वजन कमी करण्याच्या नादात जीव गेला, यूट्यूबवर पाहून घेतलेल्या औषधामुळे तरुणीचा मृत्यू

    • Author, झेवियर सेल्वाकुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वजन कमी करण्यासाठी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने यूट्यूबवर पाहून औषध घेतलं आणि दुर्दैवाने त्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे औषधं घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

तामिळनाडूतील मदुराई येथे वजन कमी करण्यासाठी यूट्यूबवरील एका चॅनेलवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून एका कॉलेज विद्यार्थिनीने स्थानिक मेडिकल दुकानातून बोरॅक्स घेतलं होतं. त्याचं सेवन केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अभ्यासकांच्या मते, पांढरं शिसं हा विषारी पदार्थ आहे आणि औषध बनवताना त्याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो.

रसायनशास्त्राचे प्राध्यापक सांगतात की, सोडियम बोरेट म्हणजेच बोरॅक्स हे एक रसायन असून, त्यात कीटकनाशकासारखेच विष असते.

या घटनेनंतर वैद्यकीय उपचारांबाबत असे भ्रामक सल्ले देणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्याची मागणी वैद्यकीय व्यावसायिकांनी सरकारकडे केली आहे.

मदुराईतील या तरुणीने खाल्लेल्या पदार्थाला इंग्रजीत 'बोरॅक्स' म्हणतात. त्याचा नेमका परिणाम काय आहे? तो खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी तमिळने विविध तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.

'युट्यूब पाहून खरेदी नंतर सेवन'

तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील सेलूर भागातील मीनांबलापूरम येथे राहणारी कलैयर्सी एका खासगी कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, "वाढलेलं वजन कमी करण्यासाठी यूट्यूबवरील सल्ल्यावर विश्वास ठेवून कलैयर्सीने स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केलं होतं. नंतर तिने त्याचं सेवन केलं."

ते खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला सतत उलट्या होऊ लागल्या आणि ती बेशुद्ध झाली. तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचार करून नंतर तिला घरी पाठवलं गेलं.

रात्री तिची प्रकृती पुन्हा खालावली. त्यानंतर तिला मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयात नेत असताना, वाटेतच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सेलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

त्या तरुणीने स्थानिक मेडिकल दुकानातून बोरॅक्स विकत घेऊन खाल्लं होतं, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

कलैयर्सीने यूट्यूबवरील एक व्हीडिओ पाहिल्यानंतर बोरॅक्स विकत घेऊन त्याचं सेवन केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

यूट्यूब चॅनेल पाहून स्वतःच मेडिकल दुकानातून औषधं खरेदी करू नये यासाठी मी सतत तिला सांगत होतो, रोखत होतो, असं कलैयर्सीचे वडील वेलमुरुगन यांनी माध्यमांना सांगितलं.

'बोरॅक्स म्हणजे काय?'

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही पावडर आहे, जी आपण कॅरम बोर्डवर वापरतो, असं कोईम्बत्तूर येथील भरथियार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक सेल्वराज सांगतात.

बीबीसी तमिळशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "हा पदार्थ अगदी बारीक मिठासारखा असतो. साधारणपणे तो फक्त चेहऱ्यावर लावायच्या पावडरमध्ये (फेस पावडर) फारच कमी प्रमाणात वापरला जातो."

ते इशारा देत म्हणाले की, "आपल्या औषधांमध्येही झिंक असतं पण ते फार कमी प्रमाणातच असतं. पण जर ते झिंक थेट खाल्लं गेलं, तर त्याचा परिणाम ब्लीच खाल्ल्यासारखाच होतो."

त्यांच्या मते, ही पावडर म्हणजे सोडियम बोरेट नावाचा रासायनिक पदार्थ आहे, ज्याला बोली भाषेत बोरॅक्स म्हणतात. पण 'हा पदार्थ खाण्यायोग्य नसतो,' असं त्यांनी सांगितलं.

प्रा. सेल्वराज म्हणाले, "हा फक्त शुद्धीकरणासाठी कच्च्या मालासारखा वापरला जाऊ शकतो, थेट खाण्यास तो योग्य नाही. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक कीटकनाशकासारखा रासायनिक पदार्थ आहे."

बोरॅक्स पावडरचा वापर काही औषधं तयार करण्यासाठी केला जातो, असं डॉ. के. शिवरामन यांनी सांगितलं.

बीबीसी तमिळशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "हा फक्त तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी बाह्य औषध म्हणून वापरला जातो." पण याचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जात नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं.

गोळ्या खाल्ल्याने वजन कमी होत नाही; वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि योग्य आहारच योग्य मार्ग आहे, असं के शिवरामन यांनी ठामपणे सांगितलं.

डॉ. वीरबाबू यांनी इशारा दिला की, "काही औषधांमध्ये बोरॅक्स फारच कमी प्रमाणात असतं, पण ते थेट औषध म्हणून दिलं जात नाही. योग्य प्रकारे शुद्ध न केल्यास त्याचा वापर करणं खूपच धोकादायक ठरतं."

डॉ. वीरबाबू म्हणतात की, बोरॅक्स हा एक विषारी पदार्थ आहे आणि तो शरीरासाठी घातक आहे.

त्यांनी असंही सांगितलं की, "साधारणपणे हा पदार्थ तोंड आणि दातांच्या संसर्गासाठी किंवा तोंडाच्या अल्सरसाठी फारच कमी प्रमाणात दिला जातो. पण ते कोणत्याही प्रकारे वजन कमी करण्यासाठी वापरायचं औषध नाही."

'शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?'

गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट आणि लेप्रोस्कोपिक सर्जन व्ही.जी.मोहन प्रसाद म्हणतात की, बोरॅक्स फार कमी प्रमाणात खाल्ल्यास कोणतीही हानी होत नाही.

ते म्हणाले, "जर शुद्ध केलेली (प्युरिफाइड) बोरॅक्स पावडर फार कमी प्रमाणात घेतली तर काही त्रास होत नाही. पण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने जास्त प्रमाणात त्याचं सेवन केल्यास, त्याचा विषारी परिणाम शरीरातील अवयवांवर झपाट्याने होतो आणि गंभीर नुकसान होतं.

उलटी, जुलाब, काही लोकांना फीट्स देखील येऊ शकतात. उशीर झाला तर त्या व्यक्तीला वाचवणं कठीण होतं."

ते म्हणाले की, "जर एखाद्याने चुकून बोरॅक्स खाल्लं, तर त्याला एका तासाच्या आत रुग्णालयात न्यावं. वेगळी ट्यूब घालून पोटातील विष काढून त्याचा जीव वाचवता येऊ शकतो."

त्यांनी पुढे इशारा देत सांगितलं की, "बोरॅक्सच्या विषामुळे शरीरातील अवयव प्रभावित होतात. त्वरीत उपचार न केल्यास काही वेळात किडनी फेल होऊ शकते आणि रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. वेळेत उपचार मिळाले तर विष बाहेर काढता येऊ शकते."

सध्या लोक यूट्यूब पाहून स्वतःहून औषधं घेणं आणि उपचार करण्याचं प्रमाण वाढलं आहे, असं अॅलोपॅथी आणि सिद्ध पद्धतीचे डॉक्टर सांगतात.

सिद्ध डॉक्टर वीरबाबू म्हणाले, "शिक्षण आणि संशोधन न करता काही लोक स्वतःला निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणवत यूट्यूबवर कुठलीही गोष्ट औषध किंवा आहार म्हणून सुचवत आहेत.

सरकारने यावर नियंत्रण ठेवावं, आणि लोकांनी अशा पोस्टबद्दल सावध आणि जागरूक राहण्याची गरज आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)