लठ्ठपणामुळं तुमच्या शरीराबरोबरच तुमच्या मेंदूचंही नुकसान कसं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहेब कोस्टांडी
- Role, न्युरोप्लास्टिसिटीचे अभ्यासक
वजन वाढल्यानंतर फक्त आपल्या कमरेच्या मापावरच परिणाम होतो असं नाही. लठ्ठपणाचा संबंध हा स्मृतीभ्रंश आणि डिमेंशिया सारख्या आजारांशीही असतो, याचेच काही धागे संशोधकांना मिळाले आहेत.
केम्ब्रिज विद्यापीठातील लुसी चेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काही जणांना आमंत्रित केलं होतं. एका खजिन्याच्या शोधासारख्या प्रयोगासाठी त्यांनी हे पाहुणे बोलावले होते.
या सर्वांना एका कंप्युटर स्क्रीनवर एका आभासी वातावरणात आभासी पद्धतीनं फिरवण्यात आलं. फिरत असताना मार्गामध्ये त्यांच्या स्क्रीनवर विविध प्रकारच्या वस्तू खाली पडताना दिसत होत्या. हा आभासी प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीचा अभ्यास करण्यासाठी काही प्रश्न विचारत त्या सर्वांची चाचणी घेण्यात आली. विशिष्ट वस्तू कुठं लपवलेली होती, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
ही चाचणी घेतली जात असताना त्यांच्या कार्यक्षमतेवर कशाचा परिणाम होऊ शकतो, असा विचार येतो. चेक यांना या सर्वांच्या कमरेच्या मापापेक्षा त्यांच्या बुद्ध्यांकाची अधिक काळजी असेल, अशी तुमची अपेक्षा असेल. पण त्यांना आढळलेल्या तथ्यांनुसार त्या सर्वांचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय (आपल्या उंचीच्या प्रमाणात वजन) आणि स्मृतीतील उणीवा यांचा परस्पर संबंध होता. ज्यांचा बीएमआय अधिक होता, त्यांनी या चाचणीत खराब कामगिरी केली होती.
हा प्रयोग करताना चेक यांनी याद्वारे एक छोटं पण वाढत्या वजनासंदर्भातील योगदान पुराव्यानिशी दिलंय. त्यावरून लठ्ठपणाचा संबंध मेंदू आकुंचन पावणे आणि स्मृती कमी होणे याच्याशी असल्याचं समोर येतं.
या संशोधनानुसार लठ्ठपणा हा अल्झायमर सारखे आजार आणि न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती म्हणजे मेंदूंच्या नसांसंबंधी विकारांसाठी कारणीभूत ठरू शकतो.
आश्चर्याची बाब म्हणजे, लठ्ठपणा आणि स्मृती यातील संबंध हा दोन्ही बाजुनं असल्याचंही दिसून आलं. लठ्ठपणा किंवा वजन वाढल्यामुळं एकिकडं आपल्या स्मृती किंवा मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्याचबरोबर खाण्यासंदर्भातील आपल्या पूर्वीच्या अनुभवांची जागा भविष्यात खाण्याच्या बदललेल्या सवयी घेतात.

फोटो स्रोत, Getty Images
चेक यांना या विषयाची आवड अचानकच लागली. "मी त्यावेळी भविष्यातील स्थितीची कल्पना करण्याच्या क्षमतेबाबत अभ्यास करत होते. विशेषतः खाण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीनं मी याचा अभ्यास करत होते," असं चेक म्हणाल्या.
"जर तुम्हाला भूक लागलेली असेल, तर तुम्ही भविष्याची कल्पनाही तशाच पद्धतीनं करता. पण लठ्ठ लोक मात्र अशा गोष्टींचा निर्णय कल्पना करण्यापेक्षा तथ्यावर आधारित गोष्टींवरून घेत असतात."
लठ्ठपणामुळं त्यांच्या "काळानुरुप मानसिक प्रवास" करण्याच्या क्षमतेचंही नुकसान होत असावं, हीदेखील एक शक्यता होती. दीर्घकालीन संशोधनावरून हे पाहायला मिळालं की, स्मृती आणि कल्पना या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घट्टपणे जुळलेल्या आहेत.
कारण आपण भूतकाळातील काही आठवणींना एकत्र जोडून भविष्यातील घटना कशा असू शकतात, याचा अंदाज लावत असतो.
त्यांच्या मते, या दोन्हीतील संबंधाचा तर्क योग्य वाटतो. कारण, मेंदूचा जो भाग स्मृती आणि कल्पना यासाठी वापरला जातो, त्या भागावर लठ्ठपणाचा परिणाम होत असल्याचे काही संकेत मिळाले आहेत.
उदाहरण द्यायचं झाल्यास, 2010 मध्ये बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी एक अभ्यास केला होता.
त्यानुसार मध्यमवयीन प्रौढ लोकांच्या पोटाच्या भागावरील चरबी वाढलेली असेल, तर एकूण विचार करता त्यांच्या मेंदूचं एकूण वजन घटत असतं.
विशेषतः हिप्पोकॅम्पस ही मेंदूची संरचना लठ्ठ लोकांमध्ये इतर कमी वजनाच्या लोकांच्या तुलनेत उल्लेखनीयदृष्ट्या लहान होती. या संरचनेला मेंदूची प्रिंटींग प्रेसही असंदेखील म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबतच्या प्राण्यांच्या अभ्यासावरूनही काही संकेत मिळाले होते. "उंदरांच्या खाण्याच्या वर्तन आणि वजनातील बदलाबाबत अभ्यास करण्यात आला. त्यात मॉरीस वॉटर मेझ (पाण्यात मार्ग शोधण्याची चाचणी किंवा कार्य) सारख्या गोष्टी शिकणं या उंदरांना प्रचंड कठिण गेलं," असं चेक म्हणाल्या.
"मी या संदर्भात जेवढा अधिक तपशील तपासला, तेवढीच अधिक स्मृती कमी झाल्याची पाहायला मिळेल, अशी मला अपेक्षा होती. पण हा प्रश्न अजूनही तसाच होता."
त्यामुळं त्यांच्या या शोधाबाबतच्या प्रयोगाचा विचार करता, लठ्ठ लोकांसाठी विविध वस्तुंच्या विशिष्ठ स्थानाची माहिती लक्षात ठेवणं हे कठिण जात असल्याचं समोर आलं.
त्यांच्या या गृहितकाला काही महत्त्वाच्या पुराव्यांचीही जोड मिळते, तसंच लठ्ठपणा आणि नैसर्गिक काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याच्या निष्कर्षालाही आधार मिळतो.
नुकताच जवळपास 500 जणांच्या मेंदूचं स्कॅनिंग करून एक अभ्यास करण्यात आला. त्यात अधिक वजन किंवा लठ्ठपणा यांचा वयानुसार मेंदू कमकुवत होण्याशी मोठा संबंध असण्याच्या तथ्याला दुजोरा मिळाला.
मध्यमवयीन लोकांमध्ये हे परिणाम अधिक प्रमाणात आहेत. त्यांच्यात लठ्ठपणासंदर्भातील शारीरिक बदल हे, मेंदूचं वय अंदाजे 10 वर्षांनी वाढवण्यासाठी अनुरुप असल्याचं पाहायला मिळालं.
लठ्ठपणा ही एक अत्यंत गुंतागुंतीची अवस्था असून त्यात अनेक घटकांचं योगदान असतं. त्यामुळं मेंदूची संरचणा आणि कार्यप्रणाली यावर लठ्ठपणाचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो, हे अद्यापही अस्पष्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चेक यांच्या मते, "शरिरावरील चरबी लठ्ठपणातील महत्त्वाचा भाग असतो. पण त्याचबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स, हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब या गोष्टीही येत असतात. मानवी वर्तनानुसार (अधिक जेवणे आणि कमी व्यायाम करणे) या गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात. त्यामुळं त्या सर्वांमुळं मेंदूमध्ये बदल होण्याची शक्यता असते."
"उदाहरण द्यायचं झाल्यास, इन्सुलिन हे म्हत्त्वाचं न्यूरोट्रान्समीटर आहे. तसंच मधुमेहाचा संबंध स्मृती किंवा गोष्टी शिकण्याबाबत होणाऱ्या बदलांशी असल्याचेही अनेक पुरावे आहेत. पण त्याचबरोबर शरिरातील अतिरिक्त चरबीमुळं मेंदूवर सूज येऊ शकते आणि त्यामुळं समस्या वाढू शकतात, याचेही पुरावे मिळाले आहेत," असंही त्या म्हणाल्या.
सूज हादेखील आणखी एक संभाव्य गुन्हेगार ठरू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाच्या मानसोपचारतज्ञांनी इंग्लिश लाँगिट्युडिनल एजिंग स्टडी या संशोधनातील 20 हजार सहभागी सदस्यांच्या डाटाचा अभ्यास केला.
त्यात सी रिअॅक्टीव्ह प्रोटीन या इन्फ्लामेटरी (सूज वाढवणारे प्रोटीन) मार्करचे नमुने गोळा करून, त्याद्वारे स्मृती, बीएमआय आणि रक्तातील प्लाझ्माचं प्रमाण तपासण्यात आलं. 1998 ते 2013 या दरम्यानच्या काळात दर 2 वर्षांनी या सर्वांचे हे नमुने गोळा करण्यात आले.
या अभ्यासात त्यांना, वाढलेल्या वजनाचा संबंध हा स्मृती कमी होणं आणि त्याचबरोबर इन्फ्लामेटरी प्रोटीनच्या वाढलेल्या प्रमाणाशीही असतो असं आढळलं.
हे संबंध थेट नसले तरी, निष्कर्षांवरून असं दिसतं की, मेंदूची सूज ही एक अशी स्थिती आहे ज्यात निरोगी प्रौढांच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवरही, वेगवेगळ्या शारीरिक वजनाचा परिणाम होण्याची शक्यता असते.
दुहेरी मार्ग
काही पुराव्यांनुसार स्मृती आणि लठ्ठपणा यांचा परस्पर संबंध असल्याचं समोर आलंय. कारण आपल्या खाण्याबाबतच्या वर्तनावर स्मृतीचं नियंत्रण असतं. त्यामुळं हा चिंतेचा विषय असायला हवा.
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्या, तुमची स्मृती कमी झाल्यास, त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होऊ शकतो.
खाण्यासंदर्भातील वर्तनामध्ये स्मृतीचा महत्त्वाचा वाटा असतो, यासंबंधीचे पुरावे 1998 च्या संशोधनात मिळाले होते. त्या संशोधनानुसार अॅम्नेशिया (विसरण्याचा आजार) झालेले लोक हे एकापाठोपाठ अनेकदा जेवण करतात. कारण त्यांनी त्याआधीच खाल्लं आहे, हे कदाचित त्यांच्या लक्षातच राहत नाही.
"यावरून असं दिसतं की, जेव्हा आपण किती खायचं आहे हे ठरवतो, तेव्हा ते ठरवण्यामागे केवळ आपल्या पोटात किती अन्न आहे, याबाबतचे शारीरिक संकेत नसतात. तर त्याचबरोबर स्मृतीसारख्या नैसर्गिक क्रियादेखील त्याला कारणीभूत असतात," असं लिव्हरपूल युनिव्हर्सिटीतील संशोधक मानसशास्त्रज्ञ एरिक रॉबिन्सन यांनी म्हटलंय.
"तुमची स्मृतीक्षमता चांगली नसेल किंवा काहीशी कमकुवत असेल तर कदाचित तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाण्याची शक्यता असते. पण याच्या उलटंही घडू शकतं का? हे मला जाणून घ्यायचं होतं. जर एखाद्या व्यक्तीची स्मृती किंवा स्मरणशक्ती वाढवता आली, तर त्यांनी कमी किंवा आवश्यक तेवढंच खाण्याच्या दृष्टीनं हे उपयोगी ठरू शकतं?" असंही ते म्हणाले.
रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 वजन वाढलेल्या किंवा लठ्ठ लोकांची निवड केली. त्यांना प्रयोगशाळेत जेवणासाठी आमंत्रित केलं. त्या सर्वांचे दोन गट तयार करण्यात आले आणि त्यांना खात असताना ऐकण्यासाठी वेगवेगळी ऑडिओ रेकॉर्डिंग देण्यात आली.
एका गटातील लोकांना ऑडिओद्वारे त्यांच्या जेवणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं जात होतं. तर दुसऱ्या गटातील लोकांना जेवणाशी काहीही संबंध नसलेलं एक ऑडिओ बूक ऐकवलं जात होतं.
त्यानंतर संशोधकांनी त्यांना दुसऱ्या दिवशीही आमंत्रित केलं. त्यासर्वांना खाण्यासाठी भरपूर कॅलरीज असलेले स्नॅक्स दिले आणि ते किती खातात याचा अभ्यास केला.
त्यात त्यांना आढळलं की, आधीच्या दिवशी ऑडिओ बूकद्वारे ज्यांचं लक्ष विचलित करण्यात आलं होतं, त्यांच्या तुलनेत जेवण करताना त्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्यांनी कमी स्नॅक्स खाल्ले. हे प्रमाण जवळपास एक तृतीयांश एवढंच होतं.
म्हणजे त्यांनी जेवढं खाल्लं त्याचा तिसरा भागच दुसऱ्या गटातील लोकांनी खाल्ला.
त्यानंतर मोठ्या गटाबरोबरदेखील करण्यात आलेल्या अभ्यासात या निष्कर्षांना दुजोरा मिळाला.
यावेळी रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 114 महिलांची निवड केली. त्यांचंही दोन गटांत वर्गीकरण करण्यात आलं. पण खाण्याच्या संदर्भात त्यांच्या विचारांमध्ये रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बदल किंवा फेरफार करण्याचा प्रयत्न केला.
या सर्वांना सारखंच जेवण देण्यात आलं. त्यात हॅम सँडविच, मिनी सॉसेज रोल, क्रिस्प, राईस केक, चॉकलेट चिप्स कुकीज आणि अंगूर याचा समावेश होता.
एका गटातील महिलांना असं सांगण्यात आलं की, खाण्यासंदर्भातील वर्तनाबाबतच्या एका अभ्यासात त्या सहभागी होत असून, त्या किती अन्न खातात हे मोजलं जाणार आहे.
तर दुसऱ्या गटातील महिलांना दिवसभरात त्यांची विचार प्रक्रिया किंवा मूड कशाप्रकारे बदलतात याचा अभ्यास केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
दोन्ही गटातील सदस्यांनी किती प्रमाणात खाल्लं यात फारसा फरक संशोधकांना आढळला नाही. ज्या महिलांना त्या खाण्यासंदर्भातील वर्तनाबाबतच्या अभ्यासात सहभागी होत आहेत असं सांगण्यात आलं होतं, त्या महिलांनी दुसऱ्या गटाच्या तुलनेत कमी कुकीज खाल्ल्या होत्या. कदाचित आपल्या जेवणाचं प्रमाण अधिक झाल्याबाबत त्या आधीच जागरूक झाल्या होत्या, हे त्यामागचं कारण होतं.
लक्ष देणं आणि स्मृती दोन्ही स्वतंत्र असले तरी दोन्हींचा आपसांत जवळचा संबंध आहे. आपण एखाद्या गोष्टीकडं लक्षच दिलं नाही तर आपल्या स्मृतीत ती राहणार नाही.
त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीकडं आपण जितकं अधिक लक्ष देतो, तितक्या आपल्या आठवणी किंवा स्मृती अधिक घट्ट होत जातात.
त्यामुळं कदाचित दुपारच्या जेवणाची जर अशीच घट्ट स्मृती निर्माण झाली तर त्यामुळं शरिराच्या शारीरिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि खूप जास्त भूक लागल्याचं जाणवणार नाही. परिणामी आपण रात्रीच्या जेवणात तुलनेनं कमी अन्न खाऊ. दुसऱ्या बाजूला, जेवण करताना जर लक्ष विचलित होत असेल तर जेवणाच्या अशा घट्ट स्मृती तयार होणार नाहीत. त्यामुळं याचा विचार करता रात्रीच्या जेवणावेळी त्या व्यक्तीला अधिक भूक लागेल आणि तो जास्त खाईल.
उदाहरणादाखल, 2011 च्या एका अभ्यासानुसार अर्ध्या सदस्यांना जेवण करताना कम्प्युटरवर गेम खेळायला लावला. त्यामुळं त्यांच्या जेवणाच्या स्मृती धूसर होत्या.
परिणामी जेवणानंतर ते दुसऱ्या गटातील सदस्यांच्या तुलनेत अधिक बिस्कीट खात असल्याचं समोर आलं होतं.
अतिरिक्त खाण्यामुळं स्मृतीवर परिणाम होतो, याचे पुरावेही आहेत. पण रंजक बाब म्हणजे, अतिरिक्त खाणं आणि स्मृतीबाबतच्या समस्या या दोन्ही गोष्टी एकमेकांना बळ देतात, आणि तुम्ही त्यात आणखी खोलवर अडकत जाता.
रॉबिन्सन यांच्या मते, "काहीशी कमकुवत स्मृती असतील तर तुम्ही जास्त खाण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही एका अशा चक्रात अडकता जिथं, आरोग्याला हानिकारक जीवनशैलीमुळं स्मृतीवर परिणाम होतो आणि स्मृतीवर परिणाम झाल्यामुळं तुम्ही परत अतिरिक्त खाण्याची समस्या सुरू होते."
मात्र त्याचवेळी त्यांनी याकडंही लक्ष वेधलं की, आपण अगदी काळजीपूर्वक याचा विचार करायला हवा. अशाप्रकारचं चक्र खरंच तयार होतं आणि त्याचा खरंच मानवी आरोग्यावर परिणाम होतो, याचे ठोस पुरावे मिळेपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता कामा नये.
"सर्वसाधारणपणे ही बाब पटत असली तरी, अद्याप त्याबाबत थेट असा पुरावा मिळालेला नाही," असंही ते म्हणाले.
हस्तक्षेप

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरी, जेवणासंबंधीच्या आठवणी आणि जागरूकता यामुळं आपल्या खाण्यासंबंधीच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो, हे तथ्य आहे.
या तथ्यांचा फायदा किमान लोकांना वजन कमी करण्याच्या आणि योग्य बीएमआय मिळवण्याच्या उद्देशासाठी होऊ शकतो. त्यामुळं रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना खाण्याबाबत अधिक जागरूक करण्यासाठी एक अॅप तयार केलंय.
रॉबिन्सन यांच्या मते, "लक्ष देणं आणि स्मृती याचा परिणाम लोकांच्या खाण्याच्या प्रमाणावरही होतो, याचे पुरेसे पुरावे आता समोर आले आहेत. पण ते प्रयोगशाळेतील अभ्यासाचे पुरावे आहेत. आता प्रयोगशाळेतील ही तथ्यं बाह्य जगातही फायद्याची ठरावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
अॅपद्वारे आम्ही लोकांना त्यांनी काय खाल्लं आहे याचे फोटो काढून त्यांच्या जेवणाबाबतच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगतो. यामागचा उद्देश जेवणाबाबत त्यांच्या घट्ट स्मृती तयार करणं हा आहे. तसं झाल्यास नंतर ते अतिरिक्त खाण्याची शक्यता कमी होते."
चेक आणि त्यांचे सहकारी आता त्यांचा अभ्यास पुढं नेत, लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांचा स्वतंत्र अभ्यास करत आहेत. त्यापैकी नेमक्या कोणत्या घटकामुळं मेंदूच्या संरचणेवर आणि कार्यप्रणालीवर परिणाम होतो याचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
लोकांची जीवनशैली आणि वर्तन याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी त्यादेखील एका अॅपचा वापर करत आहेत. तसंच त्यांना आवश्यक डाटा मिळावा यासाठी ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि आसपासच्या परिसरात स्वसंसेवकही निवडत आहेत.
चेक यांच्या मते, "एखादा व्यक्ती व्यायाम न केल्यामुळं किंवा जंक फूड खाल्ल्यामुळं लठ्ठ असू शकतो. दुसरा एखादा व्यक्ती योग्य आहार आणि व्यायाम करूनही अनुवांशिक कारणामुळं लठ्ठ असू शकतो. तर काही जण इन्सुलिनची समस्या असल्यानंही लठ्ठ असू शकतात."
"या सर्व प्रकारांमध्ये काही धागा आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी आम्ही लोकांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. ते आमच्यासाठी रोज फूड डायरीदेखील भरतात. अशा प्रकारे अभ्यास करूनच, या गोष्टींच्या मुळापर्यंत जाणं शक्य होणार आहे," असं चेक म्हणाल्या.
मोहेब कोस्टांडी हे न्युरोप्लास्टिसिटीचे लेखक आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








