You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदिपुरुष : जेव्हा रावणाच्या मृत्यूनंतर अख्ख्या गावानं दुखवटा पाळला होता...
दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र, हा सिनेमा फसल्याची अनेकजण टीका करत असून, रामानंद सागर यांच्या रामायण मालिका किती योग्य आणि चांगली होती, हेही सांगत आहेत. या निमित्तानं रामायण मालिकेशी संबंधितच एक किस्सा आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
सिनेदिग्दर्शक रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेनं भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात इतिहास घडवला. अगदी भक्तिभावाने कुटुंबच्या कुटुंब एकत्र बसून या मालिकेचे भाग पाहिले जात.
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हाही या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आघाडी घेतली होती.
रामायणाचे 78 भाग पूर्ण झाल्यानंतर आता लव-कुशाची गोष्ट सांगा, अशी मागणी प्रेक्षकांनी केली. पण रामानंद सागर याला तयार नव्हते.
जर आपण लव-कुशाची गोष्ट सांगितली तर ती एक काल्पनिक कथा असेल, असं त्यांचं म्हणणं होतं. ही गोष्ट टीव्हीवर झळकली आणि त्यानंतर अनेक वाद झाले. रामानंद सागर यांच्यावर पुढची 10 वर्षं कोर्टात खटला सुरू होता.
रामायण मालिका ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवरून प्रसारित झाली. हनुमानाचं संजीवनी बुटी आणणं, पुष्पक विमानाचं उड्डाण असे अनेक स्पेशल इफेक्ट्सही यात पहायला मिळाले.
रामायण सुरू असताना जेव्हा ज्युनियर कलाकारांची गरज असे तेव्हा गावा-गावात जाऊन दवंडी पिटली जाई आणि कलाकारांची भरती करण्यात येत असे, असं प्रेम सागर सांगतात.
प्रेम सागर म्हणतात, "स्पेशल इफेक्ट्सबद्दल समजून घेण्यासाठी रामानंद सागर ओरिजनल 'किंग काँग'च्या निर्मात्यांना हॉलिवूडमध्ये जाऊन भेटून आले होते. सोबत अनेक पुस्तकं वाचल्यानंतरच रामायणात हे स्पेशल इफेक्ट्स वापरण्यात आले."
रामायण जगभरातल्या पाचही खंडांमध्ये पाहिलं जाई. जगभरात 65 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ही मालिका टीव्हीवर पाहिली होती.
असं म्हटलं जातं, की ही मालिका सुरु होती तेव्हा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मालिकेचा भाग प्रसारित होत असताना कोणाला भेटायचे नाहीत किंवा कोणाचा फोनही घ्यायचे नाहीत.
रामायणाचा ताजा भाग असणारी कॅसेट दर आठवड्याला दूरदर्शनच्या कार्यालयात पाठवण्यात येईल. अनेकदा ही कॅसेट प्रसारण होण्याच्या जेमतेम अर्धा तास आधी पोहोचत असे. सलग 550 दिवसांपेक्षा जास्त काळ रामायणाचं शूटिंग सुरू होतं.
ज्यावेळी या टीव्हीवरच्या रामायणात रावणाचा मृत्यू झाला, त्यावेळी रावणाची भूमिका करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या गावात दुखवटा पाळण्यात आला होता.
अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने सीतेची भूमिका अगदी मूर्तीमंतपणे साकारली होती.
राम-सेतू उभारण्याचं रामायणातलं दृश्य चेन्नईमध्ये चित्रित करण्यात आलं. गुजरातमध्ये चेन्नईसारखा निळाशार समुद्र नसल्याने या प्रसंगाचं चित्रण चेन्नईमध्ये करावं लागल्याचं प्रेम सागर सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)