मधाचे काय फायदे आहेत? तो किती प्रमाणात खावा? वाचा

मध हा सोनेरी रंगाचा एक द्रव पदार्थ आहे. मधमाशा फुलझाडांमधून मकरंद किंवा परागकण जमा करून त्यापासून मध तयार करत असतात. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जगण्यासाठी अन्न मिळावं म्हणून मधमाशा मधाच्या पोळ्यामध्ये तो जमा करत असतात.

प्राचीन ग्रीसमध्ये मधाचा उल्लेख देवांचं खाद्य असा करण्यात आला आहे. तर चीनमध्ये याचं वर्गीकरण औषध म्हणून करण्यात आलं आहे.

मधातील पोषक तत्वे

मध जेव्हा कच्च्या स्वरुपात असतो तेव्हा त्यात अमिनो अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, मिनरल आणि साखर या सर्वाचा समावेश असतो.

त्यात फ्रुक्टोसचं प्रमाण अधिक असल्यानं तो साखरेपक्षा अधिक गोड असतो. पण त्याचा ग्लायकेमेडीक इंडेक्स म्हणजे GI फार जास्त नसतो. GI ही कर्बोदकं किंवा कार्बोहाड्रेट्स असलेल्या पदार्थांच्या रेटिंगची प्रणाली आहे.

तुम्ही अन्नाचं सेवन करता तेव्हा प्रत्येक पदार्थाचा तुमच्या रक्तातील साखरेच्या (ग्लुकोज) प्रमाणावर किती त्वरित परिणाम होतो, हे यावरून लक्षात येतं.

एक चमचा मधामध्ये असणारे घटकांचे प्रमाण-

  • 58 कॅलरीज/ 246 केजे
  • 5.3 ग्रॅम कर्बोदकं
  • 5.4 ग्रॅम साखर
  • 0.1 ग्रॅम प्रथिने
  • 0 ग्रॅम फॅट

मधाचे आरोग्यासाठीचे फायदे

मधाचे आरोग्यासाठीचे फायदे हे प्रामुख्यानं त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते यावर अवलंबून असतात. त्याचबरोबर तो मध कोणत्या फुलांपासून गोळा केला आहे, त्याच्या दर्जावरही अवलंबून असतात.

कच्चा मध हा कोणत्याही प्रकारे गरम केला जात नसतो. त्याचबरोबर तो पाश्चराइज, अधिक स्वच्छ किंवा फिल्टरही केला जात नाही. मूळ स्वरुपातच मधाची आरोग्यासाठी फायद्याची अधिक पौष्टिक तत्वे टिकून राहात असतात. त्यावर प्रक्रिया करण्यामध्ये ही पोषक तत्वे कमी किंवा नष्ट होऊ शकतात.

मधाचा वापर अनेक वर्षं जंतूनाशक (अँटिसेप्टिक) म्हणूनही करण्यात आला आहे. मध्यम किंवा फार खोलवर नसलेल्या जखमा, अल्सर किंवा भाजल्याच्या जखमा लवकर भरण्यासाठी मध मदत करतो असं म्हटलं जातं.

यामागचं कारण म्हणजे मध हा प्रामुख्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन घटकांपासून तयार झालेला आहे. हे दोन साखरेचे घटक पाणी शोषून घेतात. त्यामुळं मध जखमेतील पाणी शोषून घेतो आणि जखम कोरडी करतो. त्यामुळे जखमेमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होत नाही.

मध आणि विशेषतः अधिक गडद रंग असलेला मध हे फ्लॅव्होनॉइड्स सारख्या रासायनिक संयुगांचा चांगला स्त्रोत असतो.

फ्लॅव्होनॉइड्समध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटि व्हाटरल, अँटिइनफ्लामॅटरी आणि अँटि अॅलर्जिक गुणधर्म आहेत, असं समोर आलेलं आहे. फ्लॅव्होनॉइड या घटकांमुळं काहीजण मधाला आरोग्याच्या दृष्टीनं साखरेचा चांगला पर्याय आणि अँटिऑक्सिडंट्सचा स्त्रोत मानतात.

पण, साधरेपेक्षा मधाचा GI कमी असला तरीही त्यात कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तो रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू शकतो. म्हणून मधाचंही ठराविक प्रमाणातच सेवन करायला हवं.

मध साखरेपेक्षा अधिक चांगला आहे का?

मधाचा GI साखरेच्या तुलनेत कमी आहे. याचा अर्थ म्हणजे तो रक्तातील साखरेचं प्रमाण लगेचच वाढवत नाही. मध साखरेपेक्षा अधिक गोड असतो त्यामुळे तुम्हाला तो कमी प्रमाणात लागू शकतो.

पण याच्या एका चमचा एवढ्या प्रमाणात तुलनेनं अधिक कॅलरीज असतात. त्यामुळे मधाचं किती सेवन करत आहात, यावर तुम्हालाच बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असतं.

जर तुम्ही मधाला प्राधान्य देत असाल तर तो कच्चाच मिळण्यासाठी प्रयत्न करा. कारण त्यात पांढऱ्या साखरेच्या तुलनेत व्हिटामिन, एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे असतात.

तसंच तोही प्रमाणात सेवन करा. त्याचवेळी हेही लक्षात असायला हवं की, कच्च्या मधाचं सेवन करण्याचे पौष्टिक फायदे हे तसे फारसे जास्तही नसतातच.

मध सर्वांसाठी सुरक्षित आहे का?

मधाचं वर्गीकरण किंवा वर्णन मोफतची साखर असं केलं जातं. त्याचा आहारात मर्यादीत समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तो बहुतांश प्रौढांसाठी सुरक्षित समजलं जात असला तरी, सल्ल्यानुसारच त्याचं मर्यादीत सेवन करायला हवं.

मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मात्र साखरेऐवजी मधाचा पर्याय निवडून फारसा फायदा होत नाही. कारण काहीही झालं तरी शेवटी दोन्हीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढतच असतं.

त्यातही महत्त्वाचं म्हणजे 12 महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या नवजाता मुलांनी कच्च्या किंवा कोणत्याही व्यावसायिकरित्या निर्मिती केलेल्या मधाचं सेवन करू नये. त्याचं कारण म्हणजे, बोटुलिझम नावाच्या विषारी पदार्थामुळं त्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो.

आपण सगळेच आपल्या आहारामध्ये मधाचा आनंदाने समावेश करत असलो तरी तो सर्वांसाठी फायदेशीर नसतो. मध हा विगन नाही. त्याचं कारण म्हणजे, मधाच्या निर्मितीमध्ये मधमाशांना हानी पोहोचवली जाते असं म्हटलं जातं. कारण मध गोळा करण्याचं काम मधमाशा करत असतात.

हिवाळ्यामध्ये मध तयार करणं मधमाशांसाठी फार कठीण ठरतं. त्यामुळं हिवाळ्याच्या महिन्यांत जगण्यासाठी त्या या जमा केलेल्या मधाचा वापर करत असतात. तोच मध आपण वापरत असतो.