रामनामी कोण आहेत, ज्यांनी शरीरभर गोंदवलं आहे रामाचंच नाव

    • Author, आलोक प्रकाश पुतुल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी रायपूरहून

छत्तीसगडच्या कसडोल येथील राहिवासी गुलाराम रामनामी सध्या भजन मेळाव्याच्या तयारीत व्यग्र आहेत.

गेल्या शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळापासून महानदीच्या किनाऱ्यावर तीन दिवसांचा एक अनोखा भजन मेळावा भरतो. यावर्षी हा मेळावा 21 ते 23 जानेवारीदरम्यान होत असून त्याची तयारी जोरात सुरू आहे.

गुलाराम रामनामी सांगतात, “या मेळाव्यात तीन दिवस हजारो लोक वेगवेगळ्या आणि सामूहिक रुपात रामायणाचं पठण करतात. संपूर्ण वातावरण राममय असतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. याचदरम्यान अयोध्येतही राम मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे असं ऐकून आहे.”

गुलाराम छत्तीसडच्या रामनामी समुदायाचे सदस्य आहेत. संपूर्ण शरीरावर राम-राम लिहिलेलं टॅटू या सदस्यांनी गोंदवलं आहे. हे गोंदण शरीराच्या प्रत्येक भागावर केलं जातं.

या समुदायात सकाळच्या अभिवादनापासून प्रत्येक कामाची सुरुवात राम-राम म्हणून होत असते.

या समुदायाचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही. रामनामी समुदायाकडे रामाची अनेक निर्गुण भजनं आहेत.

रामभक्तीचं केंद्र

मध्य भारतात निर्गुण भक्तीची तीन मोठी आंदोलनं झाली आहेत. त्याचं केंद्र छत्तीसगड होतं. या तिन्ही आंदोलनाचा या समाजाचे बहुतांश लोक सहभागी होते, जे कथितरित्या अस्पृश्य समजले जातात.

मध्य प्रदेशातील बांधवगढ येथे राहणारे शिष्य गुरू धरमदास आणि त्यांचा मुलगा गुरू चुरामनदास यांना मध्य भारतात कबीर पंथाचा प्रचार-प्रसार आणि त्याची स्थापना करण्याचं श्रेय दिलं जातं.

छत्तीसगडच्या दामाखेडा भागात कबीरपंथीयांचा मोठं आश्रम आहे. कबीरधाम जिल्ह्यातही कबीरपंथी समाजाचं मोठं केंद्र आहे. छत्तीसगडमध्ये कबीरपंथाला मानणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्याचप्रकारे कबीरांचे शिष्य जीवनदास आणि 16 व्या शतकातील उत्तर प्रदेशातील सतनाम पंथाच्या स्थापनेचेही पुरावे सापडले आहेत.

काही इतिहासकारांच्या मते, दादू दयाल यांचे शिष्य जगजीवनदास यांनी सतराव्या शतकात सतनाम पंथाची स्थापना केली होती. मात्र, छत्तीसगडमध्ये 1820 च्या सुमारास गुरुघासीदा यांनी सतनाम पंथाची स्थापना केली होती.

कबीरपंथ आणि सतनामी समाज जेव्हा स्थापन झाला तेव्हा परशुराम नावाच्या एक युवकाने कपाळावर राम-राम असं गोंदवून या रामनामी संप्रदायाची स्थापना केली होती.

मात्र, रामनामी संप्रदायातील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात की 19 व्या शतकाच्या मध्यात जांजगीर-चापा जिल्ह्यातील चारपारा गावात जन्माला आलेल्या परशुरामाने वडिलांच्या प्रभावाखाली मानसपाठ ठेवणं सुरू केलं. मात्र तिशीत येता येता त्यांना त्वचारोग जडला.

त्याचदरम्यान रामदेव नावाच्या एका संताच्या संपर्कात आल्यावर त्याच्या रोगाचं निवारण झालं आणि त्याच्या छातीवर राम राम ही अक्षरं ठळकपणे दिसून आली. त्यानंतर त्याने रामाच्या जपाचा प्रसार सुरू केला.

त्याच्या प्रभावाखाली येऊन काही लोकांनी त्यांच्या कपाळावर राम-राम असं गोंदवलं आणि शेती वगैरे उद्योगापासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रामाचं भजन करणं सुरू केलं.

या लोकांना दुसऱ्या साधू सारखं शाकाहारी भोजन सुरू केलं आणि मद्यपानही सोडून दिलं. रामनामी संप्रदायाची ही सुरुवात 1870 च्या आसपास झाली.

या संप्रदायाच्या लोकांनी त्यांच्या कपड्यांवरही राम राम लिहिणं सुरू केलं. चादर, रुमाल, ओढणी सर्व जागांवर राम राम लिहिण्याची परंपरा सुरू झाली.

रामनामी संप्रदायाचे चैतराम सांगतात, “आमचे वडील सांगायचे की कपाळावर आणि अंगावर राम राम लिहिल्याने नाराज झालेल्या अनेक लोकांनी रामनामी लोकांवर हल्ले केले. राम राम लिहिलेलं गोंदण मिटवण्यासाठी गरम सळाख्यांनी डागण्या दिल्या. कपडे जाळले मात्र मनात रामाबद्दलचे भाव ते कसे मिटवतील?

त्याला विरोध म्हणून पूर्ण शरीरावर राम-राम कायमचं गोंदवण्याची परंपरा सुरू झाली.

रामायणातून साक्षरता

गुलाराम रामनामी सांगतात, “त्यावेळेला समाजात जी वर्णव्यवस्था होती त्यात कथित क्षुद्रांना मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता. रामाच्या नावाचा जप करण्याचा अधिकारही नव्हता.

“रामनामी संप्रदायाच्या सुरुवातीनंतक आम्हाला रामाचं भजन करण्याचा अधिकार मिळाला. त्याच्याबरोबर रामायणामुळे आमच्या पूर्वज लिहायला आणि वाचायला शिकले. शाळेत जाण्याचा अधिकार क्षुद्रांकडे नव्हताच. त्यामुळे रामायण हे साक्षरतेचं मोठं माध्यम झालं."

गुलाराम सांगतात की रामाचं नाव घेतल्यामुळे त्यांच्या पूर्वजांना न्यायालयाचे खेटे घालावे लागले. त्यांनी रामाचं नाव घेतल्याने रामाचा पावित्र्यभंग होतो असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

आम्ही न्यायालयात माहिती दिली की, आम्ही ज्या रामाला जपतो तो अयोध्येतील दशरथाचा पुत्र राम नाही तर तो राम आहे जो चराचररात आहे. आमचा सगुण रामाशी काही संबंध नाही.

रायपूर येथील सत्र न्यायालयाने 12 ऑक्टोबर 1912 ला निकाल दिला की, रामनामी कोणत्याही मंदिरात प्रवेश करू शकत नाही आणि हिंदू प्रतीकांची पूजाही करू शकत नाही.

गुलाराम सांगतात, “दशरथाचा पुत्र रामाने जन्मच घेतला नाही असं आमचं मत आहे. तेव्हाही राम होताच. तो एक निर्गुण राम होता. आम्ही आमच्या शरीरालाच मंदिर केलं आहे. आम्हीसुद्धा चार वेद, सहा शास्त्र, नऊ व्याकरण आणि अठरा पुराण वाचले आहेत. मात्र त्याचं सार राम-राम आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

रामनामी समाजात पंडित किंवा महंतांची परंपरा नाही. या समाजाच्या मंदिरात मूर्ती पूजेचंही स्थान नाही. समाजात गुरू शिष्य परंपराही नाही. इतकंच काय तर भजनाच्या आयोजनातही स्त्री पुरुष असा भेद नाही.

रामनामी समाजाचे एक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की आमच्या समाजात काही दशकांआधी राम रसिक गीताही लिहिली गेली होती. मात्र सगळं राम-रामवर येऊन थांबलं आहे आणि त्यांच्या समाजातून गीता हद्दपार झाली आहे.

ते सांगतात, “आम्ही आमच्या भजनात मानस किंवा रामायणही वाचतो मात्र त्याच्या बहुतांश भागाशी आम्ही सहमत नाही. आमची रुची कथानकात नाही. आम्ही बालकांडात नाम महात्म्य आणि उत्तरकांडात दीपसागर यासाठी गातो कारण त्यात रामाचं महत्त्व सांगितलं आहे.

नवी पिढी दूर होत आहे

रामनामी लोकांची संपूर्ण शरीरावर गोंदवण्याची परंपरा हळूहळू लोप पावत आहे. संपूर्ण शरीरावर गोंदवायला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागतो.

पूर्ण शरीरावर गोंदवणाऱ्या लोकांना नख शिख असं म्हटलं जातं. गोंदण्याचं कामही रामनामी समाजाचे लोकच करतात.

नवीन पिढी भजनांमध्ये सहभागी होते मात्र गोंदवून घेत नाही.

रामजतन नावाचा एक तरुण म्हणतो, “आधीचे लोक शेतीवर अवलंबून होते. त्यांना गोंदवण्याने काहीच फरक पडायचा नाही. आता नवीन पिढीला कमावण्यासाठी, नोकरी करण्यासाठी बाहेर जावं लागतं. आता शरीरभर गोंदवून काम करणं कठीण होतं. आता गोंदवलेल्या लोकांबरोबर कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आचरणातील शुद्धता आणि आणि श्रद्धेला अधिक महत्त्व देण्यात येतं.

मात्र सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियतेच्या संदर्भात समाजात काही उत्साह असेल असं वाटत नाही.

रामनामी समाजाचे कुंजराम यांनी 1967 च्या निवडणुकीत सारंगढ येथून विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार कुंजराम यांना 19094 मतं मिळाले होते. त्यांचे स्पर्धक कंठाराम यांना यांना 2601 मतं मिळाली होती.

दोघांमध्ये फक्त 67.23 टक्क्याचं अंतर होतं. तो आजही एक विक्रम समजला जातो. मात्र कुंजराम यांच्यानंतर राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न फार लोकांनी केला नाही.

जीवनाचं सार रामाच्या नावात आहे, अशा प्रकारच्या प्रवाहात हा रामनामी समाज सध्या आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)