6 गावांमधील 354 कुत्र्यांची हत्या, आतापर्यंत 9 जणांना अटक; पोलीस तपास करत असलेलं प्रकरण काय?

    • Author, बल्ला सतीश
    • Role, हैदराबाद
    • Author, अभिषेक डे
    • Role, गुवाहाटी

तेलंगणात गेल्या महिन्यात किमान 6 गावांमध्ये शेकडो भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्यावर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत किमान 354 भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. तसंच त्यांनी काही प्रकरणांमध्ये 9 जणांना अटक केली आहे.

प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बीबीसीला सांगितलं की, या भटक्या कुत्र्यांना एकतर विष देण्यात आलं होतं किंवा त्यांना प्राणघातक इंजेक्शन देण्यात आलं.

मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की, मृत्यू नेमक्या कोणत्या पद्धतीनं झाला आहे, हे निश्चित करण्यासाठी ते फॉरेन्सिक अहवालांची वाट पाहत आहेत.

गावकऱ्यांनी सांगितलं की, अलीकडेच झालेल्या स्थानिक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी भटके कुत्रे आणि माकडांपासून सुटका करण्याचं आश्वासन दिलं होतं. या हत्यांचा संबंध त्याच्याशी आहे.

भारतातील भटक्या प्राण्यांची समस्या

भारतात भटक्या प्राण्यांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना आणि सर्वोच्च न्यायालयात दिल्लीसह शहरांमधील रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांचं निर्मूलन कसं करावं, याबद्दलच्या याचिकांवर सुनावणी होत असताना, या हत्या झाल्या आहेत.

मात्र भटक्या कुत्र्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्या होणं ही दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

भारताच्या अनेक भागांमध्ये भटके प्राणी ही एक नेहमीची समस्या मानली जाते. भटक्या प्राण्यांमध्ये मुख्यत: कुत्र्यांचा समावेश असतो. मात्र त्यात गुरं आणि माकडदेखील आहेत.

भटक्या प्राण्यांना लोकांवर हल्ला करणं, पिकांचं नुकसान करणं आणि वाहतुकीतील अपघात यासाठी अनेकदा दोष दिला जातो.

या समस्येसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. यात नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रमांमधील त्रुटी, कचऱ्याचा ढीग साठणं, प्राण्यांना तसंच सोडून देणं, जंगलामधील नैसर्गिक अधिवास कमी होणं आणि अगदी कायद्यांची असमानरित्या अंमलबजावणी होणं, यासारखे घटक आहेत.

विशेषकरून भटके कुत्रे हे दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहेत. त्यांचं स्थानिक समुदायांशी घट्ट नातं तयार झालं आहे. भटक्या कुत्र्यांवरील क्रौर्याबद्दल प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे.

हे रोखण्यासाठी देशात यासंदर्भात पुरेशी कठोर शिक्षा, त्यासाठीचे कायदे नाहीत, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा भटक्या कुत्र्यांसंदर्भातील आदेश

तेलंगणातील मंत्री दानासारी अनसूया सीतक्का यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्राला सांगितलं की, या हत्या 'बेकायदेशीर' आणि 'अमानवी' आहेत. त्यांनी इशारा दिला की, जे या हत्यांसाठी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

भटक्या कुत्र्यांना कसं हाताळावं, या मुद्द्यावर देखील सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे.

ऑगस्ट 2025 मध्ये न्यायालयानं दिल्ली आणि दिल्लीच्या उपनगरांमधील अधिकाऱ्यांना आदेश दिला होता की, 2 महिन्यांमध्ये रस्त्यांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना प्राण्यांसाठीच्या निवाऱ्यामध्ये हलवण्यात यावं.

याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाल्यानंतर, न्यायालयानं आदेशात बदल करून, या प्राण्यांना त्यांच्या परिसरात परत सोडण्यापूर्वी त्यांचं लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश दिले होते.

प्राणी कल्याण गटांचा युक्तिवाद आहे की, आधीच अतिरिक्त भार असलेल्या प्राणी निवाऱ्यांमध्ये कुत्र्यांना ठेवणं अवैज्ञानिक आहे.

दुसरीकडे ज्या लोकांना वाटतं की, भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांहून हलवण्यात यावं, त्यांची मागणी आहे की, भटक्या कुत्र्यांच्या अनियंत्रित लोकसंख्येमुळे लोकांच्या जीविताला आणि उदरनिर्वाहाला धोका निर्माण होतो आहे.

तेलंगणात कुठे आणि किती कुत्र्यांच्या हत्या झाल्या?

तेलंगणात भटक्या कुत्र्यांच्या हत्या 3 जिल्ह्यांमध्ये झाल्या. त्या डिसेंबरच्या अखेरीपासून ते जानेवारीच्या मध्यादरम्यानच्या कालावधीत घडल्या.

पोलिसांचं म्हणणं आहे की, प्रत्येक ठिकाणी या हत्या अनेक दिवसांच्या कालावधीत झाल्या असाव्यात.

पोलीस उपनिरीक्षक, एस अनिल यांनी बीबीसीला सांगितलं की, कामारेड्डी जिल्ह्यात, "244 कुत्र्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना 4 ठिकाणी पुरण्यात आलं."

एस. अनिल म्हणाले, "सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत."

ते पुढे म्हणाले की, 3 गावांमधील सरपंचांचा यात सहभाग असल्याचं आढळून आलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, तेलंगणातील वारंगल शहराजवळच्या शायमपेट आणि अरेपल्ली या गावांमध्ये 110 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक जे परमेश्वर यांनी बीबीसीला सांगितलं की, गावच्या सरपंचांसह 9 जणांना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे.

जगतियाल शहरात, 28 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला जवळपास 40 कुत्र्यांची हत्या झाल्याच्या तक्रारीचा पोलीस तपास करत आहेत. मात्र यापैकी एकाचाही मृतदेह सापडलेला नाही.

मंत्री सीतक्का यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्राला सांगितलं की, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली त्यांची हत्या करणं, हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरवता येणार नाही.

त्यांनी पुढे सांगितलं की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारनं सर्व ग्रामपंचायतींना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, आतापर्यंत पोलिसांनी पुष्टी केलेल्या संख्येपेक्षा मारण्यात आलेल्या कुत्र्यांची संख्या खूप जास्त आहे.

काहीजणांकडून भटक्या कुत्र्यांच्या हत्येचं समर्थन

काही रहिवाशांनी मात्र या हत्यांचं समर्थन केलं आहे.

राजू (ही व्यक्ती याच पहिल्या नावानं ओळखली जाते) अरेपल्ली गावच्या सरपंचाचे पुत्र आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, फक्त पिसाळलेल्या कुत्र्यांनाच मारण्यात आलं आहे.

त्यांनी सांगितलं की, हे कुत्रे आजारी होते, आक्रमक झालेले होते आणि त्यांच्यामुळे अनेक रस्ते अपघात झाले होते आणि गंभीर दुखापती झाल्या होत्या.

आणखी एक रहिवासी, विजय (हे त्यांच्या पहिल्या नावानंच ओळखले जातात) म्हणाले की, कुत्र्यांनी चावण्याची आणि त्यातून आजार होण्याची भीती वाटत असल्यामुळे बहुतांश गावकऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

केंद्र सरकारच्या नोंदीनुसार, तेलंगणात 2024 मध्ये कुत्रा चावल्याच्या जवळपास 1 लाख 22 हजार घटनांची नोंद झाली. मात्र याच कालावधीत कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्यामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

तेलंगणात भटक्या प्राण्यांशी संबंधित इतर कथित घटनांच्याच वेळेस कुत्र्यांच्या हत्या होण्याच्या घटना घडल्या आहेत.

यात टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्ताचाही समावेश आहे. या वृत्तानुसार, कामारेड्डी जिल्ह्यात महामार्गाजवळ अनेक माकडांना कथितरित्या बेशुद्ध केल्यानंतर मृत किंवा गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)