'शेळीपालनामुळे 10 ते 12 लाखांचं घर झालं, आज माझा संसारगाडा शेळ्यांवरच सुरू आहे'

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"शेळ्यांनी मला जगण्याचा मार्ग दाखवला. शेळीपालनामुळे 10 ते 12 लाखाचं घर झालं, गाडी झाली. जो काही संसारगाडा चालू आहे, हा फक्त शेळीपालनावरच चालू आहे."
रवी हिरासिंग राजपूत सांगत होते. त्यावेळी त्यांच्या हातात शेळीचं एक गोंडस पिल्लू होतं. रवी गेल्या 13 वर्षांपासून शेळीपालन करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पाल या गावात रवी राहतात.
मराठवाड्यातल्या इतर शेतकऱ्यांप्रमाणे रवी हेसुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दीड एकर शेतजमीन आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
शेती दीड एकर पण खाणारी तोंडं 8 असल्यामुळे रवी यांना शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं लागलं.
2011 हे वर्षं रवी यांनी लख्खं आठवतं.
गरजेपोटी सुरुवात
रवी सांगतात, "मी 2011 पासून या शेळीपालन व्यवसायात उतरलो. त्याकाळी मराठवाड्यात दुष्काळाचं प्रमाण जास्त होतं. दीड एकरात 8 सदस्यांच्या कुटुंबाचं भागत नसल्यामुळे शेतीला पूरक जोडधंडा म्हणून मी हळूहळू शेळीपालनाला सुरुवात केली."
रवी यांनी एका शेळीपासून सुरुवात केली. त्या एका शेळीपासून 2 पिल्लं झाली. त्यातून मग रवी यांचा आत्मविश्वास वाढला. मग ते येणाऱ्या उत्पन्नातून शेळ्यांची संख्या उत्पन्नावर वाढवत गेले.
2011 पासून 2015 पर्यंत त्यांच्याकडे जवळपास 25 शेळ्या झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
दरम्यानच्या काळात 2015 मध्ये रवी यांनी शेळी-मेंढी विकास महामंडळ, पडेगाव येथे शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतलं. अजून 2 खाजगी ठिकाणी शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतलं.
"प्रशिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, विविध जातींची माहिती मिळते," असं रवी सांगतात.
स्थानिक ते विदेशी शेळी
ते सांगतात, "सिरोही, सोजत, कोटा, बीटल या स्थानिक शेळ्या 2018 पर्यंत माझ्याकडे होत्या. 2018 नंतर मी विदेशातील आफ्रिकन बोअर ही जातिवंत शेळी खरेदी केली. आफ्रिकन बोअर ही जात विदेशातील काटक जात आहे, तिच्यात रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, जुळं देण्याचं प्रमाण चांगलं आहे, आजारी कमी प्रमाणात पडते आणि वजनवाढ लवकर होते. ही शेळी फायदेशीर असल्यानं तिचं संगोपन करतोय."
सध्या रवी यांच्या फार्मवरती विदेशी आफ्रिकन बोअर जातीच्या मोठ्या 15 शेळ्या आहेत आणि छोट्या 15 शेळ्या आहेत. लहानमोठे जवळजवळ 30 ते 32 नग त्यांच्या फार्मवरती आहेत.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
शेळीपालनातून होणाऱ्या कमाईविषयी रवी सांगतात, "15 शेळ्यांची दोन दोन जरी पिलं धरली, तर एका शेळीपासून आपल्याला 40 ते 45 हजार वार्षिक उत्पन्न भेटतं. त्या हिशोबानं माझं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 6 ते 7 लाखांपर्यंत जातं."
शेळ्यांच्या विक्रीसाठी रवी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप बनवलेले आहेत. शेळी विक्रीला आली की त्याविषयीची माहिती ते या ग्रुप्सवर टाकतात.
तिथं सगळे शेळीपालक शेतकरी असतात. तिथं व्हीडिओ टाकले तर शेतकरी बांधव संपर्क करून जागेवरून ते घेऊन जातात, असं रवी सांगतात.
चारा आणि शेडचं नियोजन
रवी यांनी त्यांच्याकडील दीड एकर क्षेत्रापैकी 30 गुंठ्यांमध्ये चारा लागवड केली आहे.
रवी सांगतात, "दीड एकरात प्रत्येकी 5 गुंठे शिवरी, 5 गुंठे सुबाभूळ, 5 गुंठे मेथी घास, 5 गुंठे स्मार्ट नेपियर लावलेलं आहे, काही गोपी कृष्ण आहे आणि काही दशरथ घास आहे, अशाप्रकारचे 7 प्रकारच्या चारा जो शेळ्यांसाठी पौष्टिक असतो, त्याची मी लागवड केलेली आहे."
शेळीपालनातून हमखास उत्पन्न हवं असेल तर शेळ्यांच्या शेळ्यांचं आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित असलं पाहिजे, असं रवी यांचं मत आहे.
ते सांगतात, "शेळीपालन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारा नियोजन आणि राहण्याची व्यवस्था म्हणजे शेडचं नियोजन. आपलं शेड निरोगी असावं. दररोज स्वच्छ केलेलं असावं. प्रोटिनयुक्त चारा, सुका चारा हे दोन-तीन प्रकारचे चारा असले तर शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
"शेळ्यांचं वेळच्या वेळी वार्षिक, सहामाही लसीकरण गरजेचं आहे. जंतनिर्मूलन, दर तीन महिन्याला जंतनाशक पाजणं महत्त्वाचं आहे. कॅल्शियम, लिव्हर टॉनिक देणे, मिनरल देणे हे पण महत्त्वाचे घटक आहेत."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
हे सायकलिंग पाळलं तर शेळीपालनातून हमखास उत्पन्न मिळतं, असा विश्वास रवी व्यक्त करतात.
"शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन करावं. आपल्याकडे चाऱ्याची पाण्याची जर सोय असेल तर शेतामध्ये चारा उपलब्ध करावा, त्यांना राहण्याचा निवारा उपलब्ध करावा. त्याच्यानंतर शेळ्या खरेदी कराव्यात. स्वत: शेतामध्ये कष्ट करून शेळ्यांचं संगोपन करून मग आपण उत्पन्न घ्यावं," रवी सांगतात.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









