दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप? असा आहे 'ग्रँडमास्टर' बनण्याचा प्रवास

फोटो स्रोत, Instagram/Divya Deshmukh
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपूरच्या दिव्या देशमुख बुद्धीबळ वर्ल्डकप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतही अद्याप कुठलीच भारतीय स्पर्धक पोहोचली नव्हती. दिव्यानं अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय स्पर्धक म्हणूनही नोंद केली आणि पुढे जिंकून इतिहासच रचला.
मूळची महाराष्ट्रातल्या नागपूरची असलेली दिव्या देशमुख केवळ 19 वर्षांची आहे.
बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये दिव्याचा सामना 38 वर्षीय भारताची पहिली ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीसोबत होता. अनुभवी हम्पीचं आव्हान समोर असतानाही दिव्यानं वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं.
इतक्या कमी वयात दिव्या वर्ल्डकपपर्यंत कशी पोहोचली? कुठल्या गोष्टींनी दिव्याला इथपर्यंत पोहोचायला मदत केली? तिच्या इथपर्यंतच्या प्रवासापर्यंतचा घेतलेला हा आढावा.
दिव्या खरंतर अपघातानेच बुद्धिबळ या खेळाकडे वळली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
काही दिवसांपूर्वी दिव्याची आई नम्रता देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिव्याच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणी सांगितल्या.
नम्रता देशमुख म्हणाल्या, "दिव्या पाच वर्षांची असताना बहिणीसोबत बॅडमिंटन खेळायला जायची. पण रॅकेटचा आकार दिव्यापेक्षा मोठा असल्यानं तिला ते सांभाळत नव्हतं. त्यामुळे तिला त्याच इमारतीत असलेल्या बुद्धिबळ अकॅडेमीत प्रवेश दिला. तिथूनच दिव्याला या खेळाची ओळखी झाली."
दिव्याला 'चॅम्पियन' बनणं कसं शक्य झालं?
लहान वयातच दिव्यानं मोठं यश मिळवलं. बुद्धिबळ खेळायला लागल्यावर दोन वर्षांतच दिव्या अंडर-7 ची राष्ट्रीय विजेती बनली होती.
पुढे 2014 साली दिव्यानं अंडर-10 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मुलींमध्ये विजेतेपद मिळवलं, तर 2017 साली ती अंडर-12 गटात विश्वविजेती ठरली.
2023 मध्ये दिव्यानं आशियाई विजेतेपद मिळवलं. मग 2024 मध्ये हंगेरीत झालेल्या चेस ऑलिंपियाडमध्ये भारताला वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवून दिलं.
आता दिव्या 'वर्ल्डकप चॅम्पियन' झाली आहे.
पण हे कसं शक्य झालं? तर 'आक्रमक खेळ, प्रचंड मेहनत आणि तयारी हे दिव्याच्या यशाचं गमक' असल्याचं नागपुरातील बुद्धिबळ प्रशिक्षक गुरप्रित मारस सांगतात.

फोटो स्रोत, Instagram/Divya Deshmukh
गुरप्रित मारस यांनीच दिव्याला तिच्या वयाच्या सातव्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंत बुद्धिबळाचं प्रशिक्षण दिलंय.
गुरप्रित म्हणतात, "दिव्या तिच्या वयोगटातील मुलांपेक्षा नेहमी सरस होती. कारण ती वयाच्या पाचव्या वर्षांपासून खेळायला लागली होती. लहान वयात मुलं दोन तासात थकतात. पण दिव्याचं ठरलेलं असतं की, आपल्याला इतका वेळ बसायचं आहे.
तिच्या पालकांनीही तिला हेच शिकवलं की, मिळेल तेवढं ज्ञान घ्यायचं. त्यामुळे ती तशीच वागते आणि त्यावर मनापासून काम करते. प्रतिस्पर्धक कसा खेळतो याचा अभ्यास, जोरदार तयारी आणि आक्रमकता यामुळे तिला कुठलीही स्पर्धा सहज जिंकता येते."

फोटो स्रोत, ANI
दिव्या आतापर्यंत आंतरराष्ट्रीय मास्टर होती. आता ती भारताची 88 वी 'ग्रँडमास्टर' बनली आहे. पण वर्ल्डकप जिंकण्यासाठी ग्रँडमास्टर पदवीसाठीचा कुठलाही निकष दिव्यानं प्राप्त केला नव्हता. पण विश्वचषकासोबतच ती ग्रॅँडमास्टरही बनली. यामागचे तिची अनेक दिवसांची मेहनत आहे.
दिव्याच्या यशात तिच्या आई-वडिलांचा त्याग असल्याचं जीत ठाकरे सांगतात. जीत ठाकरे हे नागपुरातील बुद्धिबळ प्रशिक्षक असून, दिव्याच्या बुद्धिबळ खेळातील कामगिरीचे ते दिव्या अगदी पाच वर्षांची असल्यापासून साक्षीदार आहेत.
जीत ठाकरे म्हणतात, "दिव्या पहिल्यांदा बुद्धिबळ खेळायला आली होती, तेव्हा तिचे पहिले प्रशिक्षक राहुल जोशी होते. ते आता हयात नाहीत. त्यांना खात्री होती की, दिव्या मोठं नाव कमावेल. दिव्या लवकरच अंडर-7 चॅम्पियन बनली होती.
तिनं पहिली मूव्ह शिकली तेव्हापासून तिला ओळखतो. ती निकालावर विश्वास ठेवते. गेम ड्रॉ करणे, शांतपणे खेळणे यावर तिचा विश्वास नाही. ती तरुण आहे, ऊर्जा खूप आहे त्यामुळे तिला प्रत्येक गेम जिंकायचा असतो. तिची एनर्जी, तिचा आत्मविश्वास आणि तिच्या आई-वडिलांचा पाठिंबा तिला तिथपर्यंत घेऊन आलाय."
वर्ल्डकपपर्यंत पोहोचायला कुठल्या गोष्टींची गरज असते?
दिव्यानं वर्ल्डकप जिंकण्यासाठी कशी मेहनत घेतली? हे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलं. पण फिडेच्या वर्ल्डकपपर्यंत पोहोचण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज असते, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.
फिडेच्या नियमांनुसार, चेस ऑलिंपियाडमधली कामगिरी, खंडीय पातळीवरचं विजेतेपद, खेळाडूचा दर्जा दाखवणारं उच्च रेटिंग, रँकिंगमधलं स्थान, फिडेचं नामांकन आणि आयोजकांचं नामांकन यांचा विचार विश्वचषकासाठी केला जातो.
2023 मध्येही दिव्याला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण तिचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलं. यंदा मात्र तिनं ही स्पर्धा जिंकली आणि सोबतच कँडिडेट्स स्पर्धेचं तिकिटही मिळवलं. ती स्पर्धा जिंकली तर दिव्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरू शकते.
दिव्याची आक्रमक स्टाईल आणि फोकस्ड असणं हे तिच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. तिची ओपनिंगची तयारी खूप चांगली असते, असं ज्येष्ठ बुद्धिबळपटू आणि विमेन इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे सांगतात.

फोटो स्रोत, ANI
भाग्यश्री ठिपसे म्हणतात, "ओपनिंगसाठी दिव्या खूप तयारी करून आलेली होती. त्यामुळे तिनं पहिल्या क्लासिकल गेममध्ये हम्पीला धक्का दिला. कारण हम्पीला त्या ओपनिंगची अपेक्षा नव्हती. कदाचित त्यामुळे थोडा सूर बिघडला होता. पण हम्पी सावरली आणि खेळ बरोबरीत सुटला. टायब्रेकमध्ये हम्पीला चांगली पोझिशन मिळाली होती. पण तोही गेम बरोबरीत सुटला.
"दुसरा टायब्रेक खेळताना दिव्याच्या खेळामुळे हम्पी सरप्राईज झाली. दिव्या केवळ तिची तारुण्यातील ऊर्जा आणि धाडसामुळे जिंकली असं वाटतं."
दिव्यानं इतक्या लहान वयात हे सगळं करून दाखवलं.
बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला आणि वर्ल्डकप जिंकून भारतात आणणारी पहिली भारतीय महिला असे दोन्ही विक्रम दिव्यानं आपल्या नावावर नोंदवले आहेत.
त्याचसोबतच दिव्याला कँडिडेट्स स्पर्धेचं तिकीटही मिळालं आहे. ती स्पर्धा दिव्यानं जिंकली तर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ती पात्र ठरू शकते.
दिव्या नक्कीच 'वर्ल्ड चॅम्पियन' बनणार असा विश्वास तिचे चाहते, नातेवाईक आणि बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंना आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












