ऑनलाईन गेमिंगमध्ये 25 लाख रुपये गमावल्यावर केली बापाचीच हत्या आणि रचला दरोड्याचा बनाव

    • Author, सुरिंदर सिंह होन
    • Role, बीबीसी पंजाबी

इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या जमान्यात अनेक कामं जशी घरबसल्या करता येतात, तसंच अनेक गुन्ह्यांचा पाया देखील घरबसल्याच घातला जातो आहे.

ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंग हा त्याचाच एक भाग आहे. पंजाबमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.

ऑनलाईन गेमिंगमध्ये लाखो रुपये गमावल्यानंतर एका व्यक्तीनं एक धक्कादायक बनाव तयार केला.

या व्यक्तीनं त्याच्या वडिलांचीच हत्या केली आणि त्यानंतर कट करत एक खोटी कहाणी तयार केली. दरोडेखोरांनी वडिलांची हत्या केल्याचा बनाव त्यानं तयार केला.

ही घटना आहे पंजाबच्या दक्षिण भागातील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील मराह कलान या गावातील.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्यारजीत सिंग नावाच्या व्यक्तीनं ऑनलाईन गेमिंगमध्ये 25 लाख रुपये गमावल्यानंतर स्वत:च्याच वडिलांची चाकूनं हत्या केली.

6 सप्टेंबरला श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बारिवाला पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्यानं ही हत्या केली.

पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केल्यानंतर मुलानंच वडिलांच्या हत्येचा बनाव केल्याची बाब उघड झाली.

तुषार गुप्ता श्री मुक्तसर साहिब जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) आहेत. ते म्हणाले की, प्यारजीत सिंग याला संशयावरून अटक करण्यात आल्यानंतर त्याचे वडील लखबीर सिंग यांच्या हत्येचं गूढ उलगडलं.

हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला पोलिसांनी प्यारजित सिंगला अटक केली.

ऑनलाईन गेमिंगमध्ये 25 लाख रुपये गमावले आणि बनाव रचला

पोलिसांनी सांगितलं की, प्यारजीत सिंग ऑनलाईन गेम्स खेळताना जुगारात लाखो रुपये हारला. दरम्यान त्याचे वडील लखबीर सिंग यांनी त्याच्याकडे त्या पैशांचा हिशोब मागण्यास सुरुवात केली.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणाले की, "6 सप्टेंबरला प्यारजीत सिंग त्याच्या वडिलांना चंदीगड येथे उपचारासाठी कारमधून घेऊन जात होता. प्राथमिक तपासात आढळलं की, प्यारजीत सिंगनं माराह कालन गावाजवळ चाकूनं त्याचे वडील लखबीर सिंग यांची हत्या केली.

"त्यानंतर प्यारजीत सिंगनं आरडाओरडा केला आणि सांगितलं की चार-पाच दरोडेखोरांनी त्यांच्या कारला घेरलं आणि त्याच्या वडिलांवर हल्ला केला."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर प्यारजीत सिंगनं चाकूच्या साहाय्याने कारची तोडफोड देखील केली.

वरिष्ठ पोलिस अधिकक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी कलम 103 (1), 304, 62, 324 (3), 191 (3), 190 बीएनस आणि आर्म्स अॅक्टचं कलम 25 27, 54, 59 अंतर्गत बारिवाला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

हेही जरुर वाचा:

पोलिसांच्या प्राथमिक तपासातून काय समोर आलं?

पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा प्यारजीत सिंगला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली, तेव्हा त्यानं सांगितलेली दरोड्याची कहाणी खोटी असल्याचं समोर आलं.

प्रत्यक्षात प्यारजीत सिंग याने ऑनलाईन गेम्समध्ये 25 लाख रुपये गमावले होते. त्याच्या वडिलांनी या पैशांबद्दल त्याला अनेकवेळा विचारलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्यारजीत सिंगनं सांगितलं की त्यांनं अनेक पद्धतीनं त्याच्या वडिलांची या पैशांबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वडील त्याला या पैशांबद्दल विचारतच राहिले.

अखेर त्यानं वडिलांना सांगितलं की त्यानं हे पैसे चंदीगढमध्ये एका व्यवसायात गुंतवले आहेत.

प्यारजीत सिंग यानं असं सांगितल्यानंतर देखील लखबीर सिंग त्याच्याकडे या पैशांचा हिशोब मागत होते. त्यानंतर हत्येची ही दुर्दैवी घटना घडली आणि पोलिस तपासात उघड झाली.

ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंग काय असतं?

जगाच्या बहुतांश भागांमध्ये विविध प्रकारचे ऑनलाईन गेम्स खेळले जातात.

या खेळामागचा उद्देश मुख्यत: मनोरंजन करणं आणि एखादा टास्क पूर्ण करून तुमच्या मेंदूला एक प्रकारचा व्यायाम देणं हा असतो.

ऑनलाईन गेमिंगशी निगडीत अॅप्स किंवा गेम्स हे बहुतांश वेळा निशुल्क किंवा मोफत असतात.

तर दुसऱ्या बाजूला ऑनलाईन गॅम्बलिंग किंवा जुगाराचा विचार करता भारतात अनेक ठिकाणी त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

भारताच्या कोणत्याही भागात कोणत्याही स्वरुपातील गॅम्बलिंग (जुगार) हा एक गुन्हा आहे.

ऑनलाईन गॅम्बलिंग किंवा जुगारात पैशांची देवाणघेवाण होते किंवा व्यवहार होतात. त्यात जिंकण्या किंवा हारण्यासाठी पैसे लावले जातात, त्यालाच बेटिंग म्हणतात.

तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांसारख्या भारतातील काही राज्यांमध्ये ऑनलाईन गॅम्बलिंग किंवा जुगारावर संपूर्ण बंदी आहे.

ऑनलाईन गेमिंगचा मनावर काय परिणाम होतो?

डॉ. इंदरवीर सिंग गिल हे पंजाबच्या आरोग्य विभागातील निवृत्त वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. मानसिक आजारांचे तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

ते म्हणतात, "ऑनलाईन गॅम्बलिंग गेम्स किंवा गॅम्बलिंगचा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो."

हे गेम्स किंवा अॅप विकसित करणारे हा खेळ खेळणाऱ्यांची मानसिकता सुरुवातीच्याच टप्प्यात ओळखतात.

"ऑनलाईन गेमिंग किंवा गॅम्बलिंगच्या व्यवसायाशी संबंधित लोक हे गेम्स खेळणाऱ्या व्यक्तीला बेटिंगच्या पहिल्या फेरीत काही पैसे जिंकू देतात."

डॉ. गिल म्हणतात, "यासंदर्भातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे लहान मुलं खेळत असलेल्या गेम्समध्ये देखील अशा व्यक्तींचा शिरकाव असतो."

ऑनलाईन गॅम्बलिंग गेम्स तो खेळणाऱ्या व्यक्तीला मानसिक दृष्ट्या कमकुवत करतात. त्यामुळे त्यात गुंतलेल्या व्यक्तींना हा खेळ खेळण्याची सवय सोडणं जड जातं. एकप्रकारे त्यांना या गेम्सचं व्यसनच जडतं.

इंटरनेट लिंक्स, वेबसाईट्स किंवा मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून बहुतांश लोक बेटिंग किंवा गॅम्बलिंगच्या या बेकायदेशीर व्यवसायात जोडले जात असल्याची बाब देखील स्पष्ट झाली आहे.

डॉ. गिल म्हणतात की, "या व्यवसायात सहभागी असलेले लोक नव्या लोकांना या गेम्सच्या चक्रात ओढण्यासाठी मोफत सेवांचं आमिष दाखवतात किंवा मोफत सेवा पुरवतात. नंतरच्या टप्प्यात हे लोक गेम्स खेळणाऱ्यांना पैशाचं आमिष दाखवतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की अनेकजण या गेम्सच्या जाळ्यात अडकले जातात.

"याच टप्प्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे गमावण्यास किंवा गेम्स खेळणाऱ्यांचा खिसा रिकामा होण्यास सुरुवात होते. यातून त्या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडते. हेच कारण आहे की अशा ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्याची किंवा एखाद्याची हत्या केल्याची प्रकरणे घडतात."

भारत सरकारनं ऑनलाईन गेमिंगवर कोणते निर्बंध लादले आहेत?

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे यासंदर्भातील आदेश अतिशय कडक स्वरुपाचे आहेत.

मंत्रालयाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण विभागानं अलीकडेच एक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत, जुगार किंवा गॅम्बलिंगशी निगडीत कोणत्याही गोष्टींवर संपूर्ण बंदी आहे.

डॉ. इंदरवीर सिंग गिल, लोक याप्रकारचे ऑनलाईन गेम्स का खेळतात, त्यामागचं कारण सांगतात. ते म्हणतात की, जरी देशात ऑनलाईन गेम्स किंवा बेटिंगवर बंदी असली तरी लोक या गेम्सशी जोडलं जाण्यामागचं कारण लोकांची पैशांशी संबंधित मानसिकता हेच आहे.

ते पुढे सांगतात की, "पूर्वी दसरा-दिवाळी सारख्या सणांच्या वेळेस लोक ठराविक ठिकाणी एकत्र बसून जुगार खेळायचे, अशा गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. अशा परिस्थितीत जुगार खेळणाऱ्या लोकांवर कायद्यानं कारवाई करणं पोलिसांसाठी सोपं होतं.

"मात्र आजच्या इंटरनेट आणि मोबाईल फोनच्या जमान्यात परिस्थिती बदलली आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. त्यावर इंटरनेट आणि अॅप्सच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशाप्रकारचं बेटिंग किंवा गॅम्बलिंग कुठेही बसून सहजपणे करता येतं. त्यावर नियंत्रण ठेवणं पोलिसांसाठी अवघड होतं.

"त्यातच चटकन पैसे कमावण्याच्या मानसिकतेमुळे लोक ऑनलाईन गॅम्बलिंग गेम्स, गेमिंग अॅप्स किंवा इतर साधनांकडे ओढले जातात आणि त्यात अडकतात.

"दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन व्यवहारांसह सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी वेगळा कायदा आहे. मात्र इंटरनेटच्या जमान्यात याप्रकारचा गुन्हा रोखण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)