‘आम्ही मूकबधिर होतो, आम्हाला ऐकू यायचं नाही, पण लोक आम्हाला उद्धट समजायचे’

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नाशिक शहरातल्या जत्रा चौफुलीजवळ संध्याकाळी एक अनोखा पाणीपुरी स्टॉल लागतो. तिथले विक्रेते पती-पत्नी हसतमुखाने ग्राहकांचं स्वागत करत असतात, ग्राहकांच्या ऑर्डरी येत असतात, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरीच्या प्लेटा रिचवल्या जात असतात... पण कोणीच कोणाशी बोलत नसतं.
हा स्टॉल चालवणारे किशोर आणि मनिषा हे नवरा-बायको जन्मापासून मूकबधिर आहेत. त्यामुळे त्यांच्या गाडीवर सगळा मामला खाणाखुणांनीच चालतो.
मी सवयीप्रमाणे बोलायला लागले, तर त्यांनी थांबवून खुणेने सांगितलं की त्यांना ऐकता बोलता येत नाही. पण त्यांना मूकबधिरांची साईन लँग्वेज उत्तम येत होती.
पण ती भाषा दुर्दैवाने मला कळत नव्हती. मग खुणेनेच संवाद साधायला सुरूवात झाली.
किशोर कडेकरही आतून बाहेर आले. आता आपलं म्हणणं यांना कसं सांगायचं या चिंतेत असतानाच त्यांचा किशोरवयीन मुलगा अंकुश आला आणि सहजपणे आमच्या संभाषणातला दुवा बनला.
मी जे प्रश्न विचारायचे ते तो आपल्या आईवडिलांना साईन लँग्वेजमध्ये सांगायचा आणि त्यांनी साईन लँग्वेजमध्ये दिलेली उत्तरं मराठीतून मला सांगायचा.
आपल्या पाणीपुरीचा स्टॉल सुरू करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना किशोर म्हणतात,
“सुरूवातीला स्टॉल लावला तेव्हा कस्टमर सरळ येऊन विचारायचे, बोलायचे. हाक मारली तर आम्हाला कळायचं नाही. काहींना खूप राग यायचा, की हे कोण समजतात स्वतःला, आमच्याकडे लक्ष देत नाहीत. पण आम्हाला ते काय बोलतात हे ऐकूच आलेलं नसायचं. मग आम्ही त्यांना खुणा करून सांगायचो की आम्हाला ऐकता-बोलता येत नाही. मग लोक जरा शांत व्हायचे, आणि आमच्याशी खाणाखुणा करून बोलायचे. आम्ही पाणीपुरी शेवपुरीचे दर लिहून द्यायचो, आणि ग्राहक बोटांनी दाखवायचे किती प्लेट हव्यात,” किशोर सांगतात.

किशोर आणि मनीषा दोघांचं बालपण तसं अवघडच गेलं. त्या दोघांच्या कुटुंबात इतर कोणी मूकबधिर नव्हतं.
दिव्यांग असल्यामुळे शिक्षण नीट होऊ शकलं नाही. त्यामुळे वयाच्या एका टप्प्यात नाही म्हटलं तरी फ्रस्ट्रेशन आलं होतं.
आपलं बोलणं आपल्या घरात आईवडिलांना, भावंडांना कोणालाच समजत नाहीये ही भावना त्यांना एकटं पाडणारी होती आणि तशातच ते नाशिकमधल्या एका चर्चच्या सपोर्ट ग्रुपकडे ओढले गेले.
तिथे त्यांना समदुःखी लोक भेटले, अनेक दिव्यांग लोकांशी ओळख झाली आणि या जगात आपण एकटे नाही, आपल्यालाही समजणारं कोणी आहे या भावनेने त्यांना हायसं वाटलं.
इथेच किशोर आणि मनीषा यांची ओळख झाली. मनीषा यांचं बालपण तर आणखी अवघड होतं. त्या आपल्या आईबरोबर 10 घरी भांडी घासायला जायच्या. दुसऱ्या बाजूला त्यांनी टायपिंगचा डिप्लोमा केला. नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण पदरी निराशा आली.
मनीषाही चर्चमध्ये जाऊ लागल्या. दोघे एकमेकांकडे ओढले गेले आणि मग त्यांनी लग्न केलं.
पण खरी परीक्षा पुढेच होती.
या जोडप्याला एक मुलगा झाला. त्या अनुभवाबद्दल सांगताना मनिषा म्हणतात, “मुलगा झाला तेव्हा आनंद झाला, पण भीती होती की हा आपल्याच सारखा असला तर.
डॉक्टरांनी चेक करून सांगितलं की हा मुकबधिर नाहीये, तेव्हा प्रचंड आनंद झाला. पण त्याला वाढवणं तारेवरची कसरत होती. बाळ असताना रात्री रडायचा तेव्हा मला कळायचंच नाही. सासूबाई त्याचं रडणं ऐकून यायच्या आणि मला उठवायच्या.
तो थोडा मोठा झाल्यावर आम्ही बरेच निर्णय त्याचे त्याच्यावर सोडले, कारण आम्ही मूकबधिर होतो, पण या जगात काय घडतंय हे त्याला समजत होतं.”

लहान असताना आईवडिलांशी संवाद साधताना ज्या अडचणी येत होत्या, त्याच आता मुलाला मोठं करताना यायला लागल्या. कडेकर दांपत्यासमोरचा सर्वाxत मोठा प्रश्न होता की आपल्याला काय म्हणायचं आहे ते मुलाला कसं सांगायचं, त्याला शिस्त कशी लावायची.
मनीषा त्याचा अभ्यास घेताना पण रोज त्याच्या शेजारी बसायच्या. त्याच्या शिक्षकांनी गृहपाठ लिहून दिलेला असायचा. मग त्याला शिकवताना त्या न बोलता लिहून दाखवायच्या, आणि पुन्हा त्याच्याकडून लिहून घ्यायच्या.
पण या सगळ्या प्रवासात, लहानाचा मोठा होत असताना त्यांचा मुलगा अंकुशही साईन लँग्वेज शिकला. आता अकरावीला असणारा अंकुश आपल्या आईवडिलांचे कान आणि आवाज बनला आहे.
त्यांच्या कामातही तो मदत करत असतो.
‘भीती वाटली नाही’
कडेकर दांपत्यानी आधी 10-12 वर्षं इस्त्रीचं दुकान चालवलं. मग ते बंद करून ते मुंबईच्या एका मुकबधिरांच्या शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. कोरोना काळात नोकरी गेली. शिक्षणही बारावीच्या पुढे झालेलं नाही त्यामुळे नोकरीच्या इतर संधी नव्हत्या, म्हणून नाशिकला परत आल्यावर त्यांनी पाणीपुरीचा गाडा सुरू केला.

सुरुवातीला ते फक्त टेबल टाकून पाणीपुरी विकायचे. जरा जम बसल्यानंतर त्यांनी पाणीपुरीचा खास गाडा बनवून घेतला.
पण ग्राहकांना आपल्याशी संवाद साधता येणार नाही, आपल्याला त्यांना सर्विस देता येणार नाही ही भीती वाटली नाही का असा प्रश्न विचारल्यावर किशोर म्हणतात,
“आधी इस्त्रीचं दुकान चालवत होतोच की. तेव्हाही ग्राहकांशी संवाद साधावा लागायचा. मग इस्रीच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना आपली भाषा समजू शकते तर पाणीपुरी खायला येणाऱ्या ग्राहकांना का समजणार नाही असा विचार केला. त्यामुळे भीती वाटली नाही, आणि आपला व्यवसाय चालणार नाही अशी धास्तीही वाटली नाही.”
ग्राहकांशी संवाद साधायचीही यांची अनोखी शक्कल आहे. त्यांनी आपल्या गाड्यावर चारही बाजूला पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी यांचे रेट असलेले मोठे पॅम्प्लेट लावले आहेत. ग्राहकांनी आपल्याला हव्या त्या पदार्थावर बोट ठेवायचं आणि बोटांनी सांगायचं की किती प्लेट हव्यात.
“तिखट हवं, की गोड यासाठी हात वर किंवा खाली करायचा. तुमच्या हाताच्या उंचीनुसार पदार्थाचा तिखटपणा ठरणार,” किशोर म्हणतात.

किशोर आणि मनीषा या दांपत्यांच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग आले जेव्हा त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, निराशा पदरी पडली, अनेकांनी त्यांच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन त्यांना पैशांच्या व्यवहारात फसवलं पण या जोडप्याने हार मानली नाही.
आता त्यांचं लक्ष्य आहे ते जुनं घर नीट बांधणं, मुलाचं शिक्षण पूर्ण करणं आणि आपल्या व्यवसायाची वृद्धी करणं.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर हसतमुखाने समोर जायचं हे या जोडप्याचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या ग्राहकांचंही ते असंच स्वागत करतात. सकाळी 5 ला सुरू झालेला त्यांचा दिवस रात्री 11 संपतो पण आपल्या स्वप्नांसाठी ही छोटी किंमत आहे, असं त्यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








