You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंदाजे 30 लाख हेक्टर पीक क्षेत्र प्रभावित, एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करण्याची राज ठाकरेंची मागणी
20 तारखेपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा राज्यातील 30 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार यात 27,98,054 (69,95,135 एकर) हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून 15 जिल्ह्यांत 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित क्षेत्र आहे.
ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली असल्यानं, एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
प्रभावित क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पूरप्रभावित क्षेत्राची पाहणी केली असून मदतीचे आश्वासन दिले आहे.
मराठवाड्यात 20 सप्टेंबरपासून झालेल्या पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 150 जनावरे दगावली. तसेच, 327 घरे-गोठ्यांची पडझड झाल्याची माहिती आहे.
नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचं पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. पावसात सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी - राज ठाकरे
एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे."
सरकारनं खालील सूचनांचा विचार करावा असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
1) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी 7 आणि 8 हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान 30 हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान 1 वर्ष लागेल.
2) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा.
3) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी.
4) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील, जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
5) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. एकरी किमान 30 ते 40 हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
'थकीत रक्कम लवकरात लवकर वाटप करावी' - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे की, "सरकारने 2,339 कोटी रुपयांच्या निधीला केवळ मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात वितरण झालेले नाही, वितरणाला बराच कालावधी लागणार आहे. शेतकऱ्यांना त्वरीत मदत पुरवण्यासाठी, योग्य वेळेत त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
तसेच, राज्य सरकारकडे नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी 15 ,000 कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम लवकरात लवकर वाटप करावी अशी मागणीही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे."
अजित पवारांनी केली सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी
दरम्यान, आज (24 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित विभागाला सूचना दिल्या.
सोलापूर, पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिकट आहे. ती ढगफुटी होती. यामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी जमीन वाहून गेली आहे, खरडून गेली आहे. यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं.
ते म्हणाले, "तात्काळ मदत देण्याला प्राधान्य देतोय. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहचती होईल. ओला दुष्काळाबाबत योग्य तो निर्णय घेऊ. शिवसेनेच्यावतीने औषधं, डाॅक्टरांची टीम आणि धान्य आम्ही पाठवलं आहे."
राज्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही ठिकाणी या पूरपरिस्थितीमुळं नागरिकांची जीवितहानी झाली आहे. त्याचबरोबर अनेक घरे, गृह उपयोगी वस्तू, आणि पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे.
या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे 24-25 सप्टेंबरला होणारा माझा 'जनसंवाद' कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मी स्वतः लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर, गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा व मदत द्यावी. तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत."
शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपये मदत करण्याचे जीआर काढले आहेत- मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले, "आतापर्यंत साधारण 975.5mm पाऊस पडलेला आहे. जो सरासरीच्या 102% इतका आहे.
काही भागात पूरपरिस्थितीमुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू सुरू आहे. अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झाले आहेत. NDRF आणि SDRF च्या 17 तुकड्या या भागात काम करत आहेत."
फडणवीस म्हणाले, "पंचनामे जसे येतायत तशी मदत करत आहेत. आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपये मदत करण्याचे जीआर काढले आहेत. मृत्यू असल्यास त्यांना मदत करायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना नियमानुसार मदत देऊ."
ते पुढे म्हणाले, "खरडून गेलेल्या जमिनीकरता आपला जीआर आहे त्यानुसार मदत देता येते. नरेगाच्या माध्यमातूनही मदत करता येते. केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. परंतु केंद्राची मदत येण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत थांबणार नाही. NDRF चे ॲडवान्स पैसे आलेले आहेत ते वापरू. आतापर्यंत सर्व जीआर मिळून 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांकरता 2215 कोटी आतापर्यंत रिलीज केले आहेत. यातले खालपर्यंत 1829 कोटी पोहोचले आहेत. उर्वरित दोन दिवसात देणार. स्थलांतर केलेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात येत नाही आणि सफाई होत नाही तोपर्यंत सर्व खर्च सरकार करणार. घरं, जनावरे आणि शेती याचे स्वतंत्र असेसमेंट होणार. त्यानुसार नुकसान भरपाई देणार."
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर जिल्हयातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. करमाळ्यातील कोर्टी या ठिकाणापासून त्यांनी पाहणी सुरू केली. यावेळी त्यांनी शेतात जाऊन शेत पिकांची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं, शेतकऱ्यांचं नुकसान - शरद पवार
पावसाच्या परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "यंदा राज्यात अभूतपूर्व पाऊस पडला आहे. जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून सोयाबीनसह इतर अनेक पिकं कुजून गेली आहेत.
सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटकाळी त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे. जमीन वाहून गेलं, पिक गेलं, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे."
तर, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर म्हणाले, "पावसामुळे मराठवाड्यासह पूर्व-पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत गंभीर स्थिती उद्भवली आहे. या पावसामुळे सोयाबीनसह, कपाशीचं पीक पूर्णत: नष्ट झालं आहे. या आधीच्या पावसाने कठीण परिस्थिती उद्भवली होती, त्याचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यात या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरं वाहून गेली, माणसं असुरक्षित आहेत. त्यामुळे लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. अशा स्थितीत सरकारने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची गरज आहे. परिस्थिती सरकारने या दुष्काळ जाहीर करावा, यापूर्वीही आम्ही ही मागणी केली होती.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांना व्यवस्थित सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
ही कार्यवाही 'आपदा मित्र' अक्कलकोट यांनी बार्शी येथे जाऊन केली. पहाटे चार वाजलेपासून ही कार्यवाही केली.
बीड, धाराशिव, सोलापूरमध्ये रात्रीपासून बचावकार्य सुरू असल्याचे NDRF ने सांगितले. बीड जिल्ह्यातून 26, धाराशिव जिल्ह्यातून 9 आणि सोलापूर जिल्ह्यातील 59 जणांची बचावपथकापासून सुटका करण्यात आली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा- उद्धव ठाकरे
मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्राने 10,000 कोटींची मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, "सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत."
"आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे.शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा.जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या.
ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या."
महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी अशी मागणी करणारे, पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
300 हून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती
रविवारी (21 सप्टेंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तातडीने धाव घेतली आहे. आतापर्यंत अनेक कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी अजूनही काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात बांधलेल्या दावणीतील 300 हून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथील थोरबोले, जगताप आणि ठोंगे वस्त्यांवर पूराचे पाणी घुसले असून तेथील नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज करण्यात आले आहेत.
पूरामुळे गावोगावी घरे पाण्याखाली गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. आधीच हातात न आलेली शेतीची पिके पाण्यात बुडाली असून, घरातही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे.
स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ पथके तसेच बचाव पथके युद्धपातळीवर काम करत असून, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना, तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम आणि कळंब तालुक्यातील काही गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक अडकले असून सकाळपासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे सुमारे 150 ते 200 नागरिक अडकले होते. सकाळपासून सुरू झालेल्या बचाव कार्यात आतापर्यंत 99 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये लाखी (12), रुई (13), देवगाव खुर्द नरसाळे चौधरी वस्ती (4), ढगपिंपरी (8), करंजा (2), कपिलापुरी (11), वाघेगव्हाण (3) आणि नालगाव (20) या गावांतील लोकांचा समावेश आहे.
दरम्यान, कळंब तालुक्यातील खोंदला गावात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे 20 कुटुंबांना रात्री ग्रामपंचायत कार्यालयात हलविण्यात आले. कळंब तालुक्यात एक व्यक्ती अजूनही अडकलेली असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूम तालुक्यात पाणी साचले असले तरी लोक अडकलेले नाहीत.
सध्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाऊस कधी सौम्य तर कधी जोरात सुरू असून प्रशासनाकडून सतत बचाव व मदत कार्य सुरू आहे.
बीडमधील पावसाची परिस्थिती
दिनांक - 16/09/2025
बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून नद्या-नाल दुथडी भरून वाहत आहेत.
यासह मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
बीड जिल्ह्यात 15 तारखेला झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावे जलमय झाली आणि काही तासांतच शेकडो कुटुंबे अडकून पडली. या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देत भारतीय लष्कराने नागरी प्रशासनाच्या समन्वयाने व्यापक बचाव मोहीम हाती घेतली आहे.
दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स ब्रिगेड मधील लष्करी विमानदलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आली. प्रतिकूल हवामान व कठीण उड्डाण परिस्थितीला तोंड देत वैमानिकांनी दुर्गम व जलमग्न भागांत प्रवेश करून अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.
महिलांसह मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तसंच इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड, किनगाव राजा परिसरातील अनेक गावात काल (15 सप्टेंबर) ढगफुटी सदृश पाऊस झाला. किनगावराजा गावाला पाण्याचा वेढा होता.
पाताळगंगा नदीला महापूर आला असून तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, शेतातील उभी पिके पाण्यात गेल्याने मोठ नुकसान झालं आहे.
इंदापूर तालुक्यात पावसामुळे पूरस्थिती, कृषिमंत्र्यांकडून पाहणी
इंदापूर तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सणसर नाल्याला पूर आला. यामुळे शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले.
15 सप्टेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. सणसरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन कृषी आणि महसूल विभागाला नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, "इंदापूर तालुक्यात कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सणसर भागात पूरस्थिती निर्माण झाली. भविष्यात अभी परिस्थिती टाळण्यासाठी ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. लवकरच हे काम मार्गी लावू."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.