You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उष्णतेची लाट : समुद्राचं तापमान वाढतंय, आपल्याला याचा काय धोका?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
मे महिना म्हणजे भारतात उन्हाचा तडाखा, हे समीकरण नवं नाही. पण मोखा चक्रीवादळाने यात आणखी भर घातली.
या वादळानं बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीला झोडपून काढलंच, पण या वादळाच्या प्रभावाखाली बदललेल्या वाऱ्यांमुळे भारताच्या मुख्य भूमीवर मात्र तापमानाचा पारा आणखी वर चढला.
भारतात अनेक ठिकाणी पारा 40-42 च्या वर गेलाय, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. पण अशा उष्णतेच्या लाटा समुद्रातही येतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्ही समुद्रकिनारी राहात असाल-नसाल, तरी या सगळ्याचा तुमच्या जगण्यावर आणखी परिणाम होऊ शकतो.
त्यामुळेच चक्रीवादळ, समुद्राचं तापमान आणि हवामान बदल यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
तीन दिवसांत वादळाची तीव्रता का वाढली?
सर्वात आधी मोखा चक्रीवादळाचा प्रवास कसा झाला, त्यावर नजर टाकूयात. अवघ्या तीन दिवसांतच या चक्रीवादळाची तीव्रता तीन पटींनी वाढली.
8 मे 2023 रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं होतं. 11 मे रोजी त्याचं सायक्लोनिक स्टॉर्म (CS) अर्थात मोखा चक्रीवादळात रुपांतर झालं. काही तासांतच त्याची तीव्रता सिव्हियर सायक्लोनिक स्टॉर्म (SCS) पर्यंत वाढली.
12 मेपर्यंत मोखानं व्हेरी सिव्हियर सायक्लोन (VSCS) म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि 13 मे रोजी एक्सट्रिमली सीव्हियर सायक्लोन (ESCS) म्हणजे अती तीव्र चक्रीवादळाचं रूप धारण केलं.
त्यात सलग तीन मिनिटं ताशी 215 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांची नोंद झाली. वाऱ्याचे काही झोत याहीपेक्षा वेगवान होते.
अशा प्रकारे वेगानं चक्रीवादळाची तीव्रता वाढणं याला रॅपिड इंटेन्सिफिकेशन ऑफ सायक्लोन असं म्हटलं जातं.
हे कशामुळे झालं, तर त्यामागे हवामान बदल आणि मुख्यतः समुद्राचं वाढलेलं तापमान कारणीभूत असल्याचं हवामानशास्त्रज्ञ रॉक्सी कोल सांगतात.
मुळात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान विशिष्ट प्रमाणात वाढलं की पाण्याची वाफ होऊन ती वर सरकू लागते, तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते.
समुद्राचं तापमान जितकं अधिक, तितकी चक्रीवादळाला मिळणारी उर्जा जास्त असते आणि पर्यायानं त्याची तीव्रता वाढते.
मोखा चक्रीवादळाच्या बाबतीत काहीसं तेच झालं. पण मोखा हा काही एक अपवाद नाही आणि अशा तीव्र चक्रीवादळांची संख्या वाढू शकते, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचं तापमान वाढत आहे.
तसंच समुद्र तापल्यानं आणखीही काही समस्या भेडसावतायत.
समुद्राचं तापमान नेमकं किती वाढलं आहे?
जीवाष्म इंधनांचा वापर आणि अन्य कारणांमुळे हवेत कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारख्या उष्णता शोषून घेणाऱ्या वायूंचं प्रमाण वाढलं आहे, हे तुम्हाला ठाऊक असेल. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामागचं हे मोठं कारण आहे.
पण तापमान वाढतं, म्हणजे ती उष्णता पृथ्वीवर कुठे साठून राहते? तर प्रामुख्यानं समुद्रात. पृथ्वीचा 71 टक्के भाग हा महासागरांनी व्यापला आहे आणि हे पाणीच सर्वाधिक कार्बनडायऑक्साईड शोषून घेतं.
नेमकी किती उष्णता महासागर शोषून घेत आहेत, याविषयीची माहिती Earth System Science Data या जर्नलमध्ये 17 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिली आहे. त्यानुसार पृथ्वी तापते आहे त्यातली सुमारे 89 टक्के ऊर्जा एकटे महासागर शोषून घेतायत.
गेल्या चाळीस वर्षांत महासागरांचं तापमान 0.6 अंशांनी वाढलं आहे.
अमेरिकेतील मेन विद्यापीठातील Climate Change Institute नं जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार एप्रिल 2023 मध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचं जागतिक सरासरी तापमान 21.1 अंश सेल्सियसवर पोहोचलं. हा एक नवा उच्चांक ठरला आहे.
पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाच्या प्रभावामुळे या उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढेल अशी शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
समुद्रातल्या उष्णतेच्या लाटांचा काय परिणाम होतो?
हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमानही सातत्यानं वाढत असल्याचं आणि या महासागरात उष्णतेच्या लाटा येत असल्याचं इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इंफर्मेशन सर्व्हिसच्या नोंदींवरून स्पष्ट होतं.
2021 साली पश्चिम हिंदी महासागरात सहा वेळा तर बंगालच्या उपसागरात चार वेळा उष्णतेच्या लाटा आल्याचं भारत सरकारनं जाहीर केलं होतं.
महासागरांच्या वाढत्या तापमानानं चक्रीवादळांची तीव्रता कशी वाढते, याविषयी आपण आत्ताच जाणून घेतलं. समुद्राच्या तापमानाचा मान्सूनच्या प्रवासाशीही संबंध आहे आणि त्यामुळेच भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मान्सूनविषयी भाकित करताना समुद्राचं तापमानही लक्षात घेतात.
साहजिकच समुद्रापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांचं जगणंही एक प्रकारे समुद्राच्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून आहे, असं म्हणता येईल.
तसंच महासागरातल्या उष्णतेच्या लाटांचा परिणाम सागरी जीवांवरही होतो. पाण्याचं तापमान वाढल्यानं प्रवाळांची बेटं नष्ट होतात, माशांसारख्या जीवांचं अस्तित्वही धोक्यात येतं.
याचा थेट परिणाम भारतावर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या किनारी राज्यांवर होताना दिसतो आहे. साडेसातशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असलेल्या महाराष्ट्रात सुमारे सव्वातीन लाख लोक मत्स्य व्यवसायात आहेत.
अरबी समुद्रातल्या उष्णतेच्या लाटांनी मुंबईतल्या मासेमारीवर कसा परिणाम झाला आहे, याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट आमच्या यूट्यूब पेजवर जरूर पाहा. याविषयीची अधिक माहिती तुम्ही आमच्या वेबसाईटवरही वाचू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)