You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CA Vs CS: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरीमध्ये काय फरक आहे?
- Author, प्रियांका झा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बारावी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे हा प्रश्न वारंवार उभा राहतो की, चार्टर्ड अकाउंटंट (CA) व्हायचं की कंपनी सेक्रेटरी (CS). करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर हा निर्णय महत्त्वाचा ठरतो, कारण या दोन्ही क्षेत्रांची कामाची दिशा आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत.
पण मग CA आणि CS ही क्षेत्रं नेमकी काय आहेत आणि त्यांच्यात फरक तरी काय? तर या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे.
चार्टर्ड अकाउंटंट प्रामुख्याने बिझनेस आणि फायनान्स क्षेत्रात काम करतात. कंपनीचे आर्थिक व्यवहार सुरळीत चालले आहेत का, लेखापरीक्षण (ऑडिटिंग) योग्य पद्धतीने होतात का, कररचना आणि करभरणा (टॅक्सेशन) नियमानुसार आहे का? या सगळ्या जबाबदाऱ्या CA सांभाळतात.
त्याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंट आणि जनरल मॅनेजमेंटमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणूनच, CA हे कोणत्याही व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारे महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जातात.
दुसरीकडे, कंपनी सेक्रेटरी हे सीनियर मॅनेजमेंटमधील पद आहे. ते कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असते. हे पद बोर्ड, शेअरहोल्डर्स आणि रेग्युलेटर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.
कायदेशीर चौकटीनुसार गोष्टी होतील हे सुनिश्चित करणे, स्टॅट्युटरी रेकॉर्ड मॅनेज करणे आणि बेस्ट प्रॅक्टिसबाबतचा सल्ला देणे ही यांची जबाबदारी आहे.
आज आपण कंपनी सेक्रेटरीबद्दल जाणून घेऊया.
कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट जगतात महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावरचे लोक कंपनीच्या कायदेशीर, प्रशासकीय आणि गव्हर्नन्सशी संबंधित मोठ्या निर्णयांमध्ये भूमिका बजावतात.
जसा कॉर्पोरेट सेक्टरचा विस्तार होतोय आणि कंपन्यांवरील कायदेशीर जबाबदाऱ्या वाढतायेत, तशीच कुशल कंपनी सेक्रेटरींची मागणीही वाढत आहे. चांगला पगार, करिअरमधील स्थैर्य आणि टॉप मॅनेजमेंटसोबत काम करण्याची संधी हे सर्व या प्रोफेशनला खास बनवतात.
हे करिअर निवडण्यासाठी एक स्पष्ट आणि ठरलेली प्रक्रिया आहे, जी 'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया' (ICSI) राबवते.
कंपनी सेक्रेटरी काय करतात?
आपल्या देशात अनेक वेगवेगळे नियम-कायदे असतात. उदाहरणार्थ, रस्त्यावर वाहन चालवताना रेड लाईट आल्यावर कार थांबवायची आहे आणि ग्रीन झाल्यावर चालवायची आहे. नियम तोडल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद असते.
असेच देशात काम करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीतही आहे. त्यांना आपले काम सुरू ठेवण्यासाठी ठरवून दिलेल्या कायद्यांचे पालन करावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे कंपनी कायदा 2013, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 (FEMA), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाचे (SEBI) नियम आणि इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड.
शुभम अब्बड गेल्या 10 वर्षांपासून सीएसच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
ते म्हणतात, "भारतात व्यवसाय योग्य प्रकारे व्हावा यासाठी नियम बनवले गेले आहेत. प्रत्येक कंपनीला मुख्यत्वे कंपनी कायदा, 2013 चे पालन करावे लागते. पण जर कंपनीने असे केले नाही, तर दंड लागतो."
"कंपन्या या नियमांचे पालन करतील हे पाहण्यासाठी भारत सरकारने 1980 मध्ये कंपनी सेक्रेटरी ॲक्ट मंजूर केला होता. त्या ॲक्ट अंतर्गत एक कोर्स बनवला गेला, कंपनी सेक्रेटरी. ज्या कंपनीचे पेड-अप शेअर कॅपिटल 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी कंपनी सेक्रेटरी नियुक्त करणे अनिवार्य आहे."
पेड-अप कॅपिटल म्हणजे ती प्रत्यक्ष रक्कम असते, जी गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याच्या बदल्यात कंपनीला देतात.
एका कंपनीत कंप्लायन्स ऑफिसर असलेल्या मुस्कान सुहाग म्हणतात, "कंपनी सेक्रेटरीकडे लीगल कंप्लायन्स आणि गव्हर्नन्सची जबाबदारी असते. एखादी कंपनी कायदा आणि नियमांनुसार काम करत आहे की नाही, याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. सीएसचे काम फक्त रुटीन फायलिंगपुरते मर्यादित नसते, तर त्यांना मोठे निर्णय घ्यावे लागतात."
त्या पुढे म्हणतात, "कंपनी सेक्रेटरी हे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, फॉरेन कोलॅबोरेशन, जॉइंट व्हेंचर, आर्बिट्रेशन, फायनान्शिअल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्लॅनिंग, कॉर्पोरेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस अशा प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगी कंपनीची गरज असतात. सोप्या शब्दांत सांगायचे, तर कंपनी कायदेशीररित्या, नैतिकतेने आणि प्रक्रियेनुसार योग्य काम करेल, ही जबाबदारी कंपनी सेक्रेटरीची आहे."
बऱ्याच वेळा कंपनी सेक्रेटरीची तुलना चार्टर्ड अकाउंटंटशी केली जाते. एक असा समज आहे की, जे सीए करू शकत नाहीत, ते सीएसकडे वळतात. मात्र, तज्ज्ञ हा समज पूर्णपणे फेटाळून लावतात.
चार्टर्ड अकाउंटंटपेक्षा किती वेगळे?
देशातील काही कठीण परीक्षांमध्ये चार्टर्ड अकाउंटंटची गणना होते. पण जाणकार कंपनी सेक्रेटरीलाही तितकेच कठीण मानतात.
मुस्कान सुहाग म्हणतात, "सीएचे काम आणि त्यांचे मुख्य क्षेत्र अकाउंटिंग, टॅक्सेशन, फायनान्शिअल रिपोर्ट्सशी संबंधित असते. तर कंपनी सेक्रेटरीचे मुख्य क्षेत्र कंपनी लॉ, टॅक्स लॉ, बिझनेस लॉ, कंप्लायन्स लॉ हे सर्व असते. दोघांची कामे खूप वेगळी आहेत, कॉर्पोरेटमध्ये दोन्ही प्रोफेशनल्सची क्षेत्रे पूर्णपणे वेगळी आहेत."
शुभम अब्बड याच गोष्टीला दुजोरा देत म्हणतात, "सीए आणि सीएसची तुलना करणे म्हणजे हाडांच्या डॉक्टरची आणि डोळ्यांच्या डॉक्टरची तुलना करण्यासारखे आहे. आता दोन्ही डॉक्टरच आहेत, पण दोघांची क्षेत्रं एकदम वेगळी आहेत."
कंपनी सेक्रेटरी कसे बनायचे?
रमनदीप सिंह हे सीएस आणि सायबर लॉयर सुद्धा आहेत. ते सांगतात की, भारतात कंपनी सेक्रेटरी बनायचे असेल, तर यासाठी कोणतेही कॉलेज नसते.
याचा अभ्यास 'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया' म्हणजेच ICSI करून घेते, जे भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत येते.
हा कोर्स करण्यासाठी वयाची किंवा किमान गुणांची अट नसते. बारावी किंवा पदवीमध्ये 40 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतात.
ICSI नुसार, सध्या याच्या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये सुमारे 4 लाख विद्यार्थी शिकत आहेत. याचे मुख्यालय दिल्लीत आहे आणि चेन्नई, कोलकाता, मुंबई येथे प्रादेशिक कार्यालये आहेत. देशात याची सुमारे 75 सेंटर्स आहेत.
त्यांनी सांगितले की, जर एखाद्या विद्यार्थ्याला 12वीनंतर कंपनी सेक्रेटरी बनायचे असेल, तर त्यांना हा कोर्स करण्यासाठी 3 टप्पे पूर्ण करावे लागतात.
- सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) (याला पूर्वी फाउंडेशन कोर्स म्हटले जायचे)
- एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम
- प्रोफेशनल प्रोग्रॅम
CSEET वर्षातून तीनदा होते. फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबरमध्ये. यामध्ये 4 पेपर असतात, ज्यापैकी 3 डिस्क्रिप्टिव्ह असतात आणि 1 ऑब्जेक्टिव्ह.
हे पास झाल्यानंतर विद्यार्थी जेव्हा सीएस एक्झिक्युटिव्हमध्ये येतात, तेव्हा त्यांना दोन ग्रुपमध्ये पेपर द्यावे लागतात. एका ग्रुपमध्ये 4 पेपर आणि दुसऱ्यात 3 पेपर असतात.
त्यासोबतच त्यांना एक महिन्याचे ट्रेनिंग करावे लागते - EDP (एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम) हे ICSI च आयोजित करते. पण दोन्ही ग्रुपचे पेपर एकत्र द्यायचे की वेगवेगळे, ही विद्यार्थ्याची निवड असते. एक्झिक्युटिव्हमध्ये वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये पेपर होतात.
ते म्हणतात की, वेगवेगळे पेपर देण्याचा एक तोटा असा आहे की, सीएस इन्स्टिट्यूट इंडियामध्ये टॉप 50 रँकिंग काढते. हे रँक फक्त त्यांनाच दिले जातात जे दोन्ही ग्रुप एकत्र देतात.
रमनदीप यांच्या मते, सीएस एक्झिक्युटिव्ह क्लिअर केल्यानंतर विद्यार्थ्याला 21 महिन्यांची आर्टिकलशिप करणे आवश्यक आहे. ही एखाद्या प्रॅक्टिसिंग सीएसच्या हाताखाली, सीएस फर्ममध्ये किंवा एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या सीएसच्या हाताखाली करावी लागते. हे पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सीएस क्वालिफाईडचे सर्टिफिकेट मिळत नाही.
आर्टिकलशिप पूर्ण झाल्यावर आणि सीएस प्रोफेशनलची परीक्षा पास झाल्यावर पुन्हा एक महिन्याचे ट्रेनिंग करावे लागते, ज्याचे नाव आहे कॉर्पोरेट लर्निंग डेव्हलपमेंट प्रोग्राम (CLDP). हे ट्रेनिंग सुद्धा इन्स्टिट्यूटच घेते.
जर विद्यार्थी एखाद्या ग्रुपच्या एक विषयात जरी नापास झाला, तरी त्याला तो पूर्ण ग्रुप पुन्हा द्यावा लागतो.
सीएस कोर्समध्ये कोणते विषय आणि किती फी?
मुस्कान सुहाग सांगतात की, CSEET मध्ये 4 पेपर असतात. तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये 7 पेपर असतात जे 2 ग्रुपमध्ये विभागलेले असतात आणि प्रोफेशनल प्रोग्राममध्येही 7 पेपर असतात जे 2 ग्रुपमध्ये विभागलेले असतात.
कोणत्याही विद्यार्थ्याला सीएस म्हणून पात्र होण्यासाठी CSEET, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल या तिन्ही प्रोग्रामच्या प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण मिळवणे आणि एकूण 50 टक्के असणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामची शिक्षण फी सुमारे 17 हजार रुपये आणि प्रोफेशनल प्रोग्रामची फी 20 हजार रुपयांच्या आसपास असते.
भविष्यातील संधी आणि प्रगती
तज्ज्ञांच्या मते, कंपनी सेक्रेटरी हे एक असे पद आहे, ज्याची नियुक्ती करणे कायद्यानेच बंधनकारक आहे. भविष्यातही कंपनी सेक्रेटरींची मागणी वाढेल.
शुभम अब्बड म्हणतात, "उद्योग जगत वेगाने वाढत आहे. नवीन नियम येत आहेत, कायदे बदलत आहेत, स्टार्टअप्स येत आहेत. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे, या सर्व ठिकाणी कंपनी सेक्रेटरी हवेत. आता तर नवीन लेबर कोड्सही आले आहेत."
"नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, सेबीसारख्या संस्थांमध्ये कंपनी सेक्रेटरी आपल्या क्लायंटची बाजू मांडू शकतात. त्यामुळे कंपनी सेक्रेटरींची मागणी आणि त्यांच्यासाठी संधी दिवसागणिक वाढत आहेत."
तसेच मुस्कान सुहाग म्हणतात, "हा कमी खर्चात असा कोर्स आहे जो उत्तम भविष्य देतो. सुरुवातीचा पगारच 50 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असतो."
पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) कंपनी सेक्रेटरींच्या नोकऱ्यांवरही परिणाम होईल का? बहुतेक जाणकार याच्याशी थोडेफार सहमत आहेत.
रमनदीप म्हणतात, "AI चा धोका सीएस करणाऱ्यांना होऊ ही शकतो किंवा नाही. बरेच सीएस असे आहेत जे फक्त फॉर्म फायलिंग करतात, मिनिट्स बनवतात. ही जी कामे आहेत, त्यांना येणाऱ्या काळात AI रिप्लेस करेल."
"पण कंसल्टन्सीची कामे जसे की पैसे कोठे गुंतवायचे, एखाद्या कंपनीचे मर्जर (विलीनीकरण) कसे होऊ शकते किंवा परिस्थितीशी कायदा जोडणे हे फक्त सीएसच करू शकतो. कोठे कोणते नियम लागतील, अशा विश्लेषणात्मक कामाला AI रिप्लेस करू शकत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)