You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातल्या वाढलेल्या तापमानाबद्दल संशोधक काय भीती व्यक्त करत आहेत?
जगभरातलं वाढलेलं तापमान या वर्षअखेरपर्यंत कमी झालं नाही तर हवामान बदलाचे अकल्पित परिणाम होऊ शकतात अशी भीती संशोधक व्यक्त करत आहेत.
2024चा मार्च महिना हा आजवरचा जगातला सर्वात उष्ण मार्च महिना असल्याचं आकडेवारी सांगतेय. गेले 10 महिने सातत्याने अशी आजवरची तापमानं नोंदवण्यात आली आहेत. त्यावरून वैज्ञानिक ही भीती व्यक्त करत आहेत.
भारतात 2024 च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत उष्णतेची लाट नोंदवली गेली नाही पण असं असली तरी काळात महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान नेहमीपेक्षा अधिक होतं. दक्षिण भारतातही फेब्रुवारी - मार्च तर मध्य भारतात मार्चमध्ये हीच स्थिती होती.तर देशाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय.
एप्रिलमध्ये महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मे महिन्यात उत्तर भारतातही पारा वर चढण्याची शक्यता असते.
उष्णतेची लाट म्हणजे काय? तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागांमध्ये सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.
जग कदाचित यापेक्षा वेगवान हवामान बदलांच्या उंबरठ्यावर असल्याची काळजी काही संशोधक व्यक्त करत आहेत.
सध्या काही ठिकाणच्या वाढलेल्या तापमानासाठी एल निनो (El Niño) कारणीभूत आहे.
येत्या काही महिन्यांत या एल निनो या पॅसिफिक महासागरातल्या प्रवाहाची तीव्रता मंदावेल आणि त्यानंतर तापमान काही काळासाठी कमी व्हायला हवं, पण असं होणार नसल्याची काळजी काही संशोधकांना वाटतेय.
"उन्हाळा संपेपर्यंत उत्तर अटलांटिक किंवा इतर भागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमान पहायला मिळालं, तर याचा अर्थ नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडतंय," नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजच्या गॅविन श्मिड्ट यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
औद्योगिक क्रांतीनंतर माणसाने जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणात जाळायला - वापरायला सुरुवात केली. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अभ्यासानुसार मार्च 2024चा महिना हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळापेक्षा 1.68 सेल्शियसने जास्त उष्ण होता.
आतापर्यंत मोठ्या कालावधीत झालेली तापमानवाढ ही संशोधकांनी मांडलेल्या अंदाजांनुसारच होती. त्यामुळे हवामान बदलाचा नवा टप्पा सुरू झाला नसल्याचं बहुतेक संशोधकांना वाटतंय.
पण असं असलं तरी 2023ची वर्षअखेर इतकी उष्ण का होती, यामागची उत्तरं सापडलेली नाहीत.
मार्चमधलं वाढलेलं तापमान हे शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसारच होतं. गेल्या जून 2023 मध्ये एल निनोला सुरुवात झाली आणि डिसेंबरमध्ये या एल निनो प्रवाहांची तीव्रता सर्वोच्च होती.
एल निनो ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांची एक विशिष्ट स्थिती आहे. एल निनोदरम्यान विषुववृत्ताजवळ पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान वाढतं आणि ते गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं.
जगभरातल्या वाढलेल्या तापमानामागचं महत्त्वाचं कारण आहे जीवाश्म इंधनाचा वापर. पण या एल निनोमुळे वातावरणातला उष्मा वाढतो.
पण सप्टेंबर 2023पासून सर्वोच्च तापमानाचे रेकॉर्ड्स मोठ्या फरकाने मोडायला लागले. त्यावेळी एल निनोची स्थिती प्राथमिक अवस्थेत होती. म्हणूनच त्याकाळात तापमान इतकं वाढण्यामागे एल निनो कारण नाही.
भविष्याचा अंदाज बांधणं कठीण
"2023साठीचे आमचे अंदाज काहीसे चुकीचे ठरले आणि जर आधीची आकडेवारी कामी आली नाही तर मग भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण होईल," डॉ. श्मिडट सांगतात.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या डॉ. समांथा बर्जिस याला दुजोरा देत म्हणतात, "गेल्या वर्षाच्या मध्यात परिस्थिती अशी अचानक का बदलली आणि ही परिस्थिती अजून किती काळ अशीच राहील आणि हा कायमचा बदल आहे की दीर्घकालीन हवामान बदलामधील लहानसा बदल आहे, हे समजून घेण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत."
सध्या कार्यरत असलेल्या एल निनो प्रवाहांची तीव्रता पुढच्या काही महिन्यांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती यामुळे कशी बदलेल याबद्दल संशोधकांना पूर्ण खात्री नसली तरी सध्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजांनुसार उष्ण एल निनोची जागा, ला निनाचे शीत प्रवाह घेतील. या प्रवाहांमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे जागतिक तापमानांत घट होते. पण यावर्षी पुढे नेमकं काय होतं, ते पहावं लागणार आहे.
तापमान वाढ रोखण्यासाठी काय करायला हवं?
मग वातावरणातली उष्णता आणि परिणामी तापमान वाढ रोखण्यासाठी काय करायला हवं?
यासाठीचा मोठा उपाय म्हणजे ज्या वायूंमुळे वातावरणातलं तापमान वाढतं त्यांचं उत्सर्जन रोखणं वा घटवणं.
मकेटर ओशन इंटरनॅशनलच्या डॉ. अँजेलिक मेलेट सांगतात, "आपल्याकडे येत्या काही वर्षांचा काळ आहे ज्यात आपण उत्सर्जन कमी करून हवामान बदलामुळे झालेल्या परिणामांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू शकतो. यातली आव्हानं मला माहिती आहेत पण हेही खरं आहे की जर आपण पावलं उचलली नाहीत तर आपल्याला अशा एका भविष्यकाळाला सामोर जावं लागेल जिथे 2023सारखं तापमान हे 'न्यू नॉर्मल' असेल. आणि हे किती वेगाने घडेल, हे आपल्यावर अवलंबून आहे."