वैशाली मोरे : श्राद्धविधीमध्ये महिलांनी पूजा करणं मान्य नसताना ही महिला पूजेसाठी पुरुषांचं मुंडन करते

वैशाली मोरे
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

सकाळी सातची वेळ असली तरी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाच्या आसपास प्रचंड गर्दी असते. त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या नारायण नागबली, त्रिपिंडी अशा विधींसाठी देशभरातून भाविक आलेले असतात.

कुशावर्ताला लागूनच एक भारत सलून आहे. छोटसं सलून, आत दोन खुर्च्या आणि केस काढायला येणाऱ्या भाविकांची गर्दी.

नारायण नागबली, त्रिपिंडी या विधींसाठी ज्या पुरुषांचे वडील हयात नाहीत त्यांनी केस काढण्याची पद्धत आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर पुरुष आपलं टक्कल करून घेत असतात.

या दृश्यात वेगळं काय म्हणाल तर एकटीच महिला पुरुषांचं मुंडन करत असते. ती महिला म्हणजे वैशाली मोरे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्या पुरुषांचं मुंडन करण्याचं काम करतात. हे काम खरंतर वेगळं आणि धाडसीच म्हणायला हवं, कारण श्राद्धासारख्या विधीमध्ये अजून महिलांनी पूजा करणं लोकांना मान्य नाही, तिथे अशा विधींसाठी पुरुषांचं मुंडन करण्याचं काम त्या करतात.

पण त्यांचे अनुभव मात्र वेगळे आहेत. त्या म्हणतात, "हे काम करायला सुरुवात केली तेव्हापासून अनेक चांगले अनुभव आलेत. अगदी डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतील असे."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"एकदा माझ्या दुकानात एक काका आले होते. त्यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यांनी मला लोकांचे केस काढताना पाहिलं आणि खुर्चीवर बसायच्या आधी, खाली केस पडलेले असताना तिथेच मला साष्टांग नमस्कार घातला."

"मी म्हटलं काका काय करताय? तर म्हणाले, मी परिक्रमा पूर्ण करून सरळ इथे आलो आणि मला साक्षात नर्मदेचं दर्शन झालं. माझी परिक्रमा सफल झाली."

त्या असाच एक दुसरा अनुभव सांगतात.

"एक आजोबा लांबवरून कुठून आले होते, आणि मी त्यांचं मुंडन केल्यावर मला म्हणे, दीदी तुला माहितेय का तू काय करते आहेस? मला वाटलं माझं काहीतरी चुकलं. मी त्यांची माफी मागणार तेवढ्यात म्हणाले की तू खरंतर कालीचं रूप आहेस. तुझ्या हातात शस्त्र म्हणून हा वस्तरा आहे आणि तू त्या शस्त्राने मानवातले दोष दूर करते आहेस. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला."

आज पुरुषांचं मुंडन करण्याचा कामात त्या मुरल्या असल्या तरी या क्षेत्रात अचानकच आल्या. खरंतर परिस्थितीमुळे त्यांना यावं लागलं.

वैशाली एकल पालक आहे. लग्नानंतर नवऱ्याकडून त्रास व्हायला लागल्यावर त्या लहान मुलीला घेऊन माहेरी परत आल्या.

आपलं आणि आपल्या मुलीचं कोणाला ओझं होऊ नये, उलट हातभार लागावा म्हणून त्या वेगवेगळी कामं करत राहिल्या.

आधी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर प्रसादाची गाडी लावली. मग कपडे विकायला सुरुवात केली. पण गल्लोगल्ली कपड्यांची दुकानं झाल्यानंतर तोही व्यवसाय चालेना. आर्थिक विवंचना होतीच, मग एक दिवशी त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पारंपारिक व्यवसायातच भावाला मदत का करू नये?

"मी माझ्या भावाला, गणेशला म्हटलं की मीही हे काम करते. त्याला वाटलं चेष्टाच करतेय. असेच काही दिवस गेले, पैशांचं टेंशन होतंच. मग त्याला रागावून म्हटलं की तू शिकवतोस का मी बाहेर कोणाच्या सलूनमध्ये जाऊन शिकू?"

वैशाली आणि त्यांचे बंधू
फोटो कॅप्शन, वैशाली आणि त्यांचे बंधू

मग वैशालीच्या भावाच्या लक्षात आलं की, त्यांना मनापासून शिकायचं आहे, आणि मग हा भाऊही आपल्या बहिणीच्या मागे समर्थपणे उभा राहिला.

"त्या दिवशी रात्री दुकान बंद केल्यावर त्याने मला बोलवून घेतलं आणि म्हणे तुझ्यासमोर दुसरं कोणी तर बसणार नाहीच, आता माझ्याच डोक्यावर मुंडनाची प्रॅक्टिस कर."

वैशालीच्या भावाने त्यांना वस्ताऱ्यात ब्लेड कसं घालायचं इथपासून, ते साबण कसा लावायचा, वस्तारा कसा फिरवायचा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या भावाच्या डोक्यावरच शिकल्या.

"दर तीन दिवसांनी भावाच्या डोक्यावर नवे केस उगवले की मी त्याचं मुंडन करायचे. असं सात-आठ वेळा झालं. एकदा आमच्या दुकानात एक काशीचे बाबा आले, त्यांना मुंडन करायचं होतं. भावाने मला हाक मारली आणि म्हणाल, आता शिकली आहेस ना, मग कधी करणार काम? भावाने त्या बाबांनाही विचारलं की माझ्या बहिणीने तुमचं मुंडन केलं तर चालेल का? त्यांनी होकार दिला."

पण वैशाली घाबरल्या होत्या.

"आतापर्यंत फक्त भावाच्याच डोक्यावर मुंडन केलेलं. वस्ताऱ्यात ब्लेड घालताना माझा हात थरथरत होता. पण ते पहिलं मुंडन मी कुठेही न कापता, न चुकता व्यवस्थित केलं, त्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही."

वैशाली मोरे

वैशाली यांच्या दुकानात गर्दी असतेच. सतत कोणी ना कोणी येत असतं. त्याचा सराईत हात चालत असतो. इथेच आम्हाला भेटतात अशोक पाटील.

ते नारायण नागबळीसाठी खास अमरावती जिल्ह्यातून आलेत. त्यांना विचारलं कसं काम करतात वैशाली तर पटकन उत्तरतात, "एक नंबर!"

"असं वेगळं काम करायलाच पाहिजे महिलांनी. का करू नये? अर्धे अधिकार महिलांना मिळालेत, मग हे काम पण त्यांनी केलीच पाहिजे," ते पुढे म्हणतात.

येता जाता स्थानिक लोक भेटत असतात, वैशालींचं कौतुक करतात. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष कुशावर्ताहून जाताना भेटतात आणि म्हणतात, "आमची वैशाली जे काम करतेय त्याला तोड नाही."

दिवस हळूहळू वर चढत असतो, पूजेसाठी सकाळी जी गर्दी असते ती थोडी कमी होते. आम्हालाही त्र्यंबकेश्वरच्या खास डाळवड्यांचा आग्रह होतो.

वैशाली म्हणतात, "मला माझ्या कामाचा अभिमान आहे."

आज त्यांची परिस्थिती सुधारली असली तरी वैशालींना आता हे काम सोडावं असं अजिबात वाटत नाही. त्यांना कधी कोणी सल्लाही देतं की आता ब्युटी पार्लरचा कोर्स कर तर त्या म्हणतात, "गल्लोगल्ली ब्युटी पार्लर आहेत. पण मी करतेय ते काम वेगळं आहे."

"आमच्या समाजातले लोक अनेकदा म्हणतात की आम्ही पण आमच्या मुलीला हे काम शिकवणार, तेव्हा खूप बरं वाटतं," त्या निरोप देताना म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)