मेसालिना : सलग 25 तास सेक्स करून वेश्यांशीही स्पर्धा जिंकणारी रोमन सम्राज्ञी

प्राचीन रोमन साम्राज्य हे कट-कारस्थान, कुरघोडी आणि षडयंत्रांच्या सुरस कथांनी ठासून भरलेलं आहे.

क्रूर राजकारण, संशयास्पद मृत्यू, कारस्थान आणि डावपेचांच्या या रोमन जगतात व्हॅलेरिया मेसोलिना नावाची एक साम्राज्ञी होऊन गेली.

मेसोलिनाने रोमन सत्ताकारणाच्या या स्पर्धेला एका वेगळ्याच पातळीवर नेलं. तिच्या कहाणीत केवळ सत्तेसाठीची स्पर्धा आणि डावपेच नाहीत, तर लैंगिक इच्छेच्या स्पर्धेचाही समावेश आहे.

याचा पुरावा म्हणून प्लिनी द एल्डर (इसवी सन 77) यांनी 'एनसायक्लोपीडिया ऑफ नॅचरल हिस्ट्री' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, 'मनुष्य हा एकमेव प्राणी आहे, जो लैंगिकदृष्ट्या अतृप्त आहे.’ याचा संदर्भ आपल्याला घेता येईल.

मेसोलिना याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाते.

एका रोमन लेखकाच्या म्हणण्यानुसार, 24 तासांत सर्वाधिक पुरुषांशी कोण संभोग करू शकतो, हे पाहण्यासाठी मेसालिनाने वेश्यांसोबत स्पर्धा केली होती.

रात्रंदिवस 25 तासांच्या अखंड संभोगानंतर महाराणी मेसोलिनाने या स्पर्धेत विजयही मिळवला.

मात्र, या कथेमुळे मेसालिनाची पुढील काळात प्रचंड बदनामी करण्यात आली.

तिच्याबाबत रचलेल्या कथांमुळे तिचा स्वभाव नेमका कसा होता, याबाबत ठावठिकाणा लागणं कठीण आहे.

कारगिल मार्टिन यांच्या "मेसालिना: ए स्टोरी ऑफ एम्पायर, स्लँडर अँड अॅडल्टरी" या पुस्तकामध्ये तिच्याबाबत सविस्तर लेखन करण्यात आलेलं आहे.

अनपेक्षितरित्या सत्तापदावर

मेसालिना ही रोमन सम्राट क्लॉडियसची तिसरी पत्नी होती. क्लॉडियसने आपल्या कार्यकाळात रोमन साम्राज्याचा उत्तर आफ्रिकेपर्यंत विस्तार केला.

मेसोलिनाचा जन्म नेमका कधी झाला, याची नोंद नाही. पण, तिने क्लॉडियसशी लग्न केले तेव्हा तिचे वय 15-18 वर्षांच्या दरम्यान असावं, असा अंदाज आहे. पण दोघांचं लग्न झालं, त्यावेळी क्लॉडियस वयाच्या पन्नाशीकडे पोहोचला होता.

मेसालिनाचा जन्म त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबात झालेला होता. तिचा नवरा क्लॉडियस महाराजा असला तरीसुद्धा मेसोलिना कधी सम्राज्ञी होईल, याची शक्यता नव्हती.

नंतरच्या काळात क्लॉडियस आजारी होता. पायाचं अपंगत्व, वृद्धत्व आणि अनाकर्षक आणि वर्तन योग्य नसल्याने क्लॉडियसला सगळेच कंटाळले होते.

क्लॉडियसने इतिहासाची पुस्तके लिहिण्यासाठी पुढचा बराच काळ घालवला. त्याला या कामात रस होता.

क्लॉडियसचा पुतण्या सम्राट कॅलिगुला याने त्याला काऊन्सिल आणि सेनेटर म्हणून नियुक्त केलेलं होतं.

पण, 24 जानेवारी इसवी सन 41 रोजी कॅलिगुलाची हत्या झाल्यानंतर क्लॉडियस अनपेक्षितपणे सत्तेवर आला.

रोमन साम्राज्याच्या प्रेटोरियन गार्डच्या सैन्याने त्याला सम्राट म्हणून मान्यता दिली.

राजकारणात बदल

क्लॉडियस हा ज्युलिओ-क्लॉडियन वंशाचा चौथा सम्राट होता. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर जनतेला ते अंगवळणी पडणं सुरू झालं होतं.

खरं तर, पूर्वीच्या काळात रोम हे प्रजासत्ताक होतं. निवडून आलेले मॅजिस्ट्रेट आणि सिनेटर्स मिळून हे राज्य चालवायचे.

ज्युलियस सिझर आणि पॉम्पी द ग्रेट यांच्यातील तुंबळ युद्धात ज्युलियसचा विजय झाला.

यानंतर इसवी सन 27 साली त्याचा दत्तकपुत्र ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता.

जवळपास 50 वर्ष चाललेल्या गृहयुद्धानंतर ऑगस्टसने निरंकुश सत्तेच्या माध्यमातून रोमला शांतता, समृद्धी आणि स्थैर्य दिलं.

इथूनच येथील राजकारणात बदल झाल्याचं पाहायला मिळतं. तेव्हापासूनच असेंब्ली आणि सार्वजनिक व्यासपीठावर सुरू असलेलं राजकारण शाही न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं.

तेव्हापासूनच एखाद्या व्यक्तीची ओळख आणि पद हे सिनेटमधील त्याच्या स्थानावरून नव्हे तर सम्राटाच्या किती जवळ आहोत, यावरून होऊ लागलं.

कॅलिगुला रोमन सम्राट असताना मेसालिनाने हे सगळं पाहिलं.

सम्राटाच्या जवळ राहून कोणताही शक्ती आणि संधी मिळवू शकते, हे तिने ओळखलं. पण या सगळ्या सत्तेच्या खेळात जीवाला धोकाही असतो, हे तिच्या लक्षात आलं.

शिकलेले धडे

रोमन साम्राज्यातील राजकारण क्रूर होतं. क्लॉडियस आणि मेसालिना यांना त्यांच्यासमोरील धोक्याची चांगलीच जाणीव होती. आपल्या पूर्वजांचं काय झालं, त्यांनी पाहिलेलं होतं.

सम्राट कॅलिगुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला ठार मारून मांसाचे तुकडे खाल्ल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.

कॅलिगुलासोबतच त्याची पत्नी आणि मुलगीही मारली गेली. कारगिल मार्टिन यांनी बीबीसी हिस्ट्री एक्स्ट्राशी बोलताना सांगितलं, “भविष्यात त्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्यांनाही मारण्यात आलं होतं.”

हा सगळा घटनाक्रम सुरू होता, त्यावेळी मेसालिना 8 महिन्यांची गरोदर होती. मुलगा ब्रिटॅनिकस त्यावेळी तिच्या गर्भाशयात वाढत होता.

मार्टिन सांगतात, “सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून तिने आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी जे जे शक्य, ते सगळं केलं. तिची संपूर्ण कारकिर्द यामध्येच गेली.

सुमारे एक दशकापर्यंतचा काळ ती साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली महिला होती.

आपलं पद वाचवण्यासाठी मेसालिना नेहमी काहीही करायला तयार असे. आपल्या राजकीय शत्रूंना संपवण्यासाठी तिने अनेक राजकीय कच रचले.

इसवी सन 48 पर्यंत ती आपल्या कामात यशस्वी ठरली. पण नंतर तिची अत्यंत नाट्यमय पद्धतीने हत्या करण्यात आली.

मेसालिनाचा नामोनिशाण मिटवला

मेसालिनाच्या हत्येनंतर तिच्या आठवणी पुसण्याचं काम सुरू करण्यात आलं.

तिचा नामोनिशाण मिटवण्यासाठी तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट नष्ट करण्यात येऊ लागली. तिच्या मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या. शिलालेखांमधून मेसालिनाचं नावही काढून टाकण्यात आलं.

पुढील काळात तिच्याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या. या सर्व अफवांनी एकत्रितपणे तिची प्रतिमा वासनाधीन स्त्री म्हणून निर्माण झाली.

मेसालिनाचं वर्णन एक नितांत सुंदर स्त्री म्हणून केलं जातं. तिचे घनदाट केस, गोलाकार नितंब आणि स्मितहास्य हे कोणत्याही पुरुषाला तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसं होतं. पुढे तिच्याबाबत अनेक कथा रचून तिला त्यामध्ये नायिक बनवण्यात आलं.

कवी डेसिमो ज्युनियो जुवेनल यांनी मेसालिनाबाबत केलेल्या लेखनात तिचं वर्णन ‘शाही वेश्या’ असं केलेलं आहे.

पुस्तकात तिच्याबाबत लिहिलं आहे, “नवरा क्लॉडियस झोपी जाताच, ती वेश बदलून विग घालून बाहेर पडायची. कुणाच्याही लक्षात येऊ न देता ती वेश्यागृहात दाखल व्हायची. तिथे अनेक ग्राहकांसोबत नग्न झोपायची,’

याच दरम्यान तिने सलग 25 तास सेक्स करून वेश्यांसोबत स्पर्धा जिंकल्याची कथाही चवीने सांगितली जाते.

मेसालिनाबाबतच्या अशा कथाच शतकानुशतके चित्रपटांसाठी प्रेरणा ठरल्या.

असामान्य स्त्री

प्राचीन रोमच्या इतिहासकारांनी चुकीची व्याख्या केलेली मेसालिना ही एकमेव स्त्री नव्हती. इतर अनेकांबाबतही असं घडलेलं आहे.

परंतु, यामध्ये मेसालिनासारखी प्रसिद्धी इतर कोणत्याही व्यक्तीला मिळाली नाही, असं इतिहासकारांना वाटतं.

पुस्तकांमध्ये मेसोलिनाचा उल्लेख एक असामान्य स्त्री म्हणूनही करण्यात आलेला आहे, हे विशेष. पण असं असलं तरी तिच्या चरित्राबाबत अफवा पसरवून तिची मांडणी एक अत्यंत वाईट स्त्री म्हणून करण्यात आली.

रोमन साम्राज्यात स्त्रियांची निंदा करण्यासाठी प्रणय हा एकमेव मार्गही नव्हता. तर इतर अनेक मार्गांनी त्यांच्याविषयी भ्रम पसरवण्यात आलेले आहेत.

उदाहरणार्थ, मेसालिनाची वारस अॅग्रिपिना हिला देखील एक अतिशय धोकादायक, दुष्ट स्त्री म्हणून चित्रित करण्यात आलेलं आहे. पण तिच्याबाबतच्या कहाण्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत.

विचित्र शेवट

मेसालिनाबद्दल जे काही बोललं जातं, ते पूर्णपणे खोटं नाही. रोमन इतिहासकारांनी तर ‘मेसालिना’ हे नाव हे अनियंत्रित प्रणयसाठी टोपणनाव म्हणून चित्रित केले आहे. ते सर्वच खोटं आहे, असं म्हणून ते नाकारता येणार नाही.

कारगिल मार्टिन सांगतात, “अफवांचा भाग वगळल्यास काही तर्कसंगत गोष्टीही मेसालिनाबाबत पुढे आल्या आहेत. उदा. तिचे मेस्टर नामक अभिनेत्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. तो त्यावेळचा सर्वात मोठा अभिनेता होता. त्याव्यतिरिक्त रोमन साम्राज्यातील त्यावेळचा सर्वांत सुंदर अरिस्टोक्रॅट (मंत्रिमंडळ सदस्य) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाईस सिलियस याच्यासोबतही तिचे संबंध होते.

वयाच्या 48 व्या वर्षी एका नाट्यमय घटनेत मेसालिनाचा मृत्यू झाला. त्यावेळी क्लॉडियस हा किनारी भागातील ओस्टिया शहरात गेला. त्यावेळी, मेसालिना आणि गाईस सिलिअस पिकालोटू यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.

क्लॉडियसच्या अनुपस्थितीत दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर बंड आणि रोमचं सिंहासन ताब्यात घेण्याचीही योजना आखलेली होती.

याबाबत अनेक इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. रोमन इतिहासकार टॅसिटस लिहितात, “त्या दिवशी दोघे साक्षीदारांच्या उपस्थितीत लग्न करण्यासाठी भेटले. पाहुण्यांसोबत त्यांनी जेवण केलं. कार्यक्रम आटोपला. त्यानंतर मेसालिना आणि गाईस सिलियस यांनी रात्र एकत्रित घालवली.”

ते पुढे लिहितात, “मी त्यात कोणतीही काल्पनिक कथा जोडलेली नाही. मी माझ्या पूर्वजांकडून लिखित आणि तोंडी ऐकलेल्या गोष्टीच नोंदवल्या आहेत."

पुढे, क्लॉडियस रोमला परतले. स्वाभाविकपणे त्यांना मेसालिना आणि सिलियस यांच्या लग्नाबाबत माहिती मिळाली.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी मेसालिनाचा माजी प्रियकर आणि सम्राटचा सल्लागार असलेल्या नार्सिसो याने पुढाकार घेतला.

काही तासांतच सिलिअस, मेस्टर यांच्यासह मेसालिनाच्या इतर 8 प्रेमींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध खटला भरून फासावर चढवण्यात आलं.

यानंतर मेसालिना आपल्या पतीशी – क्लॉडियसशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण नार्सिसोने तिला त्यापासून रोखलं.

दरम्यान, क्लॉडियसने पत्नी मेसालिनासंदर्भातील खटल्याची सुनावणी दुसऱ्या दिवशी घेण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी खटल्यादरम्यान क्लॉडियस पुन्हा आपल्या पत्नीच्या प्रेमात पडेल आणि तिला माफ करेल, ही भीती नार्सिसोला होती.

त्यामुळे, मेसालिनाला सुनावणीपूर्वीच मारण्यासाठी नार्सिसोने मारेकरी पाठवले.

त्यावेळी, रोममधील एका निर्मनुष्य बागेत एकटी असलेल्या मेसालिनाला हे सगळं षडयंत्र लक्षात आलं. बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने इतरांच्या हातून मरण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिने केला.

पण त्याआधीच एका मारेकऱ्याने तिला गाठून तिच्या छातीवर चाकू खुपसल्याने तिचा मृत्यू झाला.

मेसालिनाच्या हत्येची बातमी क्लॉडियसला कळली. पण या हत्येचा त्याने कोणताही खुलासा मागितला नाही.

यानंतर क्लॉडियसने आणखी एक ग्लास वाईन मागितली. वाईनचे घोट घेत तो शांतपणे बसून होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)