You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राणी रुपमती : पतीला पराभूत करणाऱ्यासोबत लग्न करण्यापेक्षा जिने विष पिणं पत्करलं
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक, लाहोर
16 व्या शतकात माळवा प्रांतात रुपमतीच्या रूपाची चर्चा होती. हा माळवा प्रांत आजच्या दिल्लीपासून दक्षिणेकडे जवळपास 700 किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र ही राज्य मिळून बनला होता.
लेखिका मालती रामचंद्रन यांच्या मते, या माळवा प्रांतातून नर्मदा नदी जायची, तिच्या वाहण्याने एक सुंदर संगीत तयार व्हायचं. एकदा बाज बहादूर शिकारीसाठी निघाला. नदीकाठाने चालत असताना त्याला गाण्याचा मधुर आवाज आला.
हवेत चमेलीचा सुगंध भरलेला होता. तो आवाजाच्या रोखाने जायला लागला.
"चालता चालता एका मोठ्या झाडाखाली त्याला गाणारी मुलगी दिसली. तिला न्याहाळत तो तिथेच थांबला. ही मुलगी जेव्हा वरच्या स्वरात गायला लागली तेव्हा बाज बहादूरही तिच्या सुरात सूर मिसळून गायला लागला.
बाज बहादूर हे मियाँ बायजीद यांचं शाही नाव होतं. तसं तर तो मध्य भारतातील माळवा राज्याचा शासक होता पण संगीतावरही त्याच नितांत प्रेम होतं. तो एक उत्कृष्ट गायक असल्याची नोंद इतिहासकार अबुल फजलने देखील करून ठेवलीय.
सौंदर्य आणि संगीताचा असा मिलाफ पाहून बाज बहादूर काही क्षण हैराण झाला. त्या मुलीवर मोहित झाला. इकडे मुलीनेही थोडं अवघडल्या स्वरात स्वतःचं नाव रूपमती असल्याचं सांगितलं.
एका लोककथेनुसार, बाज बहादूरने रुपमतीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. यावर ती म्हणाली - "रेवा (नर्मदा) जेव्हा मांडू (शहर) मधून जाईल तेव्हा मी तुझ्याशी लग्न करीन."
बाज बहादूर नदीत उतरला आणि त्याने तिला हजार फूट उंच मांडूमधून जाण्याची विनंती केली.
त्यावेळी नदी म्हणाली की, "तुम्ही राजधानीत जा, तिथं जाऊन एका पवित्र चिंचेच्या झाडाचा शोध घ्या. त्या झाडाच्या मुळांमध्ये पाण्याचा झरा सापडेल आणि हा रेवाचा उगम असेल."
बाज बहादूरने चिंचेच्या झाडाचा शोध घेतला आणि त्याच्या मुळांजवळ खोदकाम केलं. अशापद्धतीने तिथे तलाव झाला आणि रुपमतीची इच्छा पण पूर्ण झाली. या तलावाला रेवा कुंड असं नाव देण्यात आलं.
राणी रूपमतीचं नर्मदेवर असलेलं प्रेम...
रामचंद्रन लिहितात की, आता बाज बहादूरने रूपमतीला आपल्यासोबत महालात राहायला येण्यास सांगितलं. पण तिने राजासमोर आणखीन एक अट ठेवली की, ती रोज नर्मदेला भेटण्यासाठी येत राहील.
राजानेही तिला वचन दिलं. वचनाप्रमाणे त्याने त्याच्या महालात दोन घुमट तयार करून घेतले. या घुमटातून रुपमतीला तिच्या नर्मदेकडे पाहता यायचं. एकाच नजरेत सुरू झालेल्या या प्रेमकथेचा संदर्भ अहमद अल उमरी यांच्या 1599 सालच्या पुस्तकात देखील सापडतो.
एलएम करंप यांनी 1926 मध्ये या कथेचं भाषांतर करत पुस्तकाला, 'द लेडी ऑफ द लोटस : रूपमती, मांडू की मलिका : वफादारी की एक अजीबोगरीब कहानी' असं नाव दिलं.
मोहम्मद हुसेन आझाद 'दरबार-ए-अकबरी'मध्ये लिहितात की, रूपमती अशी एक स्त्री होती जिच्या सौंदर्याने बाज बहादूरला वेड लावलं होतं. या सौंदर्यात भर टाकण्यासाठी तिच्याकडे हजरजबाबीपणा होता, तिचं हसणं, गाणं, कविता यामुळे ती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उठावदार दिसायची."
करंप म्हणतात की, रूपमतीला लक्षात ठेवलं जातं ते म्हणजे तिच्या संगीत आणि कवितेतील गतीमुळे. भीम कल्याण रागाची निर्मिती देखील रुपमतीनेच केली होती.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संशोधक सय्यद बशीर हसन त्यांच्या 'मुगलों के मातहत मालवा' या संशोधनात लिहितात की, "रूपमतीचा संबंध रितीकाव्याशी जोडला जातो."
अल उमरी यांच्या पुस्तकात रूपमतीच्या 26 कविता सांगण्यात आल्यात. यातली एक कविता अशी होती की,
मोहब्बत की बुलंदियों पर चढना मुश्किल है
जैसे शाखों के बगैर खजूरों के गोल दरख़्त पर
खुशकिस्मत तो फलों तक पहुंच जाते हैं
बेनसीब जमीन पर गिर जाते हैं
रूपमती आणि बाज बहादूर यांची प्रेमकथा..
बाज बहादूर आणि रुपमतीने 1555 मध्ये मुस्लिम आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. त्यानंतर हे प्रेमीयुगुल 6 वर्ष प्रेमविलासात मश्गुल होतं.
डॉक्टर तेहजीब फातिमा यांच्या संशोधनानुसार, बाज बहादूर आपला सर्ववेळ रूपमतीसोबत व्यतीत करायचा. रूपमतीचंही बाज बहादूरवर नितांत प्रेम होतं.
वेळ तर अशी आली होती की, हे दोघेजण एका क्षणासाठीही एकमेकांपासून लांब राहू शकत नव्हते. बाज बहादूर याने स्वतःला रूपमतीच्या प्रेमात इतकं वाहून घेतलं की त्याला आपल्या सिंहासनाचा देखील विसर पडला होता.
"शेरशाह सुरीचा मुलगा सलीम शाह सूरीचा एक शक्तिशाली अमीर (शासक) दौलत खानने बाज बहादूरवर हल्ला करायचा ठरवला. पण त्याआधीच बाज बहादूरने आपल्या आईला पुढे करत इतर प्रबळ राज्यकर्त्यांशी संपर्क केला आणि दौलत खानला उज्जैन, मांडू आणि इतर काही प्रदेश देऊन टाकला."
"पुढे बाज बहादूरने संधी साधून दौलतखानाचा काटा काढला आणि सारंगपूर शहराच्या वेशीवर त्याचे शीर टांगलं. यावेळी त्याने त्याचा दिलेला प्रदेशही पुन्हा ताब्यात घेतला. नंतर रायसेन आणि भालेसा ताब्यात घेऊन आपल्या राज्याचा विस्तार केला. पण पुढे संगीत आणि भोगविलास या गोष्टींमध्ये मश्गुल झाला."
याच दरम्यान बाज बहादूरच्या सत्तेला सुरुंग लागला. राज्याकडे दुर्लक्ष केल्याने जहागीरदार आणि अधिकारी मनमानी कारभार करू लागले. त्यांना जनतेचा छळ करण्याची संधी मिळाली. आणि याच संधीचा फायदा घेत मुघल सम्राट जलालुद्दीन मोहम्मद अकबर माळव्याकडे सरकला.
मार्च 1570 मध्ये अकबराने महाम अंगाचा मुलगा अधम खानाच्या नेतृत्वाखाली माळव्यावर हल्ला करण्यासाठी सैन्य पाठवलं. बाज बहादूर सारंगपूरमध्ये राहत होता, मुघल सैन्य सारंगपूरला पोहोचलं. त्यामुळे बाज बहादूर शहरापासून तीन कोस दूर आपली छावणी टाकली.
पण अधम खानाशी तुल्यबळ असं युद्ध झालं नाही. बाज बहादूरचा पराभव करून तो नर्मदा आणि तापी नद्यांच्या पलीकडे दक्षिण-पश्चिम दिशेला खानदेशात पोहोचला. खानदेश आज महाराष्ट्रात आहे.
रूपमतीने विष प्राशन केलं...
मोहम्मद हुसेन आझाद लिहितात, "बाज बहादूरचं राजघराणं जुनं होतं. त्यामुळे त्याच्याकडे सैन्य, सोनंनाणं, जडजवाहीर, पैसा यांची कमतरता नव्हती. त्याच्याकडे हजारो हत्ती होते."
"त्याच्या तबेल्यात अरबी आणि इराणी घोडे होते. बाज बहादूरची अमाप संपत्ती मिळाल्यामुळे अधम खान खुश झाला होता. त्याने काही हत्ती अकबराकडे पाठवून दिले आणि स्वतः मात्र तिथेच राहिला."
रुपमतीच्या सौंदर्याचं वर्णन ऐकून अधम खान तिच्यावर मोहित झाला होता. त्याने रुपमतीला निरोप दिला. रुपमतीने त्याला उत्तर दिलं की, "तू निघून जा, ज्यांना तू लुबाडलंस त्यांना छळू नकोस. बाज बहादूर गेला, सोबतच सगळ्या गोष्टी संपल्या, माझं हृदयही तुटलंय."
अधम खानने पुन्हा दुसऱ्या निरोप घेऊन पाठवलं. आता रुपमतीला समजलं होतं की, हा आपली पाठ सोडणार नाही.
तिने दोन-तीनदा त्याचा प्रस्ताव टाळला पण शेवटी भेटण्याचं कबूल केलं.
त्याला भेटण्याचा दिवस उजाडला तेव्हा तिने शृंगार केला, डोक्यात फुलं माळली, अंगावर अत्तर शिंपडलं आणि झोपी गेली.
इकडे अधम खान तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. अजून वेळ मागेच होती पण न राहवून तो भेटीच्या ठिकाणी पोहोचला.
"आत जाऊन त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठलीच नाही, कारण तिने विष प्राशन केलं होतं."
रुपमतीचा अंत्यविधी सारंगपूर मध्ये करण्यात आला. या सर्व घटना जेव्हा अकबराच्या कानावर गेल्या तेव्हा तो अधम खानावर चिडला. पण अधम खानाच्या आईने म्हणजेच महाम अंगाने त्याला अंगावरचं दूध पाजलं होतं म्हणून तो शांत होता.
1561 च्या नोव्हेंबर महिन्यात अकबराने त्याचे जवळचे सेनापती अतगा खान यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. ते जिजी अनगाचे पती होते. मात्र अधम खानने अतगा खान यांचा जीव घेतला त्यामुळे अकबराने अधम खानाला मारण्याचे आदेश दिले.
पुढे जाऊन बाज बहादूरने मुघल साम्राज्याचं मांडलिकत्व स्वीकारलं. बाज बहादूरच्या मृत्यूनंतर त्याला त्याच्या प्रेयसीच्या बाजूला दफन करण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)