You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडूत रावणाची पूजा करण्याची परंपरा कशी सुरू झाली?
- Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
- Role, बीबीसी तमिळ
तामिळनाडूमध्ये ज्याप्रकारे रामाची भक्ती-भावानं पूजा केली जाते, काहीशी त्याचप्रकारे रावणाचीही खास अशी ओळख आहे. पण हे कधीपासून सुरू झालं? आणि यामागचं नेमकं कारण काय?
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरात उत्साहाचं वातावरण होतं. शिवाय सोशल मीडियावरही रामाच्याच पोस्टची गर्दी पाहायला मिळाली.
पण देशाच्या दक्षिण भागातील तामिळनाडूमध्ये रावणाच्या पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अनेकांनी रावणाच्या संदर्भात वर्णन करणाऱ्या पोस्ट केलेल्या पाहायला मिळाल्या.
रामायणातील रामाचा मुख्य विरोधक रावण तसा भारतासाठी नवा नाही. भारतात अनेक मंदिरांमध्ये रावणाचीही पूजा केली जाते. त्याचं कारण म्हणजे रावण अत्यंत पवित्र अशा कथेचा भाग आहे.
पण तमिळनाडूमध्ये रावणाची पूजा करण्यामागं असलेलं कारण अगदी वेगळं आहे.
तामिळनाडूवर रामायणाचा प्रभाव केव्हा पडू लागला?
वाल्मिकी रामायणावर आधारित तामिळ भाषेतील कंब रामायण हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. कंब रामायणाची रचना नवव्या आणि 12 व्या शतकादरम्यान करण्यात आली होती, असं मानलं जातं. रचनेनंतरच्या काळात हे अत्यंत प्रभावी असं महाकाव्य ठरलं आहे.
पण अभ्यासकांच्या मते कंब रामायणाची रचना करण्याच्याही आधीपासून तामिळमध्ये रामायणाच्या कथेचं अस्तित्त्व होतं.
एस वैयापुरी पिल्लई यांच्या तमिलार पानपादू पुस्तकातील माहितीनुसार रामायणाच्या कथेचा प्रभाव सीतापथिकारमच्या काळापासून पाहायला मिळतो.
त्याशिवाय पुराणनुरु, अकनानुरु, मदुरैक कांची आणि परिबादल यातही रामायणातील पात्र, घटना आणि वर्णनांचं चित्र रुपात सादरीकरण करण्यात आलं असल्याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
तिरुज्ञानसंबंधरच्या थिरुनीरू पधिगममध्येही "रावण मेलेतू नीरू" असा उल्लेख असून ते शैव पंथाचे असल्याचे संकेतही मिळतात.
तामिळनाडूमध्ये रावणाचा उत्सव कसा सुरू झाला?
विश्लेषक स्टॅलिन राजंगम यांच्या मते, रावणाला सर्वात महत्त्वाचं प्रतिक म्हणून सादर करण्याची सुरुवात 19व्या शतकात झाली.
"19व्या शतकातील नियतकालिक तत्ताविवेवेसिनीमध्ये मसिलमणि मुदलियार यांनी काही ठिकाणी रावणाचं गौरवशाली किंवा सकारात्मक वर्णन केलं आहे. त्याचप्रकारे अयोध्या दास यांच्या लेखनातही रावणाबाबत सकारात्मक उल्लेख आहेत. त्यानंतर 20व्या शतकात द्रविड आंदोलनात रावणाला अत्यंत सकारात्मक पात्राच्या रुपात लोकांसमोर मांडायची सुरुवात झाली," असं ते सांगतात.
द्रविड कवी भारतीदासन यांनी एक गीत लिहिलं होतं, त्याची सुरुवात "तेनरेसाई पार्किरिनेन" नं होते. हे संपूर्ण गाणं रावणाच्या स्तुतीत लिहिण्यात आलं आहे.
भारतीदासन यांनी या गाण्यात "एंथमिशर भगवान रावणकन" असा उल्लेख केला आहे.
त्यानंतर द्रविड चळवळीचे सर्वात मुख्य नेते अन्ना यांच्या काळात रावणाची मांडणी ही रामापेक्षा जास्त सकारात्मक पर्यायाच्या स्वरुपात केली जाऊ लागली, असं स्टॅलिन राजंगम सांगतात.
त्यांच्या मते, "सुरुवातीच्या काळामध्ये रावण मुख्य प्रवाहातील परंपरांच्या व्यतिरिक्त इतर विचारसरणींशी संलग्न होते. पण विसाव्या शतकात तमिळ पुनर्जागरणानंतर द्रविड-तमिळ संस्कृतीचा संदर्भ देऊन रावणाचं सादरीकरण केलं जाऊ लागलं."
खरं तर तामिळ साहित्य परंपरेनुसार रावणाच्या संदर्भात कोणतीही परंपरा आढळत नाही. वेलसामी यांनीही हा सर्व प्रकार विसाव्या शतकात सुरू झाला असंच मत मांडलं.
"बिगर-ब्राह्मण आंदोलनानं तामिळनाडूमध्ये अधिक जोर धरला त्यावेळी तामिळनाडूमध्ये कंब रामायणाचा प्रचंड प्रभाव होता.
रामाचं सादरीकरण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रतिकाच्या रुपात करण्यात आलेलं होतं. त्यामुळं त्याचा सामना करण्यासाठी द्रविड आंदोलनानं रावणाचं प्रतिक पुढं आणलं. त्यांनी रामाला नकारात्मक पात्र ठरवत त्यावर टीका करण्यास सुरुवात केली," असं वेलसामी सांगतात.
1950 च्या दशकाच्या सुरुवातीला द्रविड नाडूमध्ये एका लेखात एक प्रश्न उपस्थित कण्यात आला होता. रामलीला आयोजित करण्याऐवजी रावण लीला आयोजित करणं आणि रामाच्या पुतळ्याचं दहन करणं शक्य आहे का? असा तो प्रश्न होता.
यानंतर रावणलीलाचा काळ संपुष्टात येईल असं अण्णा दुराई, एम करुणानिधी म्हणाले होते. अण्णांच्या 'कंब रसम' या पुस्तकात रामायणाच्या विरोधातील द्रविड चळवळीची भूमिका मांडलेली होती.
पण स्टॅलिन राजंगम यांच्या मते, रामाच्या प्रतिमेला कडाडून विरोध करणाऱ्या पेरियार यानी रावणाची ओळखही स्वीकारली नाही.
पेरियार यांच्या मृत्यूनंतर मनिअम्मैयार यांच्या नेतृत्वातील द्रविड कळघमनं त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला रावण लीला आयोजित करण्याची घोषणा केली. त्याला प्रचंड विरोध झाल्यानंतरही याचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतरही अनेक वेळा आंदोलनांमध्ये रावण लीला आयोजित करण्यात आली आहे.
यादरम्यान 1946 मध्ये द्रविड नाट्य लेखक प्राध्यापक बुलावर काव्यम यांनी लिहिलेलं 'रावण काव्यम' प्रकाशित झालं. त्यात रावणाचं सकारात्मक तर राम आणि लक्ष्मणाचं नकारात्मक वर्णन करण्यात आलं.
त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आणि 2 जून 1948 ला तमिळनाडू सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली. 1972 मध्ये ही बंदी हटवण्यात आली होती. रावणाचे चांगले गुण आणि प्रतिभावान चारित्र्य असलेली प्रतिमा निर्माण करण्यात या पुस्तकाची मोठी भूमिका आहे.
2010 मध्ये रामायणावर आधारित मणिरत्न दिग्दर्शित विक्रम आणि ऐश्वर्या राय यांच्या भूमिका असलेल्या रावण चित्रपटातही रावणातील चांगल्या गुणांचं वर्णन करण्यात आलं होतं.
"पण सामान्य लोकांनी याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यांनी नेहमीप्रमाणेच रामायणाच्याच दृष्टिकोनातून त्याकडं पाहिलं," असं वेलसामी म्हणतात.
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपचा उदय, नवं आर्थिक धोरण, देशाच्या विविध भागातील गरिबांचा संघर्ष आणि मंडल आयोगाच्या शिफारसीच्या अंमलबजावणीच्या काळात पर्याय म्हणून रावणाच्या प्रतिमेला फारसं महत्त्वं मिळालं नाही. आता राम मंदिराच्या निर्मितीनंतर पुन्हा एकदा रावणाची ओळख समोर येऊ लागली आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)