नेपोलियन बोनापार्टची पहिली पत्नी जोसेफीनच्या 'सम्राज्ञी' बनण्याचा असा आहे थरारक प्रवास

    • Author, अॅलिशिया हर्नांदेझ
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड

"फ्रान्स. सैन्य. जोसेफिन"

नेपोलियन बोनापार्टने त्याच्या मृत्यूपूर्वी हे तीन शेवटचे शब्द उच्चारले होते. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेतच होता.

या स्वयंघोषित फ्रेंच सम्राटाचं किंवा युरोपच्या लष्करी रणनीतीकाराचं मोठं चरित्र लिहिलं गेलंय.

पण त्याच्या अगदी जवळ असलेली त्याची पहिली पत्नी जोसेफिन, हीचं त्याच्या आयुष्यात मोठं योगदान आहे. पती-पत्नी म्हणून त्यांचे संबंध आयुष्यभर टिकले असले तरीही आपल्याला जोसेफिनकडून वारस मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांचे संबंध काहीसे दुरावले.

इतिहासानेही या कॅरिबियन वंशाच्या फ्रेंच व्यक्तीवर दयाळूपणा दाखवला नाही.

तिला अशिक्षित, फालतू आणि व्यर्थ म्हटलं गेलं. तिच्या उत्कट अशा लैंगिक वासनेबद्दल बोललं गेलं. हे सगळे गुण जरी खरे असले तरी ते तिच्या आयुष्याच्या केवळ एका भागाशी संबंधित आहेत.

जोसेफिनचं आयुष्य नावीन्यपूर्ण होतं. एका "सामान्य" स्त्रीपासून फ्रान्सच्या सम्राज्ञीपर्यंतचा तिचा प्रवास लक्षात घेण्यासारखा आहे.

जग तिला जरी जोसेफिन बोनापार्ट म्हणून ओळखत असलं तरी, तिचा जन्म जून 1763 मध्ये फ्रेंचच्या ताब्यात असलेल्या कॅरिबियन समुद्रातील अँटिल्समधील मार्टीनिक या बेटावर झाला होता. तिचं जन्मावेळीच नाव होतं, मेरी जोसेफ रोझ डॅशर डे ला पेजरी.

एका मोठ्या जमीनदाराच्या घरातील मेरीला प्रत्येकजण रोझ म्हणत. नेपोलियनने तिचं नाव जोसेफिन ठेवलं.

पत्रकार इवा मारिया मार्कोस यांनी जोसेफिनच्या चरित्रात लिहिलंय की, "जोसफिनला कोणीही रोझ म्हटलेलं नेपोलियनला आवडत नव्हतं. ती कधी सामान्य स्त्री नव्हतीच, तिच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती."

तिचं पहिलं लग्न लष्करात व्हिस्काउंट असलेल्या अलेक्झांड्रे डी ब्युहर्नॉइसशी झालं होतं. नेपोलियनबरोबर तिने दुसरं लग्न केलं. तिच्या पहिल्या लग्नाच्या वेळी म्हणजेच 1780 मध्ये ती केवळ 17 वर्षांची होती.

जोसफिनच्या विकासात तिचा पहिला नवरा अलेक्झांड्रेचा खूप मोठा वाटा होता, मात्र त्याने तिला कोणत्याही प्रकारे मदत केली नव्हती.

इवा मारिया मार्कोस सांगतात की, व्हर्साय इथे काम करणार्‍या तिच्या वडिलांनी तिच्या मनात रुजवलेलं स्वप्न घेऊन रोझ फ्रान्सला आली.

रोझ कॅरिबियन बेटावर वाढलेली सामन्य मुलगी होती. 18 व्या शतकातील फ्रान्समधील जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी तिला बऱ्याच अडचणी आल्या.

मार्कोस सांगतात की, "अलेक्झांड्रे तिच्या सुंदरतेवर भाळला होता. पण तेव्हा स्त्रियांनी केवळ सुंदर असून भागणार नव्हतं तर त्यांच्याकडे बुद्धिमत्ता सुद्धा असणं अपेक्षित होतं."

सुरुवातीला त्याने तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. पण रोझला शिकण्यात रस नसल्याने तिचे शिक्षक देखील कंटाळून गेले.

शेवटी अलेक्झांड्रेचा भ्रमनिरास होऊन तो रोझचा तिरस्कार करू लागला. शेवटी त्याने तिला सोडलं.

मार्कोस सांगतात, "तिच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्याकडे खर्चासाठी पैसे नव्हते. तिला 2 मुलांसह घरातून बाहेर पडावं लागलं."

1783 मध्ये रोझ फक्त 20 वर्षांची होती. तेव्हाच खरी क्रांती सुरू झाली होती.

रोझ घराबाहेर पडली असली तरी ती रस्त्यावर आली नव्हती. ती एका अशा कुटुंबात वाढलेली होती, जिथे आर्थिक स्थैर्य होतं. तिला याची मदत झाली.

एका काकूने केलेल्या आर्थिक मदतीमुळे ती पॅरिसमधील पेंडिमोंट अॅबे इथे 6 खोल्या आणि स्वयंपाकघर असलेल्या इमारतीत आपल्या मुलांसह राहू लागली.

ती अशा ठिकाणी राहत होती जिथे राजे, सरदार यांच्या प्रेयसी आपली विवाहबाह्य गर्भधारणा लपवण्यासाठी राहत असत किंवा कौटुंबिक सन्मानासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना इथे आणून सोडलेलं.

मार्कोस सांगतात, "या महिलांनी रोझला त्यांच्या कहाण्या सांगितल्या. रोझ एका न तासलेल्या मोत्याप्रमाणे होती असं या स्त्रियांना दिसलं. त्यांनी रोझला उच्च समाजातील स्त्री कशी वावरते हे शिकवलं. त्यांनी तिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करायला, डौलात चालायला, अदबीने बोलायला, नृत्य करायला शिकवलं."

तिने तिथे दोन वर्ष घालवले. त्यानंतर फ्रान्सच्या उच्चभ्रू समाजात पुन्हा परतण्याऐवजी तिने असं काही करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे तिला जीवनात प्रेरणा मिळू शकेल. त्यावेळच्या पॅरिसमधील अनेक महिलांना आपल्या नवऱ्यांना विरोध करणं शक्य नव्हतं.

रोझला खोटं ठरवण्यासाठी अलेक्झांड्रे अँटिलिसमधून गुलाम आणतो, जे तिच्याविषयी खोटी साक्ष देतात. लग्नापूर्वी तिचे अनेक प्रियकर होते अशी साक्ष तो गुलाम देतो. यामुळे रोझ आणि अलेक्झांड्रेचं लग्न संपुष्टात येणार असतं. यातून तिचं आडनाव, व्हिस्काउंटेसची पदवी, तिच्या मुलांचा ताबा आणि मालमत्तेचा ताबा ती गमावणार असते.

मार्कोस सांगतात की, जेव्हा रोझ राजाच्या वकिलाकडे तक्रार करायला जाते तेव्हा वकील म्हणतो,

"मी एका आकर्षक तरुणीला भेटलो. ती एक विशिष्ट आणि अभिजात स्त्री आहे. तिच्याकडे परिपूर्ण शैली आहे. सौंदर्याने भरपूर अशा या तरुणीचा खूप गोड आवाज आहे."

या खटल्यात रोझ जिंकते. यात तिची व्हिस्काउंटेस पदवी, मालमत्ता आणि तिच्या मुलांचा ताबा तिला मिळतो.

तिथून आपला प्रभाव वाढवण्यासाठी ती ती फ्रान्सला परतते.

चार वर्षांनंतर (1789) फ्रेंच राज्यक्रांती होते. याला दहशतवादाचं राज्य असंही म्हटलं गेलंय. रॉबेस्पियरच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्या क्रांतीदरम्यान, प्रजासत्ताकाविरुद्ध काम केल्याचा संशय असलेल्या अनेकांचा छळ करण्यात आला.

दहशतवादाच्या राजवटीत सामूहिक अटकेचा अंत शिरच्छेदात होतो. रोझच्या घराजवळ हे हत्याकांड घडलं.

(मार्कोस सांगतात की, "राजकारणात आणि कोर्टात तिचा मोठा प्रभाव होता. दोन्ही ठिकाणी तिची चांगली उठबस होती. तिने अनेक लोकांना, मित्रांना वाचवलं.)

अलेक्झांड्रे 1974 पर्यंत कैदी राहिला.

त्याने फक्त काही महिनेच तुरुंगात काढले. क्रांतीच्या काळात खूप मोठ्या संख्येने फाशी दिली गेली.

"दररोज ज्या कैद्यांचा शिरच्छेद केला जायचा, ज्या कैद्यांची कत्तल केली जायची त्यांची नावं वाचून दाखवली जायची. आपण उद्या मरणार आहोत याची कल्पनाही तिथे बंदिस्त असलेल्या लोकांना नसायची. त्याकाळात लैंगिक अत्याचारही वाढले होते. इथेच रोझ एका व्यक्तीच्या प्रेमात पडते."

या वाईट काळात रोझला लवकरच रजोनिवृत्ती आली.

फाशीच्या शिक्षेतून अलेक्झांड्रेची सुटका झाली नाही. पण पुढे जाऊन रोबेस्पियरने आपला विचार बदलला आणि डेस कार्मेस येथील सर्वांना मुक्त केलं, यात रोझ देखील सुटली.

डेस कार्मेसच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रोझ रस्त्यावर उतरली.

तुरुंगात असताना तिची भेट स्पॅनिश असलेल्या टेरेसा कॅबरोजशी झाली होती. ती लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी चांगली वेषभूषा करून पॅरिसच्या गल्लीबोळातून फिरायची.

आता रोझ देखील टेरेसा प्रमाणे वेशभूषा करून कामुक दिसण्याचा प्रयत्न करू लागली. ती स्वतःचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करू लागली.

याच काळात तिची भेट नेपोलियन नावाच्या माणसाशी झाली. तो इटालियन झाक असलेली फ्रेंच बोलायचा. त्याला फ्रान्समधील जीवनाबद्दल काहीच माहित नव्हतं.

त्यावेळी रोझचे अनेक प्रियकर होते. यात नेपोलियनही एक होता.

"रोझ राजकारणात सक्रिय होती, हुशार होती. त्यामुळे नेपोलियन रोझवर भाळला होता. त्याचं रोझवर खूप प्रेम होतं."

1796 मध्ये तिच्या पतीची तुरुंगात हत्या झाल्यानंतर दोन वर्षांनी, तिने नेपोलियनशी लग्न केले.

त्यानंतरच ती जोसेफिन बोनापार्ट झाली.

9 नोव्हेंबर, 1799 रोजी फ्रान्समध्ये आणखीन एक सत्तापालट झाली. यावेळी लुई-नेपोलियन बोनापार्टने सत्ता काबीज करण्यास सुरुवात केली.

नेपोलियन हा आधुनिक फ्रान्सचा संस्थापक मानला जातो, ज्याने फ्रेंच कायद्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्याने राजकारण आणि धर्म या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या असल्या तरी गुलामगिरीला प्रोत्साहन देणं आणि महिलांचे अधिकार कमी करणं यासाठी त्याच्यावर टीकाही झाली.

सम्राट असताना त्याने युरोपचा काही भाग पूर्णपणे जिंकला. त्याने विविध देशांशी शांतता करार केले. राजेशाहीच्या विरोधात काम केलं. तो एक रणनीतीकार आणि महान योद्धा होता. त्याने 60 पेक्षा जास्त लढाया लढल्या होत्या.

नेपोलियनने आपल्या आठवणींमध्ये म्हटलंय की त्याच्याकडे तलवार होती आणि जोसेफिनचं प्रेम होतं.

जेव्हा तो युरोपच्या इतर राज्यकर्त्यांशी युद्ध करत होता किंवा त्यांना आव्हान देत होता तेव्हा त्याने बऱ्याच भेटीगाठी घेतल्या, अनेक वाटाघाटी केल्या. बोलता बोलता मध्येच रागाने त्याने कॉफीचे मग जमिनीवर आदळले तेव्हा जोसेफिनने राजनैतिक जबाबदारी घेत अपमानित झालेल्यांना शांत केलं.

याचं मोठं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रियाबरोबरचा शांतता करार. कॅम्पो फॉर्मियो या करारावर स्वाक्षरी करताना तिने मोठी भूमिका बजावली होती.

मार्कोस सांगतात, "जोसेफिनने राजनैतिक आणि राजकीय मोहिमांवर 5 महिने घालवले. ऑस्ट्रियन लोकांना हे समजलं होतं की तिच्याशिवाय शांतता अशक्य आहे. त्यांनी कृतज्ञता म्हणून तिला घोडे भेट म्हणून दिले."

राजकारणी जोसेफ फोचे सांगतात की, नेपोलियनला सत्तेची लालसा होती. त्याने 1802 मध्ये वंशपरंपरागत साम्राज्यासाठी आपल्या विरुद्ध कट रचला जाऊ नये यासाठी वाणिज्य दूताची अदलाबदल केली. हा सल्ला त्याला जोसेफिनने दिला होता."

1804 मध्ये नेपोलियनने स्वतःला फ्रेंच सम्राट घोषित केलं. याचवेळी त्याला वाटलं की जोसेफिन केवळ त्याची पत्नी नाही तर एक सम्राज्ञी असावी.

नेपोलियन राज्याच्या कारभारावर देखरेख करत असताना, जोसेफिनने फ्रान्समधील राजदूत, सल्लागार आणि व्यापारी यांच्याशी राजकीय संबंध ठेवले. मार्कोस सांगतात त्याप्रमाणे, जोसेफिनने नेपोलियनला लोकांसोबतचे संबंध सुधारण्यास मदत केली.

जोसेफिनचा खर्च अवाढव्य असायचा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तिच्या ड्रेसिंग रूममध्ये 700 हून अधिक कपडे आणि 500 हून अधिक चपला होत्या.

जोसेफिनच्या खर्चाविषयी वेगवेगळे संदर्भ मिळतात. काहीजण सांगतात की, तिला वार्षिक मानधन म्हणून साधारणपणे एक दशलक्ष फ्रँक मिळायचे. तर काही म्हणतात की तिने याहून जास्त खर्च केला होता.

इतरांच्या मते, नेपोलियनला स्वच्छतेचा ध्यास होता. आणि युरोपियन राजेशाहीच्या बरोबरीने राहण्यासाठी त्याने जोसेफिनला दिवसातून तीन वेळा कपडे बदलण्याची सूचना केली होती.

नंतरच्या आयुष्यात तिने साधेपणाने राहणं पसंत केलं. तिचे कपडे आजही अस्तित्वात आहेत. ते अनेक फॅशन डिझाईन कंपन्यांद्वारे कॅटवॉक शोमध्ये वापरले जातात. नंतरच्या काळात जोसेफिनने मलमलचे कपडे वापरणं बंद करून प्रसिद्ध लियॉन सिल्कचे कपडे वापरण्यास सुरुवात केली होती.

ऐन मोक्याच्या क्षणी, जोसेफिनला अशा नकाराचा सामना करावा लागला ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. 1809 मध्ये नेपोलियनने तिच्याकडे घटस्फोट मागितला.

त्याचं जोसेफिनवरील प्रेम कमी झालं होतं. ते त्याच्या पत्रांवरून दिसून येतं. जोसेफिनकडून त्याला एक वारस अपेक्षित होता. पण जोसेफिनची मासिक पाळी लवकर थांबल्यामुळे ती इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून नेपोलियनने जोसेफिनला वृद्ध स्त्री म्हणून हिणवलं.

नेपोलियनने दुसरं लग्न केल्यानंतर त्याला झालेल्या मुलाला पाहण्यास जोसेफिनला काही काळ मनाई होती. त्यानंतर तिने आपलं निवासस्थान मालमेसन पॅलेसमध्ये हलवलं. तिला बागकामाची प्रचंड आवड असल्याने तिने तिथे 200 हून अधिक नवीन प्रजातींची लागवड केली.

1814 मध्ये न्यूमोनियामुळे तिचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत तिचं आणि नेपोलियनचं नातं कायम होतं.

मार्कोस सांगतात त्याप्रमाणे, "ती आदर्श तर होतीच पण ती तिच्या काळातील एक शक्तिशाली स्त्री होती."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)