क्लाऊड सीडिंग म्हणजे काय? दुबईत त्यामुळे पूर आला का?

    • Author, मार्क पाँटिंग आणि मार्को सिल्व्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दुबईत धोधो पाऊस झाला आणि त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले. कारण मुळातच अत्यंत कमी पाऊस होणाऱ्या क्षेत्रात प्रचंड पाऊस पडला.

पण नेमका किती पाऊस पडला आणि कशामुळे?

दुबई शहर युनायटेड अरब अमिराती (UAE) च्या किनाऱ्यावर वसलंय आणि इथलं हवामान कोरडं आहे. वर्षभरात इथे सरासरी 100 मिलीमीटर (3.9 इंच) पेक्षाही कमी पाऊस पडतो. पण असं असलं तरी कधीतरी इथे अतिवृष्टीही होते.

दुबईपासून 100 किलोमीटरवरच्या अल-एन शहरात 16 एप्रिलच्या 24 तासांत 256 मिमी पाऊस झाला.

कमी दाबाच्या अनाहूत पट्ट्यामुळे गरम, आर्द्र हवा इथे जमा झाली पण बाकीच्या हवामान प्रणालींचा प्रभाव त्यानं कमी केला. त्यामुळे असा भरपूर पाऊस पडला

रीडिंग विद्यापीठातली प्राध्यापक मार्टिन अम्बॉम हवामान शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी आखाती भागातल्या पावसाचा अभ्यास केलाय. ते सांगतात, "जगाच्या या भागात दीर्घकाळ पावसाशिवाय जातो आणि मग अनियमित, मुसळधार पाऊस पडतो. पण असं असलं तरी आताचा पाऊस ही दुर्मिळ घटना होती."

हवामान बदलाचे परिणाम?

अशाप्रकारे मुसळधार पाऊस पडण्यामागे हवामान बदलाचा हात किती आहे, हे नेमकं सांगता येणार नाही. त्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास होणं गरजेचं आहे आणि यासाठी अनेक महिने लागतील. पण सध्या झालेला रेकॉर्ड पाऊस हा हवामान बदल दाखवणारा आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गरम हवा जास्त आर्द्रता धरून ठेवते. दर डिग्री सेल्शियसमागे जवळपास 7% अधिक आर्द्रता साठवली जाते. परिणामी यामुळे पावसाची तीव्रता वाढते.

"रेकॉर्डब्रेक पाऊस झाला, पण हे तापणाऱ्या वातावरणाशी सुसंगत आहे. कारण आर्द्रता वाढली की त्यामुळे वादळ तयार होतात आणि अतिवृष्टी - पूर येण्याच्या घटनांची शक्यता वाढते," रीडिंग विद्यापीठाचेय हवामान विज्ञानाचे प्राध्यापक रिचर्ड अॅलन सांगतात.

जगभरातलं तापमान वाढत असल्याने या शतकाच्या अखेरपर्यंत UAE मध्ये दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाचं प्रमाण सुमारे 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता नुकतीच एका अभ्यासात मांडण्यात आली होती.

इम्पेरियल कॉलेज लंडनचे हवामानशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. फ्रेडरिक ओटो सांगतात, "माणसाने जर तेल, गॅस आणि कोळसा जाळणं सुरूच ठेवलं तर वातावरणाचं तापमान वाढत जाईल, पावसाचं प्रमाण अधिक होईल आणि पुरांमुळे लोकांचे जीव जातील."

क्लाऊड सीडिंगमुळे अतिवृष्टी झाली?

अस्तित्वात असणाऱ्या ढगांमध्ये ठराविक प्रकारच्या कणांचं बीजारोपण करून कृत्रिम पाऊस पाडला जातो. याला क्लाऊड सीडिंग म्हणतात.

कृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ज्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा आहे, तिथल्या आकाशात बाष्पयुक्त ढग असणे आवश्यक आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून पावसासाठी अनुकूल असणाऱ्या ढगांचा शोध घेण्यात येतो.कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता 70 टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचं बीजरोपण करण्यात येतं.

हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते. याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसंच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

ही पद्धत अनेक दशकांपासून अस्तित्वात असून गेली काही वर्षं पाणी तुटवड्यावरचा उपाय म्हणून UAE ती वापरत आहे.

देशामध्ये करण्यात येणाऱ्या क्लाऊड सीडिंग - कृत्रिम पावसाच्या प्रयोगांमुळेच हा धोधो पाऊस पडला आणि पूर आला असा निष्कर्ष काही सोशल मीडिया युजर्सनी पूर आल्यानंतर काढला.

रविवारी आणि सोमवारी क्लाऊड सीडिंग करणाऱ्या विमानांचा वापर करण्यात आला होता. पण ज्या दिवशी - मंगळवारी पूर आला त्यावेळी क्लाऊड सीडिंग करणारी विमानं वापरण्यात आली नसल्याची माहिती सुरुवातीच्या रिपोर्ट्समधून समोर येतेय.

क्लाऊड सीडिंग करण्यात आलं होतं का, याची पडताळणी बीबीसीने केलेली नाही. पण तज्ज्ञांच्या मते असं करण्यात आलं असलं तरी त्याचा वादळावर थोडाच परिणाम होतो आणि म्हणूनच 'क्लाऊड सीडिंग'ला मुख्य कारण मानणं दिशाभूल करणारं आहे.

"क्लाऊड सीडिंगमुळे दुबईजवळच्या ढगांना पाऊस पाडण्यास प्रोत्साहन जरी मिळालं असलं तरी हवामान बदलांमुळे मुळातच वातावरणातच ढग तयार करण्याइतकं जास्त पाणी होतं," डॉ. ओटो सांगतात.

वारा, आर्द्रता आणि धूळ यांची स्थिती पाऊस पाडण्यासाठी अपुरी असली तरच क्लाऊड सीडिंगचा पर्याय वापरला जातो. आखातामध्ये पूर येण्याचा मोठा धोका असल्याचा इशारा गेल्या आठवड्यात देण्यात आला होता.

"जेव्हा इतक्या तीव्र आणि मोठ्या प्रमाणावरच्या हवामान प्रणालींचा अंदाज वर्तवला जातो तेव्हा क्लाऊड सीडिंगसारखी महागडी प्रक्रिया वापरली जात नाही. कारण अशा प्रकारच्या मोठ्या हवामान प्रणालींमध्ये सीडिंग प्रक्रियेची गरज नसते," अबुधाबीमधल्या खलिफा विद्यापीठाच्या पर्यावरण आणि जिओफिजिक्सच्या विभागप्रमुख प्रा. डायना फ्रान्सिस सांगतात.

अशा प्रकारच्या तीव्र हवामानाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आल्याचं बीबीसी वेदरचे हवामानतज्ज्ञ मॅट टेलरही सांगतात. "हा पूर यायच्या आधीच कम्प्युटर मॉडेल्सनी हा अंदाज वर्तवला होता की 24 तासांत जवळपास वर्षभराइतका पाऊस पडणार आहे. एकट्या क्लाऊड सीडिंगच्या परिणामांपेक्षा या पावसाचे परिणाम पुष्कळ जास्त होते. बहारिन ते ओमानपर्यंतच्या भागांमध्ये मोठे पूर आले."

संयुक्त अरब अमिरातींमध्ये नॅशनल सेंटर ऑफ मेटिओरोलॉजी (NCM) हा सरकारी टास्क फोर्स क्लाऊड सीडिंग करतो.

अतिवृष्टीसाठी UAE सज्ज आहे का?

दुबईमधल्या पुरांच्या व्यवस्थापनासाठी UAEने जानेवारी महिन्यातच नव्या युनिटची स्थापना केली होती.

पण अतिवृष्टी झाली तर त्याची परिणिती विध्वंसक पुरांमध्ये होऊ नये यासाठी आधीपासूनच मोठ्या उपाययोजना कराव्या लागतात.

दुबईमध्ये शहरीकरणाचं प्रमाण जास्त आहे. आर्द्रता शोषून घेण्यासाठी पुरेशी हिरवाई नाही आणि सध्या अस्तित्वात असणारी ड्रेनेज व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर त्या पाण्याचा निचरा करण्यास सक्षम नाही.

प्रा. फ्रान्सिस सांगतात, "या नव्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी धोरणं तयार करून पावलं उचलायला हवीत. म्हणजे रस्ते आणि इमारतींसारख्या पायाभूत गोष्टींमध्ये सुधारणा करायला हव्यात. तिथे पावसाचं पाणी साठवून नंतर ते वर्षभरात वापरता येण्यासाठी टाक्या बांधायला हव्या."