अपुरी झोप आणि उशिरा जेवल्यामुळं तुमचं आरोग्य कसं बिघडतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमांडा क्युेवास सिएरा, अल्फ्रेडो मार्टिनेझ हर्नांदेज, एलिझाबेथ दो नासिमेंटो, नतालिया कॅरोलिन दे ओलिविएरा मेलो
- Role, बीबीसी कॉन्व्हर्सेशन
आपलं जसं प्रत्येक दिवसाचं खाणं, काम करणं, व्यायाम करणं, झोपणं वगैरे रुटिन असतं तसं आपल्या शरीराचंही स्वतःचं असं एक रुटिन असतं.
त्याला सर्क्याडियन सायकल असं म्हणतात. दिवसभरात सकाळी आणि दुपारी आपलं शरीर आणि मेंदू सतर्क म्हणजे अॅक्टिव्ह असतात पण रात्र जवळ येते तशी आपल्यामध्ये काही शारीरिक बदल होतात आणि झोपेसाठी आपल्याला शरीर तयार करतं.
हे एखाद्या घड्याळासारखं आहे. शरीरातलं हे घड्याळ आपल्याला दिवसाच्या 24 तासांत वेगवेगळ्या क्षणांचा आपल्या शारीरिक, मानसिक, वर्तनावर परिणाम होतो याची जाणिव करुन देत असतं.
या सगळ्या तंत्राचं महत्त्व पटवून देण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. जर तुम्ही उशिरापर्यंत जागलात किंवा एखाद्या दिवशी कामामुळे खाण्यावर-झोपण्यावर परिणाम झाला असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेचच दिसले असतील.
सत्य सांगायचं झालं तर पाश्चिमात्य जीवनशैलीमुळे सर्क्याडीयन रिदम नीट राहात नाही.
आपले पूर्वज जितका काळ सूर्यप्रकाशात राहायचे त्यापेक्षा आपण फारच कमी काळ सूर्यप्रकाशात राहातो.
आपलं आयुष्य बैठं झालं आहे आणि आपण अधिकाधिक काळ वेगवेगळ्या स्क्रिन्ससमोर म्हणजे मोबाईल, संगणक, टीव्हीसमोर बसतो.

फोटो स्रोत, Getty Images
याच्यात भर म्हणून आपल्या आयुष्यात ताणही वाढलेला आहे.
आपला दिनक्रम आणि सामाजिक जीवन यांचा संबंध जुळत नाही.
आहारात साखरेचं प्रमाण वाढलंय आणि आपण जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ खात आहोत.
याचा सगळा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
हा सगळा क्रम बिघडला तर आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो किंवा झोपेची गुणवत्ता बिघडते.
सतत मूड बदलतात, ताण वाढतो, लक्ष एकाग्र होत नाही. स्मृतीवर परिणाम होतो, सतत दमल्यासारखं वाटतं, चिंतारोग म्हणजे काळजी करत बसतो. हे सगळं दीर्घकाळ सुरू राहिलं तर त्याचे गंभीर परिणाम होतात.
पण सर्क्याडियन रिदमचा फक्त आपल्यावरच परिणाम होत नाही तर आपल्या आतड्यातल्या सूक्ष्मजंतूंवरही परिणाम होतो. या सुक्ष्मजंतूचंही आपल्यासारखं एक चक्र असतं ते आपल्या सर्क्याडियन चक्राशी जुळवून घेतलेलं असतं.
त्यामुळे या अंतर्गत घड्याळातला बिघाड आपल्या आतड्याच्या आरोग्यावर परिणाम होतो का? याचं उत्तर हो. निश्चितच परिणाम होतो, असं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शरीराच्या चक्रातील बिघाडाचा आपली पचनक्रिया आणि चयापचय क्रियेशी जवळचा संबंध आहे.
त्यामुळे ग्लुकोजच्या चयापचयात बिघाड होऊ शकतो आणि वजन, रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते. भूक नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांवर परिणाम होऊ शकतो.
या संप्रेरकांवर परिणाम झाला की अधिकाधिक साखर आणि सॅच्युरेटेड फॅट असणारे पदार्थ खायची इच्छा होते.
इन्शुलिन सेन्सेटिव्हिटी कमी होऊ शकते आणि त्याचे परिणाम शरीरावर होता. यासर्वाचा आपल्या आतड्याच्या आरोग्यावर म्हणजेच पर्यायाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आतड्यातील सूक्ष्मजंतूंवर परिणाम होतो.
आपण जेव्हा खातो तेव्हा पोट, स्वादुपिंड, यकृत, आतडी, मेदाच्या ऊती या पचनाशी संबंधित असणाऱ्या अवयवांशी आपलं चक्र जुळवून घेतलेलं असतं. त्यांचं नातं बिघडलं की आरोग्यावर परिणाम ठरलेलाच आहे समजावं.
वेळापत्रकातील बदलाचा सूक्ष्मजंतूंवर परिणाम
जर आपण उशिरा जेवायला सुरू केलं तर सूक्ष्मजंतूंवर कसा परिणाम होईल? याचा आता विचार करू.
समजा आपण उशिरा म्हणजे दुपारी 4 वाजता जेवायला सुरू केलं तर आपलं 'बॉडी क्लॉक' पुढे जाईल. आतड्यातील बॅक्टेरियाचं काम आणि त्यांचं वर्तन बदलेल आणि आतड्याचं कामच बिघडून जाईल.
या सूक्ष्मजंतूंचा आपण काय खातोय याच्याशी संबंध असतो पण कधी खातो याचाही त्यांच्यावर परिणाम होतो. म्हणजे आपल्या वर्तनासंबंधातील गोष्टी, उपवास, किंवा सतत खाणं यांचाही त्यांच्यावर परिणाम असतो.
दिवसाच्यावेळेनुसार या सुक्ष्मजीवांचं काम आणि वर्तन बदलत असतं.
या सुक्ष्मजीवांचंही एक सर्क्याडियन चक्र असतं ते त्या व्यक्तीशी जुळवून घेतलेलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
प्राण्यांच्या आतड्यात असलेल्या सूक्ष्मजीवांवर आणि त्यांच्या सर्क्याडियन चक्रावर प्रयोग झालेले आहेत.
काही प्रयोगांतून निष्कर्षही काढले गेलेत. जसंकी इंटरमिटंट फास्टिंगचा काही उंदरांना फायदा झाला. त्यांच्या पोटातील सुक्ष्मजींवातील विविधता वाढली, दाह म्हणजे इन्फ्लमेशन कमी झाला आणि त्या सुक्ष्मजीवांनी शरीराला उपयोगी अशी संयुगं तयार केली.
माणसांवर केलेल्या प्रयोगात ज्या महिलांनी उशिरा जेवण घेतलं त्यांच्या तोंडातील सूक्ष्मजंतूंची संख्या घडल्याचं दिसलं. लठ्ठपणा आणि आतड्यातील दाह या रोगांमध्ये असे प्रकार दिसून येतात.
अर्थात इथं एक महत्त्वाची गोष्ट विसरुन चालणार नाही. ती म्हणजे प्रत्येक माणसाच्या पोटातील सुक्ष्मजीवांचा संच हा वेगवेगळा असतो. सगळ्यांमध्ये त्यांचं स्वरुप, त्यांचा पोत, त्यांची संख्या, त्यांचं वर्तन, त्यांचं काम करण्याचं चक्र सारखं नसतं. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग आणि जेवणाच्या वेळा बदलणं याचा परिणाम अगदी एकसारखाच होईल असं नाही.
सुक्ष्मजीवांचा आपल्या झोपेशी संबंध
आपल्या शरीरचक्रावर परिणाम झाला की तो सूक्ष्मजीवांच्या संचावरही होतो हे अभ्यासातून दिसून आलंय. दिवसात ते वेगवेगळ्या वेळी वेगानं काम करतं किंवा मंदावलेलं असतं.
तेच चक्र सूक्ष्मजीवांशी जोडलेले असल्यामुळे त्याचा चयापचयवर परिणम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात हे नातं दुहेरी आहे. आतड्यातील सूक्ष्मजीवही सर्क्याडियन रिदमवर परिणाम करू शकतात. ते दोनप्रकारे होतं. आपण काय खातो त्यावर त्यांचं काम अवलंबून असतं किंवा कधी खातो यावर अवलंबून असतं. या घटकांनुसार सुक्ष्मजीवांचे संच काम करत असतात.
आतड्यातील सूक्ष्मजीवांचे संच हे काही रासायनिक संयुगं तयार करत असतात ती रक्तात मिसळत असतात आणि त्यानुसार आपली झोप येणं, नियंत्रित होणं सुरू असतं.
सूक्ष्मजीवांनी आपल्या चयापचयाचा आणि आपण अन्न कधी खातो, काय खातो याच्याशी नातं जोडून ठेवलेलं असतं. त्यानुसार ते काम करतात. त्यात बिघाड झाला की झोपेवर परिणाम होतो किंवा झोपेचा त्यांच्यावर परिणाम होतो.
उदाहरण द्यायचं झालं तर झोप येणं आणि जाग येणं याच्याशी संबंधित असलेल्या सेरोटोनिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी स्ट्रेप्टोकॉकस आणि इसेरिशिया, एंट्रोकॉकस सुक्ष्मजीवातले काही जंतू गरजेचे असतात.
त्याचप्रमाणे गामा अमिनोब्युट्रिक असिडसुद्धा झोप येण्यासाठी उद्युक्त करत असते.
हे सुक्ष्मजंतुंचे संच सर्क्याडियन चक्रात बदल झाल्यावरही प्रतिक्रिया देतात त्यांची संख्या, गुणवत्ता बदलते.
काही स्थितीत चांगल्या सुक्ष्मजीवांऐवजी घातक सुक्ष्मजीवांची संख्या वाढते. यावर विविध विद्यापीठांत अभ्यास सुरू आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








