You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमानात सहप्रवाशावर लघवी करण्याची आणखी एक घटना ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात एका विद्यार्थ्याने आपल्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी निघालं होतं. हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री 10 वाचून 12 मिनिटांनी उतरलं.
पीटीआय वृत्तसंस्थेला एअरपोर्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी विद्यार्थी हा अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तो प्रवासादरम्यान नशेत होता. त्याने झोपेतच लघवी केली. शेजारी बसलेल्या प्रवाशापर्यंत ती पोहोचली. यानंतर त्याची तक्रार केबिन क्रूकडे करण्यात आली.
एअरलाईन्सने हे प्रकरण प्रचंड गांभीर्याने घेतलं आहे. विमानतळावर विमान दाखल होताच एअर ट्राफिक कंट्रोलकडे याची तक्रार करण्यात आली.
विमान उतरताच संबंधित विद्यार्थ्याला CISFच्या पथकाने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन सहप्रवाशांचा जबाब घेतला आहे. याबाबत पुढीत तपास सुरू आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या पोलीस उपायुक्तांनी म्हटलं की अमेरिकन एअरलाईन्सच्या एका प्रवाशाने याबाबत तक्रार केली आहे. आरोपीची ओळख पटवण्यात आली असून कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे."
DGCA च्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितलं, "आम्हाला या प्रकरणाबाबत माहिती मिळाली. एअरलाईन्सने हे प्रकरण अतिशय चपखल हाताळलं आणि योग्य ती पावलं उचलली."
काही महिन्यांपूर्वीही विमानात दारू पिऊन सहप्रवाशावर लघवी केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)