दिवाळीसाठी रेल्वे तिकीट हवंय? नवा नियम काय सांगतो पाहा?

रेल्वे प्रवास

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विजयानंद अरुमुगम
    • Role, बीबीसी तमिळ

वर्षातील इतर दिवशी रेल्वेचं तिकीट आरक्षित करणं सर्वसामान्यांसाठी इतकं कठीण नसतं. परंतु, सणावाराचे दिवस आले की सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशावेळी गरजू प्रवाशांना आरक्षित तिकीटही मिळत नाही.

त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. सामान्य आरक्षण तिकीटाचं बुकिंग सुरू झाल्यावर काही क्षणांतच सर्व तिकीटं संपतात. तत्काळ तिकीट काढतानाही प्रचंड अडचणी येतात. एजंट्स, बनावट युजर्स यामुळे गरजू प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

सामान्य प्रवाशांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

येत्या 1 ऑक्टोबरपासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवर सामान्य आरक्षण तिकीट म्हणजेच जनरल रिझर्व्ह तिकीट बुक करताना आधार कार्ड अनिवार्य असेल, असं भारतीय रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे.

'हा नियम केवळ पहिल्या 15 मिनिटांसाठीच लागू असेल. त्यामुळे गैरवापर टाळता येईल, ' असं रेल्वे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

परंतु, आयआरसीटीसीच्या एजंट्सचं याबाबतीत वेगळ मत दिसून आलं आहे. 'अशा प्रक्रिया गरजेची नाही' आधी 'काऊंटरवर होणाऱ्या चुका थांबवायला हव्यात' असं या एजंट्सनी म्हटलं आहे. मग रेल्वे मंत्रालयाच्या या नव्या नियमामुळे कोणाला फायदा होणार? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

ऑक्टोबरपासून आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर सामान्य आरक्षण तिकीट (जनरल रिझर्व्ह तिकीट) बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑक्टोबरपासून आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर सामान्य आरक्षण तिकीट (जनरल रिझर्व्ह तिकीट) बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल.

भारतीय रेल्वे मंत्रालयाने 15 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवर जनरल बुकिंग तिकीट घेण्यासाठी पहिल्या 15 मिनिटांसाठी आधार अनिवार्य असेल.

यामुळे सामान्य प्रवाशांना फायदा होईल आणि तिकीट बुकिंगचा गैरवापर थांबवता येईल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.

संगणकीकृत काऊंटरवर सामान्य आरक्षण तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही, असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंट्ससाठी बुकिंगच्या पहिल्या 10 मिनिटांच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही रेल्वे प्रशासनाने निवेदनात सांगितलं आहे.

इंडियन रेल्वे

फोटो स्रोत, IRCTC

तिकीट बुकिंगचे फायदे खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचावेत आणि काही लोकांकडून गैरवापर होऊ नये म्हणून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे, असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.

याआधी रेल्वे मंत्रालयाने तिकीट बुकिंगची मुदत 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली होती. तरीही तिकीट बुकिंग आणि तत्काळ बुकिंगमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या.

ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सर्व तिकीटं विकली जात होती. तत्काळ बुकिंगमध्येही हीच परिस्थिती असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या.

'यंत्राद्वारे गैरव्यवहार'

यासंदर्भात आयआरसीटीसीने 24 मे ते 2 जून या कालावधीतील तत्काळ बुकिंगची स्थिती तपासली, त्याचे विश्लेषण केलं.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, तत्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच 4,724 तिकिटं आणि दुसऱ्या मिनिटात 20,786 तिकिटं बुक करण्यात आली.

आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, तत्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर एका तासात 84.02 टक्के तिकिटं विकली गेली. 'पहिल्या मिनिटात तिकीट मिळवण्यासाठी स्वंयचलित साधनांचा (ऑटोमॅटिक डिव्हाइसेस) वापर केला जातो,' असंही त्यांनी सांगितलं.

बनावट युजर्सकडून फसवणूक होत असल्याचं आयआरसीटीसी प्रशासनाने मान्य केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बनावट युजर्सकडून फसवणूक होत असल्याचं आयआरसीटीसी प्रशासनाने मान्य केलं आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, बॉट्स (सॉफ्टवेअर) वापरून एकाच वेळी लाखो बुकिंग विनंत्या केल्यास आयआरसीटीसीचा सर्व्हर ठप्प होतो.

बनावट युजर्समुळे होणाऱ्या फसवणूक होत असल्याची पुष्टी आयआरसीटीसी प्रशासनाने केली आहे. गेल्या सहा महिन्यांत 2.4 कोटींहून अधिक युजर्स हटवले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी इ-आधार योजना वापरण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर सांगितलं आहे.

तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्य केल्यानंतर, आता 1 ऑक्टोबरपासून जनरल बुकिंग तिकिटांसाठीही आधार अनिवार्य करण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

पहिल्या दिवसापासून पहिले 15 मिनिट का महत्त्वाचे?

"तिकीट बुकिंग 60 दिवसांपूर्वी सुरू होते. पण बुकिंग सुरू झालेल्या पहिल्या दिवशीच पहिल्या 15 मिनिटांत सर्व तिकिटं विकली जातात," असं भारतीय रेल्वे प्रवासी सल्लागार मंडळाचे माजी सदस्य एन.के. रविचंद्रन म्हणाले.

बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, "पोंगल आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी तिकिटं मिळत नाहीत आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा खूप त्रास होतो. विशेषतः, पहिल्या 2 मिनिटांतच सर्व तिकिटं बुक होतात."

पोंगल आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी तिकिटं मिळत नाहीत आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा खूप त्रास होतो, असं रविचंद्रन म्हणाले.

फोटो स्रोत, Ravichandran/Facebook

फोटो कॅप्शन, पोंगल आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी तिकिटं मिळत नाहीत आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा खूप त्रास होतो, असं रविचंद्रन म्हणाले.

रविचंद्रन पुढे म्हणाले की, बिहारसारख्या उत्तरेकडील राज्यांसाठी तिकीट बुकिंग एका मिनिटात संपते. नवीन नियमामुळे आयआरसीटीसी एजंट आणि अनाधिकृत लोक तिकीट बुकिंगमध्ये गैरव्यवहार करू शकणार नाहीत.

काही एजंट्स जनरल बुकिंग तिकिटं आधीच बुक करून ठेवतात आणि शेवटच्या दिवशी तिकिटासाठी हजारो रुपये घेतात. रेल्वे प्रशासनाने हा गैरवापर थांबवण्यासाठी नवीन नियम आणला आहे, असंही रविचंद्रन यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे म्हटलं की, "नवीन नियमामुळे तिकीटं खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचतील आणि अनाधिकृत लोक आणि एजंट्स यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल."

व्यावसायिक वापरासाठी नाही'

दक्षिण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सेंथामिलसेल्वन म्हणाले, "आधार पडताळणीमुळे एजंट्स तिकीट बुक करू शकणार नाहीत आणि पहिल्या 15 मिनिटांत जास्त तिकिटं बुक होण्याची शक्यता कमी होईल."

बीबीसी तमिळशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "काही लोक एकाहून अधिक इ-मेल अकाउंट्स वापरून तिकीट बुक करतात. आधार पडताळणी अनिवार्य केल्यास हे थांबवता येईल."

"जरी एखाद्या व्यक्तीकडे अनेक इ-मेल अकाउंट्स असतील आणि आयआरसीटीसीमध्ये लॉग-इन असेल, तरी आधार फक्त एका व्यक्तीसाठी असतो. त्यामुळे फक्त त्या व्यक्तीसच ओटीपी मिळेल," असं सेंथामिलसेल्वन म्हणाले.

काही लोक चार किंवा त्याहून अधिक इ-मेल अकाउंट्स वापरून तिकीट बुक करतात, असं सेंथामिलसेल्वन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, senthamilselvan / Facebook

फोटो कॅप्शन, काही लोक चार किंवा त्याहून अधिक इ-मेल अकाउंट्स वापरून तिकीट बुक करतात, असं सेंथामिलसेल्वन यांनी सांगितलं.

सेंथामिलसेल्वन म्हणाले, "नवीन नियमामुळे पहिल्या 15 मिनिटांत सर्व्हरवर जास्त विनंत्या येणार नाहीत. यामुळे आधार पडताळणी नसलेले लोक तिकीट बुक करू शकणार नाहीत. "

सेंथामिलसेल्वन म्हणाले, "रेल्वेच्या आदेशानुसार फक्त खऱ्या म्हणजेच गरजू प्रवाशांनाच तिकीट मिळेल. आधार पडताळणी असलेल्याच व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकतात आणि व्यावसायिक वापर करू शकत नाहीत. सर्व्हरवर जास्त ताण येऊ नये म्हणून नवीन नियम लागू केला आहे."

"परंतु, नवीन नियमामुळे कोणताही बदल होणार नाही," असं चेन्नईच्या आयआरसीटीसी एजंटने सांगितलं.

'काऊंटरवर जास्त गैरव्यवहार'

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसी तामिळशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "तत्काळ बुकिंगसाठी आधार पडताळणी लागू झाल्यामुळे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्याआधी हजारो तिकिटं अज्ञात नावांवर बुक केली जात होती."

ते पुढे म्हणाले, "काऊंटरवर एका व्यक्तीला जास्तीत जास्त 6 तिकिटं मिळू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने चार लोकांना सोबत आणलं तर तो 24 तिकिटं घेऊ शकतो."

ते म्हणाले, "काऊंटरवर घेतलेल्या तिकिटांमध्ये प्रवाशांचे आधार नंबर तपासले जात नाहीत. प्रवासासाठी जर सहा लोकांना तिकीट हवं असेल, तर एक आधार नंबरच दाखल करणं पुरेसं आहे. रेल्वे प्रशासन याची पडताळणी करत नाही."

आयआरसीटीसी एजंट म्हणाले, "रेल्वेमध्ये प्रवाशांची सत्यता रेल्वे सुरक्षा दलाने तपासली पाहिजे. सणासुदीच्या काळात एजंट्स फक्त 10 मिनिटांनंतरच तिकीट बुक करू शकतात, त्यामुळे तिकीट मिळण्याची संधी कमी असते. इतर काळात तिकीट मिळवण्यात फारशी अडचण येत नाही."

एजंट्समुळे समस्या येतात का?

काऊंटरवर गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपाबाबत दक्षिण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सेंथामिलसेल्वन यांनी याची, 'याची चौकशी सुरू आहे,' असं सांगितलं.

सेंथामिलसेल्वन म्हणाले, "काऊंटरवर आधारद्वारे तिकीट बुकिंगसाठी सांगितल्यास काही अडचणी येऊ शकतात. अशा समस्या एजंट्समुळे होतात, असं रेल्वे व्हिजिलन्स (दक्षता) सांगतं. या विषयावर बोर्डमध्ये चर्चा सुरू आहे. "

"काऊंटरवर गैरव्यवहार टाळण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. तातडीच्या प्रवाशांसाठी तत्काळ बुकिंगमध्ये बदल केला गेला आहे. सार्वजनिक आरक्षण प्रणालीतही बदल करण्यात येत आहेत," असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)