मायग्रेनचा त्रास नेमका कशामुळे होतो? खरी कारणे काय आहेत?

    • Author, सोफिया क्वाग्लिया

मायग्रेन ही फक्त डोकेदुखी नाही, तर संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा, गुंतागुंतीचा आजार आहे. वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसणारे मायग्रेनचे अटॅक अनेकदा रहस्यमयी वाटतात.

हळूहळू या गुंतागुंतीच्या आजाराचा शोध लागत आहे आणि भविष्यात मायग्रेनवर प्रभावी उपचार सापडण्याची आशा निर्माण झाली आहे.

मायग्रेन या आजाराबद्दलची (डिसऑर्डर) आपली समज आता हळूहळू बदलू लागली आहे. कोणती गोष्ट लक्षण आहे आणि यासाठी कोणते कारण (ट्रिगर) आहे, याबाबतची जुनी समज बदलत आहे.

तसेच मायग्रेनवर प्रभावी उपचार करण्यासाठी मेंदूचा नेमका कोणता भाग महत्त्वाचा आहे, याचंही नव्याने आकलन होऊ लागलं आहे.

आठवड्यात साधारण दोनदा माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला विचित्र वेदना सुरू होतात. जणू मेंदू आणि कवटीच्या मध्ये जरा जास्त जागा आहे असं वाटू लागतं. डोकं वाकवलं की, ती जागा वेदनेनं भरते. ही वेदना डोळ्याच्या मागे शिरते आणि सुरी खुपसल्यासारखी तिथे रुतून बसते, मग हळूहळू ती जबड्यापर्यंत पसरते.

कधी डोळे बारीक केले की, डोक्याच्या मागे जळजळ होते आणि घंटा वाजल्यासारखं जाणवतं. तर कधी ती वेदना ठोके देत, धडधडत असते, जणू बाहेर पडण्यासाठी दार ठोठावत आहे.

वेदना जास्त वाढू दिल्या आणि उशिरा औषध घेतलं, तर त्या वेदना लवकर कमी होत नाहीत. गोळ्यांचा परिणाम उतरला की, त्रास पुन्हा सुरू होतो. हे मायग्रेन आहे.

जगभरात 1.2 अब्जांहून अधिक लोकांना असा काही ना काही त्रास होतो. हा मेंदूशी संबंधित आजार जगात अपंगत्व येण्याचं दुसरं मोठं कारण आहे. इतका सामान्य आणि त्रासदायक असतानाही मायग्रेन आजही पूर्णपणे समजलेला नाही.

मायग्रेन म्हणजे नेमकं काय आहे, हा त्रास कशामुळे होतो आणि रुग्णांच्या आयुष्यातून तो पूर्णपणे कसा दूर करता येईल, याबाबत अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

"माझ्या मते मायग्रेन हा मेंदूशी संबंधित आजारांपैकीच (न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर) नव्हे, तर एकूणच आजारांपैकी सर्वात कमी समजलेला आजार आहे," असं अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी, डॅलस येथील वर्तणूक आणि मेंदू विज्ञान (बिहेव्हिरल आणि ब्रेन सायन्सेस) विभागाचे अध्यक्ष ग्रेगरी ड्युसर म्हणतात.

आता संशोधक मायग्रेन का होतो हे हळूहळू उलगडू लागले आहेत. अलीकडे तर रुग्णाच्या मेंदूत विद्युत संकेतांच्या (सिग्नल) रूपात मायग्रेन प्रत्यक्ष घडताना पाहणंही शक्य झालं आहे.

जनुके (जीन्स), रक्तवाहिन्या आणि डोक्यात फिरणाऱ्या विविध रासायनिक घटकांचा (मॉलेक्ल्यूलर कॉकटेल) अभ्यास करून शास्त्रज्ञ मायग्रेन का होतो, त्यावर उपचार कसे करता येतील आणि तो फक्त डोकेदुखी नसून संपूर्ण शरीराला प्रभावित करणारा दीर्घकालीन आजार का आहे, हे समजून घेण्याच्या अधिक जवळ पोहोचत आहेत.

'मायग्रेनचा अभ्यास करणं इतकं कठीण का आहे?'

18व्या-19व्या शतकापासून मायग्रेनकडे स्त्रियांची समस्या म्हणून पाहिलं जात होतं. तो फक्त हुशार, आकर्षक आणि सुंदर महिलांनाच होतो आणि त्यांच्यात खास 'मायग्रेन व्यक्तिमत्त्व' असतं, अशी समजूत होती.

मायग्रेनच्या रुग्णांपैकी सुमारे तीन चतुर्थांश महिला असल्या, तरी या अनेक शतकांपासून चालत आलेल्या गैरसमजांमुळे मायग्रेनवरील संशोधन मागे पडलं आणि या आजाराला पुरेसा निधीही मिळाला नाही.

"लोक मायग्रेनला हिस्टेरियाचा आजार समजत होते," असं अमेरिकेतील मियामी युनिव्हर्सिटी हेल्थ सिस्टिममधील डोकेदुखी विभागाच्या प्रमुख टेशामे मॉन्टेथ सांगतात.

आजही फारच थोड्या विद्यापीठांमध्ये मायग्रेनवर संशोधन केंद्रे आहेत आणि इतर काही मेंदूच्या (न्यूरोलॉजिकल) आजारांच्या तुलनेत या विषयात होणारी गुंतवणूक खूपच कमी आहे.

मॉन्टेथ यांच्या मते, मायग्रेनमुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास खूप मोठा आहे. मायग्रेन प्रामुख्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वाधिक काम करण्याच्या वयात म्हणजे साधारण विशी ते पन्नाशीमध्ये होतो. अशावेळी लोकांना कामावरून सुट्टी घ्यावी लागते, नोकरी गमवावी लागू शकते किंवा लवकर निवृत्त व्हावं लागतं.

युकेमधील आकडेवारीनुसार, 44 वर्षीय मायग्रेन रुग्णामुळे सरकारला दरवर्षी 19 हजार 823 पाऊंड (साधारण 2 लाख 51 हजार रुपये) अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्याचा अर्थ असा की, मायग्रेनमुळे दरवर्षी एकूण 12 अब्ज पाऊंड (साधारण 1.518 ट्रिलियन रुपये) सार्वजनिक अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार येतो.

मायग्रेनचा अभ्यास करणं कठीण असण्याचं एक कारण म्हणजे त्याची लक्षणं खूपच विविध प्रकारची असतात.

मायग्रेनचा त्रास होणाऱ्या बहुतेक लोकांप्रमाणे, मीही प्रजनन वयाची म्हणजेच बाळंतपणाच्या वयाची महिला आहे. माझ्या मासिक पाळीच्या दिवसांत या त्रासाचे अटॅक नेहमी येतात.

डोकेदुखी सहसा माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला होते आणि हालचाल केल्यावर ती वाढते. याआधी मला तीव्र वासाची संवेदनशीलता जाणवते आणि कधी कधी डावा खांदा आणि हात बर्फाप्रमाणे गोठल्यासारखा वाटतो.

परंतु, काही रुग्णांना वेगळ्या प्रकारची लक्षणंही जाणवतात, जसं की उलट्या आणि मळमळ, चक्कर येणं, पोटदुखी, प्रकाश आणि आवाजाची वाढलेली संवेदनशीलता. रुग्णांपैकी अर्ध्यांहून अधिकांना खूप थकवा जाणवतो, तर काहींना विशिष्ट अन्न खाण्याची इच्छा होते.

काही लोक सुरुवातीच्या टप्प्यात जास्त जांभई देतात. सुमारे 25 टक्के रुग्णांना वातावरण जणू उजळ किंवा अस्पष्ट प्रकाश किंवा फिल्म कॅमेऱ्याच्या चकाकणाऱ्या प्रकाशासारखे धुसर दिसते.

"मायग्रेनचा अटॅक खूपच गुंतागुंतीचा आहे," असं ड्युसर सांगतात. "ही फक्त डोकेदुखी नाही, डोकेदुखी होण्याआधीच शरीरात अनेक गोष्टी घडू लागतात."

मायग्रेन अटॅक सुरू करणारी कारणंही खूप वेगवेगळी आहेत. कमी झोप आणि उपाशी राहण्यामुळे माझी डोकेदुखी उफाळून येते. तर काही रुग्णांना चॉकलेट, एज्ड चीज, कॉफी किंवा व्हाइट वाईन यामुळे त्रास होतो.

जास्तीत जास्त रुग्णांसाठी ताणतणाव मायग्रेनशी खूप जोडलेला आहे आणि मनोरंजक बाब म्हणजे तणाव कमी झाल्यामुळेही त्रास होऊ शकतो. याच कारणामुळे सहसा वीकेंडला अटॅक येतात.

'कारणं विरुद्ध लक्षणं?'

मायग्रेनवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ खूप काळ विविध कारणांमुळे गोंधळलेले होते, पण आता अनेक अभ्यासातून दिसून येतं की, ही दिसणारी 'कारणं' (ट्रिगर) खऱ्या लक्षणांची सुरुवातीची चिन्हं असू शकतात.

अटॅकच्या सुरुवातीला रुग्णाला काही खास अन्न खाण्याची इच्छा होऊ शकते, जसं की चॉकलेट किंवा चीज. त्यामुळे लोक सहज समजू शकतात की, हे अन्न अटॅकचं कारण आहे, पण प्रत्यक्षात अटॅक आधीच सुरू झालेला असतो, असं न्यूझीलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओटागोच्या फार्माकॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजीच्या प्रोफेसर डेबी हाय सांगतात.

वैयक्तिक अनुभवातून मला नेहमी वाटायचं की, सुगंध (परफ्यूम) हे माझ्या मायग्रेन अटॅकचं कारण असेल. तरीही मी रोज परफ्यूम लावते आणि लक्षात आलं की, अटॅक ज्या दिवशी येतो त्या दिवशीच मी परफ्यूमला दोष देण्याचा प्रयत्न करते. जर अटॅक आला नाही, तर मी माझ्या परफ्यूमकडे लक्षही देत नाही.

"हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, पण कारण कदाचित चुकीचं असू शकतं," असं युकेतील किंग्ज कॉलेज लंडनचे न्यूरॉलॉजीचे प्रा.पीटर गॉड्सबी सांगतात.

"कदाचित अटॅकच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही सुगंधांबाबत जास्त संवेदनशील असता, त्यामुळे तुम्हाला सामान्य वासही जाणवू लागतात."

ज्यांना प्रकाशामुळे अटॅक येतो असं वाटतं, अशा मायग्रेन रुग्णांचे मेंदू गॉडसबी यांनी स्कॅन केले आणि त्यांची तुलना अशा रुग्णांशी केली जे प्रकाशाला दोष देत नाहीत.

फक्त पहिल्या गटात डोळ्यांसाठी जबाबदार मेंदूचा भाग जास्त सक्रिय होता. त्यामुळे त्या वेळेस त्यांना इतरांच्या तुलनेत प्रकाश जास्त जाणवत होता. "नक्कीच, शरीरात काहीतरी घडत आहे," असं गॉड्सबी म्हणतात.

परंतु, शरीरात काय घडतंय याचा शोध घेणं खूप काळापासून चाललेलं आहे.

'मायग्रेनची आनुवंशिक कारणं'

जुळ्या भावंडांवर केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे की, मायग्रेनमध्ये आनुवंशिक घटक महत्त्वाचे आहेत. म्हणजेच, तुमच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना मायग्रेन झाला असेल, तर तुम्हालाही तो होण्याची शक्यता जास्त असते.

ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे जनुकीय तज्ज्ञ डेल नायहोल्ट म्हणतात की, मायग्रेन रुग्णांपैकी अंदाजे 30 ते 60 टक्के लोकांमध्ये वारसातून आलेली जनुके (जीन्स) महत्त्वाची भूमिका बजावतात आणि उर्वरित प्रकरणांमध्ये जीवनशैली, वातावरण आणि वर्तन यांसारखे बाह्य घटक कारणीभूत ठरतात.

ज्या जनुकांमुळे मायग्रेन होतो ते शोधण्यासाठी, नायहोल्ट हजारो लोकांचे जनुके तपासत आहेत. पण हे काम त्यांना वाटत होतं, त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचं आहे, असे ते सांगतात.

2022 मध्ये त्यांनी 1 लाख मायग्रेन रुग्णांची जनुके तपासली आणि त्याची 7.7 लाख अशा लोकांशी तुलना केली, ज्यांना मायग्रेन नाही.

त्यांनी 123 'रिस्क स्निप्स' ओळखले - जे लोकांच्या डीएनए कोडमधील मायग्रेनशी संबंधित लहान फरक होते. आता ते आणखी शोधण्यासाठी 3 लाख मायग्रेन रुग्णांवर आणखी एक चाचणी करत आहेत. त्यांचा अंदाज आहे की, 'कदाचित असे हजारो फरक असतील'.

नायहोल्ट यांच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, मायग्रेनशी संबंधित काही जनुकीय चिन्हे नैराश्य, डायबिटीज आणि मेंदूच्या काही भागांच्या आकाराशी जोडलेली आहेत.

त्यांना वाटतं की, हे जनुकीय गट मेंदूत बदल घडवून वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात. (अजूनही या जनुकांवरून औषध तयार करता येईल, असं ठरवलं गेलेलं नाही.)

'रक्त आणि मेंदू'

बऱ्याच लोकांच्या डोकेदुखीच्या धडधडणाऱ्या स्वरुपामुळे, संशोधकांना वाटायचं की, मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या उघडून जास्त रक्त प्रवाह होत असल्यामुळे मायग्रेन होत असेल.

पण शास्त्रज्ञांना रक्तप्रवाह आणि मायग्रेनचा थेट संबंध सिद्ध करता आला नाही.

ड्युसर म्हणतात, "हे इतकं सोपं नाही. रक्तवाहिन्या फुगवणारी औषध प्रत्येकाला दिली, तरी कोणालाच मायग्रेन होणार नाही."

याचा अर्थ असा नाही की, रक्तवाहिन्यांचा मायग्रेनशी काही संबंध नाही. नायहोल्ट यांच्या अभ्यासात आढळलेली अनेक जनुके अशी आहेत जी, रक्तवाहिन्यांना नियंत्रित करण्यात मदत करतात.

अटॅकच्या वेळी रक्तवाहिन्या असामान्यरित्या फुगतात आणि औषधांनी त्यांना घटवून डोकेदुखी कमी करता येते. त्यामुळे रक्तवाहिन्या अटॅकमध्ये सहभागी असतात, पण त्याचं मुख्य कारण असत नाहीत.

ड्युसर म्हणतात की, हे इतर गोष्टींमुळे होऊ शकतं- जसं की रक्तवाहिन्यांमधील वेदना निर्माण करणाऱ्या रसायनांची अनपेक्षित निर्मिती किंवा रक्तवाहिन्यांकडून मेंदूपर्यंत जाणारे संदेश. किंवा फक्त रक्तवाहिन्यांचं फुगणं हे मायग्रेनचं लक्षण असू शकतं पण कारण नाही.

"मायग्रेन हा न्यूरॉलॉजी आणि मानसिक आजारांच्या दरम्यान आहे," असं गॉड्सबी म्हणतात. त्यांच्या मते, मायग्रेनचा संबंध अटॅक, अपस्मार किंवा स्ट्रोकसारख्या आजारांशी दिसतो.

ते पुढे म्हणतात, "मेंदूच्या केंद्रीय नर्व्हस सिस्टिमशी संबंधित गोष्टी समजून घेण्यासाठी मेंदूच्या पेशी, त्याची रचना आणि न्युरॉन्समधून विद्युत म्हणजे वीज कशी वाहते, हे वेगळं करून तपासणं खूप आव्हानात्मक आहे."

'मेंदूतील लाटांची निर्मिती'

मेंदूमधील मायग्रेनचा मुख्य सिद्धांत असा आहे की, अटॅक म्हणजे मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये हळूहळू पसरणारी असामान्य विद्युत लाट असते. त्याला कॉर्टिकल स्प्रेडिंग डिप्रेशन म्हणतात.

ही लाट मेंदूची कामं थोड्या वेळासाठी थांबवते आणि जवळच्या वेदना निर्माण करणाऱ्या नसा सक्रिय होतात, जे इशारा देतात आणि जळजळ (इन्फ्लॅमेशन) सुरू करतात.

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील न्यूरॉलॉजीचे प्रा. मायकेल मॉस्कोविट्झ म्हणतात की, ही लाट "मेंदूत अनेक त्रासदायक रसायन सोडते."

पण ही विचित्र विद्युत लाट नेमकी का सुरू होते, ती कुठंपर्यंत पसरते आणि त्यामुळे इतकी वेगवेगळी लक्षणं कशी दिसतात, हे अजूनही स्पष्ट नाही. मार्च 2025 मध्ये शास्त्रज्ञांनी एका 32 वर्षांच्या रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी करताना ही लाट प्रत्यक्ष सुरू होताना पाहिली.

कवटीत बसवलेल्या 95 इलेक्ट्रोड्समधून ही लाट टिपली गेली. ती मेंदूच्या दृष्टीसाठी असलेल्या भागातून सुरू झाली. म्हणूनच काही लोकांना प्रकाश जास्त त्रास देतो आणि ऑरा दिसते, असं मॉस्कोविट्झ सांगतात. त्यानंतर ती लाट सुमारे 80 मिनिटं संपूर्ण मेंदूत पसरत राहिली.

मॉस्कोविट्झ सांगतात की, ही विद्युत लाट जशी बदलते, तशी मायग्रेनची लक्षणंही बदलतात. म्हणूनच काही लोकांना फक्त ऑरा दिसतो, काहींना आधी ऑरा आणि नंतर डोकेदुखी होते, तर काहींना आधी डोकेदुखी आणि मग ऑरा दिसतो.

हे सगळं त्या लाटेच्या पॅटर्नवर अवलंबून असतं. हीच लाट मायग्रेनच्या वेळी जाणवणारा थकवा, जास्त जांभया येणं, डोकं जड वाटणं आणि काही विशिष्ट अन्न खाण्याची इच्छा होणे यासारखी इतर लक्षणंही स्पष्ट करते.

फक्त एका रुग्णावर केलेल्या दुसऱ्या अभ्यासात असं दिसून आलं की, मेंदूच्या आत खोलवर असलेला हायपोथॅलॅमस हा छोटा भाग मायग्रेनचा अटॅक येण्याच्या तब्बल एक दिवस आधीच वेगळ्या पद्धतीने सक्रिय होतो.

हायपोथॅलॅमस तणाव आणि झोप-जागरणाच्या चक्राशी संबंधित असतो, आणि ही दोन्ही कारणं मायग्रेनशी जोडलेली असतात. मात्र त्याची नेमकी भूमिका समजण्यासाठी आणखी मोठ्या अभ्यासाची गरज आहे.

महत्त्वाचं म्हणजे मायग्रेनची वेदना ना दृष्टीचा भाग असलेल्या मेंदूतून येते, ना हायपोथॅलॅमसमधून. डोकेदुखी प्रत्यक्षात मेंदूच्या बाहेरच्या आवरणातील नसा, ज्याला मेनिन्जेस म्हणतात- यातून जाणवते.

हे आवरण जाड, जेलीसारखं आणि तीन थरांचं असतं. या नसा ट्रायजेमिनल गँग्लिया नावाच्या जाड नसांच्या समूहाशी जोडलेल्या असतात, जो चेहरा, डोक्याची त्वचा आणि डोळ्यांमधून येणारे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवतो. म्हणूनच मला मायग्रेनचा त्रास डोळ्याच्या मागे सुरू होतो आणि तो जबड्यापर्यंत पसरतो.

म्हणूनच काही शास्त्रज्ञांच्या मते मेंदूभोवती असलेलं हे जाड, चिकट आवरणच (ग्लॉपी सॅक) मायग्रेन समजून घेण्याची खरी किल्ली असू शकते.

'मेनिन्जेसचा प्रवेश'

मेनिन्जेसमध्ये मेंदूचं संरक्षण करणाऱ्या अनेक रोगप्रतिकारक पेशी असतात. या पेशी जास्त सक्रिय झाल्या की त्या काही रसायनं सोडतात, ज्यामुळे सूज निर्माण होते आणि मेनिन्जेसच्या आतल्या बाजूच्या नसा प्रभावित होतात.

ड्युसर आणि इतर शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, या रोगप्रतिकारक पेशींची अतिसक्रिय प्रतिक्रिया मायग्रेनला कारणीभूत ठरू शकते. यामुळेच कदाचित अ‍ॅलर्जिक राइनायटिस किंवा हायफिव्हर असलेल्या लोकांमध्ये मायग्रेन जास्त दिसतो, आणि अ‍ॅलर्जीच्या हंगामात तो अधिक जाणवतो. कारण परागकणांसारखी अ‍ॅलर्जनं या पेशींना सक्रिय करत असावीत.

मेनिन्जेस हे बाहेरील कारणं (ट्रिगर) आणि मेंदूत होणाऱ्या बदलांमधला महत्त्वाचा दुवा असू शकतो, असे आणखी काही संकेत मिळतात. या आवरणावर अशी ठिकाणं असतात जी आम्लतेतील (अॅसिडिटीतील) बदल ओळखू शकतात.

शरीरातील बदल, मेंदूभोवतीची सूज किंवा मेंदूची कामगिरी मंदावणारी चुकीची विद्युत लाट यामुळे ही आम्लता वाढू शकते. मेनिन्जेस जास्त आम्लीय झाली की ही ठिकाणं वेदना देणाऱ्या नसांना विद्युत संकेत (सिग्नल) पाठवतात, आणि मायग्रेनचा अटॅक सुरू होतो.

मेनिन्जेसमधील काही भाग उष्णता आणि थंडीला देखील प्रतिक्रिया देतात. त्यामुळेच काही रुग्णांना बर्फाची पिशवी किंवा गरम पॅक ठेवले की डोकेदुखी कमी झाल्यासारखी वाटते, याचं हे एक कारण असू शकतं.

हार्मोन्समधील बदलही मायग्रेनसाठी कारणीभूत मानले जातात. अनेक रुग्णांना मासिक पाळी सुरू होताना मायग्रेनचे अटॅक येतात. संशोधनात दिसून आलं आहे की, प्रोस्टाग्लँडिन्स नावाची रसायनं मेंदूतील रक्तवाहिन्या फुगण्यावर मोठा परिणाम करू शकतात.

'मायग्रेनमध्ये तयार होणारं रसायनांचं कॉकटेल'

हे सर्व वेगवेगळे घटक कदाचित एकमेकांशी जुळूवून घेऊन काम करतात. सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल फार्माकॉलॉजी केंद्राच्या संचालिका अमिना प्रधान म्हणतात, "माझ्या मते, कदाचित मायग्रेनसाठी एक सामान्य कारण असू शकतं, पण त्यापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये मायग्रेन येण्याचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित होऊन मायग्रेन तयार करतात."

मायग्रेनमध्ये मेंदू कसा बदलतो हे सांगणारा नेमका एक जैविक मार्कर (बायोइंडिकेटर) शोधायचा प्रयत्न अजून सुरू आहे. अलीकडच्या काही मोठ्या शोधांपैकी एक म्हणजे संशोधकांनी सीजीआरपीज नावाच्या न्युरोमॉड्युलेटरचे (लहान प्रोटीन) जास्त प्रमाण ओळखले.

हे प्रोटीन न्युरॉन्सची सक्रियता आणि संवेदनशीलता कमी-जास्त करण्यास मदत करतात, जणू डिमर स्विचसारखे. मायग्रेन अटॅकदरम्यान या प्रोटीनचे प्रमाण जास्त दिसते, पण संशोधनानुसार जे लोक सतत मायग्रेनचा त्रास भोगतात, त्यांच्यात अटॅक नसतानाही हे प्रमाण जास्त असतं, असं गॉड्सबी आणि त्यांच्या टीमला आढळून आलं.

या शोधामुळे सीजीआरपीजवर लक्ष केंद्रित करणारी नवीन औषधे बाजारात आली आहेत. ही औषधे मायग्रेन अटॅक सुरू होण्याआधीच थांबवू शकतात किंवा त्याला प्रतिबंध करू शकतात, आणि यामुळे अनेक रुग्णांना पूर्वीच्या उपायांपेक्षा जास्त आराम मिळाला आहे.

ऑक्टोबर 2025 मध्ये 570 पेक्षा जास्त रुग्णांवर केलेल्या अभ्यासात, सीजीआरपी औषध घेतल्यावर 70 टक्के रुग्णांचे अटॅकचे प्रमाण 75 टक्क्यांनी कमी झाले आणि सुमारे 23 टक्के लोकांमध्ये अटॅक पूर्णपणे बंद झाला.

"जर आपण मायग्रेनसाठी एक जैविक मार्कर (मॉलेक्यूलर मार्कर) शोधू शकलो, तर ते खूप उपयोगी ठरेल. विशेषतः जेव्हा रुग्णांवर उपचार सुरू करतो तेव्हा पाहायचं असतं की, कोण या औषधाला प्रतिसाद देईल आणि कोण नाही," असे मॉन्टेथ म्हणतात.

पण, प्रधान म्हणतात की, रक्तातील सीजीआरपी वाढ मोजली जात असली तरी ती मुख्यतः मेंदूची बाहेरची प्रक्रिया दाखवते. अटकॅच्या वेळी मेंदूमध्ये सीजीआरपीज इतक्या प्रमाणात का दिसतात हे कोणीही नेमके सांगू शकत नाही.

मायग्रेन हा फक्त एक लहान भाग नाही, तर एक मोठ्या कोड्यातील एक तुकडा आहे. मायग्रेनला आता संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा, सततचा आजार मानला जात आहे.

"माझ्या मते, इथे शोध घेण्यासाठी बरीच संधी आहे," असं प्रधान म्हणतात.

हे ऐकून थोडं कठीण वाटतं आणि माझ्या आठवड्याला येणाऱ्या अटॅकचा त्रास अजूनही कमी झालेला नाही. पण यामुळे मला वाटतं की, विज्ञान हळूहळू मायग्रेनचं रहस्य उलगडत आहे. प्रत्येकासाठी एकसारखाच उपाय नसला तरी, वेगवेगळे पर्याय एकत्र येऊन मदत करू शकतात.

प्रधान म्हणाल्या की,"आपण अजूनही मायग्रेनबाबतीत केवळ पायरीवरच पोहोचलो आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)