अंपायर्सना एका दिवसाचे किती पैसे मिळतात? अंपायर म्हणून करिअर करण्यासाठी काय करावं?

    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी हिंदी

गोलंदाजानं टाकलेला एक चेंडू फलंदाजाच्या पॅडला लागतो... गोलंदाजासह इतर क्षेत्ररक्षक जोरदार अपील करू लागतात... सगळ्यांचीच नजर अंपायरकडे असते... अंपायर काही क्षण विचार करतो आणि त्यांनी हाताचं बोट उंचावताच निराश होत फलंदाज मैदानाबाहेर चालू लागतो...

क्रिकेटच्या सामन्यात अगदी नेहमीच दिसणारं हे चित्र. एखादा फलंदाज पायचित होतो तेव्हा शक्यतो असंच काहीतरी पाहायला मिळतं.

त्यामुळं क्रिकेटमध्ये खेळाडूंशिवाय आणखी दोन जण दिसत असतात. खेळाडूंएवढेच तेही महत्त्वाचे असतात. कोणत्याही संघाशी त्यांचा संबंध नसतो, पण त्यांच्याशिवाय कोणताही सामना होत नाही.

त्यांच्या निर्णयांवर सामन्याची दिशा बदलण्याची शक्यता असते. हे दोन जण म्हणजे सामन्यातील अंपायर.

पण अंपायर होणं ही काही सोपी गोष्ट नाही. फक्त नियम लक्षात ठेवून अंपायर बनता येऊ शकतं असं नाही. अंपायर बनण्यासाठी अनेक वर्ष कठोर परिश्रम, प्रशिक्षण आणि चुकांमधून मिळालेले धडे तसंच अनुभव गरजेचा असतो.

याबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत.

अंपायर कसे होता येते? त्यासाठी क्रिकेटपटू बननं गरजेचं आहे की, इतरही काही पर्याय आहेत? त्यातून किती पैसे मिळतात आणि या करिअरमध्ये 'ग्रोथ'ची किती शक्यता असते?

बीबीसी मराठीनं वाचकांसाठी आणि या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी काही प्रसिद्ध अंपायरांकडून या प्रश्नांची उत्तरे मिळवली आहेत.

'फक्त क्रिकेटचे ज्ञान पुरेसे'

अंपायर बनण्यासाठी विशेष शिक्षण गरजेचं आहे का? असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याचं उत्तर 'नाही' असं आहे.

तुमचा अभ्यासाचा विषय काहीही असला तरी, तुम्हाला क्रिकेटच्या नियमांमध्ये रस असायला हवा. शिवाय, यासाठी मैदानावर बराच वेळ उभं राहावं लागतं. त्यामुळं शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणंही गरजेचं आहे.

बीसीसीआय आणि नंतर आयसीसी पॅनलमध्ये अंपायर म्हणून काम केलेले एस.के. बन्सल सांगतात की, "अंपायर होण्यासाठी फक्त क्रिकेटचं ज्ञान पुरेसं आहे."

बन्सल मार्च 2001 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्यात अंपायर होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत भारतीय संघाननं फॉलोऑन मिळाल्यानंतरही कांगारुंना पराभूत करत इतिहास रचला होता. या सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 281 आणि राहुल द्रविडच्या 180 धावांच्या खेळी आजही क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक ठरतात.

बन्सल यांच्या मते, "कोणी क्रिकेट खेळलं असेल किंवा खेळत असेल तर तोही अंपायरिंग चांगली करू शकतो. पण काहीही क्रिकेट न खेळता या क्षेत्रात येता येईल असं वाटत असेल तर ते कठीण काम ठरू शकतं."

तज्ज्ञांच्या मते, अंपायर बनण्यासाठी चांगल्या संवाद कौशल्यासह इंग्रजीचं ज्ञान गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये सामान्यपणे इंग्रजी भाषाच वापरली जाते. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विविध देशांचे खेळाडू भाग घेतात आणि इंग्रजी हेच संवादाचं माध्यम असतं.

आता वयाबद्दल बोलायचं तर अंपायर बनण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा देण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असायला हवे.

अंपायर बनण्यासाठीची प्रक्रिया काय?

तुमचं वय 18 ते 40 दरम्यान असेल तर तुमच्या राज्याच्या क्रिकेट संघटनेत नोंदणी करा. उदाहरणार्थ, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र क्रिकेट संघटना किंवा इतर ठिकाणी त्या राज्याच्या क्रिकेट संघटनेत नोंदणी करा.

अंपायर अनिल चौधरी यांना अनेक आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांमध्ये अंपायर म्हणून आपण पाहिलं आहे. सध्या ते कॉमेंट्री म्हणजेच समालोचन आणि क्रिकेट अंपायरिंगवरील व्हीडिओही बनवत आहेत.

आम्ही त्यांना नोंदणी प्रक्रियेबाबत विचारलं. ते म्हणाले की, "नोंदणी कोणीही करू शकतं. त्यासाठी शिक्षणाबद्दल काहीच नियम नाही. अगदी 12 वी पास व्यक्तीही अंपायर बनू शकते. नोंदणीनंतर राज्य संघटनेतील अधिकारी किंवा अंपायरिंग इन्चार्जना भेटा. तुम्हाला अंपायरिंगमध्ये रस असल्याचं त्यांना सांगा. तिथून सुरुवात करा. तोपर्यंत कोणत्याही परीक्षेची गरज नसते."

अनिल चौधरी यांच्या मते, "त्यानंतर पुढचा फॉर्म भरायचा असेल तर तेच तुम्हाला सांगतात. त्यांच्या लीग सामन्यांमध्ये अंपायरिंगची संधी मिळाली तर नक्की करा. स्थानिक पातळीवर जी प्रक्रिया असेल त्यानुसार पुढील पावलं उचला. त्याठिकाणी जे वरिष्ठ अंपायर्सना भेटा. ते तुम्हाला प्रक्रिया सांगतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला पुढं जायचं असेल तर प्रवास हा राज्याच्या संघटनेपासूनच सुरू होतो."

अंपायर म्हणून काम सुरू करण्यासाठी कोणतीही परीक्षा नसते, असं अनिल चौधरी सांगतात. पण राज्य क्रिकेट असोसिएशन पॅनल तयार करते तेव्हा त्यात निवडीसाठी एक परीक्षा असते. संबंधित संघटनात ती परीक्षा घेत असतात.

"बीसीसीआयमध्ये अंपायर बनण्यापूर्वी स्थानिक सामन्यांचा अनुभव आवश्यक आहे. नंतर राज्य संघटनांनी पाठवलेल्या नावांना बीसीसीआयची परीक्षा द्यावी लागते. बीसीसीआयकडून आधी लेव्हल 1 आणि लेव्हल 2 परीक्षा घेतली जायची. पण आता एकच परीक्षा असते."

काम कसं मिळतं?

कोणतीही क्रिकेट संघटना अंपायर्ससाठी परीक्षा घेते तेव्हा शक्यतो सोशल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर परीक्षा कधी घेणार याची घोषणा करत असतात.

अनिल चौधरींच्या मते, "अनेक राज्यांच्या संघटना आधी स्वतःच्या परीक्षा घेतात आणि नंतर बीसीसीआयच्या परीक्षेसाठी ते नावं पाठवतात. त्यात साधारणपणे अंपायरिंग करणारे आणि राज्याच्या नवीन नियमांची माहिती असणाऱ्यांचीच नावं पाठवली जातात."

लेखी(थेअरी), प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) आणि शेवटी मुलाखत (व्हायवा) असा परीक्षेचा फॉरमॅट असतो. तिन्ही परीक्षांमध्ये मिळून 90 टक्के गुण मिळाल्यास पुढे जाता येतं, असं त्यांनी सांगितलं.

बीसीसीआयची परीक्षा पास झाल्यानंतर अंपायर म्हणून सामने मिळू लागतात. पण सुरुवातीला ज्युनियर स्तरावर म्हणजे अंडर-15 आणि अंडर-18 अंपायरिंग मिळते असं चौधरी म्हणाले. हळूहळू गुणवत्ता आणि तुमची कामगिरी सुधारल्यानंतर बीसीसीआय बढती देतं, असंही त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते, यानंतरच दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, टी20 आणि टी20 नॉकआउट्स सारख्या मोठ्या सामन्यांचं अंपायरिंग करण्याची संधी मिळते. हा प्रवास अंदाजे पाच ते सहा वर्षे चालतो.

त्यानंतर, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अंपायर्सना आधी आयपीएल आणि नंतर आंतरराष्ट्रीय सामनेही मिळू लागतात.

चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयमध्ये अंदाजे 150 अंपायर असून, सरासरी दर तीन वर्षांनी एकदा नवीन अंपार्यसच्या जागा भरल्या जातात.

आयसीसीकडून संधी कशी मिळते?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (ICC) जगभरातील सर्वोत्तम अंपायर्सचं एक पॅनल आहे. हे पॅनल 2002 मध्ये पहिल्यांदा स्थापन करण्यात आलं होतं.

भारताचे नितीन मेनन सध्या या पॅनेलचे सदस्य आहेत. या पॅनेलचे सदस्य विश्वचषक किंवा कसोटी मालिकेसारख्या आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये अंपायर असतात.

एस. के. बन्सल हेही या पॅनेलचे सदस्य आहेत.

त्यांच्या मते, "बीसीसीआयच्या अंपायरर्सपैकी फक्त दोन किंवा चारच आंतरराष्ट्रीय अंपायर बनू शकतात. अनुभवानुसार बीसीसीआयकडून प्रत्येक सामन्यातील त्यांच्या कामगिरीचा अहवाल तयार केला जातो. त्या आधारावर त्यांना आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामने मिळतात."

"एलिट पॅनलचा अर्थ एक्स्ट्रा ऑर्डिनरी अंपायरिंग असा होतो. त्यांना विश्वचषक किंवा आशिया चषकासारख्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून बोलावलं जातं. कारण त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता अगदी कमी असते," असं त्यांनी सांगितलं.

काय अभ्यास करावा?

मग जर अंपायर बनण्यासाठी विशिष्ट पदवीची गरज नसेल तर त्याच्या तयारीसाठी काय अभ्यास करावा? त्यासाठीची पुस्तकं कोणती? ती कुठं मिळणार? असे प्रश्न निर्माण होतात.

याबाबतही अनिल चौधरी यांनी काही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की,

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे MCC (मेरिलेबोन क्रिकेट क्लब) लॉ बूक असायला हवं. ते ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत.

कायद्याच्या संकल्पना समजून घेण्यासाठी मदत करणारं आणखी एक पुस्तक म्हणजे टॉम स्मिथ याचं अंपायरिंग अँड स्कोअरिंग. त्याची नवी आवृत्ती खरेदी करा.

त्यानंतर, बीसीसीआयचे नवीन नियम (प्लेइंग कंडिशन्स) वाचा, कारण परीक्षा बीसीसीआयच्या नियमांवर (प्लेइंग कंडिशन्स) आधारित असेल.

अनिल चौधरी यांच्या मते, बीसीसीआयला अंपायरिंगसाठी असे लोक हवे असतात ज्यांनी क्रिकेट खेळले असेल. पण त्यांच्या निवडीची प्रक्रिया सारखीच आहे.

फिटनेस किती महत्त्वाचा?

कोणत्याही व्यक्तीला अंपायर बनण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात.

एखाद्याची दृष्टी कमकुवत असेल, पण चष्म्याने दिसत असेल, तर अशा लोकांना निवडण्यात काहीच अडचण येत नाही.

अनिल चौधरी सांगतात की,"उमेदवार वजन, कान, डोळे इत्यादी बाबतीत तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. जास्त वजन असलेला अंपायर सात-आठ तास मैदानावर कसा उभा राहणार. सध्या खेळाचा वेग खूप वाढलाय. कोणी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसेल तर तो मानसिकदृष्ट्याही थकतो. मग सर्व काही बिघडते."

त्यांच्या मते, काही गोष्टी या शैक्षणिक ज्ञानापेक्षाही महत्त्वाच्या आहेत. आत्मविश्वास असायला हवा. निर्णय घेण्याची क्षमता असावी. मैदानाबाबत एक प्रकारचा आदर आणि संवाद कौशल्य चांगलं असावं. पण त्याचा अर्थ फक्त चांगलं इंग्रजी बोलणं एवढा नाही.

एस. के. बन्सल म्हणाले की, "चष्मा असला तरी, दृष्टी चांगली असली पाहिजे. कारण जर चेंडू दिसत नसेल तर काय करणार. प्रत्येक चेंडूवर हालचाल करता येईल एवढी तंदुरुस्ती असायला हवी. बॅटरनं समोरून शॉट मारला आणि स्वतःला वाचवता आलं नाही, तर मग तो कसला अंपायर? बॅटरला जसं स्वतःच्या शरीराला लागू न देता बॅटने बॉल मारायचं माहिती असतं तसंच अंपायरलाही शरीराची काळजी घ्यावी लागते, आणि ते केवळ फिटनेसद्वारेच शक्य आहे."

पैसे किती मिळतात?

तज्ज्ञांच्या मते, अंपायरिंग हे असं क्षेत्र आहे ज्यात चांगले पैसे आणि सुविधाही मिळतात.

अनिल चौधरी यांच्या मते, "तुम्हाला फाईव्ह स्टार किंवा चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळते. हवाई प्रवासाचे पैसे मिळतात. इतर काही भत्तेही मिळतात. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतक्या सुविधा देतं ज्या अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंपायरर्सनाही मिळत नाहीत."

त्यांच्या मते, सध्या क्लब सामन्यांमध्ये, अंपायर दररोज सरासरी तीन हजार रुपये कमवतात. त्याशिवाय प्रवास आणि राहण्याचा खर्चही मिळतो.

"तुम्ही बीसीसीआयमध्ये अंपायरिंग सुरू करता तेव्हा तुम्हाला सामन्याच्या एका दिवसाचे 40,000 रुपये मिळतात. सामना पाच दिवसांचा असेल आणि दोन दिवसांत संपला तरी पाचही दिवसांचे पैसे मिळतात. बीसीसीआयमध्ये अंपायरिंग करणाऱ्यांना वर्षात अंदाजे 40 दिवस अंपायरिंग मिळते. काही लोक 70 दिवसही अंपायरिंग करतात."

अनिल चौधरी यांच्या मते, "फक्त ऊन, थंडी, धूळ आणि आक्रमक खेळ सुरू असतानाही मैदानावर शांत राहण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी."

अंपायर्ससाठी निवृत्तीचं वय 65 आहे. पण बहुतांश लोक 60 वर्षांतच निवृत्त होतात. त्यानंतर त्यांना बीसीसीआयकडून कोणतेही फायदे मिळत नाहीत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.