लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, मग स्वयंपाकाच्या ऑर्डर घेऊन घर सावरणाऱ्या अमिताची गोष्ट

अमिता
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

7 जुलै 2020 हा दिवस अमिताच्या जसाच्या तसा स्मरणात आहे. अमिताचं एमसीएपर्यंत शिक्षण झालं आहे. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करायची. त्या दिवशी रोजच्या सारखं कामासाठी तिने सिस्टीममध्ये लॉग-इन केलं आणि त्यानंतर तिला एक मेल दिसला.

त्या मेलमध्ये तिच्या काही सिनिअर्ससोबत तिची मिटींग फिक्स केली होती आणि त्यामध्ये तिचे बाकी कुणी सहकारी नव्हते. तो कोरोनाच्या पहिल्या लाटेचा काळ होता. कडक लॉकडाऊन पहिल्यांदाच सगळ्यांनी अनुभवलं होतं.

ठरलेल्या वेळेत अमिताची मिटींग सुरू झाली.

"मिटींगची सुरुवात नॉर्मल हाय, हॅलो ने झाली. ते झाल्यावर माझ्या वरिष्ठांनी मला सांगतिलं की तू उद्यापासून कामावर यायची गरज नाही. पहिले मला कळलंच नाही. मी परत विचारलं की, काय म्हणालात? तेव्हा त्यांना सांगितलं की मंदीमुळे मला कामावरून काढून टाकण्यात येतंय. हे ऐकून मला धक्काच बसला," अमिता पासलकर सांगतात.

अमिता आणि त्यांची आई

नोकरी गेली हे कळल्यानंतर पुढचे दोन तास अमिता खूप रडल्या. अमिता आणि त्यांचे पती मनोहर पासलकर यांनी मिळून एक वर्ष आधीच नवीन घर घेतलं होतं. त्याचा ईएमआय सुरु झाला होता.

तेव्हा अमिता यांचा मुलगा फक्त एक वर्षांचा होता. दोघांचा पगार गृहीत धरुन त्यांनी काही आर्थिक नियोजन केलं होतं. मनोहरसुद्धा आयटी क्षेत्रातच काम करतात.

पण एका झटक्यात नोकरी गेल्याने त्यांचं पुढचं सगळं आर्थिक नियोजन कोलमडलं.

"माझी नोकरी गेल्यामुळे सगळा ताण माझ्या नवऱ्यावर येणार होता. दोघांचा पगार गृहीत धरुन आम्ही काही प्लॅनिंग गेलं होतं. पण ते सगळं एका क्षणात कोलमडलं. अशा स्थितीत काय करावं एकदम सुचत नाही. ती मिटींग झाल्यावर मी काही तास रडले. घरातले सगळे मला समजावत होते की, हा काही शेवट नाहीये. पण सुरुवातीला तो धक्काच तेवढा तीव्र होता. अशा परिस्थितीत पुढचे दोन दिवस गेले," अमिता सांगतात.

पोळी- भाजीच्या डब्यापासून व्यवसायाची सुरुवात

दोन- तीन दिवसांनंतर अमिताने स्वत:ला सावरलं आणि नोकरी गेल्यामुळे खचून न जाता पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला.

"अमिता मला म्हणाली की, आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या ग्रूपमध्ये मेसेज टाका. ज्यांना भाजी-पोळी घरपोच हवी असेल त्यांना मिळेल. मी करुन देते. मी तिचं ऐकलं. तिला स्वयंपाकाची आवड आहेच. मुख्य म्हणजे तिच्या हाताला चव आहे. कोणताही पदार्थ ती मनापासून करते. मी सोसायटी ग्रूपमध्ये मेसेज टाकल्यावर आम्हाला काही ऑर्डर आल्या. तो कोविडचा काळ होता. बहुतांश जणांचं घरुन काम सुरू होतं आणि त्यामुळे तयार डब्याची गरज होतीच," अमिताचे पती मनोहर पासलकर सांगतात.

पुरणपोळी

अशाप्रकारे अमिताने नोकरी गेल्याच्या धक्क्यातून सावरत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याकडे पहिलं पाऊल टाकलं. साधा भाजी-पोळीचा डबा घरपोच मिळेल इथून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली.

याविषयीची ही कल्पना कशी सुचली याबद्दल अमिता सांगतात, "माझी आई आधी मेस चालवायची. त्या कामात लहानपणापासूनच मी आणि माझा भाऊ तिला मदत करायचो. माझ्याकडे कणीक भिजवून पोळ्या करण्याचं काम होतं. शाळा-कॉलेज झालं की मी हे काम करायचे. त्यातून आम्हाला सुट्टी नव्हती.

"त्यामुळे माझ्यात हा आत्मविश्वास होता की, मी भाजी-पोळीचे डबे तर नक्कीच करू शकते. यामुळे जे मला सुचलं त्या गोष्टीपासून मी सुरुवात करायचं ठरवलं. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. मला कोणत्याही कामाची लाज नाही. त्यामुळे मी घरच्या घरी डबे करायला सुरुवात केली."

हळूहळू अमितांकडे डब्यांच्या ऑर्डर वाढत गेल्या. त्यानंतर कोविडची दुसरी लाट आली. तेव्हा अमिता आणि त्यांच्या कुटुंबाकडे सकाळी आणि संध्याकाळी मिळून 40-50 डब्यांची ऑर्डर होती. या दरम्यान त्यांनी होम क्वारंटाईन कोविड रुग्णांनाही डबे पोहोचवले.

पुरणपोळी

डब्यांच्या ऑर्डर घेताघेता सणावाराच्या निमित्ताने निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. जसं की, गणपती-गौरी सणाच्या दरम्यान त्यांनी उकडीचे मोदक, पुरणपोळ्या असे पदार्थही ऑर्डर घेऊन विकायला सुरुवात केली.

त्याला प्रतिसाद वाढत गेला. दिवाळीनिमित्त फराळाचे पदार्थ, संक्रातीला तिळगूळ आणि गुळाची पोळी हे सुद्धा त्यांनी बनवायला सुरुवात केली.

"लॉकडाऊनमध्ये माझ्या बाबांचं काम गेलं. त्यांना ब्रेन स्ट्रोक येऊन गेला. त्यामुळे त्यांचा औषधांचा खर्च होता. माझ्या आईला पण गरज होती. त्यामुळे मग आम्ही दोघी एकत्र आलो. दोघी मिळून पदार्थ बनवायला लागलो. आमच्या उकडीचे मोदक, पुरणपोळी थाळी, चकली, पोह्यांचा चिवडा या गोष्टींना उत्तम प्रतिसाद मिळायला लागला. ग्राहकांनीच एकमेकांना सांगितल्यामुळे आम्हाला ऑर्डर मिळत गेल्या," अमिता सांगतात.

'चूकांमधून शिकत गेले'

'शिवांश फुड्स' या नावाने अमिता आता हा व्यवसाय चालवतात. हा आता त्यांच्या कुटूंबाचा व्यवसाय झालाय. काही पदार्थ त्यांना आणि त्यांच्या आईला आधीपासून उत्तम जमायचे. पण काही पदार्थ मात्र ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना शिकून घ्यावे लागले.

तसंच घरातल्या मोजक्या लोकांसाठी पदार्थ बनवण्याचं प्रमाण वेगळं असतं. तोच पदार्थ कितीतरी पटींनी जास्त बनवण्याची सराव होईपर्यंत त्यांना जास्त मेहनतही करावी लागली.

अमिता आणि त्यांचा मुलगा

"घरी आधी मी दिवाळीत फाराळाचे इतर पदार्थ बनवायचे. पण अनारसे कधी बनवले नव्हते. माझ्या सासूबाई अनारसे करायच्या. नंतर मोजके अनारसे विकत आणून फराळात ठेवायचे. स्वत: कधी बनवले नव्हते. पण आम्ही जेव्हा दिवाळीच्या फराळाची आर्डर घेतली तेव्हा त्यात अनारशांची पण ऑर्डर घेतली. तेव्हा अनारसे कसे करायचे हे मी शिकून घेतलं. घरातल्या मोठ्या बायकांना अनारसे बनवण्याची पद्धत, त्याचं प्रमाण विचारलं आणि ते परफेक्ट जमेपर्यंत करत राहिले. आता माझे अनारसे उत्तम होतात," असं अमिताच्या आई शर्मिला राऊत यांनी सांगितलं.

गणपती दरम्यान पहिल्यांदा उकडीच्या मोदकांची मोठ्या प्रमाणात आर्डर आल्यावर तारांबळ उडण्याचा किस्सा अमितांनी सांगितला.

"आम्हाला शंभर उकडीचे मोदक द्यायचे होते. आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून मोदक बनवायला बसलो. पण ते तुटत होते. 30-40 मोदक झाले पण ते तुटत होते. शेवटी वरच्या आवरणात बदल करुन आम्ही ते कसंबसं मॅनेज केलं. तो पहिला अनुभव होता. आता सराव झाला आहे. शंभर काय दोनशे मोदकांची ऑर्डर आली तरीही टेन्शन येत नाही. ऑर्डरसाठी मी बेकिंगचे पदार्थ जसे की केक, पेस्ट्री, मावा केक, प्लम केक हे पण शिकून घेतलं," असं अमिताने सांगितलं.

परत नोकरी करण्याचा निर्णय

काही महिन्यांपूर्वीच अमिता यांना पुन्हा एका आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मधल्या काळात पुर्णपणे व्यवसायावरच त्यांनी लक्ष्य केंद्रित केलं होतं. पण त्या काळातही नोकरीची योग्य संधी त्या शोधतच होत्या. तशी संधी मिळताच त्यांनी नोकरी स्वीकारली.

पुरणपोळी थाळी

त्याबाबत सांगताना अमिता म्हणतात, "नोकरीमध्ये निश्चित उत्पन्नाची शाश्वती असते. या नोकरीमध्ये आधी वर्क फ्रॉम होम होतं. मला व्यवसाय सांभाळून ते काम करणं शक्य झालं. त्यामुळे मी या पोझिशनवर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आता माझा प्रोजेक्ट बदललाय.

"त्यामुळे आठवड्यातून एक-दोन दिवस ऑफिसमध्ये जावं लागतं. बाकी दिवस वर्क फ्रॉम होम असतं. त्यामुळे सध्या मी नोकरी आणि व्यवसाय सांभाळू शकतेय," असं अमिताने सांगितलं.

नोकरी आणि व्यवसायाची सांगड

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अमिता आणि त्यांच्या कुटुंबाने जोडधंदा सुरू केला खरा, पण ते करताना त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागतो.

वीकडेमध्ये पदार्थांची आर्डर आली तर रोजचं आफिसचं काम सांभाळून ते पदार्थ बनवून, त्याचं पॅकिंग, डिलीवरी या गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात.

अमिता आणि त्यांचं कुटुंब

वीकेंडला आफिसचं काम नसलं तरीही आर्डरचं काम पुरतं. त्यामुळे हे कुटूंब नेहमी कामात व्यग्र असतं.

"माझा मुलगा लहान आहे. सध्या मी त्याला वेळही देऊ शकत नाही. वीकडेमध्ये तो पूर्णवेळ माझ्या आईकडे असतो. वीकेंडला काही आर्डर आली तर परत त्यात वेळ जातो. मी त्याला जेवढा पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. वीकेंडला फिरायला जाणं, मोकळा वेळ घालवणं असं आम्हाला जमत नाही.

"या व्यवसायामुळे घरचे सण, उत्सव धुमधडाक्यात साजरं करणं जमत नाही कारण आमचा वेळ आर्डर पूर्ण करण्यातच जातो. पण मला वाटतं आता मेहनत केली तर त्याचं फळही पुढे चांगलं मिळेलं. हा बिझनेस हेच माझं पॅशन झालंय. त्यामुळे तो वाढवत न्यायचा आहे," असं अमिता सांगतात.

घरच्यांचा सपोर्ट किती महत्त्वाचा?

नोकरी, व्यवसाय, घरातली इतर कामं, लहान मुलगा हे सगळं सांभाळणं कसं जमतं असं विचारल्यावर अमिता म्हणता की, घरच्यांच्या सहकार्याशिवाय या गोष्टी होणं शक्यच नाही.

"मला माझ्या घरचे सपोर्ट करतात. मी आणि आई पदार्थ बनवत असलो की, गरज पडली तर माझा नवरा, भाऊ वडील सगळे त्यात मदत करतात. पॅकिंग आणि डिलीवरी तर माझा नवरा आणि भाऊ बघतो. कधी कधी मला आफिसचं खूप काम असलं की, नवरा घरातली बारिकसारिक कामं जसं की झाडून घेणं, कपडे वाळत घालणं, चहा बनवणं करतो. मला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर स्वयंपाकही करतो. या सपोर्ट शिवाय हे सगळं मॅनेज करणं शक्यच नाही," असं अमिताने सांगितलं.

तिळाचे लाडू

फोटो स्रोत, BBC/NitinNagarkar

अमिता यांचे पती मनोहर पासलकर यांनाही वाटतं की घरातल्या कामांमध्ये सगळ्यांचं योगदान असावं.

"कुण्या एका एकट्या व्यक्तीला सगळीच कामं करणं शक्यच नाही. अमिता आणि त्यांच्या आईची धावपळ, मेहनत आम्हाला दिसते. मला पहिल्या पासूनच घरात मदत करण्याची सवय आहे. त्यामुळे मला जेवढी कामं जमतात तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो," असं मनोहर सांगतात.

व्यवसायाच्या विस्ताराचं स्वप्न

2022 मध्ये या व्यवसायातून अमिता आणि त्यांच्या कुटुंबानं जवळपास अडीच लाख रुपये कमावले. आता व्यवसायाचा आत्मविश्वास आल्याने त्याचा हळूहळू विस्तार करायचं त्यांचं स्वप्न आहे.

"आम्ही काही रिटेल विक्रेत्यांशी बोलतोय. आमचे पदार्थ फक्त सिजनल न राहता वर्षभर कसे पुरवले जातील याचा आम्ही अभ्यास करतोय. एखादी छोटी जागा बघून तिथे मदतीसाठी काही महिला घेतल्या तर हे शक्य होऊ शकेल. पण आमच्या नोकऱ्या आणि बाकी जबाबादाऱ्या सांभाळून हे कसं साध्य करता येईल याचा आम्ही विचार करतोय," असं मनोहर पासलकर यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)