कांदळवनांमध्ये नेमकं काय असतं? या 3 कारणांमुळे कांदळवनं आपल्यासाठी महत्त्वाची

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

समुद्र म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? लांबच लांब किनारा, माडाची झाडं, सूर्यास्त, एखादी मासेमारी करणारी बोट, खडकांवर आदळणाऱ्या लाटा वगैरे.

पण किनाऱ्यावर आणखी एक परिसंस्था असते. Mangrove Forest म्हणजे कांदळवनं.

पर्यावरणासाठी महत्त्वाची असणारी खारफुटीची जंगलं, संकटात आहेत.

त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणजे म्हणून साजरा केला जातो.

कांदळवनात नेमकं काय असतं आणि ती महत्त्वाची का असतात? जाणून घेऊयात.

कांदळवनं कुठे वाढतात?

कांदळवन म्हणजे तिवराची जंगलं किंवा खारफुटी. इंग्लिशमध्ये याला Mangroves असं म्हटलं जातं. हा एक साधारण 80 वनस्पतींचा गट आहे ज्या समुद्रकिनाऱ्यालगत वाढतात.

महाराष्ट्र वनविभागाच्या कांदळवन कक्षानं दिलेल्या माहितीनुसार कांदळवनांमध्ये झाडे, झुडुपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती, वेली आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे.

प्रामुख्यानं उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात (जवळजवळ 32° उत्तर आणि 38° दक्षिण अक्षांशांदरम्यानच्या प्रदेशात) ही वनं आढळून येतात.

समुद्रकिनारी भरती-ओहोटी रेषांदरम्यान या वनस्पती उगवतात. हा अधिवास भरतीच्या कालावधीत पाण्याखाली राहतो आणि आहोटीच्या वेळेत प्रकाशझोतात येतो.

जिथे समुद्राचं पाणी आणि गोडं पाणी यांची सरमिसळ होते, अशा खाडीप्रदेशातही कांदळवनं जोमानं फोफावतात.

भारतात आणि महाराष्ट्रात कुठे कांदळवनं आहेत?

भारतातील नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांच्या किनारपट्टीलगत कांदळवन आढळते. हे कांदळवन 4,992 किमी क्षेत्रावर पसरलेले आहे.

जागतिक कांदळवनांच्या आच्छादनापैकी 3.3 % कांदळवन क्षेत्र भारतामध्ये आहे.

भारत-बांगलादेश सीमेवरचं सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठं कांदळवन आहे.

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल, 2021 नुसार महाराष्ट्रात 324 चौरस किमीवर कांदळवनं आहेत, त्यात 22 प्रजातींच्या वनस्पती आढळून येतात. राज्यातल्या किनारी जिल्ह्यांमध्ये म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई (शहर आणि उपनगर) , रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कांदळवनं आहेत.

कांदळवनांची वैशिष्ट्ये काय आहेत?

जमीन आणि समुद्र एकत्र येतात, तिथे तग धरून राहण्याची आणि भरती-ओहोटीनुसार बदलणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांचा सामना करण्याची क्षमता कांदळवनातल्या झाडांमध्ये असते.

या प्रजातींची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटतो, पण ही मुळं एकप्रकारे भरतीच्या पाण्याचा वेग रोखणाऱ्या बफरसारखं काम करतात.

यात चिखलात उभं राहण्यासाठी मदत करणारी आधारमुळे, प्राणवायू घेण्यासाठी श्वसन मुळे आणि वाकलेली मुळे अशी विशिष्ट रचना दिसून येते. काही झाडांच्या मुळांतून नवी झाडे उगवू शकतात.

यातल्या काही झाडांची पानं क्षारांचे निस्सारण करतात, म्हणजे पानांतून मिठाचे कण बाहेर पडतात.

झाडावर रुजणारी बी हे कांदळवनाच्या काही प्रजातींचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

या अंकुरलेल्या बिया नंतर पाण्यात पडतात, दूरवर वाहून जातात, आणि योग्य परिस्थिती मिळाली की तिथे झाड मूळ धरून वाढू शकतं.

कांदळवने महत्त्वाची का आहेत?

कांदळवनं ही किनारी भागातली एक अतिशय महत्त्वाची परिसंस्था आहे. खारफुटी जंगलं का महत्त्वाची आहेत, याची तीन मुख्य कारणं आहेत.

खारफुटी जंगलांमध्ये जैवविविधता आढळून येते, ही जंगलं लाखोंना उपजीविका पुरवतात आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही मदत करतात.

1. जैवविविधतेचे ‘हॉटस्पॉट’

कांदळवन हे अनेक जलचर प्राणी जसे की मासे, खेकडे, झिंगे ह्यांचे आश्रय स्थान आहे. माशांच्या अनेक प्रजाती प्रजननासाठी इथे येतात. कांदळवनांतल्या परिसंस्थांमध्ये माशांच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आढळून येतात, असं UNEP या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संस्थेनं म्हटलं आहे.

अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या अंदाजानुसार मासेमारीतून पकडल्या जाणाऱ्या माशांपैकी 75 टक्के मासे कधी ना कधी कांदळवनात राहिलेले असतात.

पण फक्त सागरी जीवच कांदळवनांत राहतात असं नाही. सुंदरबनमध्ये वाघाचा संचार असतो, हेही तुम्हाला माहिती असेल.

2. उपजीविकेची साधने

फक्त प्राणीच नाही, तर कांदळवनांशेजारी करोडो लोकही राहतात. अन्न, मासेमारी, लाकूड, पर्यटन याद्वारा त्यांची उपजीविका आणि अर्थकारण या किनाऱ्यावरच्या जंगलांवर अवलंबून असतात.

अनेक ठिकाणी स्थानिक समुदायाचं अस्तित्व या जंगलांवर अवलंबून असतं. त्यांच्या संस्कृतीतही या वनांना महत्त्वाचं स्थान असतं.

3. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत

कांदळवानतले वृक्ष आणि दलदल हे ‘कार्बन सिंक’ सारखं काम करतात म्हणजे ते मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात.

कांदळवनातल्या वृक्षांची मुळं आणि फांद्या यांच्या अडथळ्यामुळे समुद्राकडून वाहत आलेला गाळ अडवला जातो आणि तिथे घट्ट नैसर्गिक बांध तयार होतो.

त्यामुळे वादळी वारे, त्सुनामी, चक्रीवादळे अशा संकटांमध्ये कांदळवनं नैसर्गिक संरक्षण भिंतीचे काम करतात. कांदळवन हे सागरी किनाऱ्यासाठी लाभलेले वरदान आहे म्हणून त्याचे रक्षण करणे महत्वाचे आहे.

याचं उदाहरण 2005 साली इंडोनेशियातल्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीच्या वेळी पाहायला मिळालं.

श्रीलंकेत तेव्हा एका घनदाट कांदळवनं असलेल्या गावात दोघांचाच मृत्यू झाला तर त्याच परिसरात फारशी कांदळवनं नसलेल्या गावात 6,000 जणांचा मृत्यू झाला.

भरतीच्या मोठ्या लाटा किंवा त्सुनामीमधली 70 ते 90 टक्के ऊर्जा कांदळवनं शोषून घेतात.

कांदळवनांच्या रक्षणासाठी भारत काय करत आहे?

2023 साली अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कांदळवनांच्या लागवडीसाठी एक योजना जाहीर केली. पण नवी वनं लावण्याआधी सध्या संकटात असलेल्या वनांचं संवर्धन व्हायला हवं असं अनेक तज्ज्ञांना वाटतं.

वाढती शहरं, भराव, किनाऱ्यावरची बांधकामं, रस्ते, वृक्षतोड, शेती, मत्स्यशेती अशा गोष्टींमुळे कांदळवनं संकटात सापडली आहेत.

पण कायदेशीर संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांमुळे ही जंगलं वाचवणं शक्य आहे. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातल्या कांदळवनांमध्ये वाढ झाली आहे, असं वनविभागाच्या आकडेवारीवरून दिसून येतं.

लोकांमध्ये कांदळवनांविषयी जागरुकता वाढली असून कडक कायदे आणि त्यांची कसून अंमलबजावणी कांदळवनांच्या संवर्धनात महत्त्वाची असल्याचं कांदळवन कक्षाचे अधिकारी सांगतात.

पण कांदळवनांच्या लागवडीची प्रक्रिया बरीच दमवणारी आहे. कांदळवन कक्षाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, आधी वेगवेगळ्या हंगामात कांदळवन प्रजातीच्या बिया/कंदिका गोळा केल्या जातात. त्या पिशव्यांमध्ये लावणं, पाण्याचा प्रवाह वाहू देण्यासाठी आणि रोपट्यांच्या वाढीसाठी छोटे कालवे खोदणे अशी काम करावी लागतात. तर लागवडीची देखभाल पुढील सात वर्ष केली जाते.

मुंबईसारख्या शहरात, जिथे जागेची कमतरता जाणवते आणि वर्षानुवर्ष भराव घालून जमीन तयार केली जात आली आहे, तिथे कांदळवनांचं संरक्षण आणखी आव्हानात्मक ठरतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)