You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुस्लीम अधिकाऱ्यानं कुराणाची शपथ घेऊन हिंदू कुटुंबाचे प्राण असे वाचवले
- Author, मोहम्मद झुबैर खान
- Role, पत्रकार
फाळणीच्या आधी लाहोरमधल्या एका स्थानिक मशिदीच्या इमामानं एका सरकारी अधिकाऱ्याला विचारलं की, तुम्ही घरात कोणाला तरी आश्रय दिल्याच्या चर्चा या भागात ऐकल्या आहेत. कोण आहेत ते लोक?
त्यांनी उत्तर दिलं की, "माझा भाऊ आणि त्याचं कुटुंब आहे."
पण इमामांना त्यांच्या उत्तरावरून संशय आला. त्यांनी कुराण मागवलं आणि इमामांना कुराणाची शपथ घ्यायला सांगितलं. सरकारी अधिकाऱ्यानं कुराणाची शपथ घेतली आणि म्हटलं की, "ज्यांना मी घरात आश्रय दिला आहे, तो माझा भाऊच आहे."
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी उसळलेल्या धार्मिक दंगलीची झळ ही शीख आणि मुसलमानांना बसली होती. आपापला जीव वाचवून प्रवास करत असलेल्यांना दंगेखोर लक्ष्य करत होते. काही प्रवासी नशीबवान होते, ज्यांचा स्थलांतर करत असताना जीव वाचला. पण अनेकांना प्राण आणि संपत्ती गमवावी लागली होती.
जिथे त्या त्या भागातील अल्पसंख्यांकांवर हल्ले होत होते, तिथे काही प्रसंग असेही आहेत जेव्हा हिंदू आणि शिखांनी मुसलमानांच्या प्राणाचं आणि मालमत्तेचं रक्षण करण केलं होतं. मुस्लिमांनीही आपले प्राण धोक्यात घालून हिंदू आणि शिखांना मदत केली होती.
कथा-चित्रपटांमध्ये शोभेल अशी घटना
भारत आणि अमेरिकेतील अनेक पिढ्यांमध्ये लाहोरमधली या घटनेची गोष्ट सांगितली जाते. अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांनाही त्यांच्या आजीनेच सरकारी अधिकाऱ्यानं कुराणाची शपथ घेऊन एका हिंदू कुटुंबाचे प्राण कसे वाचवले याची गोष्ट सांगितली होती.
डॉक्टर तरुणजीत बोतालिया यांनी लहानपणी ही घटना इतक्या वेळेस ऐकली होती की, त्यांना या गोष्टीतली सगळी पात्रं, भाग आणि दृश्य अगदी पाठ होऊन गेले होते. अनेक वर्षांनंतर त्यांनी या घटनेची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी खूपदा पाकिस्तानमधील पंजाब, लाहोर आणि गुजरांवालाचा दौरा केला होता.
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांचं म्हणणं आहे की, "ज्यांनी कुराणाची शपथ घेतली होती, त्यांची शपथ खोटी नव्हती. त्यांनी कोणाच्या तरी मौल्यवान प्राणांचं रक्षण करत माणुसकी जिवंत ठेवली होती. शिवाय त्यांनी ज्याला भाऊ म्हटलं होतं, तो एका अर्थानं त्यांचा भाऊच झाला होता. कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून या सरकारी अधिकाऱ्यानं त्या व्यक्तीचे प्राण वाचवत नातं निभावलं होतं."
फाळणीच्या वेळी झालेल्या या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्याआधी डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेऊ.
बोतालामधील जमीनदार कुटुंब
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांचं कुटुंब फाळणीच्या वेळी गुजरांवाला इथून भारतात आलं होतं. डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहात आहेत.
तरुणजीत सिंह बोतालिया हे पंजाबचे शासक महाराजा रणजीत सिंह यांच्या दरबाराशी संबंधित होते. फाळणीच्या आधी त्यांचं कुटुंब या भागातील बडं जमीनदार घराणं होतं.
गुजरांवालामधल्या बोताला गावामध्ये त्यांची जमीन होती. म्हणूनच तरुणजीत सिंह हे आपल्या नावाच्या आधी 'बोतालिया' लावतात.
फाळणीनंतरही पाकिस्तानातील अनेक लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबाचे वैयक्तिक संबंध आहेत.
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांचे आजोबा कॅप्टन अजित सिंह लाहोरमधील एचिसन कॉलेजचे विद्यार्थी होते. बहावलपूरचे माजी नवाब, नवाब सादिक खान, जनरल मूसा खान आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे सहाध्यायी, मित्र होते. त्यांची आजी नरेंद्र कौर त्या भागातील एक प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक वर्तुळातील नामांकित व्यक्तिमत्त्व होतं.
डॉक्टर बोतालिया सांगतात की, "माझी आजी नेहमी मला भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेच्या गोष्टी सांगायची. ती सांगायची की, जेव्हा फाळणीच्या वेळी दंगे उसळले, तेव्हा लाहोरमध्ये राहणाऱ्या एक मुस्लीम सरकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने दोन महिने त्यांच्या कुटुंबाला आश्रय दिला होता. त्यावेळी त्या मुस्लीम कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी माणुसकी सोडली नाही. म्हणूनच मी त्यांच्यावर केवळ पुस्तक लिहिलं नाही, तर त्यांच्या कुटुंबाला शोधण्याचाही अनेक वर्षं प्रयत्न केला."
कुटुंबावर उपकार करणाऱ्यांसोबत पुस्तकानं जोडलं
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांनी सांगितलं की, "मी जो काही शोध घेतला त्याच्या आधारे तसंच माझ्या पूर्वजांकडून जे ऐकलं त्यावरून एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकासाठी संशोधन करत असताना मी लाहोर, गुजरांवाला आणि बोताला इथल्या माझ्या पूर्वजांच्या हवेल्यांनाही भेट दिली होती. तिथे मुलींची शाळा आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला होता."
ते सांगतात की, "मी माझ्या पुस्तकात पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टींचा समावेश केला होता. हे पुस्तक लाहोरमधील एक प्रोफेसर कैलाश यांनी वाचलं. ते स्वतः एक इतिहासतज्ज्ञ आणि संशोधक आहेत.
"मी कैलाश यांना भेटलो, तेव्हा पुस्तकात नमूद केलेल्या घटनेच्या आधारे हे कुटुंब मुस्लीम लीगचे खासदार महमूद बशीर वर्क यांचं असल्याचं कैलाश यांनी सांगितल्याचं बोतालियांनी म्हटलं."
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांनी म्हटलं की, कैलाश यांच्या भेटीनंतर मी महमूद बशीर अहमद वर्क यांच्याशी संपर्क साधला. त्यांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं. त्यांच्या पूर्वजांनी फाळणीच्या वेळी काही हिंदू आणि शिख कुटुंबांची मदत केली होती, त्यांचे प्राण वाचवले होते, एवढंच काय ते त्यांना माहीत होतं.
महमूद बशीर वर्क यांच्यासोबतच्या भेटीचं वर्णन करताना डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांनी सांगितलं की, मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांच्या विनम्र स्वभावाने खूप प्रभावित झालो होतो.
"मी त्यांना विचारलं की, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी अधिकारी होतं का? त्यांनी सांगितलं की, त्यांचे आजोबा सूबे खान हे फाळणीच्या वेळेस लाहोरमधील एक तहसीलदार होते.
मला माझ्या आजीनं सांगितलं होतं की, त्यांच्या कुटुंबाला आश्रय देणाऱ्या कुटुंबातील प्रमुख आयकर विभागातील एक सरकारी कर्मचारी होते. मग मी त्यांना विचारलं की, आमना बेगम या कोण होत्या? हे नाव ऐकल्यानंतर बशीर यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
तरुणजीत सिंह बोतालिया यांनी म्हटलं की, "जेव्हा मी माझ्या आजी-आजोबांचा जीव वाचवणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या कुटुंबातील मुलाला भेटलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणीच आलं."
महमूद बशीर वर्क यांचीही अवस्था अशीच होती. ते खरंच खूप महान लोक होते, ज्यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
"माझे आजी-आजोबा जर वाचले नसते, तर साहजिक आहे माझं कुटुंबही या जगात नसतं."
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया सांगतात की, सूबे खान हे आपले कौटुंबिक मित्र होते असं माझ्या आजीनंही मला सांगितलं होतं. जेव्हा दंगल भडकली तेव्हा सूबे खान आणि त्यांच्या पत्नीनं आम्हाला खूप वाईट अवस्थेत असताना त्यांच्या घरात आश्रय दिला होता.
फाळणीच्या वेळी परिस्थिती अशी होती की, पाकिस्तान आणि भारतातील बहुसंख्याक अल्पसंख्याकांवर निवडून निवडून हल्ला करत होते, त्यावेळी असं पाऊल उचलणं हे खूप जोखमीचं होतं.
"माझे आजी-आजोबा दोन महिने सूबे खान यांच्या सरकारी निवासस्थानात लपून राहिले होते. त्यावेळी शेजारपाजारी चर्चा सुरू झाली की, सूबे खान यांच्या घरात हिंदू किंवा शिख कुटुंबाने आश्रय घेतला आहे. त्यानंतर स्थानिक मशिदीतल्या एका इमामानं सूबे खानची चौकशी केली," असं डॉक्टर बोतालिया सांगतात.
सूबे खान यांनी कुराणाची खोटी शपथ घेतली नव्हती, कारण त्यांनी खरंच माझ्या आजोबांना भाऊ मानलं होतं. दोन महिने त्यांनी भावाप्रमाणे त्यांचं रक्षण केलं. इतकंच नाही ते घरात असताना शिखांच्या धार्मिक परंपरांचंही भान ठेवल्याचं डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया सांगतात.
घरात बनायचं दोन पद्धतीचं जेवण
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया सांगतात, "जेव्हा आम्ही हवेली सोडली तेव्हा माझे एक काका अडीच महिन्यांचे होतं आणि दुसरे काका अडीच वर्षांचे. भीषण उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही लोक कसेबसे लाहोरला पोहोचलो."
"जेव्हा आम्ही लाहोरला पोहोचलो, तेव्हा सुरक्षित स्थळी पडलोय असं वाटल्याचं माझी आजी सांगायची. सूबे खान यांच्या पत्नी आणि महमूद बशीर अहमद वर्क यांच्या आजी माझ्या दोन्ही काकांची काळजी स्वतःच्या मुलांप्रमाणेच घ्यायची."
डॉक्टर तरुणजीत सिंह बोतालिया यांच्या सांगण्याप्रमाणे, त्या आजी दोन्ही मुलांना आपल्या जवळच झोपायला घ्यायच्या. त्या त्यांची सगळी काळजी घ्यायच्या. त्यांच्या आजी-आजोबांचेही कपडे त्याच धुवायच्या. त्यांना जितकं शक्य होतं, त्यापेक्षा अधिकच काळजी त्यांनी या कुटुंबाची घेतली होती.
"त्या कुटुंबामध्ये इतकी सहिष्णुता होती, की त्यांच्या घरात मुस्लिम परंपरेप्रमाणे हलालचं जेवण बनवलं जायचं, मात्र माझ्या आजी-आजोबांसाठी शिख परंपरेनुसार जेवण बनायचं. त्यामुळेच जेव्हा मी या लोकांच्या कबरींच्या दर्शनाला गेलो, तेव्हा मी तिथे मस्तक टेकवलं नाही. त्यांच्या कबरींचं चुंबन घेऊन त्यांना श्रद्धांजली दिली," असंही बोतालिया सांगतात.
असं गाव जिथे हिंदू आणि शिख सुरक्षित राहिले
महमूद बशीर वर्क यांनी म्हटलं, "एकदा इथं अफवा पसरली होती की, आजूबाजूच्या गावांमधील शीख आमच्या गावावर हल्ला करू शकतात. त्यांचा सामना करण्यासाठी गावातील लोकही एकत्र आले. सर्वांनी बंदुका, कुऱ्हाडी आणि लाठ्या-काठ्या एकत्र करायला सुरूवात केली.
त्यांनी सांगितलं, "त्यावेळी आमच्या गावातील शिखही पूर्ण तयारीनिशी पोहोचले. त्यांनी कडं घातलं होतं . त्यांच्याकडे कृपाण आणि इतरही हत्यारं होती. शिखांनी म्हटलं की, जर या गावावर शिखांचा हल्ला झाला तर त्यांना आधी आमच्याशी संघर्ष करावा लागेल."
"त्यावेळी काय झालं हे मला आठवत नाहीये. मात्र आजूबाजूच्या गावातील हिंदू आणि शिखांनी आमच्याच गावात आश्रय घ्यायला सुरुवात केली. "
महमूद बशीर वर्क यांनी म्हटलं की, काही महिला आणि मुलांनी आमच्या घरात आश्रय घ्यायला सुरुवात केल्याचं मला आठवतंय. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझी आई आमना बेगम यांची होती. ती रात्रभर खंजीर जवळ ठेवून दरवाजावर पहारा द्यायची.
आमच्या घरात आश्रय घेतलेल्यांमध्ये दोन अनाथ मुलंही होती. ती हिंदू होती की शिख हे मला माहीत नाही, पण आई त्यांना नेहमी सोबत ठेवायची. स्वतःच्या मुलांप्रमाणे ती या दोघांची काळजी घ्यायची, असं वर्क सांगत होते.
आमच्या गावातील कोणतीही व्यक्ती लूटमार करणार नाही, असे निर्बंधही आमच्या गावानं लादले होते.
लुटलेला माल कोषागारात जमा व्हायचा
महमूद बशीर वर्क यांनी सांगितलं की, आमच्या गावामध्ये शांतता होती. मात्र आसपासच्या गावांमध्ये दंगल आणि लूटमार होत असल्याच्या बातम्या दररोज येत होत्या.
एकदा आमच्या गावातील एक जण शेजारच्या गावात जाऊन लुटीत सहभागी झाला असल्याचं समजलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन त्याच्यावर कारवाई केली आणि त्याच्या घरातून लुटीचा सगळा माल जप्त केला, असं वर्क सांगतात.
त्यांनी पुढं सांगितलं की, पाकिस्तान आणि भारत असे दोन देश अस्तित्वात आल्यानंतरही अनेक दिवस आमच्या गावात हिंदू आणि शिखांचं रक्षण केलं गेलं. हिंदू आणि शिखांना भारतात जायचं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना सुखरुपपणे शरणार्थी शिबिरांमध्ये पोहोचवलं. त्यांपैकी काही जणांना ट्रेनमध्ये बसवून दिलं. त्यांच्या घरांची आणि पशूंचही रक्षण केलं.
"मला आठवतंय की, लोक लोकांना येऊन भेटत होते. त्यांची गळाभेट घेत होते. तुमच्या संपत्तीचं रक्षण करू आणि जेव्हा गोष्टी पूर्ववत होतील तेव्हा तुमची रक्कम परत देऊ, असं आश्वासनही देत होते."
महमूद बशीर वर्क यांनी म्हटलं की, काही लोक फाळणीदरम्यान निघून गेले आणि काही जणांनी फाळणीनंतर अनेक महिन्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. गेलेले लोक कधीच परत आले नाहीत. भारतातून जे मुस्लीम शरणार्थी आले, त्यांच्याबाबतीतही असंच झालं.
"अखेरच्या दिवसांत माझे वडील मला नेहमी सांगायचे की, लोकांच्या प्राणांचं रक्षण केलं हीच माझी ओळख राहील," मेहमूद बशीर वर्क सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)