आळसात वेळ घालवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही, कारण...

आळशीपणा

फोटो स्रोत, Getty Images

आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास… आळशी लोकांना टोमणा मारणारी अशी एक म्हण आहे. याचा अर्थ मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या आळसाला खतपाणी घालणारी परिस्थिती निर्माण होणे.

सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्वांवरच सक्तीने घरात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आळशी माणसांचं फावलं, असं वाटू शकेल. पण, खरंतर या लॉकडाऊननेच मनुष्य प्राणी मुळात आळशी नाहीच, हे सिद्ध केलं आहे.

सहसा सुदृढ आरोग्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या सूचना आपल्याला नकोशा असतात. उदाहरणार्थ- व्यायाम करा. अमुक-अमुक आहार घ्या. मात्र, पहिल्यांदा आरोग्यासाठी अशी काही सूचना मिळाली आहे जी सहज शक्य आणि आवडण्यासारखी आहे- घरीच थांबा.

आता 'घरी थांबा' म्हटल्यावर प्रत्येकाकडेच भरपूर निवांत वेळ आहे. सोफ्यावर लोळत हवा तितका वेळ टीव्ही बघता येईल, घड्याळाचा काटा न पाहता निवांत कामं करता येतील.

मात्र, वाटतं तितकं हे सोपं नाही. अनेक आठवड्यांचा लॉकडाऊन घरी बसून पाळल्यावर तुमच्याही हे लक्षात आलं असेल. मनुष्य प्राणी हा आळसावत एकाच ठिकाणी बसून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या बनलेलाच नाही. उलट आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी करण्याची एक आंतरिक ओढ असते. अगदी आळशी माणूस असला तरीदेखील तो दिवसभर काहीही न करता घरातच बसून राहू शकत नाही.

सोपा पर्याय शोधण्याकडे कल

आपण कायम सोपा पर्याय शोधत असतो, काम कमी कसं करता येईल, फार कष्ट न करता यश कसं मिळवता येईल, याकडे आपला कल असतो. हातात रिमोट असल्यावर सोफ्यावरून उठून टीव्हीवरच्या बटणांनी चॅनल कोण बदलणार? कार असताना सायकलचा वापर का करणार? सहकाऱ्यापेक्षा निम्मं काम करून काम भागत असेल तर अधिकच काम कोण करणार?

कुठल्याही कामात शारीरिक किंवा मानसिक ताण येत असेल तर शक्य तोवर ते काम टाळण्याचाच प्रयत्न असतो. याला 'principle of least effort' किंवा 'Zipf's Law' असंही म्हणतात. हा 'लॉ' मोडण्याचा मोह कुणालाही होत नसावा, असा विचार मनात येऊ शकतो. पण खरंतर आपणच तो सतत मोडत असतो.

तुम्ही कधी काहीही न करण्याचा म्हणजे अगदी काडीसुद्धा न हलवता एका ठिकाणी बसून राहण्याचा विचार केला आहे का? आयुष्यातली एक दुपार काहीही न करता सोफ्यावर लोळत सिलिंगवरचा पंखा बघत बसणं, आसपासची नीरव शांतता अनुभवणं...ही कल्पना जरी रम्य वाटत असली तरी वाटते तितकी सोपी नाही.

आळशीपणा

फोटो स्रोत, Getty Images

याचसंदर्भात काही वर्षांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात सहभागी झालेल्यांना एकेकाने एका रिकाम्या खोलीत पाठवण्यात आलं. त्या खोलीत टीव्ही नव्हता, पुस्तकं नव्हती, फोनही न्यायचा नाही. शिवाय, झोपायचीही परवानगी नव्हती.

प्रत्येकाच्या पावलाला इलेक्ट्रोड्स जोडले होते. त्या सर्वांना त्या मोकळ्या खोलीत एकेकट्याने 15 मिनिटं घालवायची होती. म्हणजे 15 मिनिटांचा निवांत वेळ. 15 मिनिटं काहीही करायचं नाही. शांत बसून राहण्याची संधी.

पुढे काय झालं असेल? त्या खोलीत जाण्याआधी इलेक्ट्रिक शॉक जनरेट करण्यासाठी कॉम्प्युटरचं बटण कसं दाबायचं, एवढं मात्र सांगण्यात आलं होतं. एकदा या इलेक्ट्रिक शॉकचा अनुभव घेतल्यावर पुन्हा कुणीही ते बटण दाबलं नसणार, असं तुम्हालाही वाटेल. पण खरंतर या प्रयोगात भाग घेणाऱ्या 71% पुरुषांनी आणि 25% स्त्रियांनी त्या खोलीत 15 मिनिटं घालवताना किमान एकदा तरी स्वतःला इलेक्ट्रिक शॉक दिला.

एकाने तर स्वतःला तब्बल 190 वेळा इलेक्ट्रिक शॉक दिले. यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की करायला काहीही नसणं एवढं त्रासदायक होतं की प्रयोगात सहभागी होणाऱ्या बहुतांश लोकांनी शांत बसून राहण्यापेक्षा स्वतःला टॉर्चर करून घेणं जास्त पसंत केलं.

या कामांची गरजच काय?

हा प्रयोग एक टोकाचं उदाहरण असलं तरी आपल्या रोजच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की लोक सतत अशी कामं करत असतात जी करण्याची खरंतर काहीच गरज नसते किंवा कधी-कधी शारीरिक वेदना होतील, अशी कामंही करतात. मॅरेथॉनमध्ये भाग घेणं, अनेक तास जिममध्ये घालवणं. सुदृढ शरीर आणि आरोग्य यासाठी गरजेच्या असणाऱ्या व्यायामापेक्षा कितीतरी जास्त व्यायाम हे लोक करत असतात. अनेकांना आइस स्केटिंगची आवड असते. अनेकजण खाडी पोहून पार करण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात.

आळशीपणा

फोटो स्रोत, Getty Images

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधले मायकल इंझलेट यांनी याला 'the paradox of effort' असं म्हटलं आहे. काहीवेळा आपण अत्यंत सोपा मार्ग घेतो आणि कमीत कमी श्रमात काम कसं पूर्ण करता येईल, हे बघतो. मात्र, एखाद्या कामासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले की, त्याची किंमतही आपल्याला जास्त असते.

मेहनतीतून मिळणारा आनंद इतका असतो की त्या कामात आपण शॉर्ट कट घेत नाही. शब्दकोडे सोडवण्यासाठी खरंतर गुगलवर जाऊन सर्च करून सहज कोडं सोडवता येतं. पण, स्वतः विचार करून कोडं सोडवण्याची मजा काही निराळीच. कारण इथे बौद्धिक मेहनतीतून आनंद मिळत असतो.

लहानपणापासूनच आपली जडणघडणच त्यापद्धतीने केली जाते. लहानपणी स्वतःचे अनुभव, मोठ्यांची शिकवण यातून आपल्या मनात एक गोष्ट ठाम होत जाते की, मेहनतीचं फळ गोड असतं. पुढे मोठं झाल्यावर कष्टाचा आपल्याला आनंद होत असतो. यालाच 'learned industriousness' म्हणतात. म्हणजेच मेहनत करायला शिकणं. 20 वर्षांपूर्वी मी इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटांवरच्या केलिमुटू इथले रंग बदलणारे तळे बघायला गेलो होतो. ही तळी दर काही वर्षांनी रंग बदलतात.

कोरोना
लाईन

मात्र, ही ट्रिप संस्मरणीय ठरण्यामागचं एक कारण होतं - या ट्रिपसाठी मी घेतलेली मेहनत. त्या तळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अनेक दिवस बोट आणि बसने प्रवास केला. त्यानंतर काही तासांचा प्रवास एका छोट्या व्हॅनमधून होता. तो रस्ताही इतका खाचखळगे असणारा होता की, व्हॅनमध्ये बसणाऱ्यांना उलट्या व्हायच्या. व्हॅनमध्ये एक हेल्पर उलट्या येणाऱ्या लोकांना बॅग देणं आणि नंतर त्या गोळा करून फेकणं, यासाठी नेमलेला होता.

त्यानंतर एक रात्र एका हॉस्टेलमध्ये घालवावी लागली. तिथे खूप उकाडा होता. आमची मॅट्रेस टणक होती. खोलीत झुरळं फिरत होती. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता एका मिनिबसने आम्ही केलिमुटूला पोहोचलो. केलिमुटूला पोहोचलो तेव्हा आम्ही पार थकलेलो होतो. पण हा सगळा अनुभव होता आणि त्या तळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जे कष्ट पडले त्यामुळे ती तळी बघण्याचा आमचा आनंद अविस्मरणीय ठरला.

काही गर्भश्रीमंत पर्यटक तिथे खाजगी हेलिकॉप्टर्सनेही आले होते. पण, आम्हाला त्यांचा हेवा वाटला नाही. त्यांना ती रंग बदलणारी तळी बघण्याचा आनंद आमच्यापेक्षा जास्त झाला असेल का? नक्कीच नाही.

जगभरात पर्वतांसंबंधीच्या परिषदा वेगवेगळ्या पर्वतांवर होत असतात. तिथवर खरंतर केबल कार किंवा चेअर लिफ्टने जाता येतं. पण, गिर्यारोहक डोंगर चढूनच या परिषदांना जात असतात. उंचच उंच दगड, हाडं गोठवणारी थंडी, जीवाचं बरं-वाईट होण्याची दाट शक्यता. पण तरीही गिर्यारोहक सोपा मार्ग घेत नाहीत.

जॉर्ज लोवेंस्टेन बिहेविअरल इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी या सिंड्रोमवर एक अहवाल तयार केला आहे. त्यात ते लिहितात की, मनुष्यप्राणी ध्येयप्राप्ती आणि परिस्थितीवर मात करण्याची संधी हातची गमावू इच्छित नाही. मग त्याची गरज नसली तरीदेखील.

यालाच 'Ikea effect' असंही म्हणतात. या सिद्धांतात असं म्हटलेलं आहे की, घरातली एखादी वस्ती आपण स्वतः तयार केलेली असेल तर ती आपल्यासाठी अधिक मोलाची असते.

या सर्वाचा अर्थ असा की जेव्हा आपण घरात राहतो, स्वतःला आयसोलेट करून घेतो तेव्हा सोफ्यावर बसून टीव्ही बघणं वेळ घालवण्याचा एक मार्ग आहे. काही आठवडे अशा पद्धतीने आळसावणं मजेशीर वाटू शकतं. मात्र, खरंतर हे सगळं आपल्याला विचलित करतात.

आळशीपणा

फोटो स्रोत, Getty Images

एखादी व्यक्ती आजारी नसेल, तिच्या शरीराला आरामाची गरज नसेल तरीदेखील तिच्यावर आरामाची सक्ती केली आणि ती दीर्घकाळ असेल तर यातून आपलं मन आणि शरीर रिलॅक्स होण्याऐवजी त्यातून अस्वस्थता आणि चिडचिडेपण वाढतं. आणि म्हणूनच लॉकडाऊनमध्ये आपल्याला असे मार्ग शोधण्याची गरज आहे, ज्याद्वारे आयुष्य सामान्यपणे जगण्याचं संतुलन साधता येईल.

यासाठी नियमित व्यायाम करणं, स्वतःसाठी काही ध्येय ठरवणं, कष्ट पडतील अशी अवघड कामं करणं, हे सगळं सामान्यपणे आयुष्य जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण कायम अशा अॅक्टिव्हिटीज किंवा अनुभवांच्या शोधात असायला हवं, जे आपल्याला कृतीशील ठेवतील. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मिहॅले सिकझेंटमिहॅले यांनी याच कृतीशीलतेवर Flow : The Psychology of Optimal Experiance हे पुस्तक लिहिलं आहे.

या कृतीशील कामं कुठलीही असू शकतात. अगदी चित्रकला, बागकाम, कोडी सोडवणं, अशी कुठलीही काम जी करताना आपला वेळही जाईल आणि इतरही कुठलीही चिंता आपल्याला सतावणार नाही.

सामान्य परिस्थितीत आपण सहसा पुरेशी विश्रांती घेत नाही. कोरोनाच्या निमित्ताने ही अपवादात्मक संधी आपल्याला मिळाली आहे. तेव्हा तिचा फायदा घेत जास्तीत जास्त विश्रांती घेऊया. एक गोष्ट मात्र नक्की या कठीण काळाने एक गोष्ट तरी आपल्या नक्कीच लक्षात येईल की, आपण म्हणजेच मनुष्यप्राणी हा मुळात आळशी नाही. उलट काहीही न करता फक्त विश्रांती घेण्यासाठीही फार कष्ट पडतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)