You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार, नेते आणि कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली
अजित पवार यांचं काल सकाळी ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. आज सकाळी 9.50 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस काटेवाडी येथून सुरुवात झाली. थोड्याचवेळात त्यांचे पार्थिव बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 11 वाजता अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सर्व पवार कुटुंबीय, मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य बारामतीमध्ये उपस्थित आहेत.
काल बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला.
या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप दिलीप जाधव यांना त्यांच्या मूळ गावी सातारा येथे काल रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला.
मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे ते रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच त्यांची पत्नी, मुलगी , आई आणि मुलगा असे संपूर्ण कुटुंब विटाव्यातून बारामतीकडे रवाना झाले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीच्या दाखल झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही मुंबईतून बारामतीला पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बारामती येथे धाव घेत पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच काल शासकीय सुटी जाहीर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काल (28 जानेवारी) दिवसभरातील घडामोडी तुम्हाला इथे वाचता येतील.
आज सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
अजित पवारांच्या अपघातामागील 'राजकारणावर' शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, "अजित पवार यांचा अकाली मृत्यू हा प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज पोरका झाला. जे काही नुकसान झालं ते भरून निघणारं नाही पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात."
"मी आज मीडियासमोर येणार नव्हतो परंतु या अपघातामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कोलकत्त्यामधून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सर्वांना आहे, याच्यात राजकारण आणू नये हेच मला सांगायचं आहे," असं पवार म्हणाले.
दिलदार मित्र सोडून गेला : देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. राज्याचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालं असं ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले, "अतिशय अनाकलनीय परिस्थितीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित दादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची, प्रश्नांची जाण असलेला नेता होता. जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती.
अजितदादा एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस. असं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षं जातात. ज्यावेळेस ते राज्याच्या विकासात महत्त्वाचं योगदान देत होते अशाच काळात त्यांचं जाणं अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणार आहे. माझा एक दिलदार, दमदार मित्र सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावरही हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघत आहोत."
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करून मी संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ पसरली आहे. पुढच्या गोष्टी कुटुंबीयांशी चर्चा करून ठरवण्यात येतील. संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्यात येतील. आम्ही इतक्या जवळून, एवढ्या संघर्षाच्या काळात एकत्र काम केलेलं आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)