सोन्याचे दर आणखी किती वाढणार? सोन्यात आता गुंतवणूक करावी का? वाचा

    • Author, रौनक भेडा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं तेजी दिसून येते आहे. सोन्याचा दर 26 जानेवारीला पहिल्यांदाच 5 हजार डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) वर पोहोचला.

त्या दिवशी सोन्याचा दर 4,57,000 रुपये प्रति औंसच्या पातळीवर पोहोचला. म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,61,000 रुपये झाला.

आता तर गुरूवारी (29 जानेवारी) संध्याकाळी सोन्याचा दर 1,79,000 हजार इतका होता.

गुंतवणुकीचा हा पारंपरिक प्रकार अजूनही ट्रेंडमध्ये असल्याचं दिसून येतंय.

सोन्याच्या दरात 2025 मध्ये ऐतिहासिक वाढ दिसून आली होती. त्यावेळेस सोन्याचे दर 60 टक्क्यांहून अधिक वाढले होते. 1979 नंतर सोन्याच्या दरात एवढी मोठी वाढ झालेली दिसून आली होती.

2026 या नवीन वर्षाचा पहिलाच महिना सुरू आहे आणि सोन्याचे दर 17 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांनी सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. सोनं आणि इतर मौल्यवान धातूंना सुरक्षित गुंतवणूक प्रकार मानलं जातं.

आता प्रश्न निर्माण होतो की सोन्यातील ही तेजी आणखी किती काळ राहील, सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे काय कारण आहे आणि सध्या यात गुंतवणूक करणं सुरक्षित आहे का?

सोन्यातील तेजीमागची 3 प्रमुख कारणं कोणती?

सोन्यातील तेजीमागे तसं पाहता अनेक कारणं आहेत आणि ती सर्व एकमेकांशी जोडलेली आहेत.

भू-राजकीय तणावामुळे जगातील अस्थिरतात वाढते आहे. अशा वेळी गुंतवणुकदार जोखीम घेण्याऐवजी पारंपारिक गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करत आहेत. भू-राजकीय तणावामुळेच डॉलरचा वापरदेखील कमी होतो आहे आणि सोन्यावरील अवलंबित्व वाढत आहे.

स्प्रॉट इंक या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे अध्यक्ष रेयान मॅकइंटायर म्हणाले, "भू-राजकीय संघर्ष आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. अमेरिकेन डॉलरवरील अवलंबित्व कमी व्हावं यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका सातत्यानं सोन्याची खरेदी करत आहेत."

सोन्याच्या दरात तेजी येण्यामागे असलेल्या 3 कारणांवर नजर टाकूया -

1. ट्रम्प यांची धोरणं आणि भू-राजकीय तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे शेअर बाजाराला अनेक धक्के बसले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार आता सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करत आहेत. अलीकडेच भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. त्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली. ट्रम्प यांनी इराणच्या सरकारला धमकी दिली आहे. कारण इराणमध्ये आंदोलकांवर हिंसक कारवाई केली जात होती. ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची भूमिकाही मांडली होती.

त्यांनी युरोपियन देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. अर्थात, नंतर ट्रम्प यांनी या मुद्द्यावर माघार घेतली होती. मात्र ट्रम्प यांच्या या अनिश्चित धोरणांमुळे बाजारात अजूनही भीतीचं वातावरण आहे.

शनिवारी (24 जानेवारी) ट्रम्प यांनी कॅनडाला इशारा दिला की, जर कॅनडानं चीनबरोबर कोणताही व्यापारी करार केला, तर अमेरिका कॅनडातून येणाऱ्या मालावर 100 टक्के टॅरिफ लावेल. अर्थात, कॅनडानं नंतर स्पष्ट केलं की त्यांचा असा कोणताही हेतू नाही.

या सर्व घटनांमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगात जेव्हा युद्ध, हल्ला किंवा मोठी राजकीय उलथापालथ किंवा अस्थिरता असते, तेव्हा लोक शेअर बाजार किंवा इतर जोखीम असणाऱ्या गुंतवणूक प्रकारांमधून पैसे काढून ते सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकारात गुंतवतात.

अनिश्चितता आणि भू-राजकीय जोखमीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. त्यामळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात मोठी तेजी आली.

अशाच प्रकारे 2025 मध्येदेखील ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावले होते. तेव्हादेखील गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक प्रकारांकडे म्हणजे 'सेफ हेवन'कडे वळले होते.

'सेफ हेवन' अशा गुंतवणूक प्रकारांना किंवा मालमत्तांना म्हटलं जातं, ज्यात वित्तीय बाजारांमध्ये घसरण झाल्यानंतरही किंमत स्थिर राहते. वाईट परिस्थितीत अनेकदा त्यांच्या किंमतीत वाढ होते. सोनं आणि चांदी हे बाजारातील सेफ हेवन आहेत.

2. मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी

मध्यवर्ती बँका सोन्याची मोठी प्रमाणात खरेदी करत आहेत, हे सोन्यातील तेजीमागच्या सर्वात प्रमुख कारणांपैकी एक आहे. हा ट्रेंड 2022 पासून सातत्यानं वाढला आहे. 2025 मध्ये यात आणखी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला.

मध्यवर्ती बँका (उदाहरणार्थ चीन, पोलंड, तुर्किये, भारत, कझाकस्तान इत्यादी) रिझर्व्ह ॲसेट किंवा राखीव मालमत्ता म्हणून सोन्याचा साठा वाढवत आहेत. अमेरिकेच्या डॉलरचं वर्चस्व कमी होत असल्यामुळे ते असं करत आहेत.

निर्बंध, व्यापार युद्ध आणि जागतिक अस्थैर्यापासून संरक्षण म्हणून सोन्याचा वापर 'विम्या'प्रमाणे केला जातो. भूराजकीय तणावामुळे (रशिया-युक्रेन, पश्चिम आशिया, व्यापार युद्ध) देखील मध्यवर्ती बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

गोल्डमन सॅक्सनुसार, उदयोन्मुख देश दर महिन्याला सरासरी 60 टन सोनं खरेदी करत आहेत. पोलंडच्या मध्यवर्ती बँकेकडे 2025 च्या अखेरीस 550 टन सोनं होतं. आता त्यांचं लक्ष्य हा साठा 700 टन करण्याचं आहे. तिथले गव्हर्नर ॲडम ग्लापिंस्की यांनी या महिन्यात हाच मुद्दा मांडला होता.

पोलंडदेखील सोन्याचा साठा 700 टनांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. चीन तर आधीपासूनच सातत्यानं 14 महिन्यांपासून सोनं खरेदी करतो आहे.

मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात आणि ते 'प्राईस-इंसेंसिटिव्ह' असतात. म्हणजेच ते चढ्या दरानं देखील सोनं खरेदी करतात. यामुळे बाजारातील सोन्याचा पुरवठा कमी पडतो आणि सोन्याचे दर वाढतात.

मध्यवर्ती बँका जेव्हा सोनं खरेदी करतात, तेव्हा खासगी गुंतवणुकदार, ईटीएफ आणि किरकोळ गुंतवणुकदारदेखील तोच ट्रेंड अंमलात आणतात. त्यामुळे मागणीत आणखी वाढ होते.

3. डॉलरचा कमी होणारा वापर

अमेरिकेचा डॉलर जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा सर्वसामान्यपणे सोन्याच्या दरात वाढ होते. त्यामागचं कारण असं की सोन्याची खरेदी-विक्री डॉलरमध्येच केली जाते.

डॉलर कमकुवत झाल्यावर इतर देशाच्या लोकांना सोनं खरेदी करणं स्वस्त पडतं. त्यामुळे ते जास्त प्रमाणात सोनं खरेदी करतात. परिणामी मागणी वाढते आणि सोन्याचे दर वाढतात.

अनेकदा महागाई किंवा आर्थिक अनिश्चततेमुळे डॉलर कमकुवत होतो. अशावेळी लोक सोन्याला सेफ हेवन मानत त्यामध्ये गुंतवणूक करू लागतात.

त्याचबरोबर, डॉलर कमकुवत झाल्यावर अमेरिकेतील व्याजदर देखील कमी होतात. त्यामुळे सोनं बाळगल्यानं कोणतंही नुकसान होत नाही. विश्लेषकांना वाटतं की डॉलरपासून गुंतवणुकदार दूर गेल्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

अमेरिका आणि जपान यांनी मिळून येन (जपानी चलन) ला आधार देण्यासाठी हस्तक्षेप केला. त्यामुळे डॉलरची ताकद कमी झाली. डॉलर कमकुवत झाल्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं स्वस्त होतं. कारण सोन्याची विक्री डॉलरमध्येच होते. त्यामुळे जगभरातील लोक अधिक प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत.

या वर्षी सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल का?

विश्लेषकांना वाटतं की सध्या सोन्याच्या दरात तेजी कायम राहील.

वेगवेगळ्या वृत्तांमधून दिसतं की 2026 मध्ये सोन्याच्या दरात सामान्यपणे तेजीच असणार आहे. भलेही त्यात अधूनमधून काही घसरण होईल.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते सीए सुरिंदर मेहता यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "सोन्याच्या दरात वाढ होण्यामागच्या सर्व कारणांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असं होताच 'सेफ हेवन'कडे धाव घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होईल. यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा आणखी मोठी वाढ पाहायला मिळू शकते."

लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या ताज्या सर्व्हेमध्ये विश्लेषकांना वाटतं की, 2026 मध्ये सोन्याचा भाव 7,150 डॉलरवर देखील जाऊ शकतो.

तर गोल्डमन सॅक्स या आघाडीच्या गुंतवणूक बँकेनं या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचे दर 5,400 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

रॉस नॉर्मन या स्वतंत्र विश्लेषकांनी सरासरी 5,375 डॉलरबरोबर 6,400 डॉलर प्रति औंसचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यांना वाटतं की सध्याचा अनिश्चिततेचा ट्रेंड सुरू राहील. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होणार आहे.

जे. पी. मॉर्गननुसार, सोन्याच्या दरातील तेजी अद्याप संपलेली नाही. अर्थात हा ट्रेंड सरळ नसेल. म्हणजेच सोन्याच्या दरात चढ-उतार होत राहतील. मात्र दीर्घ काळापर्यंत सोनं महाग होण्याचा ट्रेंड कायम राहील. कारण जगभरातील लोक आणि बँका डॉलरऐवजी सोन्याकडे वळत आहेत.

त्यानुसार, 2026 च्या अखेरीपर्यंत सोन्याचे दर 5,000 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पोहोचतील. तर 2026 च्या शेवटच्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सोन्याचे सरासरी दर 5,055 डॉलर प्रति औंस राहू शकतात. तसंच 2027 च्या अखेरीपर्यंत सोन्याच्या दरात वाढ होऊन ते 5,400 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पोहोचू शकतात.

भारतात सोन्याबद्दल काय ट्रेंड आहे?

जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतातदेखील लोक सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अर्थात, सोन्याचे दर वाढल्यामुळे दागिन्यांची खरेदी घटली आहे. दागिन्यांची विक्री जवळपास निम्मी झाली आहे.

सुरिंदर मेहता यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "भारतात दागिन्यांच्या विक्रीत घसरण नोंदवण्यात आली आहे. दागिन्याची विक्री 40 ते 50 टक्के घटली आहे. जर भविष्यातदेखील सोन्याच्या दरात याच प्रकारे वाढ होत राहिली, तर लोकांचं दागिने विकत घेण्याचं प्रमाण कमीच राहील. अर्थात, जर सोन्याचे दर स्थिरावले, तर दागिन्यांच्या बाजारात पुन्हा तेजी येण्याची आशा केली जाऊ शकते."

ते पुढे म्हणाले, "भलेही दागिन्यांच्या खरेदी घट झाली असेल, मात्र सोन्यातील गुंतवणूक मोठी वाढ होते आहे. यात 15 ते 20 टक्क्यांची वाढ दिसते आहे. याच कारणामुळे भविष्यात देखील सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते, अशी लोकांना आशा आहे."

गुंतवणुकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे?

सोन्याच्या दरात तेजी आल्यानंतर त्यातील गुंतवणूक वाढली आहे. भलेही आगामी काही काळापर्यंत सोन्याच्या दरातील तेजी कायम राहील. मात्र गुंतवणुकदारांना सावधगिरी बाळगावी लागेल.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे की, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करू नये. विशेषकरून जेव्हा दर खूप वाढलेले असतील तेव्हा. सोन्यातील गुंतवणूक हळूहळू वाढवणं आणि एकूण गुंतवणुकीचं संतुलन राखणं योग्य ठरतं.

बेलफास्ट विद्यापीठातील आर्थिक इतिहासकार डॉ. फिलिप फ्लायर्स गेल्या वर्षी म्हणाले होते, "सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होते आहे. त्यात गुंतवणूक करणं जोखमीचं ठरू शकतं. जसं सरकारं विचार करून निर्णय घेतील आणि बाजार स्थिर होतील, तसं लोक पुन्हा सोन्यात गुंतवणूक करणं कमी करतील."

त्यांनी सल्ला दिला की सोन्यात गुंतवणूक करताना 'दीर्घकालीन' विचार करूनच गुंतवणूक करावी.

गोल्डमन सॅक्सशी संबंधित डान स्ट्रुवेन म्हणाले होते, "अमेरिकेचा शेअर बाजार सोन्याच्या बाजारापेक्षा जवळपास 200 पट मोठा आहे."

त्याचा अर्थ, जर शेअर बाजार किंवा बाँड मार्केटमधील थोडासा जरी पैसा निघून तो सोन्यात गुंतवला गेला, तर सोन्याच्या छोट्या बाजारात खूप मोठी वाढ दिसून येईल.

वृत्तात पुढे म्हटलं आहे की, "मात्र काहीजण चिंता व्यक्त करत आहेत की सोन्याचे दर इतक्या वेगानं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की आता त्यात फुगवटा निर्माण होतो आहे. हा फुगवटा कधीही फुटू शकतो. म्हणजेच अचानक दरात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.