Mother's Day : सर्पराज्ञी संस्था, जिथे प्राण्यांना मिळते आईची माया

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

प्राण्यांवर आईसारखी माया करणाऱ्या केंद्राविषयी.

बीडच्या तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुर्नवसन केंद्रात जंगली प्राणी सहज इकडे तिकडे फिरताना दिसतात. आम्ही जेव्हा या केंद्राला भेट दिली तेव्हा आमच्या स्वागताला एक हरीण आलं होतं. या प्राण्यांना हे केंद्र म्हणजे स्वतःचं हक्काचं घर आहे. आणि हे सर्व शक्य झालंय सिद्धार्थ सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सृष्टी सोनवणे यांच्या अथक परिश्रमामुळे.

सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी त्यांचं संपूर्ण जीवन या प्राण्यांच्या उपचारासाठी त्यांच्या संगोपनासाठी वाहून दिलंय. एवढंच काय तर त्यांची मुलगी सर्पराज्ञीसुद्धा हा त्यांचा वारसा पुढे नेऊ पाहात आहे.

आम्ही जेव्हा केंद्रात गेलो. तेव्हा तिथे पिंजऱ्यात एक माकड इकडे तिकडे फिरत होतं. मस्तपैकी खालीवर लटकून खेळतं होतं. आम्ही जेव्हा त्याला नीट पाहिलं तर त्याला एक हात नसल्याचं दिसलं. हा काय प्रकार आहे असं मी जेव्हा सिद्धार्थ यांना विचारलं तेव्हा ते सांगू लागले, "या माकडिणीचं नाव ऐश्वर्या आहे. दीड वर्षापूर्वी तिच्या हाताला अशी जखम झाली होती.

ऐश्वर्याला इलेक्ट्रिक शॉक बसल्यामुळे तिचा उजवा हात पूर्णपणे जळून गेला होता. तर तिच्या काखेमध्ये आळ्या पडल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की, तो हात काढल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्पराज्ञीतच त्याचं ऑपरेशन करून त्याचा हात काढला आणि आता ती पुर्णपणे बरी झालेली आहे."

ऐश्वर्या आता मस्तपैकी तिचं आयुष्य जगत आहे. केंद्रात असलेल्या कुत्र्यासोबत ती खेळत असते. हे असे एक नाही तर अनेक उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळतात. इथे कृष्णा नावाचं एक हरण इतकं मानसाळलं आहे, की कोणी नवीन व्यक्ती केंद्रात आला तर हे हरीण त्याच्या पायाशी खेळत राहाते. कृष्णा आजारी होता तेव्हा तो या केंद्रात आला. सिद्धार्थ आणि सृष्टीनी त्याची खूप काळजी घेतली त्याला बरे केले आणि त्याला पुन्हा जंगलात सोडून दिले.

मात्र काही दिवसातच कृष्णा सर्पराज्ञीत परत आला. तो आता तिथेच राहातो. त्याला जंगलापेक्षा सर्पराज्ञीतच राहायला आवडतंय. हे सर्व प्राणी या केंद्रात आपलं हक्काचं घर असल्यासारखे वावरतात आणि सिद्धार्थ आणि सृष्टी या प्राण्यांना त्यांनी काही नुकसान जरी केलं तरी त्यांना रागवत नाहीत. सर्पराज्ञीत आतापर्यंत १६००० हून अधिक वन्यजीवांवर उपचार करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय.

आपल्या प्राणी प्रेमाबद्दल सिद्धार्थ सांगतात, "मी पहिली, दुसरीत असेन तेव्हा पासूनच मी जिथे कुठे वन्यप्राणी आजारी असतील, जखमी असतील अशांना घरी आणायचो, नीट करायचो आणि सोडून द्यायचो. लोकांनाही हे माहिती होत गेलं, की याला प्राण्यांची आवड आहे. तेव्हा लोकं मला बोलवायचे जिथे प्राणी आजारी आहे, जखमी आहे. मग मी तो प्राणी घरी आणायचो आणि त्याच्यावर उपचार करून सोडून द्यायचो. पण घरामध्ये हे प्राणी ठेवत असताना बऱ्याचवेळा जे जखमी प्राणी आहेत त्यांची दुर्गंधी सुटायची.

अशा वेळेस शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्याचा त्रास व्हायचा. तेव्हा माझे वडील मला म्हणाले आपल्या मुळगावी तागडगावला आपली शेती आहे. तिथं तू राहा आणि तिथे तू हे प्राणीसुद्धा ठेवू शकतोस आणि काम करू शकतोस. मग आम्ही डायरेक्ट शिरूर कासारवरून तागडगाव येथे आलोत. 2001 आम्ही या उजाड रानमाळावर जिथे एकही झाड नाही, पाण्याची सोय नाही. अशा डोंगर माथ्यावर आम्ही हे वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरू केलं."

लहानपणापासून सिद्धार्थची मैत्रीण असलेल्या सृष्टी पुढे त्यांच्या आयुष्याच्या जोडीदार बनल्या. सृष्टी यांनाही प्राण्यांची आवड आहे. याबद्दल सृष्टी सांगतात, "हे काम मी सिद्धार्थसोबत लहानपणापासून करत होते. त्यामुळे लग्नानंतर हे काही तरी नवीन आहे असं कधी वाटलंच नाही. आणि लहानपणापासूनच सिद्धार्थ प्राणी आणायचा. काही वेळेला मी त्याच्याबरोबर जायचे. प्राणी आणल्यानंतर आम्ही त्याच्यावरती उपचार करायचो आणि तो पूर्ण बरा झाल्यावर त्याला आम्ही निसर्गात सोडून द्यायचो."

या केंद्रात अनेक दुर्मिळ प्रजातींवरही सिद्धार्थ यांनी उपचार केले आहेत. जखमी प्राण्यांवर योग्य उपचार कसे करायचे याचा डिप्लोमाही त्यांनी केला आहे आणि जर एखादी केस खुपच सिरियस असेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीही ते मदत घेतात.

सिद्धार्थ सांगतात, "आपल्याकडे या मागील महिना दीड महिन्यात घुबड होता, गरुड होता. त्यानंतर कापशी घार होती. बहिरी ससाणा होता. अशा अनेक प्राण्यांवर पक्षांवर आम्ही उपचार करून त्यांना सोडून दिलं आहे. साधारण पणे आपल्याकडे येणारे प्राणी हे अपघातात जखमी झालेले, विहिरीत पडलेले, किंवा आजारी, अशक्तपणा आलेले असे प्राणी प्रामुख्याने जास्त येतात.

जखमी जर प्राणी असेल तर त्यावर आम्ही आयुर्वेदीक उपचार करतो. आणि होता होईल तेवढं आम्ही वन्य प्राण्यांना इंजेक्शन देण्याचं टाळतो. आणि ज्यावेळेस खुपच गरज असेल ऑपरेशन करण्याची किंवा इंजेक्शन देण्याची त्यावेळेस आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना बोलावतो. ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात."

सिद्धार्थ आणि सृष्टी यांना सर्पराज्ञी नावाची मुलगी आहे. ति सुद्धा या कामात तिच्या आईवडीलांना मदत करते. जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की, जंगली प्राणी असतात त्या प्राण्यांच्या जवळ तुमची मुलगी जेव्हा जाते तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटत का?, तेव्हा सृष्टी म्हणाल्या, "माझी मुलगी छोटी होती. तिलाही प्राण्यांची आवड लहानपणापासूनच लागली. आम्ही तिघंच इथे होतो. तीसुद्धा लहानपणापासून प्राण्यांनाच बघत आलेली.

तिने माणसं कधी जास्त बघितलीच नव्हती. त्यामुळे तिलाही प्राण्यांची भीती राहिली नाही. आणि मलापण असं कधी वाटलं नाही की, प्राण्यांपासून त्यांना कधी इजा होईल. कारण प्राणी जरी हिंस्र असला तर त्याची भीती केवळ दोन दिवस असते. आम्ही थोडं त्याच्यापासून दूरच राहातो. आणि प्रकल्पात एखादा नवीन प्राणी आला तर त्याला आम्ही लगेच नाव देतो आणि त्या नावाने बोलावतो. त्याला आपण आवाज देत राहिलो तर त्याला कळतं हे आपल्याला बोलावत आहेत. आणि आपल्याला यांच्यापासून काहीच धोका नाही. प्राण्यांना जर आपण मायेने बोलावलं, हात फिरवला तर त्यांना लगेच कळतं. मी तर म्हणते एखाद्यावेळेस माणूस धोका देईल, पण प्राणी कधीच धोका देणार नाही."

या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च हा लोकसहभागातून भागवला जातो. याबद्दल सिद्धार्थ सांगतात, "शाळेच्या जीवनापासूनच म्हणजे मी दहावीला असताना मूठभर धान्य पक्षांसाठी आणि एक रुपया पाण्यासाठी ही मोहिम राबवत आम्ही गावामध्ये झोळी घेऊन फिरायचो आणि धान्य असेल पैसा असेल त्यातून आम्ही पाणवठे, आणि पाणवठ्यांच्या भोवती धान्य टाकण्याचे काम करायचो. आणि हीच मोहिम आम्ही अजूनही राबवतो. आम्ही शासनाचा फंड घेण्याचा विचारही मनात कधी आणला नाही आणि भविष्यात घेणारही नाही. जे लोक निस्वार्थ भावनेतून आपल्याला मदत करणार आहेत साधारणपणे अशाच माणसांची आपण मदत घेतो. मग ती रुपायाची असो, दोन रुपायाची असो किंवा लाखाची असो. आम्ही पावती देत नाही. म्हणजे निस्वार्थपणे जो मदत करू इच्छितो त्याचीच मदत आपण घेतो."

या केंद्रात दर महिन्याला अनेक मान्यवर भेटी देतात. यामध्ये बॉलीवूड अभिनेता सयाजी शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांसारखी नावं आहेत. सिद्धार्थ यांच्या या कार्यासाठी त्यांना मराठी कोन बनणार करोडपतीमध्येही बोलावण्यात आलं होतं. तसंच झी मराठीचा उंच माझा झोका हा पुरस्कारही सृष्टीयांना मिळाला आहे.

सृष्टी यांना हे सर्व प्राणी म्हणजे त्यांच्या मुलांसारखी आहेत. या प्राण्यांवर उपचार करताना, त्यांना जेऊ घालताना सृष्टी यांच्यातलं मातृत्व स्पष्टपणे दिसतं. एखाद्या लेकरासोबत आई जेव्हा जेऊ घालताना बोलत असते अगदी तसेच त्या या प्राण्यांसोबत संवाद साधतात. एखादा प्राणी जेव्हा ठीक होऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात जातो तेव्हा सृष्टी यांना आपलं लेकरू दूर जातंय असं वाटतं. सृष्टी म्हणतात, "प्राणी मोठा असो की, छोटा असो तो जखमी जर असेल तर त्याला आईची गरज असतेच आणि सर्पराज्ञीमध्ये त्याला ती आईची माया मिळते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)