मुंबईतल्या लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे लावल्यानं खरंच अपघाती मृत्यू थांबतील?

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोमवारी 9 जूनला सकाळी साधारण 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कर्जत आणि कसरा ते CSMT अशा दोन दिशांनी आलेल्या रेल्वे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ बाजूबाजूला आल्या. तेव्हा धावत्या रेल्वेतून एकमेकांचा आणि बॅगांचा धक्का लागून 13 प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले.

पुन्हा एकदा मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चिला जातो आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीन लाईन्सवरुन धावणाऱ्या मुंबईच्या लोकलमधून दररोज दररोज सुमारे 63 लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या 12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. परंतु या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी दररोज रेल्वे लोकलमधून प्रवास करत असतात.

मागणी आणि पुरवठा (म्हणजे उपलब्ध असलेली जागा) यांचं प्रमाण व्यस्त असल्यानं प्रवास करताना होणारे मृत्यू ही कायम चिंतेची बाब राहिली आहे.

या अपघाती मृत्यूंची संख्याही हादरवणारी आहे.

गेल्या तीन वर्षांत साडेसात हजाराहून अधिक मृत्यू मुंबईच्या रेल्वेमार्गांवर झाले आहेत. मुंब्रा इथे जो अपघात सोमवारी झाला, त्या वळणावर पूर्वीही असे अपघात घडले आहेत.

सकाळी कार्यालयात जाताना आणि संध्याकाळी कार्यालयांतून परत घरी येताना, या दोन्ही टप्प्यांमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये प्रचंड गर्दी असते.

त्या काळात डब्यांमध्ये आणि फलाटांवर किती प्रवासी असतात याचे असंख्य व्हीडिओ व्हायरल झाले आहेत आणि मुंबईबाहेरच्याही अनेकांनी बऱ्याचदा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

या काळात दरवाज्यांना धोकादायक पद्धतीनं लोंबकळत जाणारे प्रवासी हे चित्र प्रत्येकानं पाहिलं असेल.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळेच मुंब्राच्या अपघातानंतर अपघाती मृत्यू थांबवण्याचे उपाय काय, हा प्रश्न पुन्हा विचारला गेला.

त्यावर रेल्वे प्रशासनानं तात्काळ दिल्लीत झालेल्या एका बैठकीत ठरवलं की मुंबईच्या नॉन-एसी लोकलनाही आता स्वयंचलित दरवाजे बसवले जावेत, म्हणजे प्रवासी दरवाज्यांना लोंबकळू शकणार नाहीत.

असे स्वयंचलित दरवाजे सध्या मुंबईत अत्यंत मर्यादित प्रमाणात धावणाऱ्या वातानुकूलित लोकलना आहेत. मेट्रोलाही ते असतात.

या स्वयंचलित दरवाज्यांमुळे हा प्रश्न सुटेल? अपघात टळतील? की गर्दीचा आकडा पाहता हा प्रश्न अधिकच अवघड होईल? हा रोगापेक्षा इलाज भयंकर होईल का?

मध्ये रेल्वेनं काय निर्णय घेतला?

मुंबईच्या अपघात घडल्यानंतर सोमवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यसह रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर काही विभागांची बैठक झाली.

यामध्ये काही निर्णय झाले जे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. त्यातला महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबईच्या बिगर वातानुकूलित लोकलनही आता मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे बसवणे.

तुलनेनं कमी संख्येनं धावणाऱ्या वातानुकूलित गाड्यांना असे दरवाजे आहेत. आता ते सगळ्याच गाड्यांना लावले जातील.

या स्वयंचलित दरवाजे असलेल्या बिगर वातानुकूलित लोकलचं डिझाईन करुन पहिला प्रोटोटाईप नोव्हेंबरपर्यंत चेन्नईत असलेली इंटेग्रल कोच फॅक्टरी तयार करेल आणि त्याच्या सर्व सुरक्षा चाचण्या, आवश्यक बदल झाल्यावर जानेवारी 2026 पर्यंत ही लोकल मुंबईत धावू लागेल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं.

ग्राफिक्स

जेव्हा असं स्वयंचलित दरवाजे येतील, तेव्हा या लोकलच्या मॉडेलमध्ये अजून काही बदल असतील. हे दरवाजे आणि छत यांच्यामध्ये व्हेंटिलेशनची सोय असेल, कारण गर्दीत दरवाजे जर बंद असतील तर बाहेरुन हवा येणं आवश्यक आहे.

त्यामुळे दार बंद झाल्यावरही हवा खेळती राहील. त्यासाठी दरवाज्यांमध्ये लूव्हर्स असतील.

त्यासोबतच सध्या वातानुकूलित लोकलचे डबे जसे आतून जोडलेले आहेत, तसेच या नवीन लोकलचेही डबे तसे असतील. म्हणजे प्रवासी आत एका डब्यातून दुसऱ्यात ये-जा करु शकतील.

या नव्याने येणाऱ्या सगळ्या लोकल या वातानुकूलित असू शकतील असंही रेल्वेनं म्हटलं.

स्वयंचलित दरवाजे करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की प्रवासी दारापाशी थांबू शकणार नाहीत. त्यानं प्रवासादरम्यान पडल्यानं होणारे अपघात थांबतील अथवा कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

पण त्यानं खरंच सगळं सुरळीत होईल का?

मुंबईसारख्या एवढी प्रवासीसंख्या असणाऱ्या आणि जलद असणाऱ्या लोकल रेल्वेसेवेत असे स्वयंचलित दरवाजे लावणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं उपाय म्हटला जात असला तरीही तो सोयीचा आहे का, हा प्रश्न आहे.

तज्ञांकडून आणि प्रवाशांकडूनही काही शंका याबद्दल उपस्थित केल्या जात आहेत.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकंदरित जो वेळ प्रवासाचा आहे, ज्यासाठी प्रत्येक मुंबईकराचा झगडा सुरु असतो, तो वेळ या नव्या तांत्रिक बदलामुळे वाढेल का? स्वयंचलित दरवाजे उघडणे आणि बंद होणे याला काही वेळ लागतो. या दरवाज्यांना सेन्सरही असतो. त्यामुळे दारामध्ये व्यक्ती असेल तर काही वेळेस हे दरवाजे बंदही होत नाहीत. त्यामुळे बंद होण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे एकंदरित प्रवासाचा कालावधी आहे त्यापेक्षा वाढेल का, हा प्रश्न आहे.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईच्या फलाटांवरची गर्दी आणि लोकलमध्ये घुसणारी गर्दी पाहता, या स्वयंचलित दरवाजांना बंद होण्यासाठी प्रवाशांकडून अडचण होऊ शकते. असे काही व्हीडिओ पूर्वी व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अगोदरच जी कोंबाकोंबी, ढकलाढकली असते, ती या बंद होणाऱ्या दरवाज्यांमुळे अधिक आक्रमक होईल का, हाही प्रश्न आहे.

या गडबडीत स्वयंचलित दरवाज्यांमुळेच कोणाला जखम अथवा इजा होईल का, हाही एक प्रश्न आहे. मेट्रो किंवा तुलनेनं कमी गर्दी असलेल्या लोकल्स यांच्यामध्ये असे अडथळे येण्याची शक्यता कमी आहे. पण मुंबईल कार्यालयीन वेळांच्या टप्प्यात विशेषत: मध्ये रेल्वेच्या प्रवासात जेवढी गर्दी असते, ते पाहता सर्व लोकलना स्वयंचलित दरवाजे हा व्यावहारिक पर्याय असेल का?

व्यावहारिक पर्याय काय आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वास्तविक स्वयंचलित दरवाजे हा काही अगदीच चर्चेत असलेला पर्याय नाही. मुंबई रेल्वे प्रवासी संघानंही पूर्वी अशा प्रकारच्या दरवाज्यांची मागणी केली आहे.

मुंबई लोकलचे सध्याचे दरवाजे हे लोखंडाचे आहेत. त्यामुळे ते अतिवजनाचे आहेत. त्या ऐवजी अल्युमिनियम किंवा इतर हलक्या प्रकारे ते तयार केल्यास लोकलला बसवता येतील. पण गर्दीच्या वेळी खूप गर्दीमुळं ते बंद होणारच नाहीत त्यामुळे वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण होईल. ती टाळण्यासाठी मेट्रोप्रमाणे रेल्वे स्टेशनवरच स्वयंचलित तिकीट दाखवून प्रवेश देणारे दरवाजे असावेत, अशी मागणी प्रवासी संघाची होतीच.

"जरी असे स्वयंचलित दरवाजे आवश्यक असले तरीही आमची केवळ तीच मागणी नाही. जर या दरवाज्यांसोबत गर्दीला काही नियंत्रणच नसेल तर त्यांचा काही उपयोग नाही," असं मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई म्हणतात.

"मुख्य आवश्यकता आहे ती गर्दीच्या नियंत्रणाची. सध्या फलाटांवर असे लोक जास्त असतात जे प्रवासी नाहीत. तिकिट नसलेले, नशा करणारे, बाकीचे व्यवसाय करणारे असे असंख्य तिथे असतात. त्यांची गर्दी जास्त असते. जे प्रवासी आहेत तेच जर आत सोडले, मेट्रो स्थानकांवर असतं तसं, तरच स्वयंचलित दरवाजे अडथळे ठरणार नाहीत," देसाई म्हणतात.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

"शिवाय आम्ही अशीही मागणी केली आहे की 'पिक अवर' आणि 'नॉन पिक अवर' असं वेगळं तिकिट असावं. 'नॉन पिक अवर'ला कमी पैसे असावेत. युरोपच्या काही देशांत असं आहे. त्यानं गर्दी कमी होईल. सगळे एकाच वेळेस फलाटावर येणार नाहीत. याशिवाय जे रेल्वे ट्रॅक्स लोकलसाठी तयार केले आहेत तिथून एक्स्प्रेस जाऊ नयेत. त्यामुळे रेल्वे मागे अडकतात आणि गर्दी वाढत जाते. गर्दीचं नियंत्रण हे सगळ्यात महत्वाचं आहे," देसाई सांगतात.

ते असंही म्हणतात की वारंवार याबद्दल रेल्वे प्रशासनाला लिहूनही काही घडलं नाही आहे.

लोकलनं रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मात्र हा स्वयंचलित दरवाज्यांचा निर्णय गडबडीत घेतला आहे का, असा प्रश्न आहे.

सचिन कुरपे चिंचपोकळी ते मुलुंड असा रोजचा प्रवास करतात. त्यांना वाटतं की गर्दी एवढी असते की त्यात काय होईल हे सांगता येत नाही. "आमचं म्हणणं आहे की तुम्ही गाड्या जास्त वाढवा. त्यानं लोकांची सोय अधिक होईल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पूर्ण विचार करुन घ्या," कुरपे म्हणतात.

अजून एक प्रवासी मंगेश कसालकर म्हणतात, "एकंदरीत सध्याची लोकलची संख्या आणि प्रवाशांची गर्दी यांचं जर गणित मांडलं तर स्वयंचलित दरवाज्याची यंत्रणा निष्कामीच ठरणार आहे. सध्याच्या गर्दीतच लोकांना गुदमरायला होतं आणि त्यात जर दरवाजे बंद झाले तर काय अवस्था होईल? त्यापेक्षा लोकलची संख्या वाढवायला हवी. गर्दीचं नियोजन करायला हवं. मुंबईकरांची अवस्था 'भिक नको पण कुत्रं आवर' अशी होणार आहे."

आसावरी जाधवही नेहमी लोकलनी प्रवास करतात. त्यांचा प्रश्न सामान्य मुंबईकराच्या आर्थिक विवंचनेचा आहे. "जर तुम्ही दार बंद करणार असाल, तर मग सगळी लोकलच एसी करणार आहात का? एसी जर करणार आहात आहात तर तुम्ही तिकिटही वाढवणार. मग सामान्य माणूस जो आज रोज लोकल वापरतो, त्याला ते कसं परवडणार?" त्या विचारतात.

सुरक्षा तर हवी आहे आणि परवडणारा प्रवास पण हवा आहे. अशा स्थितीत रेल्वेच्या नव्या निर्णयाचा प्रत्यक्ष अनुभव येण्याअगोदर सामान्य मुंबईकर प्रवाशांची अवस्था 'इकडं आड आणि तिकडं विहिर' अशी झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)