You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नैऋत्य मान्सूनची माघार, मग अजूनही राज्यात पाऊस का पडतो आहे?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 17 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतातून माघार घेतली असून त्यासोबतच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य मान्सूनच्या कालावधीतच बहुतांश पाऊस पडतो.
यादरम्यान महाराष्ट्रात थंडरस्टॉर्म अर्थात वादळांमुळे पाऊस पडतो.
सध्या अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या आसपासच्या परिसरात हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वारे वाहात असून, त्यातून 18 ऑक्टोबर पर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ ही प्रणाली तयार होऊन तिची तीव्रता त्यापुढच्या दोन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.
या प्रणालीच्या प्रभावामुळे 22 तारखेनंतर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या घाट प्रदेशात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी, विशेषतः धाराशीव आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
16 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्याता आहे.
23 ते 30 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ वगळता राज्यात इतर सर्व ठिकाणी नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत विदर्भातही पावसाची शक्यता आहे आणि त्या नंतरच्या आठवड्यातही कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस
यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी दाबाच्या प्रणालींमुळे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता.
आता ऑक्टोबरमध्येही महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
एरवी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवतो. यावर्षी त्यात थोडा दिलासा मिळू शकतो.
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात दिवसाचं सर्वाधिक कमाल तापमान नेहमीपेक्षा कमी राहील. पण रात्रीचं किमान तापमान मात्र नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
थोडक्यात, रात्री खूप थंडी पडणार नाही, पण दिवसा प्रचंड उष्णता जाणवण्याचं प्रमाण कमी असेल.
तसंच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत म्हणजे नैऋत्य मान्सूनोत्तर कालावधीतही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात वर्षातील एकूण पावसाच्या साधारण आठ टक्के पाऊस या मान्सूनोत्तर कालावधीत पडतो, हे लक्षात घ्यायला हवं.
यादरम्यान पॅसिफिक महासागरात ला निना प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे.
ला निनाच्या कालावधीत भारतात हिवाळ्यात जास्त थंडी अनुभवायला मिळते.
ला-निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होतं. त्याचा परिणाम शेजारी हिंदी महासागरातल्या सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायानं ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होतं.
यंदा नेमका किती पाऊस पडला?
मान्सून आपल्यासारखं कॅलेंडर मानत नाही, पण आकडेवारीसाठी सोयीचं म्हणून भारतीय हवामान विभागातर्फे 1 जून ते 30 सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी म्हणून गणला जातो.
या काळात किती पाऊस पडला आहे, हे पाहण्याआधी हवामान विभागानं कुठे किती पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला होता, हे पाहूयात.
तर, यंदा मान्सूनच्या काळात महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला होता.
त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 105 टक्के पावसाची तसंच लडाख, तामिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं होतं.
यंदा या कालवधीत महाराष्ट्रात देशात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झाला आहे. ईशान्य भारतातील आणि बिहार वगळता सगळीकडेच नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि विदर्भात सरासरीएवढा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
यावेळी जुलैमध्ये विदर्भात, ऑगस्टमध्ये कोकणात आणि सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतीवृष्टीच्या घटना घडल्या आहेत.
शक्ती चक्रीवादळ
तसंच ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात 'शक्ती' हे अतीतीव्र चक्रीवादळ तयार झालं.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता. त्यातूनच या चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.
यंदाच्या वर्षातलं आणि या हंगामातलं हे दक्षिण आशियातलं पहिलं चक्रीवादळ ठरलं.
यंदा मान्सूनचं वेळेआधी आगमन का झालं?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 29 जून रोजी म्हणजे वेळेच्या साधारण 9-10 दिवस आधीच पूर्ण भारत व्यापला.
यंदा मान्सून 26 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला होता. 75 वर्षांत पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर मुंबईत दाखल झाला.
केरळमध्येही तो 24 जूनला म्हणजे नेहमीपेक्षा 8 दिवस आधी दाखल झाला होता. भारताच्या मुख्य भूमीवर मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही 2009 नंतरची पहिलीच वेळ ठरली. 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला होता.
यावेळी मान्सून लवकर तर आलाच पण अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झाला.
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रात दाखल झाला.
29 मे नंतर मान्सूननं थोडी विश्रांती घेतली. 16 जून पर्यंत त्याच्या स्थितीत कोणताही बदल झाला नव्हता. पण त्यानंतर मोसमी वारे पुन्हा सक्रीय झाले आणि वेळेआधीच त्यांनी पूर्ण भारत व्यापला.
मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे दोन प्रकार कोणते?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.
दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.
तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.
मान्सून ऑनसेट म्हणजे काय?
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
दरवर्षी अंदमान-निकोबारमध्ये साधारणपणे 20 मे पर्यंत मान्सून ऑनसेट होतो, म्हणजे मान्सून दाखल होतो. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि 7 ते 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो.
नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.
भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मान्सूनचा काळ साधारण 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा आहे. तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.
मान्सून कुठे तयार होतो?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.
पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.
पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.
भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.
मान्सून का महत्त्वाचा?
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.
1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.
एल निनो, ला निना आणि मान्सून
एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या तीन गोष्टी आहेत :
1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
विजा चमकत असताना अशी घ्या काळजी
वीज पडणे अत्यंत धोकादायक असू शकते आणि व्यक्ती, संरचना आणि सामान्य पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करते, असंही नमूद करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी याची माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी दिली.
1. घरात रहा: मोठ्या इमारतीत किंवा पूर्णपणे बंद असलेल्या वाहनात आश्रय घ्या. मोकळ्या जागा, उंच जमीन, उंच झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू टाळा.
2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा: विद्युत उपकरणे डिस्कनेक्ट करा आणि लँडलाइन टेलिफोन वापरणे टाळा. वीज पडल्याने वीज पडू शकते ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होऊ शकते.
3. पाणी टाळा: वादळाच्या वेळी आंघोळ करू नका, आंघोळ करू नका किंवा नळ वापरू नका, कारण विजेचे प्रवाह प्लंबिंगमधून जाऊ शकतात.
4. खिडक्या आणि दारे दूर रहा: उघड्या खिडक्या किंवा दारे वापरून वीज इमारतींमध्ये प्रवेश करू शकते. सर्व खिडक्या आणि दारे बंद करा आणि त्यांच्याकडे झुकू नका.
5. धातूच्या वस्तू वापरणे टाळा: छत्री, गोल्फ क्लब, सायकली किंवा इतर कोणत्याही धातूच्या वस्तू बाहेर वापरण्यापासून परावृत्त करा. धातू वीज चालवते आणि वीज पडण्याचा धोका वाढवते.
6. माहिती ठेवा: कोणत्याही आपत्कालीन सूचना किंवा हवामान परिस्थितीत बदलांसाठी स्थानिक हवामान अद्यतने, बातम्या बुलेटिन किंवा अधिकृत घोषणा ऐका.
7. जर तुम्ही जवळपास निवारा नसताना बाहेर पडलात तर: झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूंपासून दूर सखल जागा शोधा. खाली वाकून बसा, तुमचे पाय एकत्र ठेवा आणि जमिनीशी तुमचा संपर्क कमीत कमी करा. मोकळी मैदाने, टेकड्या आणि पाण्याचे साठे टाळा.
लक्षात ठेवा, पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतरही वीज कोसळू शकते. वादळ पूर्णपणे निघून जाईपर्यंत आणि परिस्थिती सुधारेपर्यंत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
कृपया तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा इशारा शेअर करा. माहिती ठेवा, सतर्क रहा आणि या वीज पडण्याच्या इशाऱ्यादरम्यान तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
अधिक मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत, पोलिस किंवा अग्निशमन विभागासारख्या तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि सुरक्षित रहा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.