स्वयंपाकाच्या जोरावर 11 एकर जमीन घेतली, 3 मजली घरही बांधलं; भोपळे मावशींची गोष्ट

भोपळे मावशी

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, भोपळे मावशी
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ही गोष्ट आहे स्वयंपाकाच्या जोरावर स्वत:चं साम्राज्य उभं करणाऱ्या भोपळे मावशींची. आचारी किंवा वस्ताद म्हटलं, की ज्यांच्या डोळ्यांसमोर पुरुष उभा राहतो त्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या प्रमिला रमेश भोपळे यांची. 

जालन्याच्या प्रमिला यांना आज पंचक्रोशीत भोपळे मावशी म्हणून ओळखलं जातं. त्या गेल्या 25 वर्षांपासून आचाऱ्याचं काम करत आहेत. 

वयाच्या बाराव्या वर्षी प्रमिला यांचं लग्न झालं आणि त्या जालन्याला आल्या. सुरुवातीचा किंबहुना संघर्षाचा काळ त्यांना लख्ख आठवतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

भोपळे मावशी सांगतात, "मी 12 वर्षं वयाचे होते तेव्हा माझं लग्न झालं. मालक हॉटेलमध्ये काम करायचे आणि मी माझ्या नणंदेसोबत स्वयंपाकाच्या कामाला जायचे. घरी बसून काय करायचं? म्हणून मग नणंदेसोबत जायचे कामाला. 

“पैशाच्या बाबतीत म्हणजे पैसा दिसायचंच काम नव्हतं आम्हाला. मुलं लहान-लहान, भाया (मोठा दीर), जाऊ वारलेली. त्यांचे लेकरं सांभाळायचे. त्या कारणानं मग एवढं कुटुंब पोसायचं म्हटल्यावर, नुसत्या मालकाच्या ड्युटीवर तर काही भागतच नव्हतं. दहा रुपये रोज होता त्यांना." 

7 वर्षं मेस चालवली

संसाराला हातभार लागावा म्हणून भोपळे मावशींनी 7 वर्षं मेस चालवली. पण, कुटुंब मोठं आणि आर्थिक गरजाही जास्त, त्यामुळे मग त्यांनी मेससोबतच स्वयंपाकाचा व्यवसायही सुरू केला.

"मी कृषी विद्यालयामध्ये मेस चालवायची. तिथं एका मुलाचा पावणे चारशे रुपये महिना भेटायचा. माझ्याकडे 20-25 मुलं होती जेवायला. पावणे चारशेमध्ये पोटभर जेवण द्यायचे. त्यात महिन्यामधी 100 ते 150 रुपये वापस पडायचे मला. 

"मी तिथं 7 वर्षं मेस चालवली. मेस चालू असतानाच स्वयंपाकाचा व्यवसाय चालू केला, की चला बाबा आपल्याला याच्यासोबत जोडीला काहीतरी करायचं. आपल्यामागे लेकरं आहेत म्हणून मेससोबतच स्वयंपाकाचा व्यवसाय चालू केला."

भोपळे मावशी

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, भोपळे मावशी

कधी 100, तर कधी 500 जणांच्यास्वयंपाकाची ऑर्डर मावशींना मिळायला लागली. पहिल्याच ऑर्डरनंतर त्यांचातला आत्मविश्वास दुणावला. 

"मला पहिली ऑर्डर खरपुडीची भेटली. जालन्यापासून 4 किलोमीटर अंतरावर खरपुडी गाव आहे. मी आणि मालक, असे आम्ही दोघेही जण सोबत करायचो. सुरुवातीला हजार-बाराशे रुपये भेटले. मग असं वाटलं की आपल्याला यात दोन पैसे चांगले मिळत आहेत.

"मग आम्ही हेच पुढे चालू केलं. 10 वर्षं आम्ही दोघांनी सोबत काम केलं. त्याच्यानंतर आम्ही हॉटेल टाकली. मग मालक हॉटेलकडे लागले आणि मी धकले पुढे स्वयंपाकाकडे." 

भोपळे मावशी यांची जालन्यातील माळावरचा गणपती या भागात हॉटेल आहे. आम्ही ज्यावेळी हॉटेलवर पोहचलो तेव्हा मावशी काऊंटरवर बसून कामाचं नियोजन बघत होत्या. त्यांच्या हातात त्यांची पर्स होती.

100 लोकांपासून ते 5000 लोकांपर्यंत स्वयंपाक

दिवाळी झाली की भोपळे मावशींकडे स्वयंपाकाच्या ऑर्डर यायला लागतात. महिन्यात 15 ते 20 ऑर्डरचं हमखास बुकिंग असल्याचं मावशी सांगतात.

"मी 100 लोकांपासून ते 5000 लोकांपर्यंत स्वयंपाक बनवते. भागवत सप्ताह असला की 7 दिवसाची ऑर्डर घेते. किंवा एक दिवसाची समाप्ती असली की त्याची ऑर्डर घेते. कोणी वारलं तर त्याच्या दिवसाची ऑर्डर घेते. सहामास्याची, बर्थडेटी अशा ऑर्डर घेत राहते. 

"माझ्याकडे फक्त एक फोन नंबर आहे. त्याच्यावर ऑर्डर मी घेते. आतापर्यंत माझ्याकडे कार्ड छापेल नाही की काहीच नाही. तेवढ्या फोन नंबरवर माझ्या स्वयंपाकाच्या ऑर्डर चालतात." 

एकदा का ऑर्डर घेतली की मावशी संबंधितांना घरी बोलावून किती जणांचा स्वयंपाक करायचा याची विचारपूस करतात. त्यानंतर त्यांना सामानाची यादी बनवून दिली जाते आणि ज्यादिवशी स्वयंपाक आहे त्याच्या आदल्या दिवशीच कार्यक्रम स्थळी जाऊन स्वयंपाकाला सुरुवात करतात.

भोपळे मावशींनी आज अनेक महिलांना रोजगार मिळवून दिलाय.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, भोपळे मावशींनी आज अनेक महिलांना रोजगार मिळवून दिलाय.

7 फेब्रुवारीला मावशींना जालन्यातल्या पिरकल्याण गावात लग्नाच्या स्वयंपाकाचीऑर्डर मिळाली होती.

मावशींसोबत आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो, तेव्हा काही जणांचं जेवण सुरू होतं. तर एका मोठ्या सभागृहात महिला स्वयंपाकाचं काम करत होत्या.

मावशी आत शिरताच त्यांनी पोळ्या, बुंदी, लाडू यांची पाहणी केली. महिलांना काही सूचना केल्या आणि मग हातात मोठा सराटा (पळी) घेऊन वरणाला फोडणी देण्यासाठी स्वत: सज्ज झाल्या. 

मावशींनी स्वयंपाकाच्या व्यवसायातून आज अनेक महिलांनारोजगार मिळवून दिला आहे. 

मावशी सांगतात, "100 लोकांचा स्वयपांक असेल तर मी 3 किंवा 4 बाया सोबत नेते. 1 हजार लोकांचा स्वयंपाक असला की 2 कारागिर, 10 बायका आणि मी स्वत: एवढी माणसं असतात. ऑर्डर केवढी आहे त्यानुसार बायांचं नियोजन लावते. आपल्यासोबत 10, 20 लोकांना रोजगार भेटेल, त्यांचंही पोट भरेन हा माझा यामागचा हेतू असतो." 

स्वयंपाकानं आयुष्य कसं बदललं?

स्वयंपाकानं आयुष्य कसं बदललं या प्रश्नानंतर भोपळे मावशींचे पाणावलेले डोळे जणू त्यांच्या संघर्षाची साक्ष देतात. 

"पहिली परिस्थिती जर म्हणलं तर मला एकतर राहायला घर नव्हतं. वापरायला भांडंसुद्धा नव्हतं माझ्याकडं. एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये होते मी. पण आता एवढं दिलं भगवंतानी की मला त्याची गिणताच वाटत नाही.

"स्वयंपाकानं म्हटलं तर मला राहायला चांगलं घर दिलं. त्याच्यात माझ्या मुलायचे मी लग्न पण केलेत. माझ्या पुतण्याचं लग्न केलं. माझ्याकडे माझे 2 नातू राहतात. घरात 10 जण राहतो आम्ही. 10-11 एकर शेती घेतली मी. आमची हॉटेल झाली." 

भोपळे मावशींचं घर

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, भोपळे मावशींचं घर

भोपळे मावशींनी स्वयंपाकाच्या जोरावर 3 मजली घर बांधलंय. विकत घेतलेल्या शेतीत कापूस, ज्वारी, द्राक्ष या पिकांची लागवड केलीये. पण, मागे वळून बघताना त्यांनाआठवते ती नवऱ्याची मिळालेली खंबीर साथ. 

"मेन गोष्ट माझ्या नवऱ्याची साथ मला जास्त आहे. मला जर समजा बाहेर निघूनदिलं नसतं त्या बिचाऱ्यानं, तर मी काय केलं असतं?", असा सवाल मावशी विचारतात. 

'स्वयंपाकाकडे कष्ट पाहून पाहा'

भोपळे मावशींनी आज त्यांच्यासोबत त्यांच्या सुनांनाही उभं केलंय. बाईची जात कुठं अडली नाही पाहिजे, असं म्हणत सुनेला त्यांना स्कूटी घेऊन दिलीये.

घरातली महिला स्वयंपाक करते तर पुरुषानं तिच्याप्रती कृतज्ञ राहायला हवं, अशी भावना मावशी व्यक्त करतात. 

भोपळे मावशी, महिला

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

"स्वयंपाक करणं हा काही सोपा व्यवसाय नाहीये. गर्मी असली तरी ती माऊली म्हणत नाही की तुम्ही 2 मिनिटं चला, माझी पोळी भाजा. माझ्या हाताला किती चटके लागते. का भाजीला फोडणी द्या, माझ्या डोळ्याला आसू येतेत, असंही ती म्हणत नाही. त्यामुळे कुण्याबी नवऱ्यानं तिच्याकडे कष्ट म्हणूनच बघायचं."

'महिलाही आचारी असू शकते'

आचारी म्हटलं की सामान्यपणे डोळ्यांसमोर पुरुषाचं चित्र उभं राहतं. भोपळे मावशींनाही एक महिला आचारी म्हणून बऱ्याच अनुभवांना सामोरं जावं लागलं. 

घनसावंगी येथे त्या एकदा स्वयंपाकाला गेल्या होत्या. त्यावेळचा अनुभव त्या आवर्जून सांगतात. 

भोपळे मावशी

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

“घनसावंगीला स्वयंपाकाला गेले होते. ज्यांनी ऑर्डर दिली, त्यांच्या मित्राला प्रश्न पडला की, तुम्ही जर 5 हजार लोकांचा स्वयंपाक एका बाईला दिला असेल तर ती बाई एवढा स्वयंपाक कसा करेन? म्हणून ते मला भेटायला आले. ते आले तेव्हा मी माझं काम बघत होते. एवढ्या लोकांचा स्वयंपाक असला की मला नियोजनच लावावं लागतं.

“ज्यांनी मला स्वयंपाकाची ऑर्डर दिली होती ते म्हणाले की, मावशी यांना तुम्हालाबो लायचं आहे. मी म्हटलं की आधी तुम्ही जेवण करा आणि मग मला येऊन भेटा. जेवण करून ते परत आले आणि त्यांनी मला हात जोडले. म्हटलं बोला काय बोलायचं आहे. तर ते म्हणाले की, नाही मावशी मला काहीही बोलायचं नाही. माझी सगळी चिंता वारली.” 

"माणसाला जर दोनच हात आहेत तर मलाही दोनच आहेत. मग लोक असं का बघतात की आपल्याकडे माणूसच स्वयंपाक करू शकतो," मावशी प्रश्न विचारतात. 

भोपळे कुटुंबीयांची हॉटेल

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, भोपळे कुटुंबीयांचे हॉटेल

मावशींसोबत आज त्यांचं अख्खं कुटुंब व्यवसायाला लागलं आहे. मावशींचे पती आणि त्यांची दोन मुलं हॉटेलचं काम बघतात. तर त्यांच्या सुना मावशींना स्वयंपाकाच्या व्यवसायात मदत करतात.

हातात पर्स घेऊन भोपळे मावशी जेव्हा माणसांच्या पंगती जवळून वाट काढत स्वयंपाकाच्या स्थळी पोहचतात, तेव्हा मात्र सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे कौतुक आणि कुतुहलानं पाहत असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)