तुम्हाला लागणाऱ्या उष्णतेच्या झळांमागे एल निनो आणि ला निना तर नाही?

    • Author, जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

पॅसिफिक महासागरातल्या हवामानाची एल निनो ही स्थिती आता संपली असल्याचं ऑस्ट्रेलियन हवामान विभागानं जाहीर केलं आहे. पण एल निनो आणि ला निना म्हणजे काय असतं आणि त्याचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होतो?

पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा हिवाळा सुरू होताना एल निनो आणि ला निना हे शब्द अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील.

जगभरातल्या तापमानावर आणि हवामानावर या दोन्हीचा परिणाम होताना दिसतो. एल निनोच्या काळात 2023-2024 या वर्षात जगभरात विक्रमी तापमानाची नोंद झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल.

त्यामुळे आधीच मानवप्रणित हवामान बदलाचे दुष्परिणाम आणखी प्रकर्षानं जाणवत असताना तुम्ही ते भोगलेही असतील.

एल निनो आणि ला निना काय आहेत?

'एल निनो' आणि 'ला निना' हे स्पॅनिश भाषेतले शब्द आहेत. एल निनो म्हणजे छोटा मुलगा आणि ला निना म्हणजे छोटी मुलगी.

पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं.

यालाच सदर्न ऑसिलेशन असं म्हणतात. तर एल निनो आणि सदर्न ऑसिलेशन यांना एकत्रितपणे ENSO (एन्सो) म्हणून ओळखलं जातं.

हे सगळं घडतं व्यापारी वाऱ्यांमुळे. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात. या वाऱ्यांचा पॅसिफिक महासागरातल्या सागरप्रवाहावर परिणाम होतो.

सामान्य स्थितीत म्हणजे न्यूट्रल परिस्थितीत या महासागराच्या वरच्या स्तरातलं पाणी गरम झाल्यावर आशियाच्या दिशेनं वाहू लागतं आणि खालच्या स्तरातलं थंड पाणी त्याची जागा घेतं. थोड्यात पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागातलं पाणी पूर्व भागात थोडं थंड असतं आणि पश्चिमेला आशियाजवळ ते तुलनेनं थोडं गरम असतं.

व्यापारी वाऱ्यांचा वेग कमी झाला किंवा ते उलट दिशेनं वाहू लागले, तर या वर आलेल्या पाण्याचं तापमानही वाढतं आणि मग गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं. या स्थितीला एल निनो म्हणून ओळखलं जातं. (वरचं रेखाचित्र)

पण हे व्यापारी वारे जेव्हा वेगानं वाहू लागतात तेव्हा गरम पाणी आणि त्यासोबत हवेतलं बाष्प आधी आशियाच्या दिशेनं सरकतं आणि मग हे थंड पाणीही पश्चिमेकडे वाहू लागतं. त्यालाच ला निना म्हणून ओळखलं जातं. (खालचं रेखाचित्र)

सागरी प्रवाहांची ही स्थिती पहिल्यांदा सतराव्या शतकात पेरूमधल्या मच्छिमारांच्या लक्षात आली होती.

दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ डिसेंबरच्या आसपास पाण्याचं तापमान वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी या प्रवाहाला नाव दिलं 'एल निनो डी नाविदाद' – ख्रिस्मसचा छोटा मुलगा.

तर याउलट स्थिती 'ला निना' नावानं ओळखली जाऊ लागली.

एल निनो कसा मोजतात?

एरवी साधारण दोन ते आठ वर्षांच्या अंतरानं एल निनो आणि ला निना परिस्थिती उद्भवताना दिसते. पण नेमकी कुठली स्थिती आहे, हे कसं मोजलं जातं?

एल निनो स्थिती जाहीर करण्याआधी वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

  • पूर्व पॅसिफिक प्रदेशात विषुववृत्ताजवळ समुद्राच्या पृष्ठभागाजवळ नेहमीपेक्षा जास्त तापमान
  • पश्चिम पॅसिफिक प्रदेशात ऑस्ट्रेलियातल्या डार्विनमध्ये वातावरणात हवेचा दाब नेहमीपेक्षा जास्त
  • मध्य पॅसिफिक प्रदेशात टहिटी बेटांजवळ वातावरणात नेहमीपेक्षा कमी दाब

एल निनो आणि ला निनाचा परिणाम काय होतो?

प्रत्येक वेळी एल निनो आणि ला निना जगाच्या हवामानावर समान प्रकारे प्रभाव टाकतील असं नाही. देशप्रदेशातल्या स्थितीनुसार तिथल्या पाऊस आणि तापमानावर परिणाम होतो. पण काही समान धागेही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहेत.

तापमान

एल निनोच्या काळात जगभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं तर ला निनाच्या काळात ते कमी होतं.

हे का होतं, तर एल निनोच्या काळात गरम पाणी पॅसिफिक महासागरात दूरवर पसरतं आणि समुद्राच्या पृष्ठभागावर बराच काळ राहतं. त्यामुळे पाण्यालगतची हवा तापते, वातावरणात आणखी उष्णता सोडली जाते. ला निनाच्या काळात याच्या नेमकं उलट घडताना दिसतं.

तज्ज्ञांच्या मते, आधीच मानवनिर्मित हवामान बदलामुळे जगात तापमानामध्ये वाढ झाली आहे, त्यात एल निनोच्या प्रभावामुळे 2023 हे आजवरच्या इतिहासात नोंदवलं गेलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. 2024 च्या महिन्यांमध्येही याचा प्रभाव जाणवला.

त्याआधी 2020 आणि 2022 या काळात अनपेक्षितपणे तीन वर्ष ला निनाचा प्रभाव होता. या काळात ला निनामुळे जगभरातल्या तापमानावर थोडासा अंकुश ठेवल्यासारखं झालं.

पावसावर परिणाम

एल निनोच्या काळात पॅसिफिक महासागरावरचे जेट स्ट्रीम (हवेच्या उच्च थरातले वेगानं वाहणारे वारे) दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे सरकतात. त्यामुळे अमेरिका आणि मेक्सिकोच्या आखातात जास्त पाऊस पडतो, तर आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, मध्य आफ्रिकेत तुलनेनं कोरडी हवा असते.

ला निनाच्या काळात उलट स्थिती असते.

वादळं

एल निनोचा प्रभाव वातावरणात हवेच्या प्रवाहांवर पडतो आणि परिणामी या काळात पॅसिफिक महासागरात विषुववृत्ताजवळ जास्‌त वादळं येतात, पण अटलांटिक महासागरातल्या वादळांची संख्या कमी होते. ला निनाच्या काळात या उलट स्थिती असते.

कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण

कारणम विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये कोरड्या हवेमुळे झाडांची वाढ कमी होते, त्यामुळे कमी CO2 शोषून घेतला जातो. तर उष्णतेमुळे वणवे पेटतात आणि आणखी कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो.

एल निनो, ला निनाचा भारतावर कसा परिणाम होतो?

एल निनोच्या काळात भारतातही उष्णता जास्त वाढताना दिसते. तर ला निनाच्या काळात सामान्य अथवा सरासरीपेक्षा जास्त पाऊसही पडतो, असं हवामान विभागची आकडेवारी दर्शवते.

1954 ते 2022 दरम्यान 22 वर्ष ही ला निनाची होती. त्यात 1974 ते 2000 या दोन वर्षांचा अपवाद वगळता,एरवी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे..

पण एल निनोसारखाच सारखाच हिंद महासागरातला इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही मान्सूनवर परिणाम करू शकतो.

2024 च्या एप्रिल महिन्यात IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो पॉझिटिव्ह होईल आणि परिणामी यंदा भारतात चांगला पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

ला निनाच्या काळात भारतात सामान्यतः थंडीचं प्रमाण थोडं वाढताना दिसतं.

इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठामध्ये हवामानाचा अभ्यास करणारे अक्षय देवरस यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "हवामानाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर समुद्र आणि हवामान यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. ला-निना परिस्थिती असते त्या वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात हिवाळ्याच्या महिन्यात तापमान सरासरीपेक्षा कमी असतं. अर्थात यापूर्वीच्या काही ला-निना वर्षात याच्या उलट परिस्थितीही पाहण्यात आलेली आहे. वातावरणातल्या इतर गोष्टींचाही हवामानावर परिणाम होत असतो."

एल निनोवर लक्ष ठेवणं का महत्त्वाचं?

फक्त भारतच नाही, तर जगभरात अन्न, सुविधा आणि ऊर्जानिर्मितीवर एल निनो आणि ला निनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो.

उदाहरणार्थ एल निनोच्या काळात उष्ण तापमानामुळे दक्षिण अमेरिकेनजीक महासागरातल्या मासे आणि इतर जीवांवर परिणाम होतो.

2015-16 या काळात एल निनोमुळे निर्माण झालेल्या पूर आणि दुष्काळामुळे जगभरात सहा कोटी लोकांची अन्न सुरक्षा थेट धोक्यात आल्याचं संयुक्त राष्ट्रंच्या कृषी संस्थेचा अहवाल सांगतो.

एरवी साधारण दोन ते आठ वर्षांच्या अंतरानं एल निनो आणि ला निना परिस्थिती उद्भवताना दिसते.

हे दोन्ही नेहमी लागोपाठच येतात, असं मात्र नाही. काही वेळा सलग काही वर्ष एल निनो तर सलग काही काळ ला निना दिसणं नैसर्गिक आहे. पण ला निना स्थिती निर्माण होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं.

2020-2022 या काळात सलग तीनदा ला निना स्थिती उद्‌भवली होती.

हवामान बदलाचा एल निनो, ला निनावर परिणाम होतोय का?

2021मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या IPCC या संस्थेनं जाहीर केलं की 1850 ते 1950 दरम्यान आढळून आलेल्या एन्सो स्थितींच्या तुलनेत 1950 नंतर एल निनो आणि ला निना जास्त ताकदवान झाल्याचं दिसतं.

पण झाडांच्या खोडांचा अभ्यास आणि ऐतिहासिक दस्तावेजांवरून असंही दिसून येतं की एन्सोच्या प्रभाव आणि वारंवारतेत पंधराव्या शतकापासून बदल होताना दिसले आहे.

त्यामुळे हवामान बदलाचा एल निनो आणि ला निनावर परिणाम होतो आहे का, याचा कुठला ठोस पुरावा नाही, असं IPCC चा अहवाल सांगतो.

पण काही संशोधकांनी भाकित वर्तवलं आहे की जागतिक तापमानवाढीचा परिणाम म्हणून एल निनो वारंवार आणि मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे, पण त्याविषयी आत्ताच ठोस सांगता येणार नाही.

(अतिरिक्त रिपोर्टिंग : मार्क पॉइंटिंग आणि एस्मी स्टॅलार्ड, बीबीसी न्यूज क्लायमेट अँड सायन्स)