पूर आला, तिजोरी पाण्याने भरली आणि कुटुंबाचं 200 वर्षांचं त्रासदायक रहस्य उलगडलं

    • Author, ऑर्यन कॉक्स
    • Role, बीबीसी न्यूज, स्कॉटलँड

रिचर्ड ब्लेक यांनी लहापणापासूनच आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचे किस्से ऐकले होते. त्याबद्दल त्यांना थोडीफार माहिती देखील होती, पण 1990 च्या दशकात आलेल्या पुराने त्यांच्यासमोर ट्रान्सअटलांटिक गुलामांच्या व्यापारातील त्यांच्या पूर्वजांच्या भूमिकेचं भयानक वास्तव समोर आणलं.

लहान असताना त्यांना त्यांच्या आजीने कुटुंबाविषयी सांगितलेल्या ऐतिहासिक गोष्टींविषयी कुतूहल वाटायचं. पण त्यांच्या घरी असलेल्या तलवारी, ब्लोपाइप, जमीन - जुमला यामुळे तर ते त्या गोष्टींकडे अधिक आकर्षिले जायचे.

ब्लेक हे पर्थशायरमधील किलग्रास्टन हाऊसचे वंशज आहेत. तर राणी व्हिक्टोरियाचं चित्र काढणारे प्रसिद्ध चित्रकार सर फ्रान्सिस ग्रँट आणि 19 व्या शतकातील शिल्पकार मेरी ग्रँट हे ब्लेक यांच्या मातुल घराण्याशी संबंधित आहेत.

ते सांगतात, त्यांनीही काही काळासाठी कलाकृतींमध्ये रस घेतला होता. पण कौटुंबिक विशेषाधिकार आणि संपत्ती यामागे नेमकं काय दडलंय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. हे अगदीच रहस्यमय असल्याचं ते सांगतात.

90 च्या दशकात ब्लेक हे पर्थमधील एका बँकेसाठी कायद्याची प्रॅक्टिस करत होते. जानेवारी 1993 मध्ये या बँकेजवळच्या टे नदीला पूर आला.

कायदेशीर कागदपत्रे ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँकेच्या तिजोरीत सुमारे 2.5 फूट (1 मीटर) गढूळ पाणी भरलं होतं.

ही तिजोरी साफ केली तेव्हा ब्लेक यांच्या टेबलवर किलग्रास्टनचे बॉक्स ठेवण्यात आले.

या बॉक्समध्ये त्यांना 1787 मधील किलग्रास्टन इस्टेट त्यांच्या पूर्वजांना विकल्याची पावती सापडली.

रिचर्ड सांगतात, "ही इस्टेट पर्थच्या दक्षिणेकडे आहे. 20 लाख पौंड इतकी किंमत असलेली संपत्ती विकत घेणं जॉन ग्रँटना कसं परवडलं हा प्रश्न मला पडला. हे कोड उलगडणं आता माझ्यासाठी महत्वाचं होतं."

"त्यानंतर माहिती गोळा करत असताना जमैका आणि स्कॉटलंडच्या गुलामगिरीत त्यांचा सहभाग असल्याची माहिती माझ्यासाठी विस्फोटक ठरली."

त्याच्या संशोधनातून ब्लेक यांना कळलं की जॉन आणि त्यांचा भाऊ, फ्रान्सिस यांनी तरुण असतानाच 1750 च्या दशकात स्कॉटलंड सोडलं. ही दोन्ही चित्रकार सर फ्रान्सिस यांची मुलं होती.

जमैकाला जाण्यापूर्वी त्यांनी कॅनडातील नोव्हा स्कॉशिया येथे काही वर्षे काम केलं.

ब्रिटिश साम्राज्यातील साखरेचं प्रमुख उत्पादन याठिकाणी व्हायचं. 1800 सालापर्यंत इथली सुमारे एक तृतीयांश इस्टेट स्कॉटिश लोकांच्या मालकीची होती. आणि इथलं साखर उत्पादन गुलामगिरीवर अवलंबून होतं.

याठिकाणी गेल्यावर जॉन आणि फ्रान्सिस ग्रँट यांनी स्कॉटिश लोकांचे वकील म्हणून काम केलं.

जॉन अखेरीस जमैकाचे मुख्य न्यायाधीश बनले तर त्यांच्या भावाने फ्रान्सिस ग्रँटने काही जमीन आणि गुलाम विकत घेतले

ब्लेक सांगतात की, ब्रिस्टल जहाजाबद्दल मिळालेली अस्पष्ट माहिती वाचल्यानंतर त्यांना दाट संशय आला की, फ्रान्सिस ग्रँट गुलामांचा व्यापार करत असावा.

कारण त्यावेळी ब्रिस्टल हे गुलामांचं प्रमुख बंदर होतं. कॅरिबियन बेटांवर गुलामांचं शोषण करून साखर, रम आणि कोको यासारख्या पदार्थांचं उत्पादन केलं जायचं. हेच पदार्थ ब्रिस्टल बंदरावर जहाजातून आणले जायचे. आणि पुढे गुलाम आणायला पश्चिम आफ्रिकेत जायचे.

ब्लेक सांगतात, "गुलामगिरीच्या हे संबंध उघड करणं माझ्यासाठी खरंच खूप धक्कादायक होतं."

"माझ्या वारशाबद्दल मला जे काही वाटायचं त्याच्यावर या सगळ्याचा परिणाम झाला आहे."

ग्लासगो विद्यापीठातील इतिहासाचे व्याख्याते डॉ. स्टीफन मुलेन म्हणाले की, ब्लेकच्या पूर्वजांसारख्या लोकांनी स्कॉटलंडमध्ये आणलेली संपत्ती प्रचंड होती.

ते सांगतात की, "1784 ते 1858 दरम्यान वेस्ट इंडिजमधील स्कॉटिश लोकांनी परत येताना आणलेली संपत्ती 89.4 कोटी युरोच्या समतुल्य होती.

आपल्या पूर्वजांचा गुलामगिरीशी संबंध असलेल्या ट्रेव्हेलियन्स या कुटुंबाने ग्रेनेडाच्या गुलामांची माफी मागून भरपाई देण्याचं मान्य केलं आहे.

30 वर्षांपासून बीबीसी मध्ये काम करणाऱ्या लॉरा ट्रेव्हलियन यांनी गुलामांसाठी पूर्णवेळ भरपाई प्रचारक बनण्यासाठी बीबीसी सोडलं.

1833 मध्ये ब्रिटिश सरकारने गुलामगिरी रद्द केली तेव्हा ट्रेव्हेलियन्सप्रमाणे ग्रँट कुटुंबाला देखील त्यांच्या मालकीच्या गुलामांना भरपाई द्यावी लागली.

ब्लेक सांगतात, "ग्रँट कुटुंबाचा वंश 1950 मध्ये संपला तर 19व्या शतकात त्यांची उर्वरित संपत्तीही नाहीशी झाली."

ते म्हणतात, "मला वाटतं की जर नुकसानभरपाई द्यायचीच असेल तर ती कायदे बनवणाऱ्यांना द्यावी लागेल.'

गुलामगिरी संपल्यानंतर त्यांच्या साखर उत्पादनातून मिळणारे उत्पन्न संपले. ग्रँट कुटुंबाची संपत्ती संपल्यानंतर जॉन पॅट्रिक ग्रँट यांनी किलग्रास्टन येथील इस्टेट विकली आणि 1916 मध्ये आपलं घर देशासाठी देऊन टाकलं.

ही इमारत नंतर एका कॅथोलिक धर्मादाय संस्थेने विकत घेतली आणि आता ती खाजगी बोर्डिंग शाळेसाठी वापरली जाते.

ही शाळा नुकतीच बंद होणार होती, पण पालक आणि लोकांनी देणगी दिल्यामुळे शाळा बंद होण्यापासून वाचली.

एडिंबरा कॅरिबियन असोसिएशनच्या संस्थापक, लिसा विल्यम्स सांगतात की, अशा इतर स्कॉटिश संस्थांनी आपले शोषणात्मक संबंध मान्य करण्यासाठी अनेक वर्षे मोहीम चालवली होती.

गेल्या तीन दशकांमध्ये स्कॉटलंडच्या वसाहतींच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्यात आल्याचं त्या सांगतात.

ब्लेक सांगतात की, आपली कौटुंबिक संपत्ती विकलेल्या जे पी ग्रँट, यांनी एका कागदपत्रावर लिहिलं होतं की, "ऐतिहासिक दस्तऐवज वाचणं मनोरंजक जरी असलं तरी ते खूप त्रासदायक आहे."

ब्लेक विचारतात, "मला वाटतं त्याप्रमाणे, जे पी ग्रँटने यांनी सर्व कौटुंबिक कागदपत्रांची वर्गवारी करण्यात प्रचंड रस दाखवला. पण त्यांनी हे कागदपत्रं चाळली का नाहीत?"

"घडलेल्या अत्याचाराची नोंद राहावी म्हणून त्यांनी तसं केलं का?"

ब्लेक यांनी आपल्या कुटुंबीयांविषयी, त्यांनी जमैकामध्ये त्यांची संपत्ती कशी कमावली याविषयी शुगर, स्लेव्हज आणि हाय सोसायटी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी ग्रँट बंधूंच्या कृतींच वर्णन "नैतिकदृष्ट्या घृणास्पद" असं केलं आहे.

"मी सर्वकाही त्या पेटीत बंद करून ठेवू शकलो असतो. पण माझ्या कुटुंबासाठी आमच्या पूर्वजांची पार्श्वभूमी जाणून घेणं खूप महत्वाचं होतं. हे सत्य सर्वांसमोर आलं आणि त्यावर चर्चा झाली हे योग्यच झालं."

"हे पचवायलाच मला 30 वर्षं लागली आहेत."

"मी समजू शकतो की, त्यांना पैसे कमावण्यासाठी कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केलं. पण एक नैतिक प्रश्न माझ्या डोक्यात अजूनही घोळ घालतो आहे तो म्हणजे, हे कायमच माझ्यासोबत राहील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)