You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार विमान अपघात : शेवटच्या काही मिनिटांत पायलट आणि ATC मध्ये काय संवाद झाला?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.
बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी (28 जानेवारी) एक निवेदन जारी करून बारामती येथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला आहे.
या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
DGCA ने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी 8:43 वाजता विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही.
याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी 8:44 वाजता, एटीसीला रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या.
निवेदनात असेही नमूद करण्यात आलं आहे की, संपूर्ण घटनाक्रमात महत्वाची बाब म्हणजे अपघातापूर्वी कोणताही 'मेडे' कॉल किंवा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन किंवा संकटाची सूचना एटीसीला देण्यात आली नाही.
या अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे सोपवण्यात आला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
एटीसीची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे त्यानुसार -
28 जानेवारी 2026 रोजी विमान VI-SSK ने सकाळी 8:18 वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला.
यानंतर विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं.
या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाहीये, आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर विमानाने रनवे 11 वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली; मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी 'गो-अराउंड' केला.
'सध्या रनवे दिसत नाही, दिसताच कळवू'
गो-अराउंडनंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता, क्रूने पुन्हा रनवे 11 वर अंतिम अप्रोच घेत असल्याची माहिती दिली.
रनवे दिसल्यास कळवण्यास सांगितले असता, क्रूने "सध्या रनवे दिसत नाही, दिसताच कळवू," असं सांगितलं. काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली.
यानंतर सकाळी 8:43 वाजता विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, क्रूकडून लँडिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
सकाळी 8:44 वाजता, एटीसीला रनवे 11 च्या थ्रेशहोल्डजवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. त्यानंतर तातडीच्या आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या.
कोसळलेल्या विमानाचे अवशेष रनवे 11 च्या थ्रेशहोल्डच्या डाव्या बाजूला आढळून आले.
माहितीनुसार, बारामतीतल्या गोजूबावी गावाजवळचा विमानतळ 1996 पासून वापरात आहे. MIDC ने बांधलेला हा मोठा सुसज्ज विमानतळ नाही, तर याचा वापर लहान विमानांची वाहतूक आणि पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी केला जातो.
ज्या रनवे 11 वर म्हणजे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं, तिथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजे दरीसारखा थोडा खोलगट भाग असल्याचं अपघात स्थळाच्या फोटोंवरूनही दिसून येतं.
अजित पवारांचा अपघात झाला, ते विमान कोणत्या प्रकारचं होतं?
अजित पवार यांच्यासह पाच जणांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान लियरजेट-45 XR प्रकारचं विमान होतं.
लियरजेट 45 कुटुंबातली विमानं कॅनेडियन कंपनी बॅाम्बार्डिएरनं तयार केली आहेत. जगभरातील अनेक कंपन्या चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी ही विमानं वापरतात.
मध्यम आकाराचे लियरजेट-45 XR विमान बिझनेस जेट म्हणूनही ओळखले जाते. त्यात दोन हनीवेल TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. या विमानातून एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात.
हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण 2,235 नॉटिकल मैलांपर्यंत, म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं.
छोट्या धावपट्टीवरही उतरण्याची क्षमता असल्यानं भारतात खासगी चार्टर विमानसेवा या विमानाचा प्रामुख्यानं वापर करतात.
बारामतीत कोसळलेलं विमान नवी दिल्लीस्थित VSR एव्हिएशन या खासगी एयरलाईनच्या सेवेत होतं. 2010 पासून म्हणजे सोळा वर्ष हे विमान कार्यरत होते.
याआधी 2023 साली मुंबई विमानतळावर VSR कंपनीच्याच VT-DBL या लिअरजेट 45XR प्रकारच्याच विमानाला अपघात झाला होता. 14 सप्टेंबर 2023 रोजी मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबलटीमध्ये उतरताना ते विमान रनवेवरून घसरून तुटलं होतं, पण आठही प्रवाशांचा जीव वाचवण्यात तेव्हा यश आलं होतं.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीच्या दाखल झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही मुंबईतून बारामतीला पोहोचले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते बारामतीच्या दिशेने येत आहेत. अजित पवार यांचं पार्थिव रात्री उशिरापर्यंत बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलं होतं.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच आज शासकीय सुटी जाहीर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
अजित पवार यांच्यावर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)