You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुठे भिंती कोसळल्या, तर कुठे स्लॅबला तडे, अतिवृष्टीनं शाळांची दैना; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अवस्था कशी आहे?
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र मोठं नुकसान झालं आहे. प्रामुख्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांची पिकंं पाण्यात गेली आहेत.
पण त्याचबरोबर आता या पावसामुळं इतरही अनेक क्षेत्रांत फटका बसल्याचं समोर यायला सुरुवात झाली आहे. असाच फटका ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला बसल्याचं दिसत आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळं या शाळांची अवस्था धोकादायक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी शाळांच्या भिंती कोसळल्या आहेत, तर काही ठिकाणी शाळांच्या स्लॅबला तडे गेले आहेत. शाळांच्या या दूरवस्थेचा आढाव घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
लोहारा तालुक्यात 12 शाळा धोक्यात
धाराशीवमधल्या लोहारा तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कोसळली.
सध्याच्या स्थितीत लोहारा तालुक्यातली परिस्थिती सर्वात गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे.
या एकट्या तालुक्यात सुमारे 12 शाळांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, 50 हून अधिक वर्गखोल्यांची दूरवस्था झाली आहे.
त्यामुळं या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पडझड झाल्यानं शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आता पूर्ण शाळा गावातील महादेव मंदिरात भरवली जात आहे.
स्त्यालगत असलेल्या या मंदिरात शाळा भरवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचं चिमुकले विद्यार्थी सांगतात.
"आमच्या अभ्यासात पावसामुळं अडथळे येतात. सरकारनं आम्हाला नवीन शाळा बांधून द्यावी," अशी मागणी या शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे.
'वर्गात लेकरांना शिकवणं धोक्याचं'
शाळेचे शिक्षक राजेंद्र औरादे सांगतात की, "ही शाळा 1960 साली बांधण्यात आली होती. आता ती अत्यंत जीर्णावस्थेत आहे. वर्गखोल्यांमध्ये लेकरांना शिकवणं धोक्याचं झालं आहे."
दुसरे शिक्षक राठोड यांनी सांगितलं, "स्थिती इतकी बिकट आहे की एकाच ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना शिकवावं लागतं. प्रशासनाकडून नवीन बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे."
गावकरी आनंद पाटील म्हणाले, "पूर्वीपासूनच वर्गखोल्या बसण्यासारख्या नव्हत्या. इंग्रजी शाळेचाही पाया कोसळला आहे. अशीच अवस्था राहिली तर शाळेच्या पटसंख्येवर मोठा परिणाम होईल."
पालक श्रीधर गरजे यांनी चिंता व्यक्त करताना सांगितलं की, "मुलांना शाळेत पाठवायचं आहे, पण भीती वाटते. शासनाने तात्पुरती व्यवस्था करून द्यावी."
तर गावचे सरपंच वैभव पवार यांनी सांगितलं की, "या शाळेसाठी वारंवार पाठपुरावा करूनदेखील कुणी दखल घेत नाही. शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी."
कोराळ : शाळेचा स्लॅब कोसळला
धाराशिव जिल्ह्यातील ही समस्या केवळ जुन्या शाळांपुरती मर्यादित नाही. उमरगा तालुक्यातील कोराळ गावात नुकतीच बांधलेली शाळाही अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली.
शाळेच्या इमारतीचा मोठा स्लॅब कोसळला असून, सुदैवाने त्या दिवशी सुट्टी असल्याने मोठा अपघात टळला.
पण भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने तत्काळ उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
'शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचं'
पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि आत्ताचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "लोहारा किंवा उमरगा तालुक्यातील शाळांची दूरवस्था झालीच आहे."
"मात्र, अशीच अवस्था राज्यातील अनेक शाळांची आहे. 40-50 वर्षांपूर्वी या शाळांचं बांधकाम झालं आहे."
"त्यामुळे, त्या शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. अशात राज्यातील सर्वच शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासाठी जो काही निधी आहे तो उपलब्ध करून उपाययोजना कराव्या," अशी आमची मागणी आहे, असं आमदार प्रवीण स्वामी म्हणाले.
आमदार राणा जगजतिसिंह पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो."
"अशा शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे आहवाल सादर करावेत, असे निर्देश आमदार पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत."सांगितलं.
'130 शाळा आणि 325 वर्गखोल्यांना फटका'
धाराशिव जिल्हा शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 130 शाळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये 300 ते 325 वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आम्ही सध्या आवश्यक ती काळजी घेत आहोत."
ते पुढे म्हणाले की, "जिल्हा नियोजन समिती (DPC) मध्ये या कामांसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु निधी अपुरा पडल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येईल."
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शिक्षण व्यवस्थेची पायाभूत रचना हादरवून सोडली आहे. जुन्या आणि जीर्ण शाळा तर धोकादायक झाल्याच आहेत, पण नव्याने बांधलेल्या शाळाही तुटक गुणवत्तेमुळे पडझडीला सामोऱ्या जात आहेत. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांनी शासनाकडे शाळांच्या दुरुस्ती आणि नव्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
अन्यथा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शाळांची पडझड हे प्रशासनासाठी एक मोठं आव्हान ठरत आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचं नुकसान अपरिहार्य ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)