एखाद्या जिल्ह्याएवढ्या कतारनं वाळवंट असूनही एवढी प्रगती कशी केली? वाचा

कतारने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. या माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

त्यांच्या सुटकेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) घोषणा केली की, संयुक्त अरब अमिरातीचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान 15 फेब्रुवारी रोजी कतारला भेट देतील.

ऑगस्ट 2022 मध्ये या नौदल अधिकाऱ्यांना अज्ञात प्रकरणात अटक करण्यात आली होती.

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी सकाळी अचानक जाहीर केलं की, कतारच्या अमीराच्या आदेशावरून या आठही अधिकाऱ्यांना सोडून देण्यात येणार आहे.

कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश ही या अधिकाऱ्यांची नावं आहेत.

गेल्या वर्षी 30 ऑगस्ट 2022 रोजी यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या न्यायालयाने आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांची फाशीची शिक्षा 3 ते 25 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली.

आखाती देशातील सर्वात श्रीमंत देश

एकेकाळी सर्वात गरीब आखाती देशांपैकी एक असलेला कतार आज या प्रदेशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे.

कतारने नैसर्गिक वायूसाठ्यांतून मिळणाऱ्या उत्पनाचा वापर करून गेल्या काही वर्षात आपल्या प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाकांक्षेला चांगलंच खतपाणी घातलंय.

यात बळावर कतारने 2022 साली ‘फिफा विश्वचषक’ स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केलं. असं करणारा कतार हा पहिला अरब आणि मुस्लिम-बहुल देश बनला.

गाझामधील पॅलेस्टिनी हमास गट आणि इजिप्त आणि सीरियामधील इस्लामी गटांना पाठिंबा देण्याचं कतारचं धोरण अनेक अरबी नेत्यांना पसंत पडत नाही.

2017 मध्ये सौदी अरेबियाने कट्टरतावादी आणि इस्लामी गटांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून कतारसोबत संबंध तोडण्याचा प्रयत्न केला होता.

कतारने त्यावर असं म्हटलेलं की, अशा गटांशी असलेले कोणतेही संबंध प्रादेशिक कलाकारांसोबत संबंध ठेवण्याच्या स्वतंत्र धोरणाचा भाग आहेत आणि दहशतवादाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला.

कतार

राजधानी: दोहा

क्षेत्रफळ: 11,581 चौ. किमी

लोकसंख्या: 27 लाख

भाषा: अरबी

आयुर्मान: 79 वर्षे (पुरुष) 82 वर्षे (महिला)

कतारमध्ये देशांतर्गतही अनेक समस्या आहेत. तेलातून देशाला सर्वसमावेशक कल्याणासाठी निधी उपलब्ध होतो, त्यामुळे अनेक सेवा मोफत किंवा मोठ्या प्रमाणात अनुदानासह राबविल्या जातात, परंतु स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत मानवी हक्क गटांकडून वारंवार टीका केली जाते.

वाळवंटात फुटबॉल स्पर्धेचं आयोजन

कतारमध्ये कोणतीही नदी नाही. इथं दरवर्षी 10 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो.

कतार विद्यापीठातील जलविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक राधोउयान बिन हमादोउ म्हणतात, "जर नैसर्गिकरित्या उपलब्ध पाण्यावर भागवायचं असेल तर कतारमध्ये केवळ 14,000 लोकच राहू शकतात."

2022 साली इथे ‘फिफा विश्वचषक’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र इथे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करता हे पाणी वर्ल्डकप स्टेडियमसाठी लागणाऱ्या पाण्याच्या एक चतुर्थांशसुद्धा नव्हतं.

वर्ल्डकपसाठी तयार करण्यात आलेल्या पीचवर पाणी मारण्यासाठी कृत्रिम पद्धतीने पाणी तयार करण्यात आलेलं. हे पाणी डिसॅलिनेशन प्रक्रियेद्वारे तयार केलं जायचं. शिवाय आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर, त्यासाठी कतारची राजधानी दोहाच्या उत्तरेकडील 425000 चौरस मीटरवर इमर्जन्सी ग्रास वाढवण्यात आलेलं. यासाठी रिसायकल केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला होता.

पाण्याच्या टंचाईचा विचार केला तर जगात सर्वाधिक पाणीटंचाई कतारमध्ये आहे. कतारमध्ये आज 27 लाख लोक राहतात. कतारची लोकसंख्या आणि तिथं उपलब्ध असणारं पाणी यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे.

पिण्यासाठी समुद्राचं पाणी

कतारला आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. घरगुती आणि वैयक्तिक वापरासाठी जे पाणी लागतं त्याच्या जवळपास 100 टक्के पाणी प्रक्रियेतून केलेलं असतं.

समुद्रातील खारट पाण्यावर प्रक्रिया करून त्यातील मीठ आणि इतर अशुद्ध पदार्थ काढून टाकले जातात. त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य होतं

कतारकडे समुद्र किनारा असल्यामुळे त्यांच्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक वायू, नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक संसाधने आहेत. त्यामुळे डिसॅलिनेशन प्रक्रिया करणं त्यांना अवघड नाही. फक्त यात मोठा तोटा आहे तो म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो.

तेल आणि गॅस अशा हायड्रोकार्बन इंधनांमुळे खूप प्रदूषण होतं. परंतु कतारने पर्यावरणाच्या बाबतीतही खूप महत्त्वाकांक्षी ध्येय नजरेसमोर ठेवलेली आहेत.

कतारला 2030 पर्यंत ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात 25% कपात करायची आहे. ‘कार्बन मार्केट वॉच’सारख्या पर्यावरवादी गटांनी कतारच्या या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.

परदेशी मजुरांना कशी वागणूक मिळते?

2010 साली कतारने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क जिंकले. तेव्हापासूनच मानवी हक्क कार्यकर्ते परदेशी मजुरांना मिळणाऱ्या वर्तणुकीबद्दल टीका करत आहेत.

2016 मध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कतारमधील कंपन्यांवर वेठबिगारीचा आरोप केलेला.

कतारच्या अति उष्ण हवामानात परदेशी मजुरांना काम करताना संरक्षण मिळावं यासाठी सरकारने 2017 पासून काही उपाययोजना राबविल्या, त्यांचे कामाचे तास कमी केले आणि मजूर शिबिरांमधील परिस्थितीत सुधारणा केल्या.

कतारी कंपन्या 'काफला' नावाची कार्यपद्धत चालवत होत्या. या अंतर्गत त्यांनी परदेशी मजूरांना त्यांच्या देशात येण्यासाठी अर्थसहाय्य केले, पण नंतर नोकरी सोडण्यावर बंधनं आणली.

इंटरनॅशनल लेबर ऑरगनायझेशनसारख्या गटांच्या दबावामुळे कतार सरकारने 'काफला' रद्द केली, पण अॅम्नेस्टी इंटरनॅशनल म्हणते की, कंपन्या अजूनही मजुरांना आपले रोजगारदेते (एम्प्लॉयर्स) बदलण्यापासून थांबविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतात.

याचा अर्थ हा की अजूनही कतारमध्ये वेठबिगारी अस्तित्वात आहे, असा होतो.

परदेशी मजुरांचा मृत्यू

गार्डीयन वर्तमानपत्राच्या फेब्रुवारी 2021 च्या आकवारीनुसार, कतारने विश्वचषकाचे यजमानपद प्राप्त केल्यापासून तिथे भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेमधील 6,500 स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झालाय. ही संख्या कतारमधील दूतावासाने दिलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

मृत व्यक्तींपैकी अनेक व्यक्ती कतारमध्ये मागील अनेक वर्षांपासून कतारमध्ये राहत होत्या आणि काम करत होत्या. त्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं कतारचं म्हणणं आहे.

भारत-कतार संबंध

भारत आणि कतार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

भारत कतारकडून नैसर्गिक वायूची आयात करतो. कतार हा सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यात करणारा देश आहे.

जून 2022 मध्ये भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही शोमध्ये केलेल्या एका टिप्पणी केल्यापासून या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला.

या घटनेबद्दल कतारनं भारतीय राजदूतांना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला होता. इस्लामिक जगतात रोष पसरू नये म्हणून भाजपने नुपूर शर्मा यांना तत्काळ बडतर्फ केलं होतं.

आता आठ निवृत्त भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा हे भारत-कतार संबंधांपुढील दुसरं मोठं आव्हान मानलं जातंय.

कतारमध्ये आठ-नऊ लाख भारतीय काम करतात. तिथल्या भारतीयांच्या हिताला बाधक असं कोणतेही पाऊल उचलणं टाळण्याचा भारत सरकार प्रयत्न असेल.

कतारच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या तारखा:

1825 - अल-थानी राजघराण्याने कतारवर नियंत्रण प्रस्थापित केलं.

1871 - अल-थानीस ऑटोमन अधिपत्याखाली आलं.

1913 - कतारमधून आपलं सैन्य मागे घेण्याच्या ब्रिटीशांच्या विनंतीस ओटोमनची मान्यता.

1916 - ब्रिटिशांनी कतारच्या बाह्य व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांच्या संरक्षणाची हमी देण्याच्या करारावर स्वाक्षरी.

1939 - तेलाचे साठे सापडले. दुस-या महायुद्धामुळे तेल साठ्यांचा वापर करण्यासाठी उशीर झाला. परंतु कालांतराने मोती आणि मासेमारीची या कमाईच्या मुख्य स्त्रोतांची जागा तेलाने घेतली.

1950 - कतारच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी तेलाचे उत्पन्न.

1971 - कतारला ब्रिटनपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं.

1972 - खलिफा बिन हमाद अल-थानी यांनी सत्ताधारी कुटुंबातील भांडणानंतर राजवाड्यातील सत्ता हस्तगत केली.

1990 - इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर, कतारने सांगितलं की ते आपल्या भूमीवर परदेशी सैन्याला परवानगी देतील. कतारी सैन्याने नंतर कुवेतच्या मुक्ती संग्रामात भाग घेतला.

1995 - हमाद याने रक्तहिन बंड करून वडिल शेख खलिफा यांना पदच्युत केलं.

1996 - कतारने आंतरराष्ट्रीय अल-जझीरा टीव्हीची स्थापना केली, ज्याने अरब प्रसारणाचा चेहरा बदलला.

2003 - कतार येथे असलेला ‘यूएस सेंट्रल कमांड फॉरवर्ड बेस’ इराकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिमेतील प्रमुख केंद्र म्हणून काम करतो.

2005 - पहिली लिखित घटना अंमलात आली, काही लोकशाही सुधारणांची तरतूद.

2017 - कतारने कट्टरपंथी आणि इस्लामी गटांशी संबंध तोडावे आणि त्यांना इराणपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सौदी अरेबियाने अरब वाहतूक नाकेबंदी सुरू केल्याने राजनैतिक संकट ओढवले. सौदी अरेबिया आणि कतार यांच्यातील ठरावानंतर 2021 मध्ये संकट संपुष्टात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)