You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘मला वाटलं मी आता जिवंत राहणार नाही’, 42 तास लिफ्टमध्ये अडकल्यानंतर रविचंद्रन यांनी काय केलं?'
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
विचार करा, जर तुम्ही एखाद्या लिफ्टमध्ये अडकलात तेही काही वेळासाठी नाही तर तब्बल 42 तासांसाठी. कल्पनेनेच अंगावर काटा आला ना? आता 59 वर्षीय रविंद्रन नायर यांची गोष्ट ऐका.
गेल्या शनिवारी दुपारी (13 जुलै) ते सोमवारी सकाळी (15 जुलै) असे तब्बल 42 तास रविंद्रन लिफ्टमध्ये अडकले होते. ते केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) च्या उल्लूर युनिटचे प्रभारी आहेत.
लिफ्टमध्ये अडकल्यावर जो घटनामक्रम झाला त्याची माहिती त्यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार इम्रान कुरेशी यांना दिली. वाचा रविंद्रन यांच्याच शब्दात.
चार महिन्यांपूर्वी बाथरुममध्ये पडल्यामुळे माझ्या कमरेला मार लागला होता. त्यानंतर माझी दिनचर्या एकसुरी झाली होती.
मी आणि माझी बायको श्रीलेखा तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर ऑर्थोपेडिक स्पेशालिस्टकडे दाखवायला जातो.
गेल्या शनिवारीसुद्धा आम्ही तिथे गेलो कारण दहा वाजता माझ्या बायकोला ऑफिसला जायचं होतं. मला माझ्या पाठीचा एक्स रे करायचा होता. कारण त्याच्या मागच्या आठवड्यात मी कोल्लमला गेलो होतो आणि त्यामुळे पाठीत वेदना होत होत्या.
एक्सरे पाहिल्यावर माझ्या डॉक्टरने मला ब्लड टेस्टचा रिपोर्ट दाखवायला सांगितलं आणि बायकोला लक्षात आलं की तो घरीच राहिला आहे. मी घरी गेलो आणि तो घेऊन आलो.
यामुळे मला कामावर जायला उशीर होत होता. 12 वाजले होते आणि मला 1 वाजता पोहोचायचं होतं.
माझी बायको रुग्णालयातच काम करते त्यामुळे स्टाफसाठीची लिफ्ट मी घेतली.
‘मला वाटलं की मी आता जिवंत राहणार नाही’
मी लिफ्ट नंबर 11 मध्ये 12 वाजून पाच मिनिटांनी गेलो आणि मला लक्षात आलं की तिथे कोणी अटेंडंट नाहीये.
मात्र आत सगळं व्यवस्थित होतं. मी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बटन दाबली आणि तिथून सगळी उलथापालथ सुरू झाली.
झालं असं की लिफ्ट दुसऱ्या मजल्यापर्यंत आली आणि धाडकन खाली आली आणि दोन मजल्यांच्या मध्ये अडकली.
लिफ्टमध्ये असलेल्या आपात्कालीन नंबरला मी फोन लावला. अलार्म वाजत होता. मात्र कुठूनच काहीही प्रतिसाद आला नाही.
मी माझ्या बायकोसकट अनेकांना फोन लावले जे माझ्या मदतीला येऊ शकत होते. मात्र नेटवर्क नव्हतं.
त्यानंतर मात्र मी घाबरलो आणि लिफ्टवर जोरजोरात मारू लागतो. त्यातच अंधारात माझा फोन कुठेतरी पडला आणि तो बंद झाला.
मी ओरडून ओरडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत राहिलो. तिथे अजिबात उजेड नव्हता. मात्र काही छिद्र होते. त्यामुळे मी किमान श्वास तरी घेऊ शकत होतो.
घाबरून मी लिफ्टच्या आतच येरझारा घालू लागलो.
कोणीतरी माझा आवाज ऐकावा आणि मदतीला यावं म्हणून मी वारंवार अलार्म बेल वाजवत होतो. मात्र दिवस आहे की रात्र हे मला समजत नव्हतं.
तिथे गुडूप अंधार होता. शेवटी थकून मी झोपून गेलो.
मला वाटत होतं की आता मी जिवंत राहणार नाही. मला माझ्या बायकोची, मुला बाळांची काळजी वाटायला लागली. मला माझ्या आईवडिलांची आणि पूर्वजांचीही आठवण आली.
मग मात्र मी स्वत:ला सावरलं आणि माझं लक्ष दुसरीकडे वळवलं, जेणेकरून मी यातून बाहेर निघू शकेन
रविंद्रन यांच्याकडे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या दोन गोळ्या होत्या. मात्र पाणी नसल्याने ते त्या गोळ्या घेऊ शकत नव्हते. त्यांचं तोंड इतकं कोरडं झालं होतं की ते गिळूही शकत नव्हते.
तेव्हा रविंद्रन यांना जाणवलं की कुणीतरी ही लिफ्ट दुरुस्त करायला नक्कीच येईल.
रविंद्रन सांगतात, “जवळपास 42 तासांनंतर सोमवारी सकाळी सहा वाजले होते. लिफ्ट ऑपरेटरने मला उडी मारायला सांगितली. मी प्रचंड थकून गेलो होतो आणि खाली झोपून होतो.
कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली
रविंद्रन यांची पत्नी श्रीलेखा यांनीही बीबीसीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “एका अनोळखी नंबरवरून मला फोन आला. पलीकडून रविंद्रन बोलत होते. ते लिफ्टमध्ये अडकले होते. मी त्यांना घरी घेऊन जावं असं ते म्हणत होते.”
तोपर्यंत श्रीलेखा आणि त्यांच्या दोन मुलांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. कारण रविवारी सकाळपासून त्यांचा फोन नेटवर्कच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात होतं.
त्यांचा मुलगा हरिशंकर यांनी सांगितलं, “अनेकदा हॉस्पिटलमधून थेट कामावर जायचे. म्हणून आम्ही रविवार सकाळपर्यंत वाट पाहिली. त्यांचा फोनही तुटला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचं जीपीएस लोकेशनही सापडत नव्हतं.”
रविंद्रन चिडले होते का? किंवा त्यांची एकूणच स्थिती कशी होती या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्रीलेखा म्हणतात, “तसं पाहिलं तर ते शांत स्वभावाचे आहेच. मात्र या घटनेबद्दल बोलताना त्यांना खूप राग येतो. अशी परिस्थिती एखाद्या हार्ट पेशंटवर ओढवली असती किंवा त्यांच्या जागी कोणी गरोदर बाई असती तर काय झालं असतं? हेच ते वारंवार म्हणत असतात.”
‘जबाबदार लोकांवर कारवाई होणार’
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (16 जुलै) ज्या हॉस्पिटलमध्ये रविंद्रन यांच्यावर उपचार सुरू आहेत, तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली.
आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयाने या घटनेवर एक निवेदन जारी केलं आहे. जबाबदार लोकांविरुद्ध कोणतीही तमा न बाळगता कडक कारवाई केली जाईल असं त्यात म्हटलं आहे.
श्रीलेखा सांगतात की हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांसह त्यांनीसुद्धा या घटनेबद्दल त्यांची माफी मागितली आहे. या घटनेनंतर तीन तंत्रज्ञांना निलंबित केलं आहे आणि केरळच्या आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
लिफ्टबद्दल काय आहेत नियम?
प्रत्येक राज्यात एक लिफ्ट निरीक्षक असतो, तो मुख्य विद्युत निरीक्षक या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत असतो.
केरळ लिफ्ट आणि एस्केलेटर अधिनियम 2013 नुसार निरीक्षक हाच लायसन्सिंग ऑफिसर असतो.
निरीक्षकांकडून अपेक्षा असते की ते योग्य निरीक्षण केल्यानंतर कोणत्याही इमारतीतल्या लिफ्ट किंवा एस्केलेटर लावायला परवानगी द्यावी.
लिफ्ट किंवा एस्केलेटर लावण्याचं आणि बिघाड झाल्यावर सुधारणा करण्याचं काम सक्षम व्यक्तीकडे सोपवायला हवं.
प्रत्येक परवान्याचं वार्षिक निरीक्षण केल्यावर एक विशिष्ट शुल्क देऊन त्याचं नूतनीकरण करावं लागतं. या नियमांचा भंग केल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावला जातो.
नाव न छापण्याच्या अटीवर एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी हिंदीशी संवाद साधला.
ते म्हणाले, “या प्रकरणात कर्नाटकसारखाच केरळमध्येही नियम आहे. मात्र या विभागात इतके कमी अधिकारी आहेत की प्रत्येक बिल्डिंगचा दौरा करणं आणि निरीक्षण करणं शक्य नाही.”
ते सांगतात, “मी नुकताच चार मजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीला भेटायला गेलो होतो. लिफ्ट अचानक दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या मध्ये थांबली. लिफ्ट मध्ये दोन महिला होत्या. त्यातील एका महिला कोसळली आणि दुसरीला उलट्या सुरू झाल्या. दोघींनाही धक्का बसला होता.
या अधिकाऱ्याचा अनुभव एक उदाहरण आहे. त्यावरून रविंद्रन नायर यांना काय अनुभव आला असेल याची कल्पना करू शकता.