You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांनी अजित पवारांनाच राजकारणात येण्यासाठी का निवडलं होतं?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पुढे जाऊन 'राष्ट्रवादी काँग्रेस'चे 2 तुकडे होणं वगैरे या सगळ्याच्या मुळाशी 'वारसदारी'चा प्रश्न होता, असं विश्लेषण अनेकांनी केलं. पण हा इतिहासही टाळता येण्यासारखा नाही, की जेव्हा 35 वर्षांपूर्वी आपल्या जागी कुटुंबातल्या कोणाला निवडण्याची वेळ आली, तेव्हा शरद पवारांनी 27 वर्षांच्या अजित पवारांना निवडलं होतं.
साल होतं 1991 आणि निवडणूक होती लोकसभेची. शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झाले होते आणि बारामतीचा खासदार कोण हा प्रश्न होता. तोपर्यंत शरद पवारांच्या पिढीतले त्यांच्या कुटुंबातले फक्त ते एकटेच राजकारणात होते. आतापुढच्या पिढीच्या राजकारणातला पवारांचा प्रतिनिधी कोण हे निवडण्याचा प्रश्न होता.
तो प्रश्न तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सोडवला. त्यानंतर पवार काका-पुतण्याचं राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा अध्याय सुरू झाला. त्यानं अनेकदा वेगवेगळी, कधी अतर्क्य वाटावी अशी वळणं घेतली.
अजित पवारांचं राजकारण शरद पवारांनी तयार केलेल्या जमिनीवर वाढत गेलं. एका टप्प्यावर त्यांनी स्वत:चं स्वतंत्र राजकारण उभारायला सुरुवात केली. पक्षामध्ये आणि मतदारांमध्ये त्यांना मानणारा नवा वर्ग त्यांनी तयार केला. स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं.
एका प्रकारे, राजकारणात अपेक्षित असलेले जे व्यक्तिमत्वाचे गुण असतात, ते ओळखून अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण त्या सुरुवातीच्या टप्प्यावर असं काय होतं ज्यामुळे शरद पवारांनी पुढच्या पिढीचा राजकारणातला प्रतिनिधी म्हणून अनेकांमधून अजित पवारांना निवडलं होतं? जाणून घेऊयात.
'आम्हाला सगळ्यांना एकटे अजितदादाच दिसत होते'
शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी विस्तारानं सांगितलं आहे. त्यांच्या आई शारदाबाई पवार या स्वत: राजकारणात होत्याच, पण आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन सगळ्यांना विविध क्षेत्रांमध्ये जाण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. अजित पवारांचे वडील अनंतराव शेती पहायचे, सहकार क्षेत्राशीही त्यांचा संबंध होता.
पण वडिलांच्या अकाली निधनानं तारुण्यात अजित पवारांवर घराची जबाबदारी आली. पण शेती आणि घरचं सगळं बघतांनाही ते त्यांच्या विशीमध्येच हळूहळू घराबाहेरच्या सामाजिक-राजकीय विश्वाकडे वळू लागले होते, असं दिसतं.
1983-84 मध्ये काटेवाटीच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांच्या या अंगाची चुणूक दिसली होती. आपलं पॅनल त्यांनी निवडून आणलं होतं. त्यानंतर 1984 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर ते संचालक म्हणून निवडून गेले होते.
पण त्यांची इच्छा एवढ्या मर्यादित राजकारणातच रहायची होती, असं त्यांचे तेव्हापासून अत्यंत जवळचे सहकारी आणि मित्र असलेले किरण गुजर सांगतात. किरण आजही शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवारांचे घनिष्ठ सहकारी होते आणि त्यांनी अजित पवारांना पूर्णवेळ राजकारणात आणण्यासाठी तेव्हा शिकस्त केली होती.
"सुरुवातीला आपल्या राजकारणात यायचंच नाही यावर ते ठाम होते," किरण गुजर आम्हाला बारामतीच्या 'नटराज' नाट्यगृहातल्या त्यांच्या कार्यालयात बसून आठवणी सांगतात.
"अजित पवार तेव्हा फक्त छत्रपती कारखान्यात संचालक म्हणून काम पाहात होते. बाकी कोणी नव्हतंच. त्यामुळं आम्हाला एकमेव अजितदादाच दिसत होते. आम्ही त्यांना जवळजवळ ओढूनच घेतलं. ते नको म्हणायचे. 'माझे वडील गेले आहेत, कुटुंबाची जबाबदारी आहे, राजकारणाचं काही खरं नाही, शेती करू-धंदा करू' असंच म्हणायचे," गुजर सांगतात.
राजकारणात यावं या हेतूनं नव्हे, पण शरद पवारांनी, जे एव्हाना महाराष्ट्राच्या राजकारणातलं मध्यवर्ती नाव झालं होतं, त्यांनी आपल्या या पुतण्याला हळूहळू काही समांतर कामांमध्ये आणायला सुरुवात केली, असं शरद पवारांचे कॉलेज काळापासून आजतागायत सहकारी असलेले विठ्ठल मणियार सांगतात.
"शरद पवारांनी अगोदर अजित यांना सहकार क्षेत्रामध्ये काम करायला सांगितलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रात हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्यात अजित काही योगदान देऊ शकेल. त्यानंतर मग तो इथल्या साखर कारखान्यावर संचालक झाला. पुढे अध्यक्षही झाला. शरद पवार राजकारणात तर होतेच. त्यांच्यासोबत राहताना अजितला पण सामाजिक कामांची गोडी लागली. साहेबांनाही वाटलं की तो शार्प आहे," मणियार सांगतात.
यानंतरच्या 7-8 वर्षांच्या काळात स्थानिक राजकारणात बऱ्यापैकी कार्यरत झालेले अजित पवार दिसतात.
"दादांना अक्षरश: तयार केलं गेलं. त्यानंतर 1986 ते 1988 ही 2 वर्षं त्यांनी सगळा तालुका पिंजून काढला. गावं पाहिली. तालुक्याची नाडी त्यांनी ओळखली. 1988 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर दादांच्या कामालाही गती मिळाली."
"इथल्या लोकांची कामं घ्यायची आणि मुंबईला जाऊन ती करायची. पवार साहेबांचे पुतणे म्हणून अधिकारीही जरा त्यांना महत्व देत असत. त्यानंतर ते 'पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके'च्या राजकारणात पडले. तोपर्यंत पवार कुटुंबातील कोणीही तिकडे गेलं नव्हतं," किरण गुजर सांगतात जे या सगळ्या घटनांचे साक्षीदार आहेत.
पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
शरद पवारांच्या राजकारणाच्या सीमा दिल्लीपर्यंत वाढत होत्या, त्याच काळात अजित पवारांची ही प्राथमिक तयारी बारामतीत होत होती.
विठ्ठल मणियार सांगतात, "पुढे जाऊन बारामतीचं प्रतिनिधित्व करणं किंवा पुढे जाऊन राज्याच्या राजकारणात अजून काही काम करणं, हे अजित करू शकेल असं त्यांना वाटलं. याच विचारांनी साहेबांनी त्याला पुढे राजकारणात घडवलं. अनेक संधी स्वत:हून अजितला दिल्या."
"अनेकदा 'तुम्ही पुतण्या म्हणून अजितला जास्त संधी देता' असे त्यांच्यावर आरोपही झाले. पण शरद पवारांनी नातीगोती, जातीपाती असं कधीही पाहिलं नाही, असं मला वाटतं. मग तो नात्यातल्या असो वा अन्य कोणी. त्यासाठी साहेबांनी हजारोंना प्रोत्साहन दिलं. नेते घडवले. त्यात अजित जास्त शार्प निघाला. तो पुढे जात राहिला," मणियार नमूद करतात.
पुढे जाण्याचा पहिला टप्पा होता 1991 ची लोकसभा निवडणूक. विधानसभेअगोदरही पहिल्यांदा लोकसभा अजित पवारांनी लढवली. त्या वेळेस शरद पवारांना आपल्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणण्याची गरज निर्माण झाली.
"तेव्हा जाणवत होतं की, आमची तरुण पिढी आणि तेव्हा काम करत असलेली पिढी यांच्यामध्ये जरा दरी निर्माण झाली आहे. शरद पवार देशाचं आणि राज्याचं राजकारण करतांना नव्या पिढीनं बारामतीचं राजकारण करणं गरजेचं होतं," त्या वेळेस बारामती काँग्रेसची जबाबदारी असणाऱ्या किरण गुजरांना आठवतं.
त्यावेळेस या नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं नाव पुढे केलं.
"मग जेव्हा 1991 च्या लोकसभेचा प्रश्न आला तेव्हा आम्ही सगळ्यांनी पुढे होऊन पवार साहेबांकडे अजित पवारांच्या नावाचा आग्रह धरला. तेव्हा त्याला जरा विरोध झाला. पण आम्ही सगळे सहकारी ठाम राहिलो," गुजर पुढे सांगतात.
अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनीही काळापूर्वी एका मुलाखतीत अजित पवारांना राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या पहिल्या संधीबद्दल सांगितलं होतं.
ते म्हणाले होते, "1991 च्या निवडणुकीवेळेस हा प्रश्न होता की, बारामतीची खासदारकी कोणी लढवावी. तेव्हाचं मला जे समजतं त्यानुसार अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आप्पासाहेब पवारांनी ती लढवावी. पण त्यावेळेस आप्पासाहेब आणि पवार साहेब यांच्यात नक्की काय संभाषण झालं हे मला माहीत नाही. पण पवार साहेबांनी त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादांचं नाव दिलं."
"तोपर्यंत अजित पवारांचीही राजकारणात येण्याची सुरुवात झाली होती. शरद पवारांनी काटेवाडीपुरतंच पवारांचं राजकारण न ठेवता ते दिल्लीपर्यंत नेलं होतं. त्यामुळे राजकारणातले सगळे निर्णय तेच घ्यायचे. त्यांनाही अजित पवारांनीच राजकारणात पुढे यावं हा निर्णय योग्य वाटला असावा," राजेंद्र पवार त्या मुलाखतीत सांगतात.
या पहिल्या संधीत अजित पवार निवडून आले. दिल्लीला गेले, पण काही महिन्यांसाठीच. त्यानंतर शरद पवारांना जेव्हा लगेचच दिल्लीला खासदार म्हणून जावं लागलं, तेव्हा ते बारामतीतून खासदार झाले आणि स्वत:ची बारामतीच्या विधानसभेची जागा त्यांनी अजित पवारांनाच दिली.
"जर एकाच पिढीतले दोघे तिघे जण जर राजकारणात आले असते, तर इतर राजकीय कुटुंबांमध्ये जे वाद, वाटावाटी झाली तसं पवार कुटुंबात झालं असतं, असं शरद पवारांना वाटलं असावं. म्हणून तेव्हा फक्त अजित पवारांना त्यांनी पुढे आणलं असावं," राजेंद्र पवारांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं.
राजेंद्र पवारांचे पुत्र आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले रोहित पवार, हे पवार कुटुंबियांच्या नव्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी आहेत.
'साहेबांना वाटलं हाच आपल्या विचारांचा वसा पुढे नेईल'
अजित पवारांचं सुरुवातीलाही आणि नंतरही सगळं राजकारण शरद पवारांच्या मुशीतच तयार झालं. ते विस्तारत गेलं, तरी त्यावर काकांचा प्रभाव स्पष्ट राहिला.
"शरद पवारांनी पुढच्या पिढीचा प्रतिनिधी ठरवतांना हे गुण पाहिले की, कोण आपला सामाजिक आणि राजकीय वसा पुढे नेऊ शकेल. त्यांना ते अजित पवारांमध्ये दिसले. साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशात कार्यकर्ते तयार केले, मग त्यांच्या घरातला कार्यकर्ता नजरेतून कसा सुटेल? पण साहेबांनी काय कर असं सुरुवातीला सांगितलं नाही. त्यांनी अजित पवारांना जे करायचे आहे ते करू दिलं. त्यातून ते अंदाज घेत गेले आणि समजलं की अजितदादा हे करू शकतील," किरण गुजर सांगतात.
अर्थात पुढे राजकारणानं अनेक वळणं घेतली. दोन्ही पवारांचे राजकारणाचे मार्ग वेगळे होईपर्यंत वेळ आली, 2006 मध्ये सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. त्यानंतर कालांतरानं अजित पवारांनाच शरद पवारांचा राजकीय वारसदार समजणाऱ्या महाराष्ट्रात 'वारसदारी' विषयी नव्यानं चर्चा सुरू झाली.
तो प्रश्न अधिकृतरित्या कधीही सुटला नाही. 'दिल्लीत सुप्रिया आणि महाराष्ट्रात अजित' अशी शरद पवारांनी केलेली रचना बराच काळ टिकली. पण अगोदर 2019 आणि नंतर 2023 च्या अजित पवारांच्या बंडानं, वेगळाच रस्ता पकडला.
"एक पॉईंट असा आला की, राजकारणात काही नवीन करायचं असेल, तर काही निर्णय घ्यावे लागतील, असं त्याला वाटलं. त्याबाबतीत शरद पवार आणि अजित पवार यांचे मतभेद झाले. तिथून राजकीयदृष्ट्या त्या दोघांचे विचार वेगवेगळे झाले. पण वैयक्तिक पातळीवर त्यांनी कधी एकमेकांना दुरावा दिला नाही हे मी त्या कुटुंबातला एक जुना सदस्य या नात्यानं विश्वासानं सांगतो. त्यानंतरही अजित जेव्हा मला भेटायचा, बोलायचा तेव्हा हे सतत जाणवायचं की त्याच्या मनात साहेबांबद्दल ओलावा आहे," विठ्ठल मणियार सांगतात.
आता अजित पवारांच्या निधनानंतर हे सगळेच तपशिल इतिहासाचा भाग बनून जातील. राजकारण बदलेल. नवी रचना तयार होईल. पण जेव्हा राजकारणात येण्यासाठी संधी द्यायची होती, तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांना पहिल्यांदा निवडलं होतं, ही नोंद मात्र कायम राहिल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)