You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमचं सगळं वाटोळं होऊन गेलंय, मेल्यात गिणती आहे आमची' ; हसनाळ गाव पाण्याखाली गेलं, जबाबदार कोण?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Author, अमोल लंगर
- Role, बीबीसी मराठीसाठी
"आमचं सगळं वाटोळं होऊन गेलंय. पैसा, लेकरायचं सामान, सगळं सगळं गेलंय. आमचं काहीच राहिलं नाही. मेल्यात गिणती आहे आमची. आम्हाला कुणी मदत करायला आलं नाही. आम्ही रस्त्यावर हाय बघा. भीक मागून खावं लागतं आम्हाला."
हसनाळ गावातील एक महिला सांगत होत्या. या महिलेसहित हसनाळ मधील अनेकांचा संसार एका रात्रीत उघड्यावर पडलाय.
आम्ही हसनाळमध्ये पोहचलो तेव्हा सगळीकडे लोक घरातील सामान शोधून बाहेर काढताना दिसले. गावातील घरं अजूनही पाण्याखाली आहेत. पाण्यामध्ये मरुन पडलेली जनावरं दिसताहेत.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. शेळ्या-जनावरं मोठ्या प्रमाणावर दगावलेले आहेत. याचा आकडा निश्चित करण्याचं काम पशुसंवर्धन विभाग करतंय.
"विशेषत: लेंडी धरण प्रभावक्षेत्रातील जे पुनर्वसित गावं होते, पण त्यांचं स्थलांतरण होणं बाकी होतं. या पट्ट्याला जास्त अडचण आलेली आहे."
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणक्षेत्रात 18 ऑगस्टच्या मध्यरात्री अतिप्रचंड पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पाणी 20 फूटांनी वाढलं आणि रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पाणी शिरलं. लेंडी नदीला आलेल्या पुरानं संपूर्ण हसनाळ गाव पाण्याखाली गेलं.
'प्रशासनानं विश्वासात घेतलं नाही'
ग्रामस्थ संदीप शिंदे म्हणतात, "हे जे पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकारची निष्काळजी दिसून येते. रात्री 1 वाजता अचानक पाणी आलं, ज्यावेळेस गावातली सर्व लोक झोपलेले होते. प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. फक्त आणि फक्त गावकऱ्यांनी एकमेकांना उठवलं आणि आम्ही वर आलो. नाहीतर ज्या 5 मौत गावात झाल्या, त्याजागी 500 लोक आमची मरुन पडली असती."
हसनाळ गावात पाणी शिरल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. सरकारकडून मयतांच्या नातेवाईंकाना 4 लाख रुपयांची मदत देण्यात आलीय.
40 वर्षं रखडलेल्या लेंडी धरणाच्या घळभरणीचं काम 2025 च्या मे महिन्यात सुरू झालं. पण, घळभरणीला इथल्या लोकांचा विरोध होता. आधी पुनर्वसन मग घळभरणी, असं त्यांचं म्हणणं होतं.
गावाचं पुनर्वसन करताना मागण्या पूर्ण न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं हसनाळच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
हसनाळ गावातील माधव शिंदे सांगतात, "घळभरणीला नागरिकांचा पूर्ण विरोध होता. विरोध असताना गावात पोलीस फोर्स लावून ही घळभरणी करण्यात आली. त्यानंतर गावात तळ्यामध्ये फक्त 30 % पाणी भरण्यात येईल, जेणेकरुन ते गावात शिरणार नाही, असं प्रशासनानं सांगितलं होतं. पण पाण्याची पातळी 100 % झाली आणि पाणी गावात शिरलं."
"पहिले पुनवर्सन मगच धरण, हा शासनाचा नियम आहे. पण कुठलेही प्लॉट न देता पहिले घळभरणी करुन आजपर्यंत कुणालाही प्लॉट नाही. वाहतूक भत्ता मिळालेला नाहीये. त्यामुळे आम्ही गावातून हललो नाही. आमचे काहीच प्रश्न न सोडवता बळजबरी घळभरणी करण्यात आली," माधव पुढे सांगतात.
'चौकशीअंती गोष्टी समोर येतील'
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी हसनाळ गावाला भेट देत नुकसानीची पाहणी केली.
यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "पुनर्वसनाचा इथला विषय होता. काही घरं शिफ्ट झाली होती, तर काही घरं इथंच राहून गेली होती. यात काही तांत्रिक अडचणी असतील, चुका असतील. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं नाही की इतकं पाणी येईल.
"अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, गावकऱ्यांना वारंवार सूचना दिल्या पण इथून कुणी निघालं नाही. यासंबंधीच्या गोष्टी चौकशीअंती समोर येतील. गावकऱ्यांचा इरिगेशन खात्यातील अधिकाऱ्यांवर रोष आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्ही चौकशी करू. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
मोबदला कधी मिळणार?
धरणासाठी जमीन संपादित करताना पुरेसा मोबदला न मिळाल्याचंही हसनाळचे ग्रामस्थ सांगतात.
माधव शिंदे म्हणतात, "घराचा एक रुपयाही भेटला नाही. फक्त शेताची तुटपुंजी मदत भेटलीय. दुसरं काहीच भेटलं नाही. घराचा तर रुपया भेटला नाही."
लेंडी धरणक्षेत्रातील काही नागरिकांना आर्थिक मोबदला देण्याचं बाकी असल्याचं मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी म्हटलं आहे.
आमदार तुषार राठोड म्हणाले, "ज्या जमिनी धरण क्षेत्रामध्ये गेल्या होत्या, त्याला अनेक वर्षं लोटलेली आहेत. त्यावेळेस या जमिनींना अतिशय कमी किंमत दिली गेली. अतिशय म्हणजे 1 लाख रुपये हेक्टरी प्रमाणे या जमिनी शासनानं संपादित केलेल्या आहेत. आणि एवढ्या वर्षांपासून तलाव झाला नव्हता, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची मागणी होती की, आम्हाला काहीतरी वाढून पैसे भेटले पाहिजे.
"शासनानं यासाठी 165 कोटी स्पेशल पॅकेज देण्यात आलं. या गावांमधील 60 टक्के लोकांना पैसे देण्यात आलेत. बाकीच्या लोकांच्या याद्या आमच्याकडे तयार आहेत. ज्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल, सर्वांचे पैसे दिले जाईल."
हसनाळमध्ये शेतकऱ्यांनी घरी साठवलेल्या शेतमालाचं पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालंय. एकट्या नांदेड जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीपिकांचं नुकसान झालंय. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन देण्यात आलंय.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिममध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं, "नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांत पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार नुकसान भरपाई ताबडतोब दिली जाईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)