जगज्जेत्या नेपोलियनच्या आयुष्याचा शेवट दयनीय अवस्थेत का झाला? कसे होते त्याचे अखेरचे दिवस?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

नेपोलियन म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो एक जगज्जेता योद्धा. ज्यानं संपूर्ण युरोपात फ्रान्सचा दबदबा निर्माण केला. मात्र, या अद्वितीय योद्ध्याच्या आयुष्याची शेवटची वर्षे अतिशय कठीण अवस्थेत गेली.

एक अद्वितीय योद्धा म्हणून जो सगळ्या जगाला परिचित होता, त्याला एका आडबाजूच्या बेटावरील निवासस्थानात, कडेकोट पहाऱ्यात मृत्यूला सामोरं जावं लागलं.

नेपोलियनच्या आयुष्याची अखेर कशी झाली, त्याची माहिती देणारा हा लेख.

नेपोलियनचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव झाल्यानंतर त्याला वाटलं की आता युरोपात त्याला काहीही भवितव्य नाही. त्यामुळे त्यानं अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र ब्रिटिश नौदलाच्या जहाजांनी फ्रान्सच्या अटलांटिक महासागराकडील किनाऱ्याला अतिशय जबरदस्त वेढा घातलेला होता. त्या भागात ब्रिटिश नौदलाचं अत्यंत बारकाईनं लक्ष होतं. साहजिकच तिथून निसटणं जवळपास अशक्य होतं.

त्यामुळे नेपोलियननं ब्रिटिश नौदलासमोर शरण जाण्याचं आणि ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय मागण्याचं ठरवलं. मात्र ब्रिटन नेपोलियनला कोणतीही सूट देण्याच्या मन:स्थितीत नव्हतं.

ए एम ब्रॉडली यांनी 'नेपोलियन इन कॅरिकेचर 1795-1821' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ब्रॉडली लिहितात, "ब्रिटनच्या जनतेच्या नजरेत नेपोलियन एका पीडित व्यक्तीपेक्षा गुन्हेगार अधिक होता. ब्रिटनमधील व्यंगचित्रकार त्याला पिंजऱ्यात असलेल्या एका प्राण्यासारखंच पाहत होते."

"सर्वांचच मत असं झालं की जर नेपोलियनला ब्रिटनमध्ये ठेवलं तर तो देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान निर्माण करेल. जर त्याला ब्रिटनच्या भूमीवर किंवा जवळपासच्या एखाद्या देशात ठेवलं तरी तो भविष्यात एखाद्या बंडाचा केंद्रबिंदू होऊ शकतो."

नेपोलियनला सेंट हेलेना बेटावर पाठवण्याचा निर्णय

ब्रिटिश सरकारनं नेपोलियनला जगापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या सेंट हेलेना बेटावर ठेवण्याचा निर्णय घेतला. सेंट हेलेना हे पश्चिम आफ्रिकेजवळचं बेट ब्रिटनच्या ताब्यात होतं.

आफ्रिकेच्या मुख्य भूमीपासून हे बेट किमान 1200 किलोमीटर अंतरावर होतं.

ब्रायन उनविन यांनी 'टेरेबिल एक्साइल, द लास्ट डेज ऑफ नेपोलियन ऑन सेंट हेलेना' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांसाठी सेंट हेलेना हे एक प्रमुख विश्रांतीचं ठिकाण होतं. हे बेट म्हणजे एकप्रकारे ब्रिटिश छावणी होती. तिथे जवळपास 5000 लोक राहायचे."

"यातील काही मादागास्करमधून आणलेले गुलाम होते आणि काही चीनमधील मजूर होते. ते तिथून दरवर्षी येणाऱ्या आणि जाणाऱ्या जवळपास एक हजार जहाजांच्या देखभालीचं काम करायचे."

नेपोलियनबरोबर 27 जणांची सेंट हेलेनावर रवानगी

31 जुलै 1815 ला अॅडमिरल लॉर्ड कीथ यांनी नेपोलियनला सांगितलं की त्याला युद्धकैदी म्हणून सेंट हेलेनावर ठेवलं जाईल.

नेपोलियननं या निर्णयला प्रचंड विरोध करत म्हटलं की त्याची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला सांगण्यात आलं होतं की ब्रिटनमध्येच राहू दिलं जाईल.

ही बातमी ऐकूण नेपोलियन जहाजावरील त्याच्या केबिनमध्ये निघून गेला आणि तीन दिवस तिथून बाहेर पडला नाही. चौथ्या दिवशी त्याने ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहून त्यात त्याचा विरोध व्यक्त केला.

अॅडम जेमोइस्की यांनी 'नेपोलियन द मॅन बिहाइंड द मिथ' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "नेपोलियनबरोबर एकूण 27 जणांना सेंट हेलेनावर जाण्याची परवानगी देण्यात आली. हे सर्वजण जहाजावर चढले तेव्हा नेपोलियन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे बरंच सोनं नाणं सापडलं."

"असं काही होईल याचा नेपोलियनला आधीपासूनच अंदाज होता. त्यामुळेच त्यानं कपड्यांच्या पट्ट्यात सोन्याची नाणी ठेवून ते पट्टे त्याच्या सहकाऱ्यांच्या कंबरेला बांधले होते."

या लांबच्या प्रवासादरम्यान सागरी प्रवासात होणाऱ्या त्रासाला त्यानं चांगल्या प्रकारे तोंड दिलं. तो त्याच्या केबिनमध्ये राहून वाचन करायचा. तो खलाशांबरोबर बोलायचा. त्यानं स्वत:चं इंग्रजी सुधारण्याचाही प्रयत्न केला. 24 ऑक्टोबरला त्याला जिथे नेण्यात येत होतं ते सेंट हेलेना दिसू लागलं.

नेपोलियन आणि इंग्रजांचे संबंध बिघडले

सेंट हेलेना बेटाचं क्षेत्रफळ 122 चौ. किलोमीटर होतं. 1502 मध्ये पोर्तुगीजांनी या बेटाचा शोध लावला होता. 1815 मध्ये त्या बेटावर 3395 युरोपियन, 218 काळे गुलाम, 489 चिनी आणि 116 भारतीय आणि मलय लोक राहत होते.

बेटाचा कारभार एका लष्करी गव्हर्नरकडे होता. तिथे ब्रिटिश सैन्याची एक छोटी तुकडी तैनात करण्यात आली होती.

नेपोलियनला आधी 'द ब्रायर' या इंग्लिश एस्टेटमध्ये ठेवण्यात आलं. काही दिवसांनंतर त्याला लाँगवूड हाऊसमध्ये हलवण्यात आलं.

ब्रायन उनविन लिहितात, "तिथे नेपोलियनवर करडा पहारा ठेवला जात असे. तो बागेतून बाहेर गेल्यास त्याच्याबरोबर नेहमी एक ब्रिटिश सैनिक असायचा."

"हडसन लोव याला सेंट हेलेनाचा गव्हर्नर करण्यात आल्यानंतर नेपोलियनवरील सक्ती आणखी वाढली. 1816 साल येईपर्यंत ब्रिटिश नोकरशाहीबरोबरचे नेपोलियनचे संबंध तणावाचे होत गेले."

ब्रिटिशांनी नेपोलियनसाठी नवीन निवासस्थान बांधण्यास सुरूवात केल्यानंतर तर नेपोलियनच्याही लक्षात आलं की आता त्याच्या आयुष्याचे उर्वरित दिवस सेंट हेलेनामध्येच जाणार आहेत.

बागेत फेरफटका आणि पत्ते खेळून मनोरंजन

लॉंगवूड हाऊसमध्ये नेपोलियनचा बहुतांश वेळ वाचनात जायचा. तो युरोपातून येणाऱ्या जहाजांची वाट पाहायचा. त्या जहाजांमधून येणाऱ्या विविध पुस्तकांची वाट तो पाहत असे.

नेपोलियनचा दुसरा छंद म्हणजे, त्याला भेटायला येणाऱ्या लोकांचं स्वादिष्ट भोजन आणि मद्यानं आतरातिथ्य करणं.

जाँ पॉल बरतू, नेपोलियनच्या चरित्रात लिहितात, "नेपोलियन पाहुणचारासाठी नेहमी त्याच्या बजेटपेक्षा जास्त खर्च करायचा. तो खूप जास्त मद्य पायचा आणि पाहुण्यानांही पाजायचा."

"1816 मध्येच त्याला वाईनच्या 3700 बाटल्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यात बाओडो वाईनच्या 830 बाटल्यांचा समावेश होता."

"शारीरिक तंदुरुस्तीसाठी नेपोलियन घोडेस्वारी करायचा किंवा 'द ब्रायर'च्या बागेत फेरफटका मारायचा. कॅप्टन पॉपलेटन नेहमी त्याच्याबरोबर असायचा."

"कॅप्टन पॉपलेटनवर नेपोलियनवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. संध्याकाळच्या वेळेस तो त्याचा सहकारी बालकॉमबरोबर पत्ते खेळायचा."

सेंट हेलेनाचं हवामान आणि वातावरण नेपोलियनला रुचलं नाही

ज्या लाँगवूड हाऊसमध्ये नेपोलियनला ठेवण्यात आलं होतं, तिथलं बांधकाम अजूनही सुरू होतं.

अॅडम जमोइस्की लिहितात, "नेपोलियननं तक्रार केली की रंगाच्या वासामुळे त्याला आजारी पडल्यासारखं वाटतं. सेंट हेलेनाचं हवामान आणि तिथल्या परिस्थितीमुळे नेपोलियन आणि त्याचे सहकारी नाराज झाले होते. कारण त्यांना कोरडं हवामान, स्वादिष्ट अन्न आणि आलिशान आयुष्याची सवय होती."

ते लिहितात, "नेपोलियनबरोबर आलेले अधिकारी त्याच्यासमोर पूर्ण शाही प्रोटोकॉलचं पालन करायचे. सर्वसाधारणपणे नेपोलियन दिवसा हिरव्या रंगाचा शिकारी कोट किंवा पांढऱ्या रंगाचा लिनेनचा कोट किंवा पँट घालायचा. रात्रीचं जेवण तो पूर्ण लष्करी गणवेषात करायचा."

"त्याच्यासोबत आलेल्या महिला दरबारात घालायचे कपडे आणि दागिने परिधान करून रात्रीच्या जेवणात सहभागी होत असत. जेवणानंतर ते पत्ते खेळायचे, गप्पा मारायचे किंवा नेपोलियनला एखादं पुस्तक वाचून दाखवायचे."

नेपोलियनच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर

पहाऱ्यात असूनसुद्धा नेपोलियन बागकामाची हौस पूर्ण करायचा. या कामात त्याला दोन चिनी मजूर मदत करायचे. रोपांना स्वत:च्या हातानं पाणी घालायला नेपोलियनला आवडायचं.

खऱ्या अर्थानं नेपोलियन युद्धकैदी नव्हता आणि शिक्षा भोगणारा गुन्हेगारही नाही. एका मर्यादेपर्यंतच त्याला पायी फेरफटका मारण्याची किंवा घोडेस्वारी करण्याची सूट दिली जायची.

हे करताना देखील प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत एक ब्रिटिश अधिकारी असायचा. घराच्या आतदेखील सैनिक त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचे.

दिवसातून दोनदा एक अधिकारी नेपोलियनची समोरसमोर भेट घेऊन तो तिथे असल्याची खातरजमा करायचा.

सेंट हेलेनाचा गव्हर्नर राहिलेल्या रियर अॅडमिरल सर जॉर्ज कॉकबर्न यानं त्याच्या डायरीत लिहिलं होतं, "दोन जहाजं नेहमी बेटाभोवती चकरा मारत असत. नेपोलियन कोणतंही वृत्तपत्र वाचण्यास दिलं जात नसे. सेंट हेलेनावरून पळून जाण्याबद्दल नेपोलियननं कधी विचार केला असेल याचा कोणताही पुरावा नाही."

उलट तिथलं वातावरण आणि परिस्थितीशी नेपोलियननं असं काही जुळवून घेतलं होतं की असं वाटायचं की तो तिथे आनंदात राहतो आहे. तो सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर नम्रतेनं वागायचा.

तिथे येणाऱ्या किंवा तिथून जाणाऱ्या ब्रिटिश सैनिकांसाठी नेपोलियनला फक्त पाहणं हीदेखील खूप मोठी आकर्षणाची गोष्ट असायची.

त्यांच्याशी देखील नेपोलियन खूपच चांगला वागायचा. त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये अशा आशयाच्या बातम्या येऊ लागल्या की नेपोलियनला खूपच वाईट स्थितीत ठेवलं जात आहे.

नेपोलियन आणि गव्हर्नर लोव यांच्यात वाद

एप्रिल 1816 मध्ये मेजर जनरल सर हडसन लोव यानं अॅडमिरल कॉकबर्न यांच्या जागी सेंट हेलेनाच्या लष्करी गव्हर्नरचा पदभार स्वीकारला. मात्र सुरूवातीपासून नेपोलियन आणि गव्हर्नर लोव यांचं जमलं नाही.

अॅडम जमोइस्की लिहितात, "गव्हर्नर जेव्हा पूर्वसूचना न देताच लाँगवूड हाऊसमध्ये आला, तेव्हा नेपोलियननं त्याला भेटण्यास नकार दिला. नेपोलियननं त्याला निरोप पाठवला की तो दुसऱ्या दिवशी त्याची भेट घेईल. त्याप्रमाणे भेट झालीसुद्धा."

"मात्र त्याच क्षणापासून गव्हर्नर लोव नेपोलियनला नापसंत ठरला. लोव्हनं देखील नेपोलियनला धडा शिकवण्याचं ठरवलं."

नेपोलियनच्या एका इंग्रज चाहत्यानं जेव्हा त्याला पुस्तकांचे दोन गठ्ठे पाठवले, तेव्हा गव्हर्नर लोवनं ते जप्त केले.

जेव्हा त्याची बहीण पोलीननं त्याच्या वापरासाठी म्हणून काही वस्तू पाठवल्या, तेव्हा त्याला इतक्या वस्तूंची आवश्यकता नाही, असं सांगत त्या वस्तू नेपोलियनपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत.

नेपोलियन आणि गव्हर्नर लोवमध्ये संघर्ष

यादरम्यान गव्हर्नर लोव आणि नेपोलियनच्या दोन भेटी झाल्या. टॉमस ऑबरी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "या भेटींच्या वेळेस पूर्ण वेळ नेपोलियन उभा होता. त्यामुळे गव्हर्नर लोवला देखील उभं राहावं लागलं. कारण सम्राटाच्या समोर बसणं प्रोटोकॉलच्या विरुद्ध ठरलं असतं."

"गव्हर्नर लोवला वरून आदेश आले की नेपोलियनवर होत असलेला खर्च कमी करण्यात यावा. गव्हर्नर लोवनं याबद्दल जेव्हा नेपोलियनशी बोलू पाहिलं, तेव्हा नेपोलियननं त्याला सांगितलं की यासंदर्भात माझ्या बटलरशी चर्चा करा."

18 ऑगस्ट 1816 ला गव्हर्नर लोव पुन्हा एकदा नेपोलियनला भेटायला गेला. त्यावेळेस नेपोलियन त्याच्यावर चिडला. नेपोलियन त्याला म्हणाला की तू एक किरकोळ कारकून आहेस.

गिल्बर्ट मार्टिन्यू, नेपोलियनच्या चरित्रात लिहितात, "नेपोलियन गव्हर्नर लोवला म्हणाला की तू सन्माननीय व्यक्ती अजिबात नाहीस. तू असा माणूस आहे जो चोरून इतरांची पत्र वाचतो."

"तू फक्त एक जेलर आहे, सैनिक तर अजिबात नाहीस. माझ्या शरीरावर तुझं नियंत्रण नक्कीच आहे, मात्र माझा आत्मा स्वतंत्र आहे."

हे ऐकताच गव्हर्नर लोवचा चेहरा संतापानं लाल झाला. तो नेपोलियनला म्हणाला की 'तू हास्यास्पद आहेस आणि तुझी वर्तणूक खूपच दयनीय आहे.' असं म्हणून लोव तिथून निघून गेला.

त्यानंतर नेपोलियन जिवंत असेपर्यंत लोवची त्याच्याशी भेट झाली नाही.

नेपोलियनची तब्येत बिघडली

त्यानंतर नेपोलियनची मन:स्थिती ढेपाळू लागली. आयुष्यातील एकसूरीपणा, कंटाळवाणं वातावरण, वाईट हवामान, वाईट अन्न, दररोज दरवाजा आणि खिडकीवर सैनिकांची उपस्थिती, हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आणि सातत्यानं येणारी आजारपणं यामुळे नेपोलियन प्रचंड अस्वस्थ झाला.

गव्हर्नर लोवनं नेपोलियनच्या हिंडण्याफिरण्यावर निर्बंध घातल्यानंतर नेपोलियन घोडेस्वारी करणं आणि फेरफटका मारण्यास जाणं बंद केलं.

1816 साल संपेपर्यंत नेपोलियन खोकला आणि तापानं हैराण झाला. कित्येकदा तर असंही व्हायचं की तो कपडेसुद्धा बदलायचा नाही आणि त्याच्या खोलीबाहेर देखील पडायचा नाही.

टॉमस ऑबरी लिहितात, "नेपोलियन आजारी पडल्यावर गव्हर्नर लोवनं आधी हे मान्यच केलं नाही की तो आजारी आहे. नंतर लोवनं सैन्य आणि नौदलाच्या एका चांगल्या डॉक्टरला नेपोलियनच्या उपचारासाठी पाठवायचं ठरवलं."

"मात्र तो डॉक्टर गव्हर्नरसाठी हेरगिरी करेल या शंकेनं नेपोलियननं त्याच्याकडून उपचार करून घेण्यास नकार दिला. नंतर नेपोलियननं एच एम एस कॉन्कररच्या डॉक्टर जॉन स्टोको याला तपासणी करण्याची परवानगी दिली."

वयाच्या 52 व्या वर्षी नेपोलियनचं निधन

जानेवारी 1819 मध्ये डॉक्टर स्टोकोच्या लक्षात आलं की नेपोलियनला हेपॅटायटिस झाला आहे. एप्रिल महिन्यात नेपोलियननं ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड लिव्हरपूल यांना त्याच्या आजारपणाबद्दल एक पत्र पाठवलं होतं.

मात्र गव्हर्नर लोवनं पंतप्रधानांना सांगितलं की नेपोलियनच्या तब्येतीला काहीही झालेलं नाही.

वसंत ऋतू येत येत नेपोलियनला एक गंभीर आजार झाला. तो आजार एकतर कर्करोग होता किंवा पोटात अल्सर झाल्यामुळे होणारा रक्तस्त्राव. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नेपोलियनला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या.

त्यानं विनंती केली की त्याचा पलंग ड्रॉईंग रूम मध्ये हलवण्यात यावा. कारण तिथे जास्त उजेड यायचा. तो दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता. अनेकदा तो बेशुद्धसुद्धा व्हायचा.

5 मे 1821 ला संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी नेपोलियननं शेवटचा श्वास घेतला. त्यावेळेस त्याचं वय फक्त 52 वर्षे होतं.

पॅरिसमध्ये पुन्हा करण्यात आलं दफन

नंतर नेपोलियनचा मृत्यू कसा झाला, त्यामागच्या कारणांवरून वाद निर्माण झाला.

अॅलन फॉरेस्ट यांनी नेपोलियनच्या चरित्रात लिहिलं आहे, "त्याच्या केसांमध्ये आर्सेनिकचा अंश आढळला. नेपोलियनचा एक सहकारी, मारचेन यानं आठवण म्हणून त्याचे काही केस स्वत:जवळ ठेवले होते."

"नंतर जेव्हा नेपोलियनच्या त्या केसांची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली, तेव्हा आढळलं की नेपोलियन बहुधा विष देण्यात आलं होतं."

नेपोलियननं त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये इच्छा व्यक्त केली होती की त्याला पॅरिसमध्ये दफन करण्यात यावं. मात्र तत्कालीन ब्रिटिश आणि फ्रेंच सरकारला हे मान्य नव्हतं.

असं ठरलं होतं की नेपोलियनला सेंट हेलेनामध्येच दफन करण्यात यावं. 12 ग्रेनेडियर्सचे सैनिक जेव्हा नेपोलियनचं पार्थिव शरीर दफन करण्यासाठी घेऊन जात होते, तेव्हा सेंट हेलेनाची संपूर्ण जनता ते दृश्य पाहण्यासाठी बाहेर आली होती.

नेपोलियनच्या कॉफिनभोवती निळं मखमली कापड गुंडाळलेलं होतं. त्याच्यावर नेपोलियनची तलवार आणि घड्याळ ठेवण्यात आलं होतं.

नेपोलियनला सेंट हेलेनामध्ये दफन केल्यानंतर 18 वर्षांनी फ्रान्सचा राजा लुई फिलिप याच्या आदेशानं त्याचा मृतदेह सेंट हेलेनाच्या कबरीतून काढून पॅरिसला आणण्यात आला. तिथे पूर्ण राजकीय सन्मानानं नेपोलियनला पुन्हा दफन करण्यात आलं.