'मधात भेसळ, लोकांचं आरोग्य धोक्यात,' कंपन्यांनी आरोप फेटाळले

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

भारतातलं पंचामृत, इजिप्तमधल्या ममीज, प्राचीन ग्रीसचं ओईनोमेल मद्य या सगळ्यांत काय साम्य आहे?

उत्तर आहे मधाचा वापर. जगभरातल्या जवळपास प्रत्येक देशात, प्रत्येक संस्कृतीत मध वापरलं जातं. भारतात तर धार्मिक सोहळ्यांपासून खास मिठाईपर्यंत आणि आयुर्वेदिक औषधांपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक ठिकाणी मधाचा वापर होतो. पण यातलं सगळंच मध शुद्ध असतं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निमित्त ठरला आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यनमेंट (CSE) या संस्थेचा एक अहवाल, ज्यात भारतात अनेक नामवंत ब्रँड्सच्या मधात साखरेचे अंश असल्याचा दावा केला आहे.

यामध्ये डाबर, पतंजली, बैद्यनाथ आणि झंडू यांच्यासारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. पण या कंपन्यांनी भेसळीचा आरोप फेटाळला आहे.

मधाविषयी CSE चा अहवाल काय सांगतो?

CSE च्या संशोधकांनी भारतातील तेरा ब्रँड्सचा मध तपासून पाहिला. यात प्रक्रिया केलेल्या आणि कच्च्या स्वरुपातल्या मधाच्या 22 नमुन्यांचा समावेश होता.

भारतातील सध्याच्या नियमांनुसार मध शुद्ध की अशुद्ध हे ठरवण्याचे 18 ते 22 मापदंड आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI नं तयार केलेल्या या मापदंडानुसार पात्र ठरल्याशिवाय तो 'मध' भारतात शुद्ध मध म्हणून विकता येत नाही.

CSE च्या संशोधनात बहुतांश ब्रँड्स या FSSAI च्या मानकांनुसार असलेल्या तपासण्यांमध्ये पास झाले. पण नव्या NMR चाचणीमध्ये मात्र वेगळं चित्र दिसतं.

NMR म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स ही चाचणी एखाद्या पदर्थाच्या रेणूंची रचना सांगू शकतो. भारतात विक्रीसाठी असणाऱ्या मधासाठी ही चाचणी गरजेची नाही, मात्र भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या मधाला मात्र ती आता अनिवार्य करण्यात आली आहे.

CSEनं जर्मनीतल्या प्रयोगशाळेत भारतील ब्रँडेड मधाच्या नमुन्यांवर ही NMR चाचणी करून घेतली. त्यात केवळ सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर हे तीन ब्रँड्सच पास झाले. यातल्या प्रत्येक ब्रँडच्या किमान दोन नमुन्यांवर ही तपासणी करण्यात आली होती.

दहा ब्रँड्सच्या मधात साखरेच्या पाकाचं (शुगर सिरपचं) मिश्रण आढळून आलं असलं, तरी या भेसळीचं प्रमाण किती आहे, ते ही तपासणी दाखवू शकत नाही, असं CSE च्या महासंचालक सुनिता नारायण यांनी स्पष्ट केलं आहे.

विशेष म्हणजे, या संशोधनाचा भाग म्हणून CSE ने उत्तरखंडमधल्या शुगर सिरपची निर्मिती करणाऱ्या एका कारखान्यातले नमुनेही तपासले आहेत. हे सिरप मधात 50 टक्क्यांपर्यंत मिसळलेलं असलं तरी, भारतातल्या FSSAI च्या नेहमीच्या तपासणीत भेसळ दिसून येत नाही.

मधात चिनी साखरेची भेसळ?

गेल्या वर्षीच FSSAIनं राज्यातल्या अन्न आणि औषध विभागांना तसंच आयातदारांना चीनमधून येणाऱ्या गोल्डन सिरप, इन्व्हर्ट शुगर सिरप आणि राईस सिरप ही द्रव्यांचा मधात वापर होत असल्याविषयी माहिती दिली होती.

CSE च्या अहवालातही भारतातील काही मधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या चीनमधून येणारी कृत्रिम साखर मधात मिसळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मधाचा वापर वाढला, पण आरोग्य धोक्यात

या अहवालात समोर आलेली माहिती धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचं सुनिता नारायण सांगतात. कोव्हिडच्या काळात यामुळे लोकांच्या तब्येतीशी खेळ होत असल्याची भावना त्या व्यक्त करतात.

"घरोघरी मधाचा वापर वाढल्याचं दिसून येत आहे, कारण मधात जीवाणूरोधक आणि औषधी गुणधर्म असतात. पण आमच्या संशोधनात समोर आलं आहे, की बाजारात मिळणाऱ्या बहुतांश मधामध्ये साखरेची भेसळ असते."

"म्हणजे लोक मधाऐवजी साखरेचं सेवन वाढवत आहे, ज्यानं कोव्हिड-19चा धोकाही वाढू शकतो. साखरेच्या सेवनाचा स्थूलतेशी थेट संबंध असून अशा व्यक्तींना संसर्गापासून असलेला धोका वाढतो," असंही त्या म्हणतात.

कंपन्यांनी फेटाळला भेसळीचा दावा

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर डाबर, पतंजली आणि झंडू यांसारख्या कंपन्यांनी भेसळीचे आरोप फेटाळले आहेत.

डाबर इंडिया लिमिटेडनं जुलै 2020 मधला एक अहवालही सादर केला आहे ज्यात NMR तपासणीचं उकरण करणाऱ्या जर्मनीच्या ब्रुकर या कंपनीचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार डाबरच्या मधात सुगर सिरप नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

"डाबर ही भारतातली एकच कंपनी आहे, ज्यांच्या प्रयोगशाळेत NMR तपासणी करणारं उपकरण आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या मधाची चाचणी घेण्यासाठी हेच उपकरण आम्ही नियमितपणे वापरतो," असं डाबरनं ट्विटरवर जाहीर केलं आहे आणि आपला मध 100 % शुद्ध असल्याचं म्हटलं आहे.

तर पतंजलीनं स्थानिक मीडियाला प्रतिक्रिया देताना हा अहवाल म्हणजे भारतीय मधउद्योगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं आणि 'कोट्यवधी रुपयांच्या जर्मन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आंतरराष्ट्रीय मार्केटिंग योजना' असल्याचं म्हटलं आहे.

पण NMR हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून जगभरातील देश आता मधाच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचं CSE ने स्पष्ट केलं आहे.

जगभरात मधामध्ये होणारी भेसळ ही मोठी समस्या असून, त्यावर मात करण्यासाठी भारतासह सगळेच देश नवीन तपासण्या आणि मापदंड तयार करत आहेत. इथे प्रश्न केवळ आरोग्याचा नाही, तर स्थानिक पातळीवर मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचाही आहे.

मधुमक्षिकापालन करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

पाटणमध्ये मधमाशी पालन करणाऱ्या रोहिणी शिर्के सांगतात, "मध हा मधमाशांपासून घेतला जातो, तो कधी आणि किती प्रमाणात मिळणार यावर मर्यादा असते. कधीतरी तो संपू शकतो, पण मोठ्या ब्रँड्सच्या मधाचं उत्पादन कधी थांबलेलं दिसत नाही. यावरूनच माझ्या मनात या मधाविषयी शंका यायची.

"ब्रँडेड मधावर अनेकदा एक्सापयरी डेट लिहिली असते. तुम्हालाच तुमच्या उत्पादनाविषयी खात्री नसल्याचं यातून दिसतं, कारण अस्सल मध बरीच वर्षं टिकतो."

CSE च्या अहवालानंतर लोकांमध्ये मधाविषयी जागरुकता वाढेल आणि स्थानिक उत्पादकांकडून मध घेण्याचा लोक विचार करतील अशी आशा त्यांच्यासारख्या मधमाशी पालन करणाऱ्यांना वाटते आहे.

कोव्हिडच्या साथीनंतर मधाच्या मागणीत वाढ झाल्याचं पण सध्याच्या वातावरण बदलांमुळे तेवढा पुरवठा करणं कठीण असल्याचं रोहिणी शिर्के सांगतात.

"कुठल्या प्रजातीच्या मधमाशा आहेत, कुठली फुलं, झाडं आसपास आहेत यावर मधाचं उत्पन्न, चव आणि किंमत ठरत असते. त्यामुळे अस्सल मध महाग असू शकतो. पण महाग असलेला प्रत्येकच मध अस्सल नसतो.

"आता लोकांना खरं-खोटं कळू शकेल. त्यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा मधमाशा पाळणाऱ्यांकडून जास्त शुद्ध मध मिळेल. त्यानं स्थानिक उद्योगाला चालना मिळेलच, शिवाय मधमाशा या परागीभवनासाठी आवश्यक असतात, त्यांचं महत्त्वही लोकांना समजेल."

नॅशनल बी बोर्डाच्या आकडेवारीनुसार 2017-2018 या वर्षात भारतात 1.05 लाख टन मधाची निर्मिती झाली होती. देशात 9 हजारांहून अधिक मधमाशी पालक आहेत.

मधाला एवढी मागणी का असते?

प्राचीन काळापासून जगभरात माणसं मधाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या कारणांसाठी करत आली आहेत. दक्षिण अमेरिकेच्या माया संस्कृतीतलं बाल्शे हे पेय असो, तुर्कस्तानातली बकलावा ही मिठाई असो, पूर्व आशियातलं स्टिकी चिकन असो. प्रत्येक खाद्य संस्कृतीत मधाला स्थान आहे.

फूड हिस्टोरियन मोहसीना मुकादम सांगतात, "पूर्वीच्या काळी आहारात साखरेचा नाही, तर मधासारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर व्हायचा. आयुर्वेदातही वेगवेगळ्या प्रकारच्या मधांचा आणि त्यांच्या गुणधर्मांचा उल्लेख आहे. मधाचं सांस्कृतिक महत्त्व एवढं आहे, की भारतात अनेक ठिकाणी नवजात बाळाला मध चाटण्याची पद्धत आहे. काही आदिवासी जमातींमध्ये मधाचं पोळं रिकामं केल्यावर त्या पोळ्याची भाजीही करून खातात."

ज्यू धर्मियांचा रोश हशान्ना सण असो किंवा बांग्लादेशातल्या बौद्ध धर्मियांची मधु पुर्णिमा. मधाचं महत्त्व इतकं मोठं आहे, की अनेक धर्मांमध्ये ते देवाला अपर्ण केलं जातं किंवा धार्मिक सोहळ्यांत त्याचा वापर केला जातो. कुराणातही मधमाशीविषयी सविस्तर लिहिलं आहे.

मधामध्ये काही प्रमाणात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याचं याआधीही अनेकदा संशोधनातून समोर आलं आहे.

साधा कफ, खोकला, अशा आजारांमध्ये डॉक्टरही मधाचं सेवन करण्याचा सल्ला देतात. आयुर्वेदासारख्या पारंपरिक उपचार पद्धतीत अनेक औषधं मधात मिसळून घेतली जातात.

मोहसीना सांगतात, "मध हे समृद्धीचं, नैसर्गिक संपन्नतेचंही लक्षण मानलं जातं. म्हणजे प्राचीन भारताचा उल्लेख करताना त्याला दुधाचा-मधाचा देश असंही म्हटलं जायचं. खाणं-पिणंच नाही, तर भाषेतही सौंदर्याचं वर्णन करताना मधाळ, मधुर, माधुर्य असे शब्द वापरले जातात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)