BMI आणि स्थूलपणा: माझं वजन जास्त आहे, म्हणजे मी लठ्ठ आहे का?

वजन

फोटो स्रोत, Getty Images

लठ्ठपणा जर आजार असेल तर त्याची व्याख्या कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य किती चांगलं आहे यावरून केली पाहिजे त्या व्यक्तीच्या फक्त वजनावरून नाही, अशा स्वरूपाच्या नव्या मार्गदर्शक सूचना कॅनडातल्या संशोधकांनी दिल्या आहे.

एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणावर उपचार करायचे असतील तर नेहमीच्या डायट आणि व्यायाम या उपायांच्या पुढे जाऊन विचार करा असा सल्लाही त्यांनी डॉक्टरांना दिला आहे.

'लठ्ठपणाच्या मूळ कारणांचा शोध घ्या'

डायट आणि व्यायामापेक्षा पेशंटच्या लठ्ठपणाच्या मूळ कारणांचा शोध घ्या आणि फक्त वजन कमी करण्यापेक्षा त्या व्यक्तींचं संपूर्ण आरोग्य कसं सुधारेल याकडे डॉक्टरांनी लक्ष द्यावं असंही यात म्हटलं आहे.

लठ्ठ महिला

फोटो स्रोत, Reuters

या नव्या मार्गदर्शक सूचना कॅनडाच्या मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये एका लेखात प्रसिद्ध झाल्या आहेत. यात लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींवर जी वागणूक दिली जाते त्यावर सडकून टीका केली आहे.

"आपल्याकडे असा समज आहे की लठ्ठ व्यक्ती आळशी असतात, बेजबाबदार असतात आणि त्यांच्या लठ्ठपणाला सर्वस्वी तेच जबाबदार असतात. समाजही त्यांच्याकडे याच दृष्टीकोनातून पाहातो आणि मग लठ्ठ व्यक्तींमध्ये न्यूनगंड तयार होतो," असं या लेखात म्हटलं आहे.

कोरोना
लाईन

या लेखातल्या सूचनांचा आधार घेऊनच डॉक्टरांनी लठ्ठपणावर उपचार करावेत असंही यात म्हटलं आहे.

क्झिमेना रामोस-सॅलास या कॅनडाच्या लठ्ठपणा संशोधन आणि धोरण या विभागाच्या उपसंचालक आहेत तसंच या नव्या लेखाच्या लेखकांपैकी एक आहेत.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालंय की उपचार करताना डॉक्टर्स लठ्ठ पेशंटच्या बाबतीत दुजाभाव करतात आणि त्यामुळे त्या पेशंटचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशा काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात ज्याचा वजनाशी काही संबंध नसतो. फक्त समाजच नाही तर डॉक्टर्सही लठ्ठ माणसांकडे चुकीच्या नजरेने पाहातात."

वजन करणाऱ्या व्यक्तीचे पाय

फोटो स्रोत, Reuters

कॅनडात गेल्या तीन दशकात लठ्ठपणाचं प्रमाण तिप्पट झालंय. कॅनडा स्टॅटिस्टिक्स या त्यांच्या सांख्यकी विभागानुसार कॅनडातल्या दर चार व्यक्तींमध्ये एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे.

लठ्ठपणाविषयी कॅनडाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये 2006 नंतर आता पहिल्यांदा बदल झाला आहे. ओबेसिटी कॅनडा, कॅनेडियन असोसिएशन ऑफ बॅरिअॅट्रिक फिजिशियन्स अँड सर्जन आणि कॅनेडिन इंस्टिट्युट ऑफ हेल्थ रिसर्च या संस्थांनी एकत्र येत या नव्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

वजन आणि व्यक्तीचं आरोग्य

बॉडी मास इंडेक्स आणि पेशंटच्या कमरेचा घेर यावरून अजूनही लठ्ठपणाचं निदान होत असलं तरी या गोष्टींनाही मर्यादा आहेत हे डॉक्टरांनी लक्षात घेतलं पाहिजे असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीचं वजन त्या व्यक्तीच्या आरोग्यावर काय परिणाम करतं यावर डॉक्टरांनी लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

लठ्ठ माणसांचं वजन 3-5टक्क्यांनी जरी कमी झालं तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. एखाद्या लठ्ठ व्यक्तीसाठी त्यांच्या उंचीनुरूप असणारं 'आदर्श'वजन योग्य ठरेलच असं नाही.

लठ्ठपणा ही गुंतागुंतीचा आणि लवकर बरा न होणार आजार आहे आणि याची काळजी आयुष्यभर घ्यावी लागते असंही यात म्हटलं आहे.

"लठ्ठ लोकांकडे आपण मोठ्या काळापासून चुकीच्या नजरेने पाहात आहोत. त्यांच्या जीवनशैलीमुळे ते लठ्ठ आहेत असा विचार आपण करतो. त्यांनाच दोषी धरतो. पण लठ्ठ लोकही इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या लोकांसारखेच मोठ्या आजाराशी झुंज देत असतात आणि त्यांनाही इतर आजारी लोकांसारखाच आधार आपण द्यायला हवा," असं रामोस-सॅलस म्हणतात.

लठ्ठ व्यक्तींना फक्त 'कमी खा आणि जास्त हला' असा सल्ला देता कामा नये. त्याबरोबर त्यांना मानसोपचार, बॅरिअॅट्रिक सर्जरीसारखे उपचारही द्यायला हवेत, हेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे.

अर्थात डायट किंवा व्यायाम करून नका असं यात म्हटलेलं नाही. "कोणत्याही वयाच्या, वजनाच्या, लिंगाच्या कोणत्याही व्यक्तीने चौरस आणि कमी कॅलरीजचा आहार घेतला आणि नित्यनियमाने व्यायाम केला तर त्याने आरोग्य सुधारणार आहेच," असं या संशोधकांनी म्हटलेलं आहे.

पण यात असंही लिहिलं आहे की डायट करून वजन कमी झालं तर ते टिकवणं अवघड असतं कारण मेंदू तुम्हाला सतत खाण्याची आज्ञा देतो ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागल्यासारखं वाटतं.

डायटपेक्षा आरोग्याची उदिष्ट ठरवावीत आणि त्यावर काम करावं असा सल्ला रामोस-सॅलस देतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)