You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमान आकाशात असतानाच त्याने विमानाचा दरवाजा उघडला आणि...
- Author, डेरेक कै
- Role, बीबीसी न्यूज
असियाना एअरलाइन्सचं विमान दक्षिण कोरियात उतरत असताना एक दुर्घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या आधीच विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी घडलेल्या या घटनेतील 194 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या या विमानाचं दार उघडंच होतं.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही जणांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात पोलिसांनी एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
असियाना एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक OZ8124, एअरबस A321-200 जेटने शुक्रवारी जेजू बेटावरून स्थानिक वेळेनुसार 11:45 च्या सुमारास (03:45 GMT) उड्डाण केलं होतं.
एक तासानंतर हे विमान जमिनीवर उतरणार इतक्यात जमिनीपासून 250 मीटर अंतरावर असताना आपत्कालीन दरवाजाजवळ बसलेल्या एका व्यक्तीने दरवाजा उघडला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हीडिओमध्ये विमानाच्या डाव्या बाजूने बसलेल्या प्रवाशांच्या लाईनमध्ये वारा वाहत असल्याचं दिसत आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दरवाजा उघडताना विमानाच्या अटेंडंडने त्याला रोखलं नाही कारण विमान लवकरच जमिनीवर उतरणार होतं.
दरवाजा उघडल्यानंतर त्या व्यक्तीने विमानातून उडी मारण्याचाही प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर विमानात सुरू झालेल्या गोंधळाविषयी काही प्रवाशांनी माहिती दिली.
एका 44 वर्षीय प्रवाशाने योनहाप वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "आपत्कालीन दरवाजा जवळ बसलेले लोक गुदमरून बेशुद्ध पडत असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी फ्लाइट अटेंडंट्सनी ब्रॉडकास्टिंगद्वारे बोर्डवरील डॉक्टरांना बोलावलं आणि त्यामुळे गोंधळ सुरू झाला."
या प्रवाशाने सांगितलं की, "मला एका क्षणासाठी वाटलं की मी आता इथेच मरणार आहे."
या विमानात तब्बल 194 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थीही होते. हे सर्वजण एका स्पर्धेसाठी जात होते.
यातल्याच एका विद्यार्थ्याच्या आईने योनहाप वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "मुलं घाबरून रडू लागली होती."
संशयित दारूच्या नशेत होता का? किंवा त्याने असं कृत्य का केलं यावर त्याने अद्याप काहीही उत्तर दिलेलं नाही. पोलिसांकडून या संशयिताची अधिक चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी सांगितलं की, "त्याच्याशी सामन्य भाषेत बोलणं देखील कठीण आहे. हे कृत्य करण्यामागे त्याचा हेतू काय होता याचा तपास करून त्याला शिक्षा केली जाईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)