You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांसोबत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि सुरक्षा रक्षक विदीप जाधव कोण होते?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"माझ्या मुलीला मॉडलिंगची आवड होती, पण तिने या क्षेत्रात जाण्यासाठी मी हट्ट केला, आज असं वाटतंय का केलं? आमचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे."
ही प्रतिक्रिया बारामती विमान अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी यांच्या वडिलांची आहे.
29 वर्षाच्या पिंकी माळी या फ्लाईट अटेंडंटचा या अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह या विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, फ्लाईट अटेंडंट आणि दोन पायलट्सचा समावेश होता अशी माहिती नागरी विमान उड्डाण नियामकने दिली आहे.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातामुळे देशभर शोक व्यक्त केला जातोय. त्यातच मुंबईत वरळी येथे पिंकी माळी यांच्या घरात आणि ठाणे विटावा येथे राहणारे अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या भागात शोक व्यक्त केला जात आहे.
कोण होत्या पिंकी माळी?
पिंकी माळी या 29 वर्षाच्या होत्या. गेल्या सहा वर्षापासून त्या फ्लाईंग क्षेत्रामध्ये काम करत होत्या. गेल्या वर्षभरापासून या व्हीएसआर कंपनीमध्ये त्या कार्यरत होत्या. तर यापूर्वी ती सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत होती.
त्या मूळच्या उत्तर प्रदेश जौनपूरच्या होत्या. मात्र गेले तीन पिढ्या माळी कुटुंबीय मुंबईत वरळी सेंचुरी मिल परिसरामध्ये वास्तव्यास होते.
दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सध्या पतीसह त्या ठाण्यात राहत होत्या. वरळी येथील आई-वडिलांच्या घरी येऊन जाऊन असत. त्यांच्या पश्चात पती, वडील शिवकुमार माळी, आई आणि एक लहान भाऊ आहे.
पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. तसेच वडील सामाजिक क्षेत्रात काम करत व्यवसाय करतात. वडील पूर्वी दिल्ली एअरपोर्टवर काम करायचे मात्र त्यांना काहीं कारणाने कामावरून काढलं. तेव्हापासून घरच्यांची इच्छा होती मुलीने या क्षेत्रात काम करावं. सर्वांच्या इच्छेखातर तिने हे क्षेत्र निवडलं. मात्र पिंकीला मॉडलिंगची देखील खूप आवड होती असे कुटुंबीय सांगतात.
मुलीच्या या अपघातानंतर बीबीसी मराठीशी बोलताना पिंकीचे वडील शिवकुमार माळी म्हणाले की, काल जाण्यापूर्वी मुलीने सांगितलं की अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये मी जात आहे, तिथून मी नांदेडला जाणार आहे. सकाळी आम्ही बातम्या लावल्या तेव्हा कळलं अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. तेव्हा हाता-पायांना मुंग्या आल्या. पुढे पाहिलं तर पिंकी माळी यांचा मृत्यू झाल्याचं कळलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आमचं सगळं गेलं."
पुढे ते म्हणाले की , "ती खूप चांगली होती. तिला मॉडेलिंगची आवड होती. मात्र मला वाटत होतं तिने या फ्लाईंग क्षेत्रामध्ये जावं. त्यामुळे मी हट्ट केला तिने हे क्षेत्र निवडावं. पण आज असं वाटतंय की का केलं, तिच्या जाण्याने खूप मोठे आमच्या कुटुंबीयाची हानी झाली आहे. सर्व कुटुंबीय धक्क्यात आहेत."
विदीप जाधव कोण?
बारामती विमान अपघातात मूळचे साताऱ्याचे असलेले पोलीस विदीप जाधव यांचाही यात मृत्यू झाला. विदीप हे 2009 पासून मुंबई पोलिसात सेवेत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार होता.
ते ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहत होते. गेले काही वर्ष अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावलीसारखे नेहमी त्यांच्यासोबत असायचे. एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्यासुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत.
ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब ठाण्यातील त्यांच्या विटावा येथील घरात होते. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहेत अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
विदीप जाधव यांच्याबद्दल त्यांचे शेजारी श्रुती वाडीकर म्हणाल्या की, "आम्ही गेल्यात 27 वर्षापासून येथे राहतो, जाधव कुटुंबीय आणि आमचे खूप चांगले संबंध गेल्या अनेक वर्षांपासून होते. विदीपदादा खूप चांगला आणि मनमिळाऊ होता. तो पोलिसांत असतानाही सर्वांशी चांगलं आणि सन्मानाने वागायचा. मी आजच सकाळी त्यांना पहाटे जाताना पाहिलं. अचानक दोन तासात अशी बातमी ऐकायला होईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं."
तर शेजारीच राहणारे चंद्रकांत सहाने 22 वर्षापासून त्यांच्या संपर्कात होते. सहाने म्हणाले की, "त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. कधीही कोणाशी भांडण तंटा नाही. असा दुर्दैवी प्रसंग कोणावरही येऊ नये. त्यांच्या जाण्याने खूप दुःख आम्हाला झालं आहे. त्यांची दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाटते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)