हरिद्वारमध्ये कॅन्सरग्रस्त मुलाला ‘बुडवून मारल्याचा’ आरोप, प्रकरण नेमकं काय?

    • Author, राजेश डोबरियाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, हरिद्वार

हरिद्वारमधील 'हर की पैड' चा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. यामध्ये एक महिला एका मुलाला पाण्यात बुडवताना दिसतेय, तिच्यासोबत दोन पुरुषही आहेत. काही मिनिटांनंतर घाटावर उपस्थित लोक मुलाला जबरदस्तीने बाहेर काढतात, मात्र मुलाची काहीच हालचाल होताना दिसत नाही.

त्यानंतर संबंधित लोकांनी मुलाला बुडवून मारल्याचा आरोप करत त्या पुरुष आणि महिलेला शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा केली जाते.

दुसर्‍या एका व्हीडिओमध्ये ती महिला मुलाच्या मृतदेहासोबत बसलेली दिसत आहे आणि मुलगा लवकरच जागा होईल, असा दावा करत वेड्यासारखी हसताना दिसतेय.

या गोंधळानंतर पोलिसांनी त्या पुरुष आणि महिलेला अटक केली आणि मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणामागची खरी गोष्ट आता समोर आली आहे. प्रथमदर्शनी या मुलाचा मृत्यू बुडून झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

व्हीडिओ शेअर न करण्याचे आदेश

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये लोक आई-वडिलांनीच मुलाला मारल्याचा आरोप करत त्यांनाच शिव्याशाप देताना दिसताय.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हरिद्वार शहराचे एसपी स्वतंत्र कुमार यांनी पत्रकार परिषदेत मुलाचा मृत्यू बुडून झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं.

हरिद्वार पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, "हर की पैडी येथे एका महिलेने आपल्या मुलाला बुडवून मारल्याचा आरोप खोटा आहे. प्रथमदर्शनी पाहता, हे संपूर्ण प्रकरण श्रद्धा आणि मुलगा जिवंत होण्याची 'शेवटची आशा' याच्याशी संबंधित आहे, प्रत्येक गोष्टीचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलाला रक्ताचा कर्करोग झालेला आणि त्याचा आजार शेवटच्या टप्प्यात असल्याने दिल्ली एम्सने त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिलेला. त्यानंतर, शेवटची आशा म्हणून मुलाच्या पालकांनी त्याला हरिद्वारला आणलं होतं.”

पोलिसांनी सांगितलं की, घटनेनंतर सायंकाळी 5 वाजता मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं, ज्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की मुलाच्या फुफ्फुसात पाणी नव्हतं आणि त्याचा मृत्यू बुडून झालेला नाही. मुलाचं शरीर ताठर झालेलं. तरीसुद्धा, अद्याप अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यामधून अधिक तपशील समोर येईल.

हे प्रकरण लहान मुलाशी संबंधित असल्याने ते अत्यंत संवेदनशील असून हरिद्वार पोलीस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या घटनेचे विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारे व्हीडिओ कोणतीही पडताळणी केल्याशिवाय शेअर करू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

'वाटेतच झाला मृत्यू'

या प्रकरणाशी संबंधित एका पोलिस अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली आणि शवविच्छेदनानंतर मुलाचा मृत्यू बुडून न झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं, जेणेकरून त्यांना मुलावर अंत्यसंस्कार करता येतील.

दिल्लीतील सोनिया विहार येथे राहणारे रणजीत कुमार हे टॅक्सी चालक असून त्यांनी या लोकांना दिल्लीहून हरिद्वारला आणलं होतं.

रणजीतने बीबीसीला सांगितलं की, मूलगा खूप आजारी होता आणि गाडीत बसल्यानंतर काही वेळातच मुलाने हालचाल करणं बंद केलेलं.

त्यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजता मुलाच्या मामाने (शेजारी) हरिद्वारला जाण्यासाठी फोन केलेला. सव्वा नऊ वाजता ते दिल्लीहून निघाले. मुलासोबत त्याचे आई-वडील आणि एक मावशी होती. मुलगा त्यावेळी जोरजोराने श्वास घेत होता.

काही वेळाने मुलाच्या श्वासाचा आवाजही येणं बंद झालं, तेव्हा तो झोपला असल्याचं मुलाच्या आईने सांगितलं.

दुपारी सव्वाच्या सुमारास हरिद्वारला पोहोचल्यानंतर पालकांनी त्याला आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते गंगेत स्नान करण्यासाठी गेले. दोन-अडीच तासांनंतर पोलिसांनी रणजीतला बोलवलं आणि चौकशी केली.

दिल्लीतील सोनिया विहार कॉलनीत राहणारे मदन राय हे या कुटुंबाचे शेजारी आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की मुलाचे वडील राज कुमार हे फुलविक्रेते म्हणून काम करतात आणि त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा रवी मरण पावला असून त्यांना त्याच्यापेक्षा एक मोठी मुलगी आहे.

ते म्हणतात की मुलाला रक्ताचा कर्करोग झालेला आणि डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडून दिलेली होती. त्यानंतर काहीतरी चमत्कार होईल या आशेने ते हरिद्वारला गेलेले, जेणेकरून गंगामातेच्या आशीर्वादाने त्यांचा मुलगा बरा होऊ शकेल.

मदन राय म्हणतात, "देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, गाझियाबाद ओलांडतानाच मुलाचा मृत्यू झालेला. डॉक्टरांनीही त्यांना हेच सांगितलेलं."

शवविच्छेदनानंतर सर्व कुटुंबीय रात्री उशिरा दिल्लीला परतले.

मदन राय मीडियाच्या कार्यपद्धतीवर नाराज दिसले आणि त्यांनी विचारलं की, "तुम्ही लोक बातम्यांची पडताळणी केल्याशिवायच प्रकाशित करता का? ती गरीब माणसं आधीच दु:खात आहेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये नको त्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही बातम्या चालवणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जात नाही का?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)