महिलांच्या हाती पोलीस स्टेशनची धुरा येते तेव्हा...

फोटो स्रोत, Nitesh Raut/bbc
यवतमाळ शहरातील लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण धुरा महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकासह ड्रायव्हर ते बीट अंमलदार अशी सगळी महत्त्वाची जबाबदारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
पोलीस विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी उचलण्यात आलेल्या या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक होतंय. या महिला पोलिसांचा आत्मविश्वासही दुणावल्याचं चित्र आहे.
लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक मधू सराड याबाबत सांगत होत्या, "आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काम करायचो तेव्हा महिलांचं काम दिसून यायचं नाही. पण आता ड्रायव्हरपासून पोलीस निरीक्षकापर्यंत सर्व पदांवर महिला आहेत. सगळी कामं आम्हीच पाहतोय."
तर दुसऱ्या एक पोलीस नाईक संध्या दुर्धवे यांनाही हा बदल एक मोठी संधी असल्याचं वाटतंय. पूर्वी पुरूष सहकारी जे काम करायचे तेच काम आता त्यांना करायला मिळतंय यासाठी त्या आनंदी आहेत.
"पूर्वी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सोपी आणि दुय्यम कामं सोपवली जायची," असं महिला पोलीस म्हणतात. महिला सक्षमीकरण्यासाठी अमरावती पोलीस विभागाने हे पाऊल उचललंय.

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC
जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून पोलीस स्टेशनचा शुभारंभ झालाय. 2020च्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस स्टेशन असेल याची घोषणा केली होती.
त्याचीच अंमलबजावणी म्हणून यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सध्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये 60 महिला कर्मचारी काम करतायत. जवळपास 11 वसाहती आणि 60 हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलीस स्टेशनवर आहे.
सकाळी 11 वाजता पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणनेला सुरूवात होते. त्यावेळी गरजेनुसार सगळ्यांच्या डुटीज लावण्यात येतात. पेट्रोलिंग, ऑफिस कर्मचारी, बिनतारी सेवा, स्टेशन डायरीचा चार्ज योग्यतेनुसार देण्यात येतो.
लोहारा हा परिसर एमआयडीसी आणि झोपडपट्टीने व्यापलेला आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगारी, चोरी, अवैध दारू तसंच सामान्य गुन्हेगारीचं प्रमाण इथे अधिक असल्याचं इथल्या पोलीस सांगतात.
अशा गुन्हेगारांवर अंकुश लावण्यात महिला पोलीस कर्मचारी सक्षम असल्याचं, गुन्हे शाखेच्या रजनीगंधा गेडाम ठामपणे सांगतात.
रजनीगंधा गेडाम 2011 मध्ये पोलीस खात्यात रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी साडेचार वर्षं डीबी (detection branch) पथकात काम केलं. त्यामुळे गुन्हेगार पकडण्यात त्यांचा हातखंडा आहे.

फोटो स्रोत, Nitesh Raut/bbc
"लोहारा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अंमलदार म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यानंतर DB पथक नेमण्यात आलं. तेव्हा तीन महिला पोलीस कर्मचारी मिळून एक DB पथक तयार करण्यात आलं.
"अवैध दारू, चोरी, मटका, भांडण आणि इतर प्रकारच्या गुन्हेगारीवर आमचं तपास पथक धाडी मारतं. गुन्हेगाराचा पूर्व इतिहास तपासून त्या पद्धतीने गुन्हेगाराला हाताळलं जातं. मोठी घटना किंवा गुन्हा असला तर आम्ही इतरांची मदत घेतो," गेडाम सांगतात.
एरव्ही जी कामं पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांना मिळतात ती या निमित्ताने महिला पोलिसांना मिळतायत, असं पोलीस विभागात दांडगा अनुभव असणाऱ्या संध्या दुर्धवे याचं मत आहे.
त्या म्हणतात, "यापूर्वी महत्त्वाची कामं महिलांना कधीच सोपवण्यात आली नव्हती. त्यांना पोलीस खात्यात नोकरी करताना वायरलेस, मेडिकल अशी किरकोळ कामं वाट्याला यायची."
त्या पुढे सांगतात, "किरकोळ कामांमुळे गुन्हांच्या तपासाची सूरूवात कशी असते आणि न्यायालयीन प्रक्रिया काय असते याची माहिती त्यांना नसायची. आता मात्र या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हांचा छडा लावण्यापासून ते न्यायालयात दाखल होण्यापर्यंतची सगळी जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागतेय. त्यामुळे आव्हानात्मक वाटणाऱ्या या कामांमध्ये वेगळा उत्साह आणि तेवढीच चपळता दिसून येते."
महिला असल्यामुळं महिलांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात, असंही त्यांना वाटत.

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC
पोलीस स्टेशनमधील सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे 112 क्रमांकावर येणारी माहिती आणि तक्रारी ऐकणं. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचारी मधू सराड सांगतात, "शहरातल्या कोणत्याही गुन्हांची माहिती सर्वप्रथम डायल 112 वर येते."
"कॉल आल्याबरोबर घटनेच्या ठिकाणी पोहोचायचं असतं. काहीतरी घडण्यापूर्वी त्यावर आळा बसू शकतो. कौटुंबिक हिंसाचार, मुलींची छेडछाड अशा स्वरूपाचे कॉल असतात.
"आाता आम्ही पाहतोय की महिला पोलीस कर्मचारी हे गुन्हे हाताळत असल्याने सामान्य महिलांनाही सुरक्षित असल्याचं वाटतं. अनेक महिला आपुलकीच्या भावनेने आम्हाला फोन करतात."
महिला पोलीस स्टेशन झाल्यानंतर महिलांवरचे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार कमी झालाय, असं निरिक्षण नोंदवत सराड सांगतात, "24 तास आमचं पेट्रोलिंग सुरू असतं, त्यामुळं रोडरोमियोंवर वचक बसलाय."
लोहारा पोलीस स्टेशनचं नेतृत्व पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे करतायत. अवघ्या एका महिन्यात लोहारा परिसरात पोलीस स्टेशनचा दरारा निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
"भारतीय समाज हा पुरुष प्रधान समजला जातो. त्यामुळं एखाद्या पुरुष आरोपीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एक थप्पड जरी मारली तर आरोपीला अपमानास्पद वाटायला लागतं. त्या एका थप्पडची सल आयुष्यभर जात नाही. त्यामुळं आरोपीही अनधिकृत कृत्य करताना विचार करतो. त्यामुळेच आमच्या संपूर्ण महिला कर्मचारी असणाऱ्या लोहारा पोलीस स्टेशनची दहशत निर्माण झाली आहे"

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC
"अनेक महिला ज्या गोष्टी पुरुष अधिकाऱ्यांशी शेयर करू शकत नाही त्या गोष्टी आमच्याशी शेयर करतात. त्यामुळे कारवाई करणं आम्हाला अवघड जात नाही. महिलांना होणाऱ्या त्रासाचं गांभीर्य जाणून ही लगेच कारवाई केली जाते. स्त्रियांना मारहाण करण्याला पुरूषाला लागलीच धडा शिकवतो," भेंडे सांगतात.
पोलीस स्टेशनमध्ये सर्व महिला असल्याने इथलं वातावरणही वेगळं झाल्याचं त्या सांगतात.
"महिलांना घर सांभाळून नोकरी अशी तारेवरची कसरत करावी लागते. इथे सर्व महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये खेळीमेळीचे वातावरण असतं. सर्वजण उस्फुर्तपणे काम करतायत. महिला पुरुषांपेक्षाही चांगली कामगिरी करू शकतात हेच यातून दिसतं."
यवतमाळ पोलिसांनी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याआधी शहरातल्या 4 पोलीस स्टेशन्सची निवड केली होती, असं अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी सांगितलं.
"तीन महिन्यांपूर्वी गृहमंत्री यांच्याशी आढावा बैठक झाली. या बैठकीत महिलांविषयी संवेदनशीलता तसंच शहर मुख्यालय असणाऱ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिला पोलीस स्टेशन असावं, अशी संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार यवतमाळ पोलिसांनी पुढाकार घेऊन शहरातील चार पोलीस स्टेशनपैकी लोहारा पोलीस स्टेशनची निवड केली."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








